Saturday, May 25, 2019

हे ‘राज’कारण आहे

दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्या पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी निवडून आलेला नाही. ज्या पक्षाचा आजवर एकही खासदार नाही. ज्या पक्षाच्या नेतृत्वाने वेळोवेळी केवळ सोयीचे राजकारण केले आहे, त्या पक्षाने म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काय मिळवले अथवा काय गमावले? हा एक यक्ष प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनांमध्ये नक्कीच असणार आहे. कारण वेळोवेळी संधीसाधू राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांच्या भुमिकेमुळे कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रकारची संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. 

२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आधीच एक प्रकारची मरगळ आलेला पक्ष. त्यात निवडून आलेला होता, असा एक आमदार देखील मनसेला सोडून गेला. नाशिक महानगरपालिकेतील सत्ता गेली. अशा परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीत एक ही उमेदवार न देता मोदींविरोधात प्रचार करण्याचे धाडस राज ठाकरे यांनी केले होते. त्यांनी हे धाडस केले असे म्हणणे योग्य आहे, की “दुसऱ्याच्या वरातीत नाचतंय येडं!” असं म्हणणे योग्य आहे. हे लोकमताच्या कलातून दिसून आलेलं आहे. राज ठाकरे यांनी युतीच्या विरोधात ज्या ज्या मतदार संघांमध्ये सभा घेतल्या होत्या, त्या मतदार संघातील काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या दिग्ग्ज नेत्यांचा पराभव झालेला आहे. यामध्ये अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, राजू शेट्टी आणि मुंबईतील सर्वच नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे राज ठाकरे यांचं नक्की काय चाललं आहे, हे मनसे कार्यकर्त्यांना समजण्याच्या पलीकडे आहे. परंतु राज ठाकरे यांच्या माध्यमातून सेना-भाजप युती विरोधात एका वेगळ्या प्रचाराचा फंडा वापरण्यात आलेला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा राजकीय डाव चालवलेला असावा. हे एक शहा प्रतिशहाचे वेगळ्या प्रकारचे ‘राज’कारण होते. जे जनतेच्या लक्षात आल्यामुळे निष्प्रभ ठरले. 

२०१९ ची लोकसभा निवडणूक ही व्यक्ती केंद्रीत निवडणूक होती. यामध्ये पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना रंगला होता. यामध्ये महाराष्ट्राची स्थिती पाहिली तर, मुख्य लढत युती विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होती. यावेळी निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्याकडे जात असताना राज ठाकरे यांनी प्रचारात उडी घेतली. ज्या राज ठाकरे यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांचे पाय धुवून पिले पाहिजेत, अशी भाषा केली होती. ज्या राज ठाकरे यांनी २०१४ साली, “माझ्या पक्षाचे खासदार निवडून द्या, ते मोदींना पाठिंबा देतील” अशी भाषा केली होती. गुजरात मॉडेलची भाषा केली होती. तेच राज ठाकरे, २०१९ च्या निवडणुकांमध्ये प्रचार करत असताना विरोधाचा सूर गाऊ लागले. मोदी आणि अमित शहांबद्दल अपशब्द बोलू लागले. अगदी खालच्या थराचा प्रचार झाला. मात्र हे सर्व नाट्य लोकांच्या मनात काही उतरवू  शकले नाही. शेवटी निकाल काय लागले हे आपण पाहिलेच आहे. 

असे असताना देखील, राज ठाकरे यांच्या सभांना मात्र प्रचंड गर्दी जमत होती. त्यांच्या प्रचाराच्या वेगळ्या पद्धतीचा हा प्रभाव होता. परंतु मागील निवडणुकांप्रमाणेच केवळ राज यांची भाषणे ऐकण्यासाठी प्रचारादरम्यान जमलेली ही गर्दी, मतांमध्ये परावर्तित होऊ शकली नाही. मनसेचा मागील १० वर्षातील इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे आधीच डबघाईला आलेला, मरगळ आलेला हा पक्ष अजून खोलात गेला आहे. यास पूर्णपणे राज ठाकरे जबाबदार आहेत. 

राज ठाकरे यांची अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांच्याकडून लोकांना भरपूर अपेक्षा होत्या. परंतु या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरल्यामुळे, त्यांची ही अवस्था झालेली आहे. त्यामुळे सभांमधून इतरांना केवळ नावं ठेवल्यामुळे मतं मिळत नसतात, त्यासाठी केलेली कामे दाखवणे देखील आवश्यक असते, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यांच्या बदलत्या भूमिकांमुळे संभ्रमावस्थेत जाणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना काही ठोस दिशा दाखवली पाहिजे. आजवर केलेले संधिसाधू राजकारण बाजूला ठेवून, पक्ष संघटना मजबूत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. दुसऱ्यांवर टिका करण्यापेक्षा पक्ष बांधणीकडे लक्ष दिले पाहिजे. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील राज ठाकरे यांची बदललेली भुमिका, हे शरद पवार यांचे राजकारण होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण मागील काही दिवसांमध्ये त्याचे संकेत मिळालेले आहेत. सोलापूरमधील निवडणूक प्रचारादरम्यान पवार आणि राज ठाकरे एकाच हॉटेलमध्ये थांबले होते, किंवा त्या दोघांमध्ये वाढलेली जवळीक याचीच उदाहरणे आहेत. परंतु हे सर्व लोकांनी ओळखले होते. त्यामुळेच “ऐकावे जनाचे, करावे मनाचे!”, या उक्तीप्रमाणे जनतेने त्यांच्या मनातील कौल देऊन नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून दिले आहे. परंतु आजवर संधीसाधू राजकारण करणारे राज ठाकरे, येणाऱ्या काळात कोणती भुमिका घेतात हे येणारा काळच ठरवणार आहे. कारण शेवटी हे ‘राज’कारण आहे.