Saturday, May 20, 2017

दुर्ग भ्रमंती - नरवीर ‘सिंहगड’

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला सिंहगड (कोंडाणा किल्ला) पुणेकरांसाठी सर्वात जवळचे ठिकाण आहे. पुण्यातील दुर्गप्रेमी सिंहगडावर सतत गर्दी करत असतात. सह्याद्री पर्वताच्या भुलेश्वर डोंगररांगेवर पूर्वी "कोंढाणा" नावाचा प्राचीन किल्ला होता. तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव "सिंहगड" ठेवले. तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला कोंढाणा किल्ला, आजच्या स्थितीत पुणेकर मंडळींसाठी पर्यटनस्थळ म्हणून कार्यरत आहे. सिंहगडावरून परिसरातील पुरंदर, लोहगड, विसापूर, राजगड आणि तोरणा किल्ल्यापर्यंतचा प्रदेश दिसतो.
सिंहगडावर जाण्यासाठी पुणे मनपापासून आणि स्वारगेटहून गडाच्या पायथ्यापर्यंत पी. एम. टी. बस आहेत. तसेच सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे खडकवासला धरणाजवळून गडाच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहन घेवून जाता येते. पी. एम. टी. बसने गडाच्या पायथ्यापर्यंत गेल्यानंतर हातकरवाडी गावातून पुढे पायी जाण्यासाठी पायवाट आहे. गडावर जाण्यासाठी वाहनाने जाण्यापेक्षा या पायवाटेने गेल्यानंतर ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो.
सिंहगडावर पुणे दरवाज्यापासून ते शेवटी असलेल्या टिळक वाड्यापर्यंत (बंगल्यापर्यंत) सर्व ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच गडावर अनेक हॉटेल्स देखील आहेत.

पुणे दरवाजा मार्गे : पुणे-सिंहगड पी. एम. टी. बसने पुण्यातून निघाल्यानंतर खडकवासला धरणापासून सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते.
पुणे- कोंढणपूरमार्गे : पुणे- कोंढणपूर बसने कल्याण गावामध्ये पोहचल्यानंतर कल्याण दरवाज्यातून सिंहगडावर जाता येते. कल्याण दरवाजा सिंहगडाच्या पश्चिम दिशेस आहे.

कोंढाणा किल्ला / सिंहगड चा इतिहास :
कोंढाणा किल्ला केंव्हा बांधला असावा, याचा ज्ञात पुरावा नाही. परंतु कोंढाण्याचा इतिहास सुरु होतो तो आदिशाहीच्या सत्तेपासून. कोंढाणा गावामध्ये असलेला कोंढाणा किल्ला पूर्वी आदिलशाहीच्या अखत्यारीत होता. त्यावेळी आदिलशाहिने दादोजी कोंडदेव यांना किल्ल्याचा सुभेदार म्हणून नियुक्त केले होते. इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पुरंदरच्या तहावेळी कोंढाणा किल्ला मोघलांना देण्यात आला. त्यावेळी मुघलशाहीकडून सरदार उदयभान राठोड यांस कोंढाणा किल्ल्याचा गडकरी म्हणून नियुक्त करण्यात आले.
मराठेशाहीच्या इतिहासात कोंढाणा किल्ल्यावर घडलेल्या पराक्रमामुळे कोंढाण्याचे नामकरण ‘सिंहगड’ झाले, आणि किल्ला विशेषत्वाने प्रसिद्धीस आला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने, मुघलांकडे असलेला कोंढाणा किल्ला, मराठ्यांनी जिंकला खरा परंतु यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांना वीर मरण आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळी, “गड आला, पण माझा सिंह मात्र गेला”, असे म्हणत कोंढाण्याचे नामकरण ‘सिंहगड’ असे केले.

सिंहगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
पुणे दरवाजा : सिंहगडाच्या वाहन तळापर्यंत गेल्यानंतर सुरुवातीस पुणे दरवाजा आहे. गडावर प्रवेश करण्यासाठी पुण्याच्या बाजूने हा मुख्य दरवाजा आहे. पुण्याच्या बाजूस असणारे असे तीन दरवाजे आहेत. एका मागे एक अशा या तीन दरवाज्यामधून गडाकडे जाण्याकरिता वाट आहे.

दारूचे कोठार : पुणे दरवाज्यातून आत आल्यानंतर समोर दारूचे कोठार दिसते. दारूच्या कोठाराची थोडीफार पडझड झालेली आहे. परंतु हे सुस्थितीत आहे. पुणे परिसरातील पर्यटकांची याठिकाणी सतत वर्दळ असल्यामुळे, याठिकाणी सतत गर्दी असते. गडावर येथे तोफखाना असे लिहिलेली एक पाटी देखील आहे.

खांद कडा : पुणे दरवाज्यामधून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर खांद कडा दिसतो. या कड्यावरून सह्याद्री पर्वताच्या परिसरातील निसर्ग दिसतो. तसेच पुण्यातील इमारती देखील दिसतात.

कोंढाणेश्वर महादेव मंदिर : इतर किल्ल्यांप्रमाणे कोंढाणा किल्ल्यावर देखील एक यादवकालीन महादेवाचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते. मंदिरामध्ये  कोंढाणेश्वर महादेवाची पिंड आणि एक नंदीची मुर्ती आहे.

अमृतेश्वर मंदिर : कोंढाणेश्वराच्या मंदिरापासून थोडे पुढे गेल्यानंतर अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. यादव घराण्याच्यापूर्वी कोंढाणा किल्ल्यावर कोळ्यांची वस्ती होती, आणि भैरव हा कोळ्यांचा देव असल्यामुळे अमृतेश्वर मंदिरामध्ये भैरव आणि भैरवीच्या मुर्त्या आहेत. यामध्ये हातात राक्षसाचे मुंडके असलेली भैरवाची मुर्ती आहे.

