Wednesday, March 29, 2017

दुर्ग भ्रमंती - शिवालय शिवनेरी

शिवनेरी गडावर इतिहास जन्माला आला !  त्यामुळे या गडास “शिवालय शिवनेरी” असे म्हणता येईल. शिवकालीन सर्व किल्ल्यांचा स्वतःचा असा विशिष्ठ इतिहास आहे. शिवरायांच्या जन्माच्या पूर्वीपासून नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर असलेला किल्ला शकांच्या राजधानीचे ठिकाण म्हणून ओळखला जात असे. त्यावेळी नाणेघाटमार्गे खुप मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता दुर्गांची निर्मिती करण्यात आली. त्यात शिवनेरी देखील निर्माण करण्यात आला. शकांनंतर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट या राजवटींच्या अधिपथ्याखाली हा किल्ला राहिलेला आहे. जुन्नर गावामध्ये असल्यामुळे आणि जुन्नर ही नाणेघाट मार्गावरील मोठी बाजारपेठ असल्यामुळे या किल्ल्यास विशेष महत्व होते. परंतु खरेतर यादवांच्या कालखंडात शिवनेरीस भव्य गडाचे स्वरूप प्राप्त झाले. पुढे बहमनी राजवटीने गडाची डागडुजी करून गडावर वास्तव्य वाढवले. इ.स.१४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. आणि गड निजामशाहीच्या देखरेखीखाली आला.
गडावर शिवाई देवीचे मंदीर आहे. इ.स. १५९५ मध्ये जुन्नर प्रांत आणि शिवनेरी किल्ला मालोजीराजे भोसले यांना निजामशाहीकडून देण्यात आला. पुढे शहाजीराजे भोसले निजामशाहीत असताना शिवनेरी किल्ला शहाजी राज्यांच्या अधिकार क्षेत्रात आला. शहाजी राजांच्या पत्नी राणीसाहेब जिजामाता गरोदर असताना, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शिवनेरी गडावर पाठवण्यात आले होते. त्यावेळी राणीसाहेब जिजाऊनी गडावरील भवानी शिवाई देवीस नवस केला होता. पुत्ररत्न प्राप्त झाले तर त्यास तुझे नाव ठेवीन.

शिवनेरी गडावर “भवानी सिवाई” देवीचे मंदीर आहे, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन.

जिजाबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानुसार बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. हे बाळ  शिवाजी पुढे स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजीराजे या नावे आज ही महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत आहेत. शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. त्यामुळे शिवनेरी गडावर महाराष्ट्र शासनाकडून शिवजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पुण्याहून शिवाजीनगर बस स्थानकातून जुन्नरला जाण्यासाठी बस आहेत. पुणे-नाशिक मार्गावर नारायणगावमार्गे जुन्नरला शिवनेरी गडाच्या पायथ्यापर्यंत पोचता येते. मुंबईहून माळशेजघाटमार्गे जुन्नरला येण्यास मार्ग आहे. जुन्नर गावातून शिवनेरी गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

सात दरवाज्यांची वाट : जुन्नर गावामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूस असलेल्या मार्गाने चालत गेल्यास गडाच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते. या मार्गाने गडाच्या पायथ्यापर्यंत वाहन घेऊन जाता येत. पुढे गडावर जाताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच आपण जसे जसे पुढे गडावर चालत जावू तसे आपणास जुन्नर परिसरातील असलेल्या लेण्याद्रीच्या लेण्या गडाच्या उत्तर बाजूस दिसू लागतात. अष्ट विनायकांपैकी एक असलेला लेण्याद्री जुन्नरपासून खुप जवळ आहे. येथे गणेश लेणी आहेत. अष्ट विनायक यात्रा करणारे पर्यटक आणि भाविक यानिमित्ताने या परिसरात येत असतात.

