Wednesday, March 29, 2017

दुर्ग भ्रमंती - शिवालय शिवनेरी

शिवनेरी गडावर इतिहास जन्माला आला !  त्यामुळे या गडास “शिवालय शिवनेरी” असे म्हणता येईल. शिवकालीन सर्व किल्ल्यांचा स्वतःचा असा विशिष्ठ इतिहास आहे. शिवरायांच्या जन्माच्या पूर्वीपासून नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर असलेला किल्ला शकांच्या राजधानीचे ठिकाण म्हणून ओळखला जात असे. त्यावेळी नाणेघाटमार्गे खुप मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता दुर्गांची निर्मिती करण्यात आली. त्यात शिवनेरी देखील निर्माण करण्यात आला. शकांनंतर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट या राजवटींच्या अधिपथ्याखाली हा किल्ला राहिलेला आहे. जुन्नर गावामध्ये असल्यामुळे आणि जुन्नर ही नाणेघाट मार्गावरील मोठी बाजारपेठ असल्यामुळे या किल्ल्यास विशेष महत्व होते. परंतु खरेतर यादवांच्या कालखंडात शिवनेरीस भव्य गडाचे स्वरूप प्राप्त झाले. पुढे बहमनी राजवटीने गडाची डागडुजी करून गडावर वास्तव्य वाढवले. इ.स.१४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. आणि गड निजामशाहीच्या देखरेखीखाली आला.
गडावर शिवाई देवीचे मंदीर आहे. इ.स. १५९५ मध्ये जुन्नर प्रांत आणि शिवनेरी किल्ला मालोजीराजे भोसले यांना निजामशाहीकडून देण्यात आला. पुढे शहाजीराजे भोसले निजामशाहीत असताना शिवनेरी किल्ला शहाजी राज्यांच्या अधिकार क्षेत्रात आला. शहाजी राजांच्या पत्नी राणीसाहेब जिजामाता गरोदर असताना, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शिवनेरी गडावर पाठवण्यात आले होते. त्यावेळी राणीसाहेब जिजाऊनी गडावरील भवानी शिवाई देवीस नवस केला होता. पुत्ररत्न प्राप्त झाले तर त्यास तुझे नाव ठेवीन.

शिवनेरी गडावर “भवानी सिवाई” देवीचे मंदीर आहे, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन.

जिजाबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानुसार बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. हे बाळ  शिवाजी पुढे स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजीराजे या नावे आज ही महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत आहेत. शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. त्यामुळे शिवनेरी गडावर महाराष्ट्र शासनाकडून शिवजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पुण्याहून शिवाजीनगर बस स्थानकातून जुन्नरला जाण्यासाठी बस आहेत. पुणे-नाशिक मार्गावर नारायणगावमार्गे जुन्नरला शिवनेरी गडाच्या पायथ्यापर्यंत पोचता येते. मुंबईहून माळशेजघाटमार्गे जुन्नरला येण्यास मार्ग आहे. जुन्नर गावातून शिवनेरी गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

सात दरवाज्यांची वाट : जुन्नर गावामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूस असलेल्या मार्गाने चालत गेल्यास गडाच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते. या मार्गाने गडाच्या पायथ्यापर्यंत वाहन घेऊन जाता येत. पुढे गडावर जाताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच आपण जसे जसे पुढे गडावर चालत जावू तसे आपणास जुन्नर परिसरातील असलेल्या लेण्याद्रीच्या लेण्या गडाच्या उत्तर बाजूस दिसू लागतात. अष्ट विनायकांपैकी एक असलेला लेण्याद्री जुन्नरपासून खुप जवळ आहे. येथे गणेश लेणी आहेत. अष्ट विनायक यात्रा करणारे पर्यटक आणि भाविक यानिमित्ताने या परिसरात येत असतात.

साखळीची वाट : जुन्नर गावातून गडाकडे जात असताना एक पायवाट आपल्याला सात दरवाज्यांच्या वाटेकडे जाताना दिसते. त्या वाटेने शिवनेरी गडावर सात दरवाज्यांच्या वाटेपेक्षा लवकर पोचता येते.
पायवाटेने चालत गेल्यास गडाच्या पायथ्याच्या कातळ भिंतीपर्यंत जाता येते. या कातळ भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने गडावर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड आहे. परंतु या मार्गाने गडावर पोचल्यास शिवजन्म स्थळाच्या ठिकाणाकडे लवकर  पोहचता येते.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : गडावर आलेले पर्यटक वन विभागाकडून राखली जाणारी परिसरातील स्वच्छता आणि वनराई पाहून आनंदित होतात. खास करून गडावर असलेला बगीचा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतो. गडावर लाईट आणि पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शिवाई देवीचे मंदिर : सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर जाताना शिपाई दरवाज्यातून पुढे गेल्यानंतर गडाकडे जाणारी मुख्य वाट सोडून उजव्या बाजूस समोर ‘शिवाई देवीचे’ मंदिर दिसते. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. मंदिर परिसरात मागील बाजूस असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. गडाच्या कातळात उभे असलेल्या देवीच्या मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात आलेला असून, मंदिर परिसर सुशोभित करण्यात आलेले आहे.