नरवीर तानाजी मालुसरे स्मारक : अमृतेश्वर मंदिराच्या मागील बाजूने पुढे चालत गेल्यानंतर नरवीर  तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. उदयभान राठोडशी लढता लढता धारातीर्थी पडलेल्या नरवीर तानाजींच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे.

देव टाके : नरवीर तानाजी मालुसरे स्मारकाच्या जवळून पुढे गेल्यानंतर देव टाके आहे. या टाक्यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होत असे.

कल्याण दरवाजा : सिंहगडाच्या पश्चिम दिशेस कल्याण दरवाजा आहे. कोंढणपूर गावामधून पायथ्याच्या कल्याण गावातून गडावर आल्यानंतर कल्याण दरवाज्यामधून गडावर प्रवेश करता येतो. कल्याण दरवाज्यावर काही दगडी शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.

उदयभान राठोडचे स्मारक : मोगलांनी उदेभान राठोड यास कोंढाण्याचा गडकरी म्हणून नियुक्त केले होते. नरवीर तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्या लढाईमध्ये उदयभान देखील मारला गेला होता. या उदयभान राठोडचे देखील गडावर स्मारक आहे.

झुंजार बुरूज : सिंहगडाच्या दक्षिण दिशेस झुंजार बुरूज आहे. उदयभान राठोडच्या स्मारकापासून पुढे गेल्यानंतर झुंजार बुरुजावर येता येते. झुंजार बुरुजावरून पानशेतचा परिसर, राजगड, तोरणा आणि पुरंदर दिसतात.

तानाजी कडा : तानाजी कडा सिंहगडाच्या पश्चिम दिशेस आहे. नरवीर तानाजी मालुसरे याच बुरुजावरून मावळ्यांसह गडावर चढले होते. तानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड आणि त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा वेगळ्याप्रकारे सांगण्याची गरज नाही.

छत्रपती राजाराम महाराज स्मारक : छत्रपती राजाराम महाराज यांची सिंहगडावर समाधी आहे.  मुघलशाहीशी लढा देत असताना छत्रपती राजारामांचे सिंहगडावर निधन झाले होते. त्यावेळी छत्रपती राजाराम यांचे स्मारक सिंहगडावर बांधण्यात आले. पुढे पेशवाईमध्ये सिंहगडावर असलेल्या या स्मारकांची रीतसर व्यवस्था ठेवण्यात आलेली होती.

लोकमान्य टिळक यांचा वाडा : सिंहगडावर लोकमान्य टिळक यांचा एक वाडा आहे. इ.स. १९१५ साली लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची या वाड्यामध्ये भेट झाली होती. आगरकर आणि लोकमान्य टिळक सिंहगडावर आल्यानंतर येथे येत असत.

सिंहगड. सिंहगड आपणास मराठेशाहीच्या एका सरदाराच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. इतिहासात विजयी पताका मिरवणारा ‘सिंहगड’ आजच्या दिवशी मात्र आपल्याच लोकांनी बाटवला आहे. रेव्ह पार्ट्या, दारू पिवून दंगा करण्यासाठी आजकाल पुणे परिसरातील मंडळींसाठी सिंहगड पायथा एक प्रकारचा अड्डाच झाला आहे. अश्लील चाळे करण्यासाठीच जाऊन काही हे मुक्त ठिकाण असल्यागत गडावर प्रेमी युगुलं वावरत असतात. याच साठी नरवीर तानाजींनी बलिदान दिले का? याच साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सिंहगड ठेवले होते का? याचा विचार आजकाल खुप कमी लोक करत असावेत. त्यामुळेच सिंहगडावर दुर्गप्रेमी कमी आणि प्रेमी लोक अधिक असतात.
प्रशासनाच्या पुढाकाराने सध्या गडावर व्यवस्था राखली जात आहे. तरी देखील इतिहासातील वास्तवाचा पुरावा असलेल्या सिंहगडचे पावित्र्य, एक नागरिक म्हणून आपण देखील जपणे गरजेचे आहे. गडावर गेल्यानंतर स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या या ऐतिहासिक वारसा स्थळांना आपल्या भावी पिढ्यांसाठी एक आदर्श आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणून वारसारूपाने प्रदान करण्यास हातभार लावू शकतो.


हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 
- नागेश कुलकर्णी 

Friday, May 19, 2017

दुर्ग भ्रमंती - सज्जनगड



|| दास डोंगरी राहतो, 
यात्रा रामाची पाहतो |
देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे ||

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांच्या इतिहासात स्वतःच्या विशिष्ठ पाऊल खुणा अस्तित्वात आहेत. मग आजच्या दिवशी त्या किल्ल्यावर काही अवशेष असतील अथवा नसतील, तरीही अनेक किल्ले स्वतःचे पावित्र्य आणि वेगळेपण जपून आहेत. त्यामध्ये सज्जनगडाचा रायगडाच्या बरोबरीने क्रमांक लागतो. समर्थ रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जाणून घेत असताना सज्जनगडाचा नामोल्लेख येतोच, त्यामुळे सज्जनगडाचे स्वराज्य स्थापनेत विशेष आणि महत्वपूर्ण योगदान आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील शंभू महादेव या नावाने ओळखली जाणारी एक डोंगररांग सातारा जिल्ह्यात पुर्व दिशेस विस्तृतपणे वाढत जाते. शंभू महादेव डोंगररांगेवरच सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या अगदी जवळ असलेल्या परळी गावाच्या डोंगरराईत हा किल्ला आहे. उरमोडी नदीच्या खोर्‍यात परळीचा किल्ला उभा आहे. सज्जनगड किल्ल्यावर समर्थ रामदासांची समाधी आहे. तसेच समर्थ रामदासांचे याठिकाणी अनेक दिवस वास्तव्य होते.

सज्जन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. कोणत्याही वाटेने गेल्यानंतर पायऱ्या चढून गडावर जावे लागते.

परळी गावामधून : सातारा गावामधून परळी गावामधून गडाकडे जाता येते. परळी गावातील गड पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.

गजवाडी पासून : सातारा परळी वाटेवर परळीच्या अलीकडेच गजवाडी गाव आहे. तेथून गडावर जाता येते. तेथून पुढे गडावर जाता येते.