साखळीची वाट : जुन्नर गावातून गडाकडे जात असताना एक पायवाट आपल्याला सात दरवाज्यांच्या वाटेकडे जाताना दिसते. त्या वाटेने शिवनेरी गडावर सात दरवाज्यांच्या वाटेपेक्षा लवकर पोचता येते.
पायवाटेने चालत गेल्यास गडाच्या पायथ्याच्या कातळ भिंतीपर्यंत जाता येते. या कातळ भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने गडावर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड आहे. परंतु या मार्गाने गडावर पोचल्यास शिवजन्म स्थळाच्या ठिकाणाकडे लवकर  पोहचता येते.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : गडावर आलेले पर्यटक वन विभागाकडून राखली जाणारी परिसरातील स्वच्छता आणि वनराई पाहून आनंदित होतात. खास करून गडावर असलेला बगीचा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतो. गडावर लाईट आणि पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शिवाई देवीचे मंदिर : सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर जाताना शिपाई दरवाज्यातून पुढे गेल्यानंतर गडाकडे जाणारी मुख्य वाट सोडून उजव्या बाजूस समोर ‘शिवाई देवीचे’ मंदिर दिसते. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. मंदिर परिसरात मागील बाजूस असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. गडाच्या कातळात उभे असलेल्या देवीच्या मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात आलेला असून, मंदिर परिसर सुशोभित करण्यात आलेले आहे.

अंबरखाना : शेवटच्या कुलाबकर दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. गडावरती ज्यावेळी वस्ती होती त्यावेळी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. आजच्या परिस्थितीत अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. अंबरखान्याचे भग्न अवशेष आजही शिवकालीन मावळ्यांच्या सामर्थ्याची आठवण करून देतात.

कोळी चौथरा : अंबरखान्यापासून पुढे गडाकडे जात असताना दोन मार्ग दिसतात. त्यातील एक मार्ग समोर दिसणाऱ्या टेकाडाकडे जातो. या टेकाडावर एक चौथरा आहे. निजामशाहीच्या पाडावानंतर आदिलशाहीचे आणि मोगलांचे त्यांच्या सीमावर्ती भागाकडे थोडेसे दुर्लक्ष होत होते. याचा फायदा घेऊन महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी  मोगलांनी महादेव कोळ्यांवर आक्रमण करून, शिवनेरीला वेढा दिला. त्यामुळे महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे शरणागती पत्करली. मुघल सैन्याकडून महादेव कोळी सैन्याचे अतोनात हाल करण्यात आले. गडाच्या माथ्यावरील चौथऱ्यावर महादेव कोळी सैन्याचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्यास कोळी चौथरा म्हणतात. कालांतराने त्या चौथऱ्यावर एक घुमट बांधून त्यावर फारसी भाषेमध्ये लिहिलेले दोन शिलालेख लावलेले आहेत.

शिवकुंज : अंबरखान्यापासून गडाकडे जाणारा दुसरा मार्ग शिवकुंजाकडे घेवून जातो. या मार्गाने जात असताना वाटेत पाण्याची अनेक टाकी लागतात. त्यात गंगा जमुना टाके देखील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या शिवकुंजात जिजाउंच्या पुढे उभे असलेल्या  बाल शिवाजीची पंचधातूची मुर्ती आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे. त्यासमोरच खाली पाण्याचे टाके आहे. कमानी मशिदी जवळून पुढे चालत गेल्यास हमामखाना आहे. तेथून पुढे उत्तरेकडे चालत गेल्यानंतर शिवजन्म स्थानाची इमारत आहे.

शिवजन्म स्थळ 
शिवजन्मस्थळ : शिवजन्म स्थानाची दगडी इमारत दुमजली असून, इमारतीच्या खालच्या खोलीमध्ये शिवरायांचे जन्मस्थळ आहे. तेथे शिवरायांचा अर्धाकृती पुतळा आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर देखील भव्य कोरीव काम केलेल्या दगडी भिंती आहेत. येथून जुन्नर गाव आणि परिसर दिसतो. तसेच गडावरून नाणेघाट आणि जीवधन परिसर दिसतो. गडाच्या उत्तरेस समोर दिसणारा वडूज धरणाचा जलाशय पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. परिसरात किल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष आहेत.

बदामी टाके : शिवजन्म स्थळाकडून कडेलोट टोकाकडे जाताना बदामाच्या आकाराचे पाण्याचे ‘बदामी टाके’ आहे. बदामी टाक्याचा संपूर्ण घेर दगडी बांधकामाचा असून, तळास देखील दगड आहे. बदामी टाक्यापासून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकाकडे जातो.

