Friday, November 27, 2015

अभिव्यक्तींचे असहिष्णु राष्ट्र

            वाचाळ वीरांनो सावध व्हा! हे राष्ट्र हिंदूंचे आहे की मुस्लिमांचे अथवा गरीबांचे आहे की श्रीमंतांचे अथवा पुरोगाम्यांचे आहे की प्रतिगाम्यांचे अथवा राजकारण्यांचे आहे की जनतेचे, यामध्ये भरीस भर म्हणून आता सहिष्णू विरुद्ध असहिष्णू हा नवा वर्ग विनाकारण या वाचाळवीरांकडून तयार केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून कधीही काहीही बडबड करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना एवढेच म्हणावेसे वाटते की थांबवा हे आता. देशाला प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी तुमच्या अशा वागणुकीची, बोलण्याची आवश्यकता नाही.
            भारत देशाच्या संविधानाने देशातील सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. याचा अर्थ असा होत नाही की, काहीही कुठेही ऊठसूट बोलत सुटले पाहिजे. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्तीने तुम्ही प्रेरित असाल तर जनता अशा अवास्तव बोलण्यास थारा देणार नाही हेच खरे, परंतु २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून जो काही नवा रंग या साहित्यिक तत्त्ववाद्यांनी पांघरला आहे, त्याचा भविष्यातील भारतास धोका जाणवतो आहे. आजकाल बोलण्याचा अधिकार आहे म्हणून कोणीही काहीही बोलते, त्याचा या टीआरपीवाल्या बुजगावण्यांकडून वेगळाच अर्थ काढला जातो. अर्थातच विपर्यास होतो अन् देशामध्ये अस्थिर वातावरण निर्माण वाव दिला जातो. भारत देशाने आजवर खूप सोसलेले आहे. परकीय आक्रमणे, देशातील अंतर्गत वाद यांमध्ये देश आजवर अनेक वेळा होरपळून निघालेला आहे. हा वाद देशास नवा नव्हे! तर मग हा अखंड, एकसंध भारत देश या वाचाळवीरांना आजच का असहिष्णू वाटावा? मान्य आहे की, काही लोकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी देशात अस्थिरता पसरवण्याचा सचोटीने प्रयत्न केला जात आहे. शेवटी ते राजकारणीच. परंतु असे करतेवेळी देश अराजकतेकडे झुकत आहे, याचे त्यांना थोडे देखील भान उरलेले नाही. देशात असहिष्णुता वाढत आहे, असे सांगणारे, ओरडून, छाती बडवून, पटवून देणारेच खरेतर असहिष्णुतेचा कांगावा करत एक प्रकारे देशद्रोह करत आहेत. त्यांना नकळत साथ मिळते ती या टीआरपीवाल्या माध्यमी टोळांची. त्यात मग सत्तेवर असणारे वाचाळवीर आणि विरोधक, दोन्ही बाजूंचे लोक अभिव्यक्तीचा ढोल पिटत एक बोलतात अन् माध्यमे त्याचा दुसरा अर्थ काढून देशभर त्या वक्तव्याचा डंका पिटतात. का? याचे उत्तर कोणाकडेच नाही.
            देशाचा इतिहास पहाल तर अफगाणिस्तानपासून बांगलादेशपर्यंतचा अखंड भारत देश असहिष्णू होता की सहिष्णू? येथे आजवर सर्व जाती-धर्मांचे-पंथांचे लोक गुण्यागोविंदाने राहायचे, किंबहुना आजही राहतात. त्यात कधी धर्मांधता अथवा काही गैरसम जुतीतून वादही घडले असतील अथवा राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी घडवले गेले असतील, म्हणून संपूर्ण देशास असहिष्णू म्हणून वेठीस धरणे कितपत योग्य आहे? बरे, ज्यांना देशात असहिष्णुता वाढते आहे असे वाटते, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी यावर भाष्य का करावे? यामुळे असहिष्णुता कमी होऊन देश सहिष्णू होणार आहे का? की अस्थिर देशात हा खोटा कांगावा केल्यास भाबडी जनता काहीतरी चुकीचे करेल? याची जाण आजच्या वाचाळवीरांना असायला हवी.