सज्जन गडाचा इतिहास :
परळी गावाच्या शेजारी असलेल्या डोंगरावर पूर्वी आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, असे म्हणतात. त्यामुळे या किल्ल्यास अपभ्रंश स्वरुपात ‘अस्वलगड’ असे म्हटले जात असे, स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर असे सांगण्यात आले. सज्जन गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव असल्यामुळे, या किल्ल्यास परळीचा किल्ला असे देखील म्हणतात. सज्जनगडाची उभारणी शिलाहार घराण्यातील भोज राजाने ११ व्या शतकात केली असल्याचे इतिहासकारांकडून सांगण्यात येते. सज्जनगड हा किल्ला बहमनी राजाकडून वारसदार आदिलशाहीकडे वर्ग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो स्वराज्याच्या सेवेत दाखल झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीस मान देवून समर्थ रामदास स्वामी उर्फ नारायण विसाजी ठोसर हे परळीच्या किल्ल्यावर वास्तव्यासाठी आले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे "सज्जनगङ" असे नाव ठेवले, असे इतिहासातून समजते. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे पहिले छत्रपती या नात्याने छत्रपती शिवाजीराजे भोसले सज्जनगडावर समर्थ रामदासांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांनी युवराज संभाजी राजांना समर्थ रामदासांच्या सज्जनगडावरील वास्तव्यात पाठवले होते. दरम्यान युवराज संभाजीराजे भोसले  सज्जनगडावरून पळून गेले होते. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज याचं गुरु शिष्याच नात होत. समर्थ रामदासंकडून मार्गदर्शन घेण्याकरिता शिवाजी महाराज वेळोवेळी सज्जनगडावर जात असत अथवा पत्र व्यवहार करत असत. (यावर वाद असू शकतो, परंतु इतिहासातील नोंदींवरून हे मान्य करावेच लागेल.) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर तसेच प्रतापगडावरून अफजल खानाच्या वधाचा डाव आखत असताना,समर्थ रामदासांच्या अनुयायांनी म्हणजेच ‘रामदासी’नी छत्रपतींसाठी हेरगिरीचे काम केले असल्याची नोंद इतिहासात आढळते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इ.स. १६८२ मध्ये सज्जनगडावर श्रीरामाचे मंदिर बांधून तेथे राममूर्तींची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थ रामदासांचे निधन झाले. समर्थ रामदासांचे रामदासी, रामदासांच्या निधनानंतर देखील सज्जनगडावर श्रीराम मंदिरात रामदासांच्या समाधीजवळ राहत होते. यावेळी समर्थ रामदासांच्या शिष्या अक्कास्वामी यांनी मठाची व्यवस्था पाहिली होती. त्यानंतर इ.स. १७०० मध्ये फतेउल्ल खानाने सज्जनगडास वेढा देऊन, सज्जनगड मोगलांच्या ताब्यात घेतला. त्यावेळी गडाच्या विशिष्ठ ठिकाणावरून त्याचे ‘नौरसतारा’ असे नामकरण करण्यात आले होते. त्यानंतर मुघलांकडून इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी सज्जनगड पुन्हा मराठेशाहीच्या राजवटीखाली सहभागी करून घेतला. इ.स. १८१८ मध्ये सज्जनगड ब्रिटीशांच्या राजवटीत कंपनी सरकारच्या अधिपत्याखाली आला.

सज्जन गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

समर्थ दर्शन : सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत पोचत असताना, वाटेवर उजव्या बाजूस हनुमानाची उंच मुर्ती नजरेस पडते. गडाच्या पायथ्याजवळ असलेल्या वाहन तळाकडे जात असताना ही मुर्ती दिसते. या मूर्तीच्या परिसरात समर्थ दर्शन येथे, समर्थ रामदासांचा जीवनपट उलगडलेला आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाद्वार : सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत वाहनाने गेल्यानंतर, पायथ्यापासून गडाकडे जात असताना वाटेवर सर्वप्रथम ‘श्री छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ लागते. गडावर जाण्यासाठी मुख्य द्वार असल्यामुळे, दररोज रात्री ९ वाजता नियमाप्रमाणे द्वार बंद करण्यात येते. तसेच सकाळी द्वार उघडण्यात येते. शिवाजी महाद्वार खुप भक्कम आणि उंच आहे.

श्री समर्थ महाद्वार : शिवाजी महाद्वारातून पुढे गेल्यानंतर पुढे दुसरे द्वार लागते, ते म्हणजे ‘श्री समर्थ महाद्वार’ होय. आजही या दोन्ही द्वारांचे मुख्य दरवाजे रात्री ९ नंतर बंद होतात. या दोन्ही मुख्य महाद्वारांच्या तटबंदी भक्कम आहेत. गडाकडे जात असताना वाटेवर समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतीची प्रतिकृती स्वरूपातील छोटी मंदिरे आहेत.

रामघळ : श्री समर्थ महाद्वारातून पायर्‍या चढून गडावर प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस रामघळ आहे. रामघळ समर्थ रामदासांची एकांतात बसण्याची जागा होती.

अंग्लाई देवीचे मंदिर : गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे एक पाटी लावलेली दिसते, अंग्लाई देवी मंदिराकडे. या पाटीपासून पुढे गेल्यानंतर एक छोटे तळे आहे. याच परिसरात अंग्लाई देवीचे मंदिर आहे. अंग्लाई देवीची ही मुर्ती समर्थ रामदासांना डोहात सापडली असल्याची आख्यायिका सांगितली जाते.

पेठेतील मारुती मंदिर : गडावरील मुख्य पेठेत हे मारुती मंदिर आहे. समर्थ रामदास गडावर राहण्यास येण्यापूर्वीपासून हे मंदिर गडावरती आहे.