कडेलोट टोक : शिवनेरी किल्ल्याच्या उत्तरेस कडेलोट टोक आहे. अपराध्यांना शिक्षा देण्याकरिता  कडेलोट टोकावरून त्याचा कडेलोट केला जात असे. कडेलोट टोकावरून लेण्याद्री परिसर अगदी जवळ असल्यासारखा दिसतो.
स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास महाराष्ट्राच्या दर्‍या-खोर्‍यांशी, डोंगरकडांशी जोडलेला आहे. या डोंगररांगांमधील घडलेल्या इतिहासाची साक्ष देणारे गडकोट किल्ले, आजही आपणासमोर साक्षीदार म्हणून उभे आहेत. या किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि या किल्ल्यानीच स्वराज्य स्थापन केले. थोडक्यात स्वराज्याच्या उभारणीत इतर किल्ल्यांप्रमाणे शिवनेरीचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी शिवालय शिवनेरीस भेट देऊन, गडावरील पवित्र वस्तूच्या सानिध्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे.

हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे.

Thursday, March 16, 2017

प्रश्नार्थक ‘उत्तर’ प्रदेश

देशातील सर्वात मोठे राज्य असून देखील उत्तरप्रदेशचे अनेक प्रश्न आहेत. परंतु तेथील स्थानिक जनतेला त्याची उत्तरे मात्र मिळत नाहीत. केंद्रीय राजकारणात असे म्हणतात कीदेशाच्या पंतप्रधान पदाचा मार्ग उत्तरप्रदेश मार्गे जातो. देशाला पंडित नेहरूंपासून ते अटल बिहारी वाजपेयीजी पर्यंतची राजकीय उंची असणारे पंतप्रधान देणारे उत्तर प्रदेश राज्य आजही जाती व्यवस्थागरिबी आणि बेरोजगारी या समस्यांचा सामना करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली तरी तेथील अनेक स्थानिक समस्या जैसे थे आहेत. उत्तर प्रदेशच्या जनतेने आजवर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना राज्यात आलटून पालटून सत्ता देतानाअनेक वेळा स्पष्ट बहुमतातील सरकारं दिली आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील इतर छोट्या राज्यांमध्ये त्रिशंकू सरकार सत्तेत येत असतानाविधानसभेत ४०३ जागा असणाऱ्या उत्तरप्रदेशच्या जनतेने कॉंग्रेससमाजवादी पार्टीसह भाजपला देखील आजवर अनेक वेळा स्पष्ट बहुमत दिलेले आहे. परंतु उत्तर प्रदेशमधील जनतेला याचा आजवर किती फायदा झाला अथवा याचे फलित काय हे पाहणे आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्रीमंत्री म्हणून काम केलेल्या राजकीय नेत्यांचे केंद्रीय मंत्री मंडळात वजन वाढते. हे आजवरचा इतिहास सांगतो. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भुषवणारे चरणसिंग आणि व्ही. पी. सिंग हे तर देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते. ‘गरिबी हटाव’ची घोषणा देणाऱ्या इंदिरा गांधी यांचा लोकसभा मतदार संघ उत्तर प्रदेशमधील आहे. गांधी -नेहरू कुटुंबाची राजकीय वाटचाल उत्तर प्रदेशातून सुरु होते. तरी देखील कॉंग्रेस पक्ष आजही उत्तर प्रदेशमध्ये गरिबीबेरोजगारीशेतीच्या समस्याअन्न सुरक्षा योजनामनरेगा या मुद्द्यांवरच निवडणुका लढत आहे. तर दुसरीकडे स्वतःला गरीब आणि दलितांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या सुश्री मायावती आजही जातीय समीकरणे जुळवत निवडणुका लढवत आहेत. या स्पर्धेत मागे नसलेल्या समाजवादी पक्षाच्या अंतर्गत यादवीतून सावरतविकास करू म्हणणाऱ्या अखिलेश यादव यांनी देखील सत्तेत असून देखील काही ठराविक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली. परंतु भाजपने स्थानिक मुद्दे आणि केंद्रातील भाजपचा विकासाचा अजेंडा या मुद्द्यावर निवडणूक लढवतबहुमताने सत्ता स्थापन केली. या निवडणूक निकालावरून लक्षात येते कीउत्तर प्रदेशच्या स्थानिक जनतेला नेमक काय हवं आहे.

