Wednesday, September 28, 2016

एक मराठा लाख मराठा !?!


कोपर्डीतील घटनेचे पडसाद म्हणून ठीक ठिकाणी मराठा समाजाकडून अत्यंत शिस्तबद्ध रीतीने मूक मोर्चे काढले जात आहेत. (नक्कीच स्वागतहार्य आहे, समाज जागृत होत असल्याचे हे लक्षण आहे.)
परंतु कोपर्डी बलात्कार आणि हत्याकांड घटनेत बलात्कार करणारे नराधम दलित समाजातील होते म्हणून एका विशिष्ठ समाजास दोष देणे योग्य नाही...
आजवर अनेक विचित्र मानसिकतेच्या लोकांनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले आहेत.
ते मराठा असोत वा दलित,
मग आजच का, या मोर्चे बांधणीचा अट्टाहास?
ते तरुण दलित होते म्हणून?
की खरंच समाज जागृत झाला आहे म्हणून?
म्हणजे इतर समाजातील विकृत लोक बलात्कार करत नाहीत असंच म्हनायचं?
यावेळी केवळ दलिताकडून मराठ्यांवर अत्याचार असा जो जातीय रंग पसरवला जात आहे तो योग्य नाही(हे पसरवण्यात प्रसारमाध्यमे आघाडीवर आहेत)...

मोर्चे निघत असताना बलात्कार थांबले आहेत का?
मागच्या आठवड्यात एक घटना उघड झाली आहे, जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर सतत तीन वर्षे बलात्कार करून तिचा लैंगिक छळ केला!
मग तो दलित होता की मराठा की आणि कोणी यात तथ्य नाही. तो केवळ एक वासनांध नर होता...
हे मोर्चे समाज भावनांचा उद्रेक दर्शवत असले तरी यामधून जी फलश्रुती होणार आहे, जी शिकवण मिळणार आहे,
त्यामधून या पुरुषप्रधान संस्कृतीस नर आणि मादी या पलीकडील नात्यांचा पडत चाललेला विसर आणि पालक आणि पाल्य यांमधील हरवलेला संवाद सुधारण्यासाठी काही करता येते का हे या समाज बांधवानी विचारात घ्यायला हवे.

'एक मराठा लाख मराठा' चा आवाज देत महाराष्ट्रभर मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाकडून अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धरीतीने या मोर्च्यांचे आयोजन होत आहे. आपल्या मागण्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या या महाराष्ट्रीयन मराठा क्रांती मूक महामोर्च्याची इतिहासात नक्कीच नोंद होणार आहे.
एवढ्या मोठया संख्येने सहभागी होत समाजाने एकत्रित येऊन मोर्चे काढण्याची बहुधा हि पहिलीच वेळ आहे,
असे असले तरी येथे एक गोष्ट स्पष्टपणे विचारावीशी वाटते की,
आज एकत्रित आलेला अखिल मराठा समाज खरंच एकत्रित आहे का हो?
येथे घराघरात, भाऊबंदकीमध्ये भावा-भावामध्ये वाद आहेत (ते इतरांमध्ये पण असतील ही, परंतु आपण घर पातळीवर एकजूट नाही आहोत, तर समाज पातळीवर कसे असू?),
आपली वृत्ती अनेक वेळा खेकड्याप्रमाणे दिसून येते, एकमेकांचे पाय ओढण्याची...
आपल्या गावामधील, भाऊबंदकीतील कष्टाळू आणि तत्पर लोकांना आपण पुढे जाण्याची संधी देत नाही, उलट त्यांच्यासोबत कुत्सित बुद्धीने वागतो,
त्यात बांधला बांध असून शेतीचे वाद, गावातील राजकारण, गटबाजी यामुळेच आजवर महाराष्ट्रात सर्वाधिक असलेला मराठा समाज मागास होत चालला आहे,
प्रमाणात इतर समाज पाहिला, तर ते भाऊबंदकीत आणि संघटन पातळीवर देखील एकत्रित असतात, त्याचा परिणाम म्हणूनच आज मराठा समाजावर मोर्चे काढण्याची वेळ आली आहे.

येथे मराठा समाजामध्ये दोन भावांमध्ये, दोन घराण्यांमध्ये, दोन गल्ल्यामध्ये, दोन गावांमध्ये वाद आहेत.
मग आपण एकत्रित आहात, हे मान्य करायचे कसे?

जर अखिल मराठा समाजास समाज परिवर्तन घडवून आनायचे असेल, सर्व समाज संघटित करून सर्वांना एकत्रित पुढे न्यायचे असेल तर त्यासाठी आधी स्वतःपासून सुरुवात करत, मग कुटुंब, मग गाव आणि मग मराठा समाज असा विचार करत काही बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीचे वाद, वयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवतं एकत्रित येऊन एकमेकास समजून घेण्याची गरज आहे.

तरचं सर्व समाज संघटित होईल आणि सर्वांना सोबत पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.
विचार बदला, मार्ग नक्की सापडेल...!