समर्थ रामदासांचे समाधी मंदिर आणि श्रीराम मंदिर : अंग्लाई देवीच्या मंदिराकडून परत येवून समाधी मंदिराकडे जात असताना वाटेवर संस्थानाचे कार्यालय, श्री समर्थ संस्थान कार्यालय आणि काही छोटी साहित्य भांडार वस्तूंची दुकाने आहेत. मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर विस्तीर्ण आणि भव्य असा सभामंडप आहे. सभामंडप परिसरात मंदिराचा मुख्य गाभारा आहे. सभामंडप परिसरातच समर्थ महाप्रसाद गृह आहे. समोरच श्रीरामाचे मंदिर, समर्थ रामदासांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थ रामदासांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. श्रीराम मंदिराच्याखाली तळ मजल्यावर समर्थ रामदासांचे समाधी मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूने गेल्यानंतर संस्थानच्या धर्मशाळेकडे जाण्यासाठी वाट आहे. सज्जनगडावरील धर्मशाळेत निशुल्क राहण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच मंदिर परिसरातील प्रसादालयात निशुल्क भोजन देखील करता येते.
सज्जनगडावर परिसरात कल्याण स्वामी यांचे स्मारक आहे. तसेच समर्थ रामदासांच्या शिष्या वेण्णा बाई आणि अक्काबाई स्वामी यांचे देखील समाधी वृंदावन मंदिर आहे. ब्रह्मपिसा स्मारक आहे. एकूणच काय तर सज्जनगड परिसर सध्या केवळ समर्थमय आहे.

धाब्याचा मारुती मंदिर : सज्जनगडाच्या पश्चिम तटबंदीजवळ समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. असे सांगण्यात येते की, गडाच्या या पश्चिम बाजूस छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांची भेट होत असे. धाब्याच्या मारुतीपासून ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता दिसतो.
सज्जनगड परिसरात आल्यानंतर साताऱ्याहून ठोसेघर धबधबा, अजिंक्यतारा किल्ला आणि कास पठार ही ठिकाणे देखील जवळ आहेत. पर्यटक सज्जनगडावर आल्यानंतर यासर्व ठिकाणी जावून येवू शकतात.
आजच्या दिवशी सज्जनगडावर पडलेल्या अवस्थेतील तटबंदी आहेत आणि गड म्हणून काही भग्न अवस्थेतील अवशेष आहेत. परंतु समर्थ रामदास स्वामींच्या समाधी स्थळामुळे सज्जनगडास विशेष श्रद्धास्थान प्राप्त झाले आहे. रामदासी आणि समर्थ रामदासांना श्रद्धास्थान मानणारे भाविक गडावर नियमित येत असतात. तसेच राम नवमीला गडावर उत्सव असतो. त्यामुळे समर्थांच्या या भूमीवर आपण पर्यटक म्हणून अथवा भाविक म्हणून गेल्यानंतर गडाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 

-    नागेश कुलकर्णी

Monday, May 1, 2017

दुर्ग भ्रमंती - परम प्रतापी पुरंदर

ज्याप्रमाणे प्रतापगडाने पराक्रमी इतिहास अनुभवलेला आहे, त्याचप्रमाणे पुरंदरनेदेखील मोरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम पाहिलेला आहे. पुणे परिसरातील इतर किल्ल्यांच्या दृष्टीने पुरंदरचा इतिहास खुप महत्वाचा आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. तसेच पेशवे कालीन इतिहासात देखील पुरंदरावर पेशव्यांचे विशेष वर्चस्व होते. त्यामुळेच इतिहासात पुणे आणि कोकणच्या वाटेवर असलेल्या पुरंदर किल्ल्याला इतिहासात विशेष महत्व होते. पुरंदरपासून जेजुरी गड जवळ आहे.

 
पोवाडे गाणारे शाहीर आणि इतिहासकार, पुरंदरचे वर्णन करत असताना म्हणतात,
 
अल्याड जेजुरी,

पल्याड सोनोरी |

मध्ये वाहते कऱ्हा,

पुरंदर शोभतो शिवशाहीचा तुरा ||
 
पुरंदर किल्ला बांधण्यात आलेल्या डोंगराचे नाव ‘इंद्रनील पर्वत’ असे होते. त्यामुळे पुरंदर म्हणजे इंद्र, याप्रमाणे किल्ल्यास पुरंदर हे नाव देण्यात आले असावे असा कयास आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. नारायणपूरमध्ये यादवकालीन महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. त्यामुळे हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वी बांधण्यात आला असावा असे इतिहासकार सांगतात.

पुण्याहून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी सासवडला आल्यानंतर नारायणपूरकडे जाणाऱ्या एस.टी.बसने आपण किल्ल्यापर्यंत पोहचू शकतो. तसेच स्वतःचे वाहन घेवून गेल्यानंतर याच मार्गाने पुरंदरच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते. सासवड हे पुणे जिल्ह्यातील पुणे जेजुरी रस्त्यावरील तालुक्याचे ठिकाण आहे.
 
 
पुरंदरचा इतिहास :
एका आख्यायिकेनुसार द्रोणगिरी पर्वत उचलून नेत असताना, हनुमानाकडून पर्वताचा काही भाग या परिसरात खाली पडला होता, तोच हा डोंगर. पुढे यास ‘इंद्रनील पर्वत’ असे देखील म्हटले गेले.

पुरंदर किल्ल्याबाबतच्या इतिहासातील नोंदीनुसार बहामनी राजवटीमध्ये हा किल्ला चंद्र संपत देशपांडे यांच्या ताब्यात होता. त्यांनी पुरंदर किल्ल्यावर पुर्ननिर्माणास प्रारंभ केला. त्यानंतर इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमधील अनेक किल्ले स्वराज्याला जोडून घेतले होते. म्हणूनच शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढण्यास पाठवले होते. तेंव्हा पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज देवून, लढाई जिंकली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचा कारभारी म्हणून नेमले.

