Friday, September 25, 2015

शाश्वत विकास परिषद (SDG) २०१५











आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी  विकासाच्या दृष्टीने जगातील सर्व विकसित आणि विकसनशील देशांनी

एकत्र येऊन १९९० च्या दशकात संयुक्त राष्ट्र संघाच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्क, स्त्रिया आणि लहान मुले यांच्या संगोपनासाठी सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे सांगून, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषदा घेण्यास सुरुवात केली. त्या आंतरराष्ट्रीय  परिषदांमधून एक मुद्दा समोर आला की मानवाच्या विकासासाठी आपण सर्वांनी स्वतःवर काही बंधने निर्माण करायला हवीत तसेच त्याचे सर्वांनी पालन करायला हवे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे १००० सरकार बाह्य संस्थांनी पुढाकार घेऊन २००० साली दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरणाचे संरक्षण, मानवी हक्क संरक्षण आणि संवर्धन तसेच असुरक्षित समाजाचे संरक्षण या संदर्भात कच्चा मसुदा तयार केला. या मसुद्यास अनुसरून संयुक्त राष्ट्राच्या २००० साली झालेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स परिषदेने २०१५ पर्यंत साध्य करण्यासाठी स्वतःवर काही उद्दिष्टे लादून घेतली होती. त्यावेळी सदस्य असणाऱ्या १८९ देशांनी आणि २३ आंतरराष्ट्रीय संस्थांनी ठरवल्या- प्रमाणे २००० ते २०१५ या कालावधीमध्ये  उद्दिष्टे साध्य झाली अथवा नाही किंवा या पुढील १५ वर्षांकरताचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात २५-२७ सप्टेंबर २०१५ दरम्यान शाश्वत विकास परिषद (SDG) संपन्न होत आहे. मानवी जीवनाचे भविष्य ठरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या परिषदेस १९३ सदस्य राष्ट्रांचे सदस्य न्यूयॉर्क येथे उपस्थित आहेत.
            शाश्वत विकास परिषदेची (SDG) औपचारिक परिषद या आधी २०१२ मध्ये ब्राझील मधील रिओ या ठिकाणी पार पडली होती. त्या पहिल्या औपचारिक परिषदेत (रिओ प्लस २०) , जून २०१२  मध्ये रियो दि जानेरो येथे  शाश्वत विकासाचे भविष्यकालीन नियोजन आणि तरतुदी यावर संयुक्त राष्ट्र परिषदेत चर्चा करण्यात आली होती. त्या परिषदेचे पुढील भाग म्हणून होत असलेल्या न्यूयॉर्क मधील शाश्वत विश्व  परिषदेस मानवतेच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. ही परिषद आयोजित करण्याच्या अगोदर संयुक्त राष्ट्र संघाकडून THE FUTURE WE WANT and Transforming our world : the 2030 Agenda for Sustainable Development या नावाने अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये भविष्यातील मानवी विकासाची उद्दिष्टे आणि ध्येय यांचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. या आधी जुलै २०१४ मध्ये, शाश्वत विकासाची उदिष्टे साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ओपन वर्किंग ग्रुप (OWG) विधानसभेचे आयोजन केले गेले होते. ज्यामध्ये गरीबी आणि उपासमार समाप्त करणे, आरोग्य आणि शिक्षण यांमध्ये सुधारणा करणे, शहरे अधिक शाश्वत बनवणेहवामानातील बदलांचा  सामना करणे तसेच समुद्र आणि वन संरक्षण करणे याचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर २०१५ पूर्वीच्या विकासावर वाटाघाटी करण्यास जानेवारी २०१५ मध्ये सुरुवात केली आणि वाटाघाटी ऑगस्ट २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आल्या. एक अंतिम दस्तऐवज तयार करून, न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या  कार्यालयात तो प्रसिद्ध करण्यात आला. ही सर्व पार्श्वभूमी सांगत असताना २५ ते २७  सप्टेंबर दरम्यान होत असलेली परिषद मानव हिताच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात येते.
शाश्वत विकास परिषदेची प्रस्तावित उद्दिष्टे :
          या परिषदेने सदर केलेल्या मसुद्यात एकूण १७ उद्दिष्टे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत, जी पूर्ण करण्यासाठी सर्व सदस्य राष्ट्रांकडून पुढील १५ वर्षांचे नियोजन केले जाणार आहे.
. गरिबी समूळ नष्ट करणे.
. सर्व मानवजातीस अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषा अन्न देऊन भूकबळी समाप्त करणे आणि शाश्वत शेती विकासाला प्रोत्साहन देणे.
. सर्वांना निरोगी जीवन आणि आनंददायी जीवन जगता यावे याची खात्री करून देणे.
. सर्वांना समान संधी आणि न्याय देणे.
. सर्व राष्ट्रांमध्ये स्त्री-पुरुष समानता साध्य करणे आणि सर्व स्त्रिया आणि मुलींना  शिक्षण देऊन सक्षम बनवणे.
. सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.
. सर्वांना स्वस्त, स्थायी आणि आधुनिक ऊर्जा उपलब्ध करून देणे.
. सर्वांना योग्य रोजगार उपलब्ध करून देताना, कामाच्या रीतसर मोबदला देणे.
. पायाभूत सुविधा वाढवताना समावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणास नावीन्यपूर्ण प्रोत्साहन देणे. १०. विकसित आणि विकसनशील देशांमधील विषमता दूर करणे.
११. शहरे आणि मानवी वस्ती सर्व  समावेशक, सुरक्षित आणि संवेदनक्षम बनवणे.
१२. टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या पुनरुत्पादित वस्तूंचा वापर वाढवणे.
१३. हवामानातील बदल आणि त्याचे परिणाम सोडविण्यासाठी त्वरित कारवाई करणे.
१४. शाश्वत विकास साधण्यासाठी सागरी संसाधनांचा अधिकाधिक वापर करणे.
१५. जमिनीची धूप आणि जैवविविधतेचे नुकसान थांबवण्याकरिता ओसाड  जमिनीचे व्यवस्थापन करणे. १६. आंतरराष्ट्रीय स्तरांवर प्रभावी जबाबदार आणि समावेशक संस्था तयार करून शाश्वत विकासासाठी शांततापूर्ण  मार्गाने प्रयत्न करणे.

१७आंतरराष्ट्रीय स्तरावर शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारीची अंमलबजावणी म्हणजे मजबूत आणि सर्वसमावेशक व्यवस्था तयार करणे.