अंबरखाना : शेवटच्या कुलाबकर दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. गडावरती ज्यावेळी वस्ती होती त्यावेळी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. आजच्या परिस्थितीत अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. अंबरखान्याचे भग्न अवशेष आजही शिवकालीन मावळ्यांच्या सामर्थ्याची आठवण करून देतात.

कोळी चौथरा : अंबरखान्यापासून पुढे गडाकडे जात असताना दोन मार्ग दिसतात. त्यातील एक मार्ग समोर दिसणाऱ्या टेकाडाकडे जातो. या टेकाडावर एक चौथरा आहे. निजामशाहीच्या पाडावानंतर आदिलशाहीचे आणि मोगलांचे त्यांच्या सीमावर्ती भागाकडे थोडेसे दुर्लक्ष होत होते. याचा फायदा घेऊन महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी  मोगलांनी महादेव कोळ्यांवर आक्रमण करून, शिवनेरीला वेढा दिला. त्यामुळे महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे शरणागती पत्करली. मुघल सैन्याकडून महादेव कोळी सैन्याचे अतोनात हाल करण्यात आले. गडाच्या माथ्यावरील चौथऱ्यावर महादेव कोळी सैन्याचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्यास कोळी चौथरा म्हणतात. कालांतराने त्या चौथऱ्यावर एक घुमट बांधून त्यावर फारसी भाषेमध्ये लिहिलेले दोन शिलालेख लावलेले आहेत.

शिवकुंज : अंबरखान्यापासून गडाकडे जाणारा दुसरा मार्ग शिवकुंजाकडे घेवून जातो. या मार्गाने जात असताना वाटेत पाण्याची अनेक टाकी लागतात. त्यात गंगा जमुना टाके देखील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या शिवकुंजात जिजाउंच्या पुढे उभे असलेल्या  बाल शिवाजीची पंचधातूची मुर्ती आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे. त्यासमोरच खाली पाण्याचे टाके आहे. कमानी मशिदी जवळून पुढे चालत गेल्यास हमामखाना आहे. तेथून पुढे उत्तरेकडे चालत गेल्यानंतर शिवजन्म स्थानाची इमारत आहे.

शिवजन्म स्थळ 
शिवजन्मस्थळ : शिवजन्म स्थानाची दगडी इमारत दुमजली असून, इमारतीच्या खालच्या खोलीमध्ये शिवरायांचे जन्मस्थळ आहे. तेथे शिवरायांचा अर्धाकृती पुतळा आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर देखील भव्य कोरीव काम केलेल्या दगडी भिंती आहेत. येथून जुन्नर गाव आणि परिसर दिसतो. तसेच गडावरून नाणेघाट आणि जीवधन परिसर दिसतो. गडाच्या उत्तरेस समोर दिसणारा वडूज धरणाचा जलाशय पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. परिसरात किल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष आहेत.

बदामी टाके : शिवजन्म स्थळाकडून कडेलोट टोकाकडे जाताना बदामाच्या आकाराचे पाण्याचे ‘बदामी टाके’ आहे. बदामी टाक्याचा संपूर्ण घेर दगडी बांधकामाचा असून, तळास देखील दगड आहे. बदामी टाक्यापासून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकाकडे जातो.

कडेलोट टोक : शिवनेरी किल्ल्याच्या उत्तरेस कडेलोट टोक आहे. अपराध्यांना शिक्षा देण्याकरिता  कडेलोट टोकावरून त्याचा कडेलोट केला जात असे. कडेलोट टोकावरून लेण्याद्री परिसर अगदी जवळ असल्यासारखा दिसतो.
स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास महाराष्ट्राच्या दर्‍या-खोर्‍यांशी, डोंगरकडांशी जोडलेला आहे. या डोंगररांगांमधील घडलेल्या इतिहासाची साक्ष देणारे गडकोट किल्ले, आजही आपणासमोर साक्षीदार म्हणून उभे आहेत. या किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि या किल्ल्यानीच स्वराज्य स्थापन केले. थोडक्यात स्वराज्याच्या उभारणीत इतर किल्ल्यांप्रमाणे शिवनेरीचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी शिवालय शिवनेरीस भेट देऊन, गडावरील पवित्र वस्तूच्या सानिध्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे.

हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे.

No comments:

Post a Comment