इतिहासातील महत्वाची घटना या पुरंदरच्या पायथ्याशीच घडलेली आहे. ती घटना म्हणजे पुरंदरचा तह. दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग, औरंगजेबाच्या सांगण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि दख्खन प्रांतातील त्यांच्या कारवाया थांबवण्यासाठी शिवाजी राजांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याच्या हेतूने, दख्खन प्रांतात दाखल झाले होते. त्यावेळी छत्रपतींचे मावळे आणि खानच्या शिबंदीमध्ये पुरंदरजवळ लढाई झाली होती. दिलेर खानाने लढाईच्या शेवटच्या टप्प्यात वज्रगड ताब्यात घेवून पुरंदरावर हल्ला केला, त्यावेळी पुरंदरच्या माचीवर दिलेर खानाची आणि मुरार बाजींची लढाई झाली होती. लढाईमध्ये शेवटपर्यंत लढा दिल्यानंतर मुरारबाजी धारातीर्थी पडले आणि पुरंदरही पडला. पुरंदर किल्ला पडल्याचे समजताच छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले. त्यानंतर ११ जून १६६५ रोजी झालेला ’पुरंदरचा तह’ इतिहासात प्रसिद्ध आहे. पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी पुणे परिसरातील २३ किल्ले मोघल साम्राज्यास दिले होते. पुरंदरचा तह जरी झालेला असला, तरीही पुरंदर परिसराने मुरार बाजींचा परम प्रताप पाहिलेला होता, त्यामुळे या पुरंदर किल्ल्यास ‘परम प्रतापी पुरंदर’ अशी उपाधी नकळतपणे मिळते.

त्यानंतर मराठेशाहीतील सरदार निळोपंत मुजुमदार यांनी किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुरंदर ताब्यात घेवून त्याचे नाव ’आजमगड’ ठेवले होते. त्यानंतरच्या लढाईमध्ये मराठेशाहीतील सरदाराने पुरंदर परत स्वराज्यात आणला, त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी किल्ला पेशव्यांच्या स्वाधीन केला. पुण्याच्या आधी पुरंदर किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. दरम्यान पेशवाईतील श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म पुरंदरावर झाला. त्यानंतर इंग्रजांनी इ.स. १८१८ मध्ये पेशवाईच्या पडावानंतर पुरंदर ताब्यात घेतला.
 
पुरंदर किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. सह्याद्री पर्वताच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही डोंगररांगा पुर्व दिशेस विस्तृतपणे वाढत जातात, त्यापैकी एका डोंगर रांगेवर सिंहगड आहे. त्याच्याच पुढे भुलेश्वरजवळ, याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड किल्ले आहेत. कात्रजचा घाट, बापदेव घाट, दिवेघाट चढून गेल्यानंतर पुरंदरच्या पायथ्याशी पोहचता येते.

पुरंदरच्या पायथ्यापासून मुरारगेटने किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर समोर "पद्मावती तळे" दिसते. त्याच्या पुढे इंग्रजांच्या काळात बांधलेले एक चर्च आहे. चर्चपासून पुढे गेल्यानंतर "वीर मुरार बाजींचा” पुतळा आहे.
 
बिनी दरवाजा : बिनी दरवाज्यामधून किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर “वीर मुरारबाजीं” चा पुतळा दिसतो. किल्ल्याच्या उत्तर दिशेस असलेल्या माचीवरील हा एकमेव दरवाजा आहे. बिनीच्या दरवाज्यातून पुढे गडाकडे थोडे पुढे गेल्यानंतर ‘पुरंदरेश्वर’ मंदिर आहे.
 
पुरंदरेश्वर मंदिर : हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले महादेवाचे पुरंदेश्वर मंदिर, गडावरील मुख्य स्थान आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिरात देवेंद्र इंद्र देवाची मूर्ती आहे. पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. पुरंदेश्वर मंदिराबाहेर एक विहिर आहे, या विहिरीस "मसणी विहीर" असे म्हणतात.
 
राजाळे तलाव आणि भैरवखिंड : पुरंदरेश्वर मंदिरापासून पुढे चालत गेल्यानंतर उत्तर माचीच्या टोकावर राजाळे तलाव आहे. राजाळे तलावाच्या पुढे पुरंदर आणि वज्रगड यांच्यामध्ये भैरवखिंड आहे. भैरव खिंडीतून वज्रगडाकडे जाण्यासाठी वाट आहे.
 
पेशव्यांचा वाडा : पुरंदेश्वर मंदिराच्या एका बाजूस पेशव्यांच्या दुमजली वाड्याचे भग्न अवशेष दिसतात. पेशवाईच्या सुरुवातीस बाळाजी विश्वनाथ यांनी हा वाडा बांधून घेतला होता. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते.
 
दिल्ली दरवाजा : पुरंदर किल्ल्याच्या उत्तर दिशेस हा दरवाजा आहे. दरवाज्यावर हनुमानाची मुर्ती आहे. दिल्ली दरवाज्यातून आत गेल्यानंतर "गणेश दरवाजा" आहे. गणेश दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर "बावटा बुरुज" आहे. पूर्वी येथे ध्वज लावला जात असे.
 
कंदकडा : गणेश दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर समोर पूर्व दिशेस पसरलेला कंद कडा नजरेस पडतो. या कड्याच्या शेवटी कंदकडा बुरूज आहे. कंदकडा पाहून परत गणेश दरवाज्याजवळ आल्यानंतर शेंदर्‍या बुरुजाकडे जाता येते.
 
शेंदर्‍या बुरूज : हा बुरुज पद्मावती तळ्याच्यामागे आहे. स्थानिकांकडून सांगण्यात येते की, शेंदर्‍या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा गडावरील उपस्थित सोननाक यांनी त्यांचा मुलगा आणि सून यांचा बळी देवून बुरूज उभा केला होता.
 
केदारेश्वर मंदिर : पुरंदरचे मूळ दैवत असलेल्या केदारेश्वर मंदिरात जाण्यासाठी दगडी जीना बांधलेला आहे. तसेच या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीला भाविक केदारेश्वराच्या दर्शनासाठी आजही येत असतात. केदारेश्वराचे मंदिर पुरंदर किल्ल्यावरील सर्वात उंचावरील ठिकाण आहे. मंदिर परिसरातून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहीडा, मल्हारगड हे किल्ले दिसतात. केदारेश्वर मंदिराजवळच केदारगंगेचा उगम होतो.