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. त्या प्रमाणात येथे गरिबीबेरोजगारीदुष्काळ या समस्या इतर राज्यांपेक्षा अधिक आहेत. याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेश मधून इतर राज्यांमध्ये कामानिमित्त विस्थापित होणाऱ्यांची समस्या देखील अधिक आहे. देशातील दिल्लीमुंबई आणि कलकत्ता यासारखी महानगरे या समस्येचा आजही सामना करत आहेत. तर मुंबई सारख्या महानगरात प्रादेशिक विरुद्ध बाहेरचे (उत्तर प्रदेशचे) हा वाद देखील आपणास दिसून येतो. उत्तर प्रदेशमध्ये शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठी दरी दिसून येते. एका बाजूस उत्तर प्रदेशबिहारमधून देशाच्या प्रशासकीय सेवेत दाखल होणाऱ्या युवकांची संख्या इतर राज्यांच्या प्रमाणात खुप जास्त आढळते. तर दुसरीकडे देशाच्या अनेक भागात पाणीपुरी विकणारेकामगार म्हणून काम करणारे भैय्या लोक देखील उत्तर प्रदेशचेच असल्याचे दिसून येते. ही एवढी प्रचंड सामाजिकआर्थिक दरी का निर्माण होते ? यास उत्तर प्रदेशातील स्थानिक लोक कारणीभूत आहेत ? की सत्तेवर असणारे राजकीय पुढारी कारणीभूत आहेत ? याचे उत्तर मात्र आजही अस्पष्टच आहे.

     देशातील गरीबीवर विश्लेषण करताना रंगराजन समितीच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशमधील ३९.८ % जनता दारिद्रय रेषेच्या खाली आहे. तर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात उत्तर प्रदेशचा वाटा महाराष्ट्राच्या तुलनेत कमीच राहिलेला आहे. देशात जीडीपीच्या बाबतीत उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. आजही उत्तर प्रदेशातील मध्यम वर्गीय शेतकरी दुष्काळशेतकरी आत्महत्यारासायनिक खतांची समस्याकृषी मालाला हमी भाव या मुद्द्यांवर तोडगा निघावा याकरिता आशावादी आहेत. केंद्रातील भाजप सरकारने युरियाचे निम कोटिंग करणेउत्तर प्रदेशातील अनेक छोट्या गावांमध्ये आज ही वीज नव्हती. त्या ठिकाणी वीज पोहचवणेअशी काही कामे केली आहेत. यामुळेच २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने मतांचा कौल दिला आहे. या पुढे देखील भाजपने मुख्य स्थानिक प्रश्नांना हात घालतउत्तर प्रदेशसाठी पुढील काळात काम करत राहणे आवश्यक आहे.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश हे गंगेच्या सुपीक मैदानी प्रदेशातील एक मोठे राज्य आहे. देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात उत्तर प्रदेश अग्रेसर असते. तरी देखील आज ही येथील स्थानिक समस्या पाहताअसे दिसते कीआजवर उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर आलेल्या सरकारांनी मूळ समस्यांवर तोडगा न काढताकेवळ त्या समस्यांचा राजकीय लाभ घेण्याकरिता उपयोग करून घेतलेला आहे. उत्तर प्रदेशातील वाढत्या गुंडाराजवर कोणताही राजकीय पक्ष काहीही बोलण्यास तयार नसतो. केवळ निवडणुकींच्या तोंडावर गुंडाराज ही समस्या असल्याचे राजकीय पक्षांकडून दाखवले जाते. निवडणुकीनंतर मात्र यावर कोणीही भाष्य करत नाही. येथील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्यातील सत्ताधाऱ्यांनी यावर योग्य उपाय शोधणे आवश्यक आहे. कारण २०११ च्या देशातील गुन्हेगारी अहवालानुसार उत्तर प्रदेशात गुन्हेगारीचे प्रमाण इतर राज्यांच्या प्रमाणात अधिक आहे. देशातील एकूण पोलीस संख्येपैकी ९.५० % पोलीस एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. तरी देखील येथे गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे.        

