Friday, April 24, 2015

वैचारिक मतभेद

आजकाल विचार स्वातंत्र्य आणि शब्द स्वातंत्र्य यांमध्ये बरीचशी तफावत दिसून येते. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य असले तरी केवळ सनसनाटी बातम्या निर्माण करण्याच्या उद्देशाने अंगीकारलेला बोलघेवडेपणा आणि त्यातून ढासळत चालेली विचारसरणी, यामुळे अनेकजण नावीन्यपूर्ण रीतीने अकलेचे तारे तोडत असतात, त्यातूनच त्यांच्या बुद्धीप्रामाण्यवादाचा ढोंगीपणा दिसून येतो.
कट्टरतावाद असो अथवा डाव्या विचारसरणीतून तुटपुंज्या वैकल्पिक विषयांवर केलेले भाष्य असो, या वैचारिक मतभेदांमधून साध्य/असाध्यचा मुद्दा विसरला जातो. वैचारिक पंडितांची रेलचेल वैचारिक सांस्कृतीस ओढून ताणून आपापल्या परीने मांडत असते. स्वतःचेच म्हणणे खरे कसे हे पटवून देण्यासाठी ते संविधानालादेखील आव्हान देण्यास तयार होतात. परंतु स्वतःच्या विचारांना ऐतिहासिक पाठबळ आणि कधीकधी तर ठोस पुराव्यांची जोड देण्यास मात्र ते विसरतात. यामधून काय निष्पन्न होते? मग मतभेद वैचारिक पातळीवरून शाब्दिक पातळीवर नेले जातात. अर्वाच्य भाषा वापरली जाते. यासाठी प्रसारमाध्यमे जेवढी दोषी आहेत तेवढाच डाव्या विचारसरणीकडे झुकत चाललेला तुटपुंजा वर्ग देखील दोषी आहेच. दोन पुस्तके अधिक वाचून अथवा लिहून वैचारिक धोरणे पोसली जाऊ शकतात. परंतु त्या विचारांना अध्यात्मविचारांची जोड असल्याखेरीज ते देशहितकारक होऊ शकत नाहीत. (मी येथे सरळ डाव्या विचारांवर काहीही टीकाटिप्पणी करत नाही. त्यांचे विचार त्यांच्या दृष्टीने का होईना पण उत्तम आहेत.)
तसेही वैचारिकता, नीतिमत्ता ही मनुष्यानुसार बदलत असते, त्यामुळे आपण याबाबतीत अधिक काही तर्कवितर्क मांडणे त्यांना (विचारवंतांना) गैरसोयीचे होऊन बसेल. प्रसारमाध्यमांवरून तासन्तास एखादा विषय चघळत बसणार्या काही (अपवाद आहेत) व्यक्तींच्या विचारांमधून काय निष्पन्न होते? अथवा देशाची परिस्थिती कोठून कोठे जात आहे? याचा विचार सामान्य माणसाने करायला हवा. भलेही तुमचे वैचारिक मतभेद असतीलही परंतु तिकडे देशाचे पंतप्रधान विदेश दौर्यावरून असताना फ्रान्स, जर्मनीमध्ये ऐतिहासिक निर्णय घेतात...! त्याची साधी बातमीसुद्धा जनतेपर्यंत योग्य रितीने प्रसारमाध्यमांकरवी पोचवली जात नाही. तर दुसरीकडे अज्ञातवासातून इच्छा नसताना दर्शन देणारे काँग्रेसचे युवराज देशात प्रकट झाले तर प्रसारमाध्यमांवर त्यांच्या आगमनाबद्दल चर्चेच्या मैफिली रंगवल्या जातात. किती हे टोकाचे वैचारिक मतभेद? प्रसारमाध्यमांना सरकारविरोधी भूमिका घेण्याचे सर्वतोपरी स्वातंत्र्य आहे, परंतु जे लोकहिताचे आहे, देशाचे आहे, सरकारकडून करविले जात आहे ते तरी योग्य रीतीने जनतेपर्यंत पोचविले जावे.
वृत्तपत्रांमधील एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर त्या विचारांना प्रतिकार करण्याची एक पद्धत असते. त्यासाठी काही ऐतिहासिक, सामाजिक मनावर परिणाम करणार्या गोष्टींवर आधारभूत पुराव्यांचे दाखले देणे आवश्यक असते. उगाच प्राकृत मराठी भाषा प्रखर शब्दात मांडून स्वतःचे विचार खरे करता येऊ शकणार नाहीत, हे या संकुचित विचार विद्वानांना पटण्यासाठी, त्यांनी त्यांची छिद्रान्वेषी प्रवृत्ती सोडून देणे आवश्यक आहे. त्यामधून बुद्धिप्रामाण्यवाद आणि बोलघेवडेपणा यामधील अंतर कळून येईल. तसे पाहता एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर टीका करणे हा खर्या पत्रकारितेचा धर्मच नव्हे. एकवेळ एखाद्या व्यक्तीच्या विचारांवर टीका करता येऊ शकते, परंतु त्यातून निर्माण होणार्या मतभेदांना आधारभूत ठोस पुरावे (स्वतःची बाजू मजबूत असल्याचे दाखवून देण्यासाठी) आवश्यक असतात. ते आजकाल खूप वरवर, सखोल अभ्यास करता मांडले जातात. तसेच, संविधानाच्या चौकटीला देखील खोटे ठरवण्याची धडपड यामधून दिसून येते. त्यातून निष्पन्न मात्र शून्य असते. शून्य.
खरे पाहता देशहितकारक धोरणे अंगिकारून विचारांची लढाई करता, देवाणघेवाण करून आणि काही योग्य विचार आत्मसात करून समविचार्यांनी देशाला यावेळी आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आधार देऊन, देशाचा शाश्वत विकास, वैचारिक क्रांती घडवून आणणे आवश्यक आहे. त्यामुळे देशाचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल. नक्कीच मदत होईल.