आजच्या परिस्थितीत पुरंदर किल्ला आणि वज्रगड भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सुरेक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला बंदच असतो. आणि वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. भारतीय सैन्याकडून पुरंदर किल्ल्यावरील कंदकडा, केदार दरवाजा आणि बावची माची सुरक्षेच्या कारणास्तव तारांचे कुंपण घालून बंद करण्यात आली आहेत. तसेच भैरवखिंड आणि वज्रगड परिसरात जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.

मुरार बाजींच्या परम प्रतापाची साक्ष देणारा पुरंदर आज भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे गडावर सुरक्षा व्यवस्था अधिक असते. परंतु इतिहासातील लढायांची आठवण करून देणारा हा किल्ला पाहिल्यानंतर मराठेशाहीचा सार्थ अभिमान वाटतो.

हा लेख महा तरुण भारत साठी लिहिलेला आहे .

नागेश कुलकर्णी

Wednesday, April 26, 2017

दुर्ग भ्रमंती - रयतेचा रायरेश्वर

रायरेश्वर मंदिर 
रायरेश्वर. कोणी याला किल्ला म्हणेल. कोणी डोंगर. तर कोणी केवळ रायरेश्वराचे मंदिर म्हणेल, परंतु रायरेश्वर म्हटले की, ‘स्वराज्य स्थापनेची शपथ’ हा इतिहासातील प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. इतिहासातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात काही निवडक मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, आणि रायरेश्वर पठाराची इतिहासात नोंद झाली. सतराव्या शतकाच्या मध्यावर शिवशाहीतील ही प्रेरक घटना त्यावेळी घनदाट अरण्यात असलेल्या रायरेश्वराच्या साक्षीने घडली. रायरेश्वर पठारावरील रायरेश्वर याठिकाणी महादेवाचे मंदिर आहे. रायरेश्वराच्या मंदिरात सभामंडप, समोर भग्न अवस्थेतील नंदी आणि महादेवाची पिंड असलेले छोटेसे गर्भगृह आहे. इतिहासातील नोंदीनुसार मूळ रायरेश्वर मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिरपरिसरात छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेत असल्याचा एक फोटो देखील आहे. तसेच रायरेश्वर पठारावर पांडव लेण्या देखील आहेत. या पांडव लेण्यापर्यंत पावसाळ्यात जाणे अशक्य असल्यामुळे पावसाळा नसताना या परिसरात जाणे सोयीचे आहे.
रायरेश्वराच्या डोंगरावर केंजळगडाच्या वाटेने चालत गेल्यानंतर समोर आपणास विस्तीर्ण पसरलेले पठार दिसते. रायरेश्वराच्या या पठारावर वर्षा ऋतूमध्ये विविध प्रकारची फुले पहावयास मिळतात. तसेच पठारावर ग्रामस्थांकडून भात शेती केली जाते. भातशेती कशी असते, हे पाहण्यासाठी या परिसरात आपण जावू शकतो. वातावरण चांगले असेल तर रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून आपली चौफेर नजर जावू शकते. रायरेश्वराच्या पठारावरून, पठार फिरत असताना परिसरात असलेले पांडवगड, विचित्रगड, वैराटगड, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, चंद्रगड, रुद्रमाळ, मंगळगड, मकरंदगड हे किल्ले दिसतात.

रायरेश्वराचा इतिहास :
किल्ला म्हणता येईल, असे काहीच अवशेष या परिसरात नाहीत, सध्याच्या परिस्थितीत काही ग्रामस्थ मंदिराच्या शेजारी घरे बांधून राहतात. रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर खुप प्राचीन आणि पांडवकालीन आहे. स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठेशाहीच्या इतिहासात खुप महत्व आहे.

रायरेश्वरला जाण्यासाठीचा मार्ग :
रायरेश्वर पठार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. पुण्याहून एस. टी. महामंडळाच्या बसने भोरपर्यंत गेल्यानंतर, पुढे केंजळगड आणि रायरेश्वरला जाता येते. रायरेश्वरला जाण्यासाठी भोरमार्गेच जावे लागते.

टिटे धरणाजवळून : पुण्याहून भोरमार्गे आंबवडे (भोर) गावातून टिटे धरणाजवळून रायरेश्वरावर जाता येते. पावसाळ्यातील दुर्ग भ्रमंतीसाठी ही वाट थोडी अवघड आहे.

केंजळगडमार्गे : केंजळगडावरून रायरेश्वरला जाण्यासाठी रस्ता आहे. केंजळगडाच्या पायथ्यापासून पुढे जाणारा एक डांबरी रस्ता, रायरेश्वराच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जातो. या वाटेने आपण वाहन घेवून रायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत जावू शकतो. यामार्गे रायरेश्वराच्या पायथ्यापासून काही ठिकाणी शिडीने तर काही ठिकाणी पायऱ्यांच्या वाटेने रायरेश्वराचा डोंगर चढावा लागतो. डोंगर चढून वर गेल्यानंतर समोर विस्तीर्ण पठार नजरेस पडते. तेथून पायवाटेने रायरेश्वराच्या मंदिराकडे जाताना पठारावरील भातशेती दिसते. तसेच पावसाळ्यात या परिसरात गेल्यानंतर, पठारावर दाट धुके दिसते.

