Tuesday, March 14, 2017

दुर्ग भ्रमंती - दुर्गराज रायगड

गड कसा पहावा याच देखील एक तंत्र असत, प्रत्येकाने गडाची वाट चालत असताना हे तंत्र पाळत आणि गडाचे सौंदर्य अनुभवत दुर्ग भ्रमंती करायला हवी. दुर्ग भ्रमंती करत असताना ज्या व्यक्तीचे वाचन आहे, तो व्यक्ती कल्पनाशक्तीच्या आधारे गडांचे सौंदर्य आणि इतिहास अनुभवू शकतो. मात्र त्यासाठी दुर्ग भ्रमंती आवश्यक आहे.

रायगड(पाचाड). जि.रायगड. महाराष्ट्र. स्वराज्याच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या दुर्गराज रायगडास इतिहासात आजवर विविध नावांनीसंबोधिले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जम्बूद्वीप, राजगिरी, भिवगड या नावांनी इतिहासत रायगडास ओळखले जात असे.
मुंबईहून रायगडला जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून महाडपर्यंत येऊन पुढे पाचाड (रायगड पायथा) पर्यंत जाता येते. पुण्याहूनभोरमार्गे वरंधा घाटातून महाडला परिवहन महामंडळाच्या बसेस असतात. पुढे पाचाड गावापर्यंत महाडहून बस तसेच टमटम, गडाच्या पायथ्यापर्यंत जातात. पुढे गडावर जाण्यासाठी रोप वे ची देखील सुविधा आहे. तसेच गडावर पायऱ्या चढून देखील जाता येते. परंतु गडाच्या पायऱ्या चढून जाण्यात जी मजा आहे ती रोप वे ने जाण्यात नाही. शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर येत असतात. तसेच अनेक शिवप्रेमी गडावर नियमितपणे येत असतात. मुख्यत्वे पावसाळ्यामध्ये रायगडावर अधिक पर्यटक असतात.
रायगडावर केवळ पर्यटक म्हणून जायचे असेल तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा अप्रतिम गड पाहण्यासाठी नक्की जा. स्वराज्याच्या राजधानीस भेट देण्यासाठी रायगड वारी करायची असेल तर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर जात असताना तिथे आपल्याकडून काही वेगळी हरकत होणार नाही याची नक्की काळजी घ्या. गडाचे पावित्र्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी गडावर स्वच्छता राखण्याचे काम आपणच करणे गरजेचे आहे.
रायगडावर इतिहासाची आठवण करून देणाऱ्या आणि स्वतःचे पावित्र्य टिकवून असलेल्या ठिकाणी फिरत असताना जो अनुभव येतो, तो अद्भुत आहे. त्याबाबत माहिती...

पाचाडचा आईसाहेब जिजाबाईंचा वाडा आणि समाधी :
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंची समाधी आहे. तसेच उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा सहन होत नसे, त्यामुळे महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळ एक वाडा बांधून दिला होता. पाचाड गावात या वाड्याचे अवशेष सुस्थितीत आहे. येथे असलेली तक्क्याची विहीर तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासाठी पर्यटक विशेष गर्दी करतात. वाड्याच्या परिसरात फिरत असताना जिजाऊ मासाहेब आणि त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांच्या सर्व कल्पनांचा येथे भास होतो. तुम्ही जर रायगडावर मुक्कामी जाणार असाल तर याठिकाणी संध्याकाळी नक्की भेट द्या.
महादरवाजा:
दुर्गराज रायगड चढत असताना सुरुवातीस वाटेवर असणाऱ्या महादरवाज्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. तसेच महादरवाज्याच्या दोन्ही बाजूस भव्य बुरूज आहेत. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांसाठी आणि संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत आणि डावीकडे हिरकणी बुरूजापर्यंत भक्कम तटबंदी बांधलेली आहे.

हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव:
महादरवाज्यातून थोडे पुढे गडाकडे जात असताना हत्ती तलाव समोरच दिसतो. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता हा तलाव बांधण्यात आलेला होता. हत्तीतलावापासून जवळच गंगासागर तलाव आहे. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि नद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकलेली होती. त्यामुळेच या तलावाचे गंगासागर असे नाव अस्तित्वात आले आहे. गडावर आजही या पाण्याचा उपयोग केला जातो.
सायंकाळी या परिसरात पक्षांचा मधुर आवाज ऐकायला येतो, येथे जवळच निवासाची सुविधा असल्यामुळे तलावातील पाणी आणि गडाचे सौंदर्य जवळून पाहता येते.

हिरकणी टोक (हिरकणी बुरुज) :
गंगासागराच्या पश्चिमेस चिंचोळी वाट हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी गवळणीची एक कथा हिरकणी टोकाशी संबंधित असल्यामुळे या बुरुजास हिरकणी बुरुज असेही म्हणतात. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावरून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे स्पष्टपणे दिसतात.

पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजा:
मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. तर पालखी दरवाज्याने प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो.त्याच्या जवळच राण्यांचे महाल दिसून येतात. सारे अवशेष रूप आज याठिकाणी अस्तित्वात आहे.