            अमीर खानच्या पत्नीस, सौ. किरण राव (खान) यांस, असे वाटते की भविष्यात भारत देश आणखी अस्थिर होऊ शकतो. मान्य आहे की आजची परिस्थिती अशीच राहिली तर खरेच भविष्यात भारत देश असहिष्णुतेकडे वाटचाल करेल. परंतु आज ही परिस्थिती नाही, ती परिस्थिती निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्यास विरोध करायचा सोडून श्रीयुत अमीर खान यांनी सार्वजनिक ठिकाणी, चार भिंतींमध्ये पत्नीने व्यक्त केलेली चिंता उघड केली. त्याचा देशभर गहजब सुरू झाला. यामुळे असहिष्णुता संपून राष्ट्र सहिष्णू होणार आहे? किंवा १९८४ साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभर शीख समुदायाविरुद्ध दंगली उसळल्या होत्या. त्यामध्ये एकट्या दिल्ली शहरामध्ये हजारावर शीख समुदायातील नागरिकांच्या हत्या केल्या गेल्या. त्यावेळी देखील शांत बसणाऱ्या उच्चभ्रू साहित्यिकांनी सरकारने त्या त्या वेळी जाहीर रीत्या प्रदान केलेले पुरस्कार आजकाल परत करण्यास सुरुवात केली. खरे बुद्धिजीवी असाल तर तर निषेध करण्याचा तुमचा मार्ग योग्य आहे का? हे या लोकांनी ठरवायला हवे. अभिव्यक्तीचा धिंडोरा पिटणाऱ्या या माजी (वयस्क) साहित्यिकांनी पुरस्कारांसाठी अथवा एखाद्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यावेळी सरकारची चापलुसीच केलेली आहे. राज्यसभा खासदार अन् काही राज्यातील विधानपरिषद सदस्य (आमदार) म्हणून स्वतःचा तोरा मिरवला आहे. मग आता भाजपला हिंदुत्ववादी पक्ष ठरवताना, त्यांची सत्ता आहे म्हणून यांचा राजकीय सेक्युलरवाद जागृत झाला अन् असहिष्णुवादाचे यांना डोहाळे लागले. मग बोलायचेच झाले तर प्रश्नाला प्रश्न अन् शब्दाने शब्द वाढवत दोन्ही बाजूंनी वादात भरच टाकली जाते. तसे पाहता राजकीय वाचाळवीरांचा विचार केल्यास काँग्रेसचे राहुल गांधी, दिग्विजय सिंग, मणिशंकर अय्यर अन् भाजपचे साध्वी, योगी आदित्य नाथ, साध्वी निरंजन ज्योती सारखेच म्हणावे लागतील. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी भाष्य करणाऱ्या या पुढाऱ्यांना स्वतःच अकलेचे तारे तोडताना देशातील सद्य परिस्थितीची काही माहिती असते की नसते?
            पांचजन्य या साप्ताहिकामध्ये दादरी प्रकरणानंतर तुफेल चतुर्वेदी यांनी वेदांचा संदर्भ देतइस उत्पात के उस पारया नावाने एक लेख लिहिला होतात्यामध्ये त्यांनी गोहत्या करणाऱ्या व्यक्तीस देहदंडाची शिक्षा दिली जात असे, असे वेदात म्हटले असल्याचे सांगितले आहे, तर मग तुफेल यांना हा लेख आताच का लिहावासा वाटला? याचा अर्थ त्यांनी दादरी प्रकरणाचे समर्थनच केले असा होतो! मग उघडपणे अशावेळी, असे समर्थन करणे कितपत योग्य की अयोग्य? यावरती प्रसारमाध्यमांनी केवळ चर्चा आणि वाद वाढवून अभिव्यक्तींचा असहिष्णू वाद वाढवणे कितपत योग्य आहे? बरे, देशात एक-दोन घटना घडल्या म्हणून संपूर्ण देशात असहिष्णुता वाढते आहे, अशी भाषा वापरणे प्रसारमाध्यमांना तरी पटते का?
            भारत देशाच्या तुलनेत इतर देशांचा विचार केला तर, आपल्या शेजारील पाकिस्तान, बांगलादेश- मध्ये दिवसाढवळ्या ब्लॉगर्सची हत्या केली जाते. अभिव्यक्तीचे समर्थन हे तिकडे पाप समजले जाते. खुलेपणाने वाचाळपणा करण्यास लोकांना मुभा नाही. अशा देशांप्रमाणे भारतात देखील असे कायदे लागू होत गेल्यास आजच्या वाचाळवीरांचे काय होईल? इराक, इराण, सौदी अरेबिया, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांमध्ये तर सरकारविरोधी अथवा त्या राष्ट्रांच्या धर्माविरोधी भाष्य करणे म्हणजे हत्याच हा नियम असल्यागत वागणूक मिळते. तर मग आजच्या एकसंध भारत देशात विविधतेत एकता गुण्यागोविंदाने नांदत असताना हा नवा वाद उभारण्याची आवश्यकता काय?

            असो, अखंड, एकसंध भारत देश सहिष्णु होत आहे आणि पुढेही राहील यात तिळमात्र शंका नाही. कारण, इंग्रजांनी तोडा आणि फोडा नीतीचा वापर करून देशाची फाळणी घडवून आणल्यानंतरही भारतात आज अनेक जातीधर्मांचे लोक एकत्र राहत आहेत. त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संपूर्ण अधिकारही संविधानाने सर्व लोकांना बहाल केलेला आहे. त्यामुळे अभिव्यक्तीचा फायदा घेऊन असहिष्णुतेचा कांगावा करणाऱ्या वाचाळवीरांना एवढेच म्हणावेसे वाटते की, थांबवा हे सारे. कोण योग्य, कोण अयोग्य, हे बोलत बसण्यापेक्षा संविधानाचा आदर राखत राष्ट्रधर्माचे पालन केले तरच भविष्यात देशाची सहिष्णुता टिकून राहील.