रायरेश्वराच्या पठारावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

रायरेश्वर पठार : रायरेश्वर डोंगराच्या पायथ्यापासून केंजळगडमार्गे डोंगर चढून वर गेल्यानंतर समोर रायरेश्वराचे विस्तीर्ण पठार नजरेस पडते. रायरेश्वर पठाराची उंची साधारणता ४००० मीटरच्या जवळपास आहे. या पठारावर विविध प्रकारची फुले नजरेस पडतात. संपूर्ण पठारावर रानफुले उमललेली आहेत. पाय वाटेने रायरेश्वराच्या मंदिराकडे जात असताना वाटेवर तलाव आहे. पावसाळ्यात या तलावात स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी साचलेले असते. तलावाच्या या परिसरात खुप मोठ्या प्रमाणात धुके पसरलेले असते. त्यामुळे धुके असताना सावधपणे पायवाटेने पुढे जाणे आवश्यक आहे. रायरेश्वराच्या पठारावर पावसात भातशेतीची मशागत करणारे शेतकरी बांधव देखील आपल्या नजरेस पडतात.

पांडव लेण्या : रायरेश्वराच्या पठारावर फिरत असताना एका ठिकाणी गुहे सारख्या, दगडात कोरलेल्या पांडव लेण्या आपल्या नजरेस पडतात. पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड धुके आणि पाणी असते. पठारावरून नाल्यामार्गे पाणी खाली दरीमध्ये पडत असताना दिसते. याच परिसरात छोट्यामोठ्या अशा नाल्यांना धबधब्याचे स्वरूप आल्यासारखे दिसते.

पाण्याचे टाके : रायरेश्वर मंदिराच्या परिसरात गाववस्तीकडे जात असताना वाटेवर पाण्याचे टाके आहे. गावातील राहणारे लोक याच पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. पाण्याच्या टाक्यात दगडामध्ये कोरलेले एक गाईचे मुख आहे. या गाईच्या मुखातून सतत टाक्यामध्ये पाणी पडत असते.

रायरेश्वर मंदिर : शेवटी रायरेश्वराच्या मंदिराजवळ पोचल्यानंतर असे लक्षात येते की, केवळ ग्रामीण भागातील खेडेगाव असल्यासारखा हा परिसर आहे. रायरेश्वराच्या मंदिरात महादेवाची पिंड आहे. आणि भग्न अवस्थेतील नंदीची मुर्ती आहे. तसेच मंदिराचा देखील वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला असावा हे तेथील परिस्थितीवरून लक्षात येते. मंदिरावर पत्रे टाकलेले आहेत. परिसरात राहणारी ग्रामस्थ मंडळी मंदिरात सर्व व्यवस्था पाहतात. हे मंदिरातील स्वच्छता पाहून लक्षात येते.

मंदिर परिसरातील शिवाजी महाराजांची मुर्ती :
रायरेश्वर मंदिराच्या परिसरात, मंदिराच्या एकदम समोर छत्रपती शिवाजी महाराजांची एक आसनस्थ मुर्ती बसवण्यात आलेली आहे. तसेच मंदिराच्या परिसरात एक विस्तीर्ण सभामंडप देखील आहे. येथील ग्रामस्थांनी सांगितले, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री दिवशी रायरेश्वराच्या दर्शनासाठी याठिकाणी लोकांची गर्दी असते.
किल्ला म्हणून कोणतेही अवशेष रायरेश्वरी अस्तित्वात नसले, तरीही मराठेशाहीच्या इतिहासातील महत्वपूर्ण क्षण रायरेश्वराच्या मंदिराने अनुभवलेला असल्यामुळे या परिसरास विशेष महत्व आहे. आणि हे महत्व, हे पावित्र्य हा परिसर आज ही टिकवून आहे. त्यामुळेच सूर्यास्ताच्या वेळी रायरेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या छत्रपतींच्या मुर्तीचे रूप खुप मनमोहक दिसते.
स्वराज्य स्थापनेच्या शपथेचा साक्षीदार असलेला ‘रयतेचा रायरेश्वर’ परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. आपण पर्यटक म्हणून या परिसरात गेल्यानंतर, छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष असलेल्या या रायरेश्वर पठाराची निसर्गरम्य दृश्ये डोळ्यांमध्ये साठवून परतीच्या वाटेला निघत असताना, प्रसन्न चित्ताने डोंगराच्या पायऱ्या उतरू लागतो.

हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 

Monday, April 17, 2017

दुर्ग भ्रमंती- पोलादी लोहगड

                   
लोहगड. लोहगड म्हटल की पुणे आणि परिसरातील दुर्ग प्रेमींना आठवतो तो हिरवाईने नटलेला विंचू कडा (विंचू काटा) आणि पावसाळा असो अथवा हिवाळा, लोहगडावर पसरलेले दाट धुके. लोहगड हा पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळ असलेला गिरीदुर्ग आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे निसर्ग सौंदर्य या गडाच्या सभोवती आपल्याला अनुभवण्यास मिळते. मावळ परिसरातील पवना नदीच्या खोऱ्यात असलेला आणि बोर घाटाचा संरक्षक म्हणून अभेद्यपणे उभा असलेला लोहगड हवा पालटासाठी खुप चांगले ठिकाण आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबई परिसरातील दुर्गप्रेमी सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी गडावर येत असतात. पुणे-लोणावळा लोकलने आल्यानंतर मळवली रेल्वे स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने मळवली गावात सर्व सुविधा आहेत. लोहगड परिसरात विसापूर (संबळगड), तुंग (कठीणगड) आणि तिकोणा (वितंडगड) हे किल्ले आहेत. तसेच भाजे आणि बेडसे या बौद्ध कालीन लेण्या देखील या परिसरात आहेत.
                 लोहगडाच्या पायथ्यापर्यंत वाहन घेवून जाता येते. मळवली गावातून गडाकडे जात असताना वाटेवर ‘गायमुख’ खिंड लागते. गायमुख खिंडीतून उजवीकडे लोहगड आणि डावीकडे विसापूर आहे. लोहगडाच्या या वाटेवर लोहगडवाडी हे गाव आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून पायऱ्या आहेत. आपण जसे गड चढू लागतो, तसे आपल्याला लोहगड परिसरातील निसर्ग सौंदर्य दिसू लागते.