राजसभा आणि राजभवन:
महाराजांचा राज्याभिषेक राजसभा येथे झाला होता. येथे पूर्वेकडे तोंड करून असलेल महाराजांचे सिंहासन आहे. येथून मागील बाजूने बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की एक राजभवनमध्ये प्रवेश करता येतो. जवळच खलबतखाना देखील आहे.
राजसभा परिसरात गेल्यानंतर समोरच आसनस्थ छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती दिसून येते. येथे आजही सभा भरत असावी असा भास होतो. महाराजांची नेत्र दिपक मुर्ती सर्वांचे मन मोहून घेते.

बाजारपेठ:
राजभवनाकडून महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात असताना समोर होळीचा मळा लागतो. तेथे छत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुढे जात असताना पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात,तेथे पूर्वी बाजारपेठ होती. भव्य बाजारपेठेचे अवशेष आजही पर्यटकांना आकर्षित करतात.
बाजारपेठेतून जात असताना इतिहासात तेथील वैभव काय असेल याची जाणीव होते. अगदी याची देही याची डोळा प्रसंग समोर उभा राहावा, अशा ठिकाणी मोकळ्या जागेत बाजारपेठ वसलेली आहे.

टकमक टोक:
बाजारपेठेच्या समोरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. टकमक टोकाचा इतिहासात आहे. टकमक टोक हे गडावरील सर्वात उंच ठिकाण असून, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट केला जात असे.
टकमक टोक म्हणजे, गडावरील सर्वात उंच ठिकाण. टकमक टोकाकडे जात असताना जागा निमुळती होत जाते, अन आपल्या ह्रदयाचा ठोका वाढत जातो. इतिहासात या ठिकाणी कित्येक जणांचा कडेलोट झाला असावा आणि त्यांचे पुढे काय झाले असावे. याचा विचार आपण टोकाच्या शेवटी जावून नक्की करायला लागतो.

शिरकाई देवी मंदिर आणि जगदीश्वर मंदिर:
शिरकाईदेवी ही गडावरील मुख्य देवता आहे. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे.
महाराजांच्या समाधी स्थळाकडे पुढे जात असताना समोर दिसणारे भव्य मंदिर जगदीश्वराचे आहे. जगदीश्वराच्या मंदिरासमोर नंदीची मोठी भग्रावस्थेतील मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यास समोर हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात असताना, पायऱ्यांच्या खाली एक शिलालेख दिसतो. ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर’. रायगडाची बांधणी करत असताना हिरोजी इंदुलकर यांनी हा शिलालेख येथे लावलेला आहे.

महाराजांची समाधी:
जगदीश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजापासून बाहेर पडताच समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसते. महाराजांच्या समाधी स्थळावर महाराजांची महती सांगणारी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. या परिसरातील शांतता आणि स्वच्छता पाहता पर्यटक आणि शिवप्रेमी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी सतत गर्दी करत असतात.
महाराजांच्या ध्यानस्थ समाधी स्थळाजवळ जायची योग्य वेळ म्हणजे, सुर्योदय. सकाळी सकाळी महाराजांच्या समाधीवर पडणारी सोनेरी सुर्यकिरणे महाराजांसमोर नतमस्तक होण्यास आतुर असतात असा भास या ठिकाणी होतो.

वाघ्या कुत्र्याची समाधी :
महाराजांवर अंत्यसंस्कार सुरु असताना त्यांच्या चीतेमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी घेतली होती, असे इतिहासात म्हटले जाते, या वाघ्या कुत्र्याची समाधी महाराजांच्यासमाधीच्या परिसरातच आहे.

भवानी टोक :
महाराजांच्या समाधी स्थळाकडून पूर्वेकडे चालत गेल्यास शेवटी भवानी टोक अशी पाटी लावलेली दिसते. तुळजापूरच्या दिशेने असलेले भवानी टोक हे गडाच्या पुर्व दिशेचे शेवटचे टोक आहे. येथे भवानी देवीचे एक मंदिर आहे. समोर सह्याद्री पर्वत रांगेतील सौंदर्याने नटलेला परिसर पाहण्यासाठी पर्यटक येथे खास करून पावसाळ्यामध्ये येत असतात. भवानी टोकाकडून महाराजांच्या समाधी स्थळाकडे येत असताना महाराजांचे समाधी स्थळ आकर्षक आणि महादेवाच्या पिंडीप्रमाणे स्थिर आणि चीरशांत, ध्यानमग्न असल्यासारखे दिसते. सह्याद्रीच्या रक्षणार्थ कटीबद्ध असलेला हा दुर्ग इतिहासाची साक्ष आहे.
आपल्या पुर्वजांनी आपल्यासाठी इतिहासाची साक्ष म्हणून जोपासलेला सांस्कृतिक वारसा दुर्गराज रायगड टिकवून आहे. रायगडाने अनेक आक्रमणे पाहिली आहेत. अनेक लढाया लढल्या आहेत. परंतु तो अजून ही उभा आहे. स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या या दुर्गराजास आपण वेळ काढून नक्की भेट दयायला हवी. आणि हा वारसा पुढील पिढ्यांसाठी अभिमानास्पद ठरावा याकरिता आपण प्रयत्न करायला हवेत.
                  
मुंबई तरुण भारतसाठी दुर्ग भ्रमंती ही लेख माला सुरु केली आहे. त्या लेख मालेतील हा पहिला लेख.
                                                     नागेश कुलकर्णी.

No comments:

Post a Comment