उत्तर प्रदेश राज्यामध्ये भविष्यात सत्तेत येणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा जोपासताना तेथील स्थानिक प्रश्नांना हात घालतविकास करणे आवश्यक आहे. कारण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आज ही उत्तर प्रदेशला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेच्या प्रश्नांवर उत्तरे शोधायची असतील तर यापुढे भाजपची जबाबदारी वाढली आहे. भाजपचे केंद्रातील सरकार जो विकासाचा अजेंडा देशभर राबवत आहे. तोच अजेंडा उत्तर प्रदेशमध्ये देखील राबवला जाणे अपेक्षित आहे. तरच प्रश्नार्थक उत्तर प्रदेशप्रश्नार्थक न राहता स्वतःची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल.

हा लेख मी दैनिक मुंबई तरुण भारत (Web Edition) साठी लिहिलेला आहे.

Tuesday, March 14, 2017

दुर्ग भ्रमंती - दुर्गराज रायगड

गड कसा पहावा याच देखील एक तंत्र असत, प्रत्येकाने गडाची वाट चालत असताना हे तंत्र पाळत आणि गडाचे सौंदर्य अनुभवत दुर्ग भ्रमंती करायला हवी. दुर्ग भ्रमंती करत असताना ज्या व्यक्तीचे वाचन आहे, तो व्यक्ती कल्पनाशक्तीच्या आधारे गडांचे सौंदर्य आणि इतिहास अनुभवू शकतो. मात्र त्यासाठी दुर्ग भ्रमंती आवश्यक आहे.

रायगड(पाचाड). जि.रायगड. महाराष्ट्र. स्वराज्याच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या दुर्गराज रायगडास इतिहासात आजवर विविध नावांनीसंबोधिले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जम्बूद्वीप, राजगिरी, भिवगड या नावांनी इतिहासत रायगडास ओळखले जात असे.
मुंबईहून रायगडला जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून महाडपर्यंत येऊन पुढे पाचाड (रायगड पायथा) पर्यंत जाता येते. पुण्याहूनभोरमार्गे वरंधा घाटातून महाडला परिवहन महामंडळाच्या बसेस असतात. पुढे पाचाड गावापर्यंत महाडहून बस तसेच टमटम, गडाच्या पायथ्यापर्यंत जातात. पुढे गडावर जाण्यासाठी रोप वे ची देखील सुविधा आहे. तसेच गडावर पायऱ्या चढून देखील जाता येते. परंतु गडाच्या पायऱ्या चढून जाण्यात जी मजा आहे ती रोप वे ने जाण्यात नाही. शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर येत असतात. तसेच अनेक शिवप्रेमी गडावर नियमितपणे येत असतात. मुख्यत्वे पावसाळ्यामध्ये रायगडावर अधिक पर्यटक असतात.
रायगडावर केवळ पर्यटक म्हणून जायचे असेल तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा अप्रतिम गड पाहण्यासाठी नक्की जा. स्वराज्याच्या राजधानीस भेट देण्यासाठी रायगड वारी करायची असेल तर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर जात असताना तिथे आपल्याकडून काही वेगळी हरकत होणार नाही याची नक्की काळजी घ्या. गडाचे पावित्र्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी गडावर स्वच्छता राखण्याचे काम आपणच करणे गरजेचे आहे.
रायगडावर इतिहासाची आठवण करून देणाऱ्या आणि स्वतःचे पावित्र्य टिकवून असलेल्या ठिकाणी फिरत असताना जो अनुभव येतो, तो अद्भुत आहे. त्याबाबत माहिती...

पाचाडचा आईसाहेब जिजाबाईंचा वाडा आणि समाधी :
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंची समाधी आहे. तसेच उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा सहन होत नसे, त्यामुळे महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळ एक वाडा बांधून दिला होता. पाचाड गावात या वाड्याचे अवशेष सुस्थितीत आहे. येथे असलेली तक्क्याची विहीर तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासाठी पर्यटक विशेष गर्दी करतात. वाड्याच्या परिसरात फिरत असताना जिजाऊ मासाहेब आणि त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांच्या सर्व कल्पनांचा येथे भास होतो. तुम्ही जर रायगडावर मुक्कामी जाणार असाल तर याठिकाणी संध्याकाळी नक्की भेट द्या.
महादरवाजा:
दुर्गराज रायगड चढत असताना सुरुवातीस वाटेवर असणाऱ्या महादरवाज्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. तसेच महादरवाज्याच्या दोन्ही बाजूस भव्य बुरूज आहेत. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांसाठी आणि संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत आणि डावीकडे हिरकणी बुरूजापर्यंत भक्कम तटबंदी बांधलेली आहे.

हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव:
महादरवाज्यातून थोडे पुढे गडाकडे जात असताना हत्ती तलाव समोरच दिसतो. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता हा तलाव बांधण्यात आलेला होता. हत्तीतलावापासून जवळच गंगासागर तलाव आहे. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि नद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकलेली होती. त्यामुळेच या तलावाचे गंगासागर असे नाव अस्तित्वात आले आहे. गडावर आजही या पाण्याचा उपयोग केला जातो.
सायंकाळी या परिसरात पक्षांचा मधुर आवाज ऐकायला येतो, येथे जवळच निवासाची सुविधा असल्यामुळे तलावातील पाणी आणि गडाचे सौंदर्य जवळून पाहता येते.

हिरकणी टोक (हिरकणी बुरुज) :
गंगासागराच्या पश्चिमेस चिंचोळी वाट हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी गवळणीची एक कथा हिरकणी टोकाशी संबंधित असल्यामुळे या बुरुजास हिरकणी बुरुज असेही म्हणतात. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावरून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे स्पष्टपणे दिसतात.

पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजा:
मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. तर पालखी दरवाज्याने प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो.त्याच्या जवळच राण्यांचे महाल दिसून येतात. सारे अवशेष रूप आज याठिकाणी अस्तित्वात आहे.

राजसभा आणि राजभवन:
महाराजांचा राज्याभिषेक राजसभा येथे झाला होता. येथे पूर्वेकडे तोंड करून असलेल महाराजांचे सिंहासन आहे. येथून मागील बाजूने बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की एक राजभवनमध्ये प्रवेश करता येतो. जवळच खलबतखाना देखील आहे.
राजसभा परिसरात गेल्यानंतर समोरच आसनस्थ छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती दिसून येते. येथे आजही सभा भरत असावी असा भास होतो. महाराजांची नेत्र दिपक मुर्ती सर्वांचे मन मोहून घेते.

बाजारपेठ:
राजभवनाकडून महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात असताना समोर होळीचा मळा लागतो. तेथे छत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुढे जात असताना पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात,तेथे पूर्वी बाजारपेठ होती. भव्य बाजारपेठेचे अवशेष आजही पर्यटकांना आकर्षित करतात.
बाजारपेठेतून जात असताना इतिहासात तेथील वैभव काय असेल याची जाणीव होते. अगदी याची देही याची डोळा प्रसंग समोर उभा राहावा, अशा ठिकाणी मोकळ्या जागेत बाजारपेठ वसलेली आहे.

टकमक टोक:
बाजारपेठेच्या समोरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. टकमक टोकाचा इतिहासात आहे. टकमक टोक हे गडावरील सर्वात उंच ठिकाण असून, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट केला जात असे.
टकमक टोक म्हणजे, गडावरील सर्वात उंच ठिकाण. टकमक टोकाकडे जात असताना जागा निमुळती होत जाते, अन आपल्या ह्रदयाचा ठोका वाढत जातो. इतिहासात या ठिकाणी कित्येक जणांचा कडेलोट झाला असावा आणि त्यांचे पुढे काय झाले असावे. याचा विचार आपण टोकाच्या शेवटी जावून नक्की करायला लागतो.

शिरकाई देवी मंदिर आणि जगदीश्वर मंदिर:
शिरकाईदेवी ही गडावरील मुख्य देवता आहे. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे.
महाराजांच्या समाधी स्थळाकडे पुढे जात असताना समोर दिसणारे भव्य मंदिर जगदीश्वराचे आहे. जगदीश्वराच्या मंदिरासमोर नंदीची मोठी भग्रावस्थेतील मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यास समोर हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात असताना, पायऱ्यांच्या खाली एक शिलालेख दिसतो. ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर’. रायगडाची बांधणी करत असताना हिरोजी इंदुलकर यांनी हा शिलालेख येथे लावलेला आहे.