लोहगडाचा इतिहास :
लोहगड केंव्हा बांधण्यात आला याची इतिहासात नोंद नाही. परंतु गडाच्या अभेद्य आणि पोलादी तटबंदीवरून गडाच्या इतिहासाबद्दल कयास बांधला जातो. लोहगडाजवळ दगडात कोरण्यात आलेल्या  भाजे आणि बेडसे या बौद्धकालीन लेण्या आहेत. त्यापूर्वी, म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे सांगण्यात येते. गडावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या सर्व राजवटीनी राज्य केलेले आहे. इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदशाहने निजामशाहीची स्थापना केली. त्यावेळी पुणे परिसरातील बहुतेक सर्व किल्ले जिंकून घेतले होते. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होता. इतिहासात अशी नोंद आहे की, इ. स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा निजाम शाह दुसरा बुर्‍हाण निजाम लोहगडावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये लोहगड आदिलशाहीच्या आधिपत्याखाली आला. त्यानंतर कालांतराने इ.स. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला. त्यावेळी लोहगड–विसापूर हा परिसर स्वराज्यात सामील करून घेतला. इतिहासातील नोंदीनुसार इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात लोहगड मोगलांच्या स्वाधीन करण्यात आला होता. त्यानंतर १६७० मध्ये झालेल्या लधाईमध्ये मराठ्यांनी मोघलांकडून किल्ला परत जिंकून घेतला. त्यानंतर पहिल्या सुरत लुटीच्या वेळी, लुटलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर ठेवली होती. इ.स. १७१३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला होता.
लोहगड इ.स. १७२० मध्ये कान्होजी आंग्रे यांच्याकडून पेशवाईकडे आला. त्यानंतर इ.स. १७८९ मध्ये नाना फडनीसांनी किल्ल्याचे बांधकाम करून घेतले. पुढे इ.स. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
लोहगडवाडीतून गडावर जात असताना वाटेवर चार दरवाजे लागतात. या दरवाज्यांच्यामध्ये असलेल्या नागमोडी वाटेने गडाकडे जावे लागते. पावसाळ्यामध्ये या वाटेवर पाणी आणि शेवाळे असते, त्यामुळे गडावर जात असताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
  
गणेश दरवाजा : गणेश दरवाज्यावर काही शिलालेख लिहिलेले आहेत. त्यावरून या दरवाज्याविषयी माहिती मिळते. दरवाजाच्या दोन्ही बाजूस गणेशाच्या मुर्ती आहेत. तसेच दरवाज्यावर लोखंडी अणकुचीदार खिळे आहेत. गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गणेश दरवाजा महत्वाचा आहे.

नारायण दरवाजा : नारायण दरवाजा पेशवाईत नाना फडनीसांनी बांधला होता. दरवाज्याच्या परिसरात धान्य साठवण्यासाठी एक भुयारी धान्य कोठार असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. गडावरील मुख्य दरवाज्यांपैकी नारायण दरवाजा आहे.

हनुमान दरवाजा : हनुमान दरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. हनुमान दरवाज्यामधून गडाच्या आवारात प्रवेश करता येतो. हनुमान दरवाज्यामधून पुढे गेल्यानंतर आपण गडाचा परिसर पाहू शकतो. या परिसरात माकडांचा वावर जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे पर्यटकांनी सोबत नेलेल्या वस्तू माकडे हिसकावून घेणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. गडावर वास्तुंचे काही भग्न अवशेष आहेत.

महादरवाजा: महादरवाजा लोहगडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. नागमोडी वाटा पार करून आपण महादरवाज्याच्या पायथ्यापर्यंत पोचतो. त्यानंतर उंचावर असलेल्या गडाकडे जात असताना काही पायऱ्या चढून जावे लागते. महादरवाज्याचे काम नाना फडणीसांनी पूर्ण करवून घेतले होते. महादरवाज्यातून गडावर पोचल्यानंतर समोर एक मंदीर दिसते.

लोहगडावरील राजाराणीचे मंदीर : गडावर प्रवेश केल्यानंतर भग्न अवस्थेतील काही वास्तू आहेत. त्यामध्ये हे पडझड झालेले राजाराणीचे मंदीर देखील आहे. इतिहासातील नोंदीनुसार ही एका राजपूत किल्लेदाराच्या बायकोची समाधी असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या जवळच शेजारी राजसदर आणि लोहारखान्याचे अवशेष आहेत. मंदिराच्या बाहेर चुन्याचा घाना बनवण्याची गोलाकार तळी आहे. त्याच्या जवळच ध्वजस्तंभ आहे, त्यावर भगवा जरीपटका अखंड फडकत असतो. भग्न अवस्थेतील या वास्तूंच्या परिसरात एक तोफ लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या पुढे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. राजाराणी मंदिराच्या पुढे गेल्यानंतर लक्ष्मी कोठी आणि शिवमंदिर आहे.

लक्ष्मी कोठी: लक्ष्मी कोठी ही दगडांमध्ये कोरलेली गुहा आहे. येथे लोमेश ऋषींनी तपस्चर्या केल्याचे सांगण्यात येते. गडावरील सर्वात पुरातन वास्तूंपैकी लक्ष्मी कोठी ही गुहा आहे. लक्ष्मी कोठीला तळ मजला देखील आहे. पावसाळ्यामध्ये या कोठीमध्ये काही प्रमाणात पाणी साठलेले असते. पर्यटक गडावरील वास्तव्यासाठी लक्ष्मी कोठीचा वापर करतात.

शिवमंदिर : गड परिसरात भग्न अवस्थेतील शिवमंदिर आहे. मंदिराच्या पुढे एक छोटासा तलाव आहे. हा छोटासा तलाव अष्टकोनी आकाराचा आहे. या तलावाच्या बाजूस पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेले टाके आहे. शिवमंदिराचा जीर्नोधार करण्यात आलेला आहे. 

बावन टाकं : शिवमंदिर परिसरासह गड माथ्याच्या परिसरात ४० पेक्षा अधिक पाण्याची टाकी आहेत. त्यामध्ये नाना फडणीसांनी बांधलेल्या टाक्यांमध्ये बