Saturday, January 24, 2015

भारताचा वाढता प्रभाव आणि शेजारील राष्ट्रे...!

भारताचा वाढता प्रभाव आणि शेजारील राष्ट्रे - नागेश कुलकर्णी

            भारताचे स्थान भौगोलिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आशिया खंड तसेच भारतीय उपखंडात महत्त्वाचे आहे. त्यामध्ये भारताच्या शेजारील राष्ट्रांचा व्यापार बऱ्याच प्रमाणात भारतासोबत होत असतो. सद्य:स्थितीत जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने भारताचे जगामध्ये वजन वाढते आहे. त्यामुळे आपल्या शेजारील काही देश आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आकस बाळगून आहेत. तर काही देश स्वत:चा फायदा कसा होईल याचा विचार करत आहेत.
            भारत हा भारतीय उपखंडामधील सर्वात मोठा भूभाग आहे. त्यामुळे आपण औद्योगिकदृष्ट्या आणि विज्ञान तंत्रज्ञानाने समृद्ध होत आहोत. यामध्ये भर म्हणून केंद्रामध्ये आलेल्या नवीन मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणांमुळे भारताचा जागतिक पातळीवर प्रभाव वाढताना दिसत आहे. आपला वाढता प्रभाव पाहून आपल्या शेजारील भूतान, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या देशांना आनंद झाल्याचे चित्र दिसते.पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि चीन आपल्या विरोधात कटकारस्थाने रचताना दिसून येत आहेत. चीन आणि पाकिस्तान तर एक प्रकारची ईर्षा बाळगून वावरताना दिसून येतात. त्यामुळेच तर नवाज शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सार्क परिषदेच्या बैठकीवेळी भेट होऊ शकली नाही.
            भारत सार्क, आसियान+ आणि जी-२० चा सदस्य राष्ट्र आहे. नुकत्याच या सर्व परिषदांच्या बैठका पार पडल्या. तसे पाहता भारत हा बिमस्टेकचा पण सदस्य आहे. बिमस्टेकमधील सदस्य राष्ट्रे ही भारताकडे मोठा भाऊ म्हणून पाहतात. १९९७ साली स्थापन झालेल्या बिमस्टेकमध्ये सार्कमधीलच बांगलादेश, भारत, श्रीलंका, नेपाळ आणि आसियानमधील थायलंड म्यानमार ही राष्ट्रे आहेत. या संघटनेचा देखील द्विराष्ट्रीय व्यापारासाठी उपयोग केला जातो.
            भारताचा आसियान देशांसोबतचा व्यापार सध्या वृद्धिंगत झाला आहे. भारत हा आसियानचा सदस्य (संस्थापक सदस्य) देश नाही तरी देखील आसियानशी भारताचा व्यापार चालतो. थोडेफार आसियानबद्दल जाणून घ्यायचे झाले तर, आसियानच्या स्थापनेवेळी इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, कंबोडिया, लाओस, म्यानमार, व्हिएतनाम आणि ब्रुनेई ही दहा सदस्य राष्ट्रे अस्तित्वात होती. त्यानंतर यामध्ये १९९७ मध्ये बदल करून चीन, जपान आणि . कोरिया यांचा समावेश करण्यात आला. ते म्हणजे आसियान + तसेच भारताचा देखील समावेश केला गेला. (आसियान+) या सर्व सदस्य आणि इतर राष्ट्रांमध्ये आसियानशी व्यापार भारत आणि चीनकडूनच अधिक प्रमाणात होतो. आसियानशी व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने येथे भारत आणि चीनमध्ये स्पर्धा चालूच आहे. भारताला आसियान आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय, राजकीय आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, त्यामुळेच आपण या भागातील राष्ट्रांवर व्यापारीदृष्ट्या लक्ष केंद्रित केलेले आहे. चीनला निष्प्रभ करण्यासाठी आपण आसियानच्या माध्यमातून आपला व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सार्कबद्दल बोलायचे झाले तर सार्क सदस्य राष्ट्रांमध्ये आपण नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसून येतो. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, मालदिव, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान ही राष्ट्रे सार्क परिषदेतील सदस्य राष्ट्रे आहेत. तर चीन हा निरीक्षकाच्या भूमिकेत आहे. नुकत्याच झालेल्या सार्क परिषदेमध्ये चीनने सार्क देशांचा सदस्य होण्यासाठी आपली बाजू मांडली होती आणि पाकिस्तानने देखील यास पाठिंबा दिला होता. चीन सार्क देशांचा सदस्य होणे म्हणजे भारतास शह देण्याचा प्रयत्न असेच म्हणावे लागेल.