महाराजांची समाधी:
जगदीश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजापासून बाहेर पडताच समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसते. महाराजांच्या समाधी स्थळावर महाराजांची महती सांगणारी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. या परिसरातील शांतता आणि स्वच्छता पाहता पर्यटक आणि शिवप्रेमी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी सतत गर्दी करत असतात.
महाराजांच्या ध्यानस्थ समाधी स्थळाजवळ जायची योग्य वेळ म्हणजे, सुर्योदय. सकाळी सकाळी महाराजांच्या समाधीवर पडणारी सोनेरी सुर्यकिरणे महाराजांसमोर नतमस्तक होण्यास आतुर असतात असा भास या ठिकाणी होतो.

वाघ्या कुत्र्याची समाधी :
महाराजांवर अंत्यसंस्कार सुरु असताना त्यांच्या चीतेमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी घेतली होती, असे इतिहासात म्हटले जाते, या वाघ्या कुत्र्याची समाधी महाराजांच्यासमाधीच्या परिसरातच आहे.

भवानी टोक :
महाराजांच्या समाधी स्थळाकडून पूर्वेकडे चालत गेल्यास शेवटी भवानी टोक अशी पाटी लावलेली दिसते. तुळजापूरच्या दिशेने असलेले भवानी टोक हे गडाच्या पुर्व दिशेचे शेवटचे टोक आहे. येथे भवानी देवीचे एक मंदिर आहे. समोर सह्याद्री पर्वत रांगेतील सौंदर्याने नटलेला परिसर पाहण्यासाठी पर्यटक येथे खास करून पावसाळ्यामध्ये येत असतात. भवानी टोकाकडून महाराजांच्या समाधी स्थळाकडे येत असताना महाराजांचे समाधी स्थळ आकर्षक आणि महादेवाच्या पिंडीप्रमाणे स्थिर आणि चीरशांत, ध्यानमग्न असल्यासारखे दिसते. सह्याद्रीच्या रक्षणार्थ कटीबद्ध असलेला हा दुर्ग इतिहासाची साक्ष आहे.
आपल्या पुर्वजांनी आपल्यासाठी इतिहासाची साक्ष म्हणून जोपासलेला सांस्कृतिक वारसा दुर्गराज रायगड टिकवून आहे. रायगडाने अनेक आक्रमणे पाहिली आहेत. अनेक लढाया लढल्या आहेत. परंतु तो अजून ही उभा आहे. स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या या दुर्गराजास आपण वेळ काढून नक्की भेट दयायला हवी. आणि हा वारसा पुढील पिढ्यांसाठी अभिमानास्पद ठरावा याकरिता आपण प्रयत्न करायला हवेत.
                  
मुंबई तरुण भारतसाठी दुर्ग भ्रमंती ही लेख माला सुरु केली आहे. त्या लेख मालेतील हा पहिला लेख.
                                                     नागेश कुलकर्णी.

Friday, March 3, 2017

अभिव्यक्तीच्या नावाने चांगभलं !

व्यक्त होण्यास स्वातंत्र्य आहेम्हणून नट देखील व्यक्त होत असतोत्याच्या परीने तो त्या स्वातंत्र्याची रूपरेषा ठरवतोभारतीय राज्य घटनेने लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या या व्यवस्थेत सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहेभारतीय संविधानाचे कलम १९ याबाबत सर्वकाही सांगून जातेभारतातील प्रत्येक नागरिकास बोलण्याचेलिखाण करण्याचेदेशात कुठे ही वास्तव्य करण्याचे इस्वातंत्र्य आहेपरंतु आजकाल या अधिकाराचा गैरवापर वाढला आहेकेवळ एक वेगळा विचार प्रवाह देशात रुजवण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे त्यांची स्वतःची मक्तेदारी वाटू लागली आहेकदाचित डाव्या विचारसरणीस देशात टिकवण्यासाठी धडपडतानाते चालत असेलला मार्ग देश विरोधी ही असू शकतोहे ते विसरले आहेत.
जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात नागरिकांना एवढी स्वतंत्रता बहाल करण्यात आलेली नाहीज्या साम्यवादाचा पुरस्कार करत हे कम्युनिस्ट लोक केरळमध्ये वैचारिक आणि रक्तरंजित मतभेद पसरवत आहेत ते पाहता  यांना इतिहासात घडलेल्या काही घटनांची आठवण करून द्यावी वाटते१९८९ साली तियानान मेन स्क्वेअर येथे  एक पार्टी सत्ता असलेल्या  कम्युनिस्टवादी चीनने घडवून आणलेले हत्याकांड म्हणजे खरी अभिव्यक्तीची हत्या होती त्यावेळी चायनीज कम्युनिस्ट  सरकारविरुद्ध अतिशय शांतपणे आणि शिस्तीत आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना ठार करण्यात आले होतेसरकारच्या जाचक धोरणांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे  सारे नियम वेशीला टांगून चिरडण्यात आले होतेत्यावेळी कम्युनिस्टांची अभिव्यक्तीची व्याख्या कोणती होती खरे तर या लोकांनी स्वतःला नशीबवान समजले पाहिजेकारण त्यांचा जन्म भारत देशात झालेला आहेयांना त्यांच्या सोयीने भारत देश आणि त्यांची विचारसरणी यांची बांधणी करायची असतेपरंतु हे कदापि शक्य नाहीकारण भारत देशातील देशहितकारक विचारप्रवाह आजही कार्यरत आहेत.
यापूर्वी जे बंगालमध्ये झाले आणि केरळमध्ये होत मागील काही वर्षांपासून होत आहेत्या कम्युनिस्ट विचारधारेच्या रक्तपाताला वैचारिकता म्हणता येणार नाहीएका बाजूस अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेआम्हाला बोलू दिलं जात नाहीआमचा आवाज दाबला जातो असं ही म्हणायचंआणि दुसरीकडे वेळ आली किवैचारिक विरोधकांचा गळा दाबायचाहा कुठचा वैचारिकपणाजर हीच कम्युनिस्टनिती असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या सोयीने बदलण्याचे कौशल्य असणारी विचारधारा असे कम्युनिस्टांबाबत म्हणता येईल.

कट्टरतावाद असो अथवा डाव्या विचारसरणीतून तुटपुंज्या वैकल्पिक विषयांवर केलेले भाष्य असोया वैचारिक मतभेदांमधून साध्य असाध्यचा मुद्दा अनेक वेळा  विसरला जातोडावे वैचारिक पंडित त्यांच्या वैचारिक सांस्कृतीस ओढून ताणून आपापल्या परीने मांडत असतात.  स्वतःचेच म्हणणे खरे कसे हे पटवून देण्यासाठी ते संविधानाला देखील आव्हान देण्यास तयार असतातपरंतु स्वतःच्या विचारांना ऐतिहासिक पाठबळ आणि ठोस पुराव्यांची जोड देण्यास मात्र ते विसरतातयामधून काय निष्पन्न होतेमग मतभेद वैचारिक पातळी वरून शाब्दिक पातळीवर नेले जातातअर्वाच्य भाषा वापरली जातेयासाठी प्रसारमाध्यमे जेवढी दोषी आहेत तेवढाच डाव्या विचारसरणीकडे झुकत चाललेला तुटपुंजा वर्ग देखील दोषी आहेचदोन पुस्तके अधिक वाचून अथवा लिहून वैचारिक धोरणे पोसली जाऊ शकतातपरंतु त्या विचारांना राष्ट्रीय विचारांची जोड असल्याखेरीज ते देशहितकारक होऊ शकत नाहीतत्यामुळे कम्युनिस्टांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे वेळेनुसार आणि व्यक्तीनुसार बदलणारे स्वातंत्र्य आहेउत्तरप्रदेशात घडलेल्या अखलाख अहमदच्या घटनेनंतर पुरस्कार वापसी करणारे डावे विचारवंत स्वतःच्या सोयीनुसार अभिव्यक्तीची व्याख्या बदलत असतीलतर अभिव्यक्तीच्या नावाने चांगभलं असेच म्हणावे लागेल!