भारताचा वाढता प्रभाव आणि भारत चीन संबंध :
            आशिया खंडात आणि जगात महासत्ता होण्याच्या दृष्टीने या दोन देशांमध्ये सतत चढाओढ होताना दिसून येते. भारताने मार्स मिशन (मंगळयान मोहीम) करून दाखवले. चीनने देखील मंगळयान मोहिमेची घोषणा केली. भारताने अग्निबाण - ची दोन वेळा यशस्वी चाचणी केली. (आंतरखंडीय मिसाईल) चीनने देखील नवीन लष्करी साधनसामग्री विकसित करून देशाचे भूदल अधिक बलवान करण्याची घोषणा केली. भारताने मालदीवला मदत म्हणून १२०० टन पाणी देऊ केले तर चीनने देखील मालदीवला तातडीने १००० टन पाणी विमानांनी पाठवले. सोबतच समुद्राचे खारे पाणी स्वच्छ करण्याचे तंत्रज्ञानदेखील पाठवून दिले. या सर्व उदाहरणांवरून असे दिसून येते की भारताचा वाढता प्रभाव चीनला नकोसा आहे.
            लोकसंख्या, वाढते उद्योगधंदे, विज्ञान तंत्रज्ञान या सर्व बाबतीत चीन आणि भारत जवळपास समसमान प्रगतिपथावर आहेत, त्यामुळे भारत आशिया खंडामध्ये पुढे येऊ पाहत असताना हे चीनला नकोसे आहे, म्हणूनच की काय चीन भारताविरोधात पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना मदत करत आहे.
            चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत भेटीवर आले, त्यावेळी चिनी सैनिक भारतीय हद्दीमध्ये फेरफटका मारून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची अहमदाबादेत साबरमती किनारी बोलणी सुरू असताना चिनी सैन्य उत्तराखंड आणि लडाखमध्ये घुसले होते. भारताने याबद्दल जाब विचारल्यानंतर चीनकडून सैन्य मागे घेण्यात आले, असे म्हटले जाते की भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी चीनने हा डाव खेळला होता.
            भारत चीन संबंध अनेक मुद्द्यांवर आधारलेले आहेत. तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा, आर्थिक महासत्ता होणे, १९६२ साली झालेले भारत-चीन युद्ध, चीनची पाकिस्तानला छुपी मदत, जागतिक पातळीवर भारताने मांडलेल्या धोरणास विरोध करणे, या सर्व प्रकारांमुळे भारत-चीन संबंध सर्वकाळ ताणलेले असतात. त्यातच आता भारताचा जागतिक पातळीवर प्रभाव वाढत आहे, चीनला हे नक्कीच रुचणार नाही.
भारताचा वाढता प्रभाव आणि भारत - पाकिस्तान संबंध :
            भारत-पाकचे सामरिक संबंध स्वातंत्र्यापासूनच ताणलेले आहेत. त्यात भारताचा जागतिक पातळीवर प्रभाव वाढतोय हे पाकिस्तानला पटणारेच आहे. पाकिस्तान सारखा छोटा देश भारताशी नेहमीच स्पर्धा करण्याच्या दृष्टीने पावले टाकत असतो. पाकिस्तानदेखील प्रत्येक वेळी भारताला विरोध करण्याचा प्रयत्न करतो. परंतु पाकिस्तान भारताशी बरोबरी कधीच करू शकणार नाही.
            आशिया खंडामध्ये भारताचे वाढते महत्त्व आणि पुढील काळात पडणारा प्रभाव हे पाकिस्तान ओळखून आहे, त्यामुळे भारतावर दहशतवादी हल्ले करणे, जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण करणे असे प्रकार पाकिस्तानकडून केले जात आहेत. भारताला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असताना पाकिस्तान चीनच्या मदतीने पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर-चीन असा हिमालयामधून मार्ग तयार करत आहे. त्यामुळे भारत-पाक संबंधांमध्ये चीन देखील बऱ्याच प्रमाणात अडसर ठरत आहे.
            नुकतेच पाकिस्तानने भारताचा जुना मित्र असलेल्या रशियाकडून अधिक किंमतीमध्ये शस्त्रास्त्रे खरेदी केली. हा भारत रशियामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होता. भारत सध्या अमेरिका, जपान सारख्या राष्ट्रांच्या अधिक जवळ जात आहे. त्यामुळे रशियाला हे खपणार नाही असे समजून पाकने खेळलेली ही खेळी होती. परंतु रशियन अध्यक्ष पुतिन यांनी याचे स्पष्टीकरण देऊन पाकिस्तानचे तोंड बंद केले. काहीही असले तरी भारताचा वाढता प्रभाव पाकिस्तानला पटणारा नाहीच, कारण पाकिस्तान भारताला आजवर आपला शत्रूच मानत आलेला आहे.
भारताचा वाढता प्रभाव आणि अफगाणिस्तान, नेपाळ, भूतानसारख्या राष्ट्रांची भूमिका :
            नेपाळ, भूतान ही दोन राष्ट्रे भारताला सदैव मोठ्या भावाच्या भूमिकेत पाहतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रथम विदेश दौऱ्यासाठी भूतानची निवड करून हे त्यांचे म्हणणे सार्थ करून दाखवले. या भेटीदरम्यान भूतानबरोबर आणि नंतर नेपाळ भेटीदरम्यान नेपाळबरोबर अनेक सामरिक करार विनाशर्त करण्यात आले. तेथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या देण्यात आल्या. तेथे हायड्रोइलेक्टिक पॉवर प्लाण्ट उभारण्याच्या घोषणा करण्यात आल्या. तेथील पर्यटनास गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु नेपाळ आणि भूतान ही दोन राष्ट्रे भारत चीनच्या मध्ये Land Lock राष्ट्रे आहेत. म्हणजेच ही दोन राष्ट्रे Buffer State म्हणून गणली जातात. याचाच अर्थ असा होतो की, भारताचा वाढता प्रभाव असो वा नसो किंवा चीन महासत्ता बनो अथवा बनो ज्या देशांकडून जे काही मिळेल, जेवढे मिळेल ते घेत राहणे, आणि स्वत:ची उपजीविका चालवणे हा प्रकार या दोन राष्ट्रांमध्ये दिसून येतो.
            भारताबरोबरच चीन देखील नेपाळमध्ये गुंतवणूक करत आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने नेपाळी तरुणांना चिनी भाषेचे प्रशिक्षण चीनकडून दिले जात आहे. असे असले तरी ही दोन राष्ट्रे भारतासाठी चीनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची राष्ट्रे आहेत. अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झाले असले तरीदेखील तेथील नवीन सरकार भारतधार्जिणेच दिसून येते. कारण आजवर भारताने स्वत:चा विकास साधत असतानाच अफगाणिस्तानला देखील बऱ्याच प्रमाणात मदत केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये अंतर्गत कलह काहीही असो परंतु जागतिक पातळीवर बऱ्याचवेळा अफगाणिस्तान भारताच्या बाजूने उभा राहतो.
भारताचा वाढता प्रभाव आणि श्रीलंका, बांगलादेश या राष्ट्रांची भूमिका :
            भारत हा भारत आहे, म्हणजेच हे एक विशाल राष्ट्र असताना देखील ही दोन राष्ट्रे आपल्या पद्धतीने भारताशी टक्कर देण्याचा प्रयत्न करतात. कधी भारताच्या बाजूने तर कधी विरोधात भूमिका या राष्ट्रांकडून घेतली जाते. भारताला शह देण्यासाठी चीन श्रीलंकेमध्ये गुंतवणूक करत आहे, व्यापारिकदृष्ट्या हिंदी महासागरातून श्रीलंकेद्वारे व्यापार वाढवण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो. या गोष्टी जाणून श्रीलंका याचा फायदा करून घेत आहे. भारताचा प्रभाव वाढत जरी असला तरी देखील चीनकडून जेवढे मिळवता येईल तेवढे मिळवू अशा भूमिकेत सध्या श्रीलंका आहे.
            वाढता तामिळविरोधी मुद्दा, समुद्रातील मासेमारी, कच्चतिवू बेटे यामुळे भारत-श्रीलंकेमध्ये जरी वाद असला तरी देखील श्रीलंका भारताच्या बाजूने असते, परंतु चीनमुळे भारत-श्रीलंका संबंध सध्या दुरावताना दिसत आहेत.
            तसे पाहता भारतानेच जन्माला घातलेले बांगलादेशसारखे राष्ट्र देखील कधी भारताच्या बाजूने तर कधी भारताच्या विरोधात उभे राहते. प्रत्येक वेळी बांगलादेश आपली बाजू बदलताना दिसून येतो. तेथील सरकारवर हे अवलंबून असते.
            भारताचे आशिया खंडातील वाढते महत्त्व लक्षात घेता आता बांगलादेश देखील भारताशी संबंध सुधारू पाहात आहे. त्यामुळे नुकताच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बांगलादेशचा दौरा केला. बांगलादेशमध्ये वीज संकट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना भारताकडून विजेचा पुरवठा होतो म्हणून सध्या तरी बांगलादेश भारताच्या बाजूने भूमिका मांडताना दिसून येतो.
            १६ मे २०१४ रोजी भारतामध्ये सरकार बदलले, त्या दिवसापासून भारताच्या विकासात भर पडली. सार्क देशांच्या प्रमुखांना मोदींनी शपथविधीस बोलावून एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला. नंतर जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, फिजी सारख्या देशांना भेटी देऊन विविध सामरिक करार करण्यात आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष,अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, कॅनडाचे मंत्री, थायलंड, व्हिएतनामचे मंत्री, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर आले. २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने भारतभेटीचे आमंत्रण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी स्वीकारले. या सर्व घटनाक्रमावरून जागतिक पातळीवर भारताचा प्रभाव वाढत आहे हेच दिसून येते. जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने भारताची पावले पडत आहेत याचीच ही अनुभूती आहे.

            भारताचा प्रभाव उपखंडात वाढत असला तरी याचा फायदा करून घेण्याच्या दृष्टीने शेजारील राष्ट्रे आपल्या बाजूने उभी राहतात अथवा विरोधात हे येणारा काळच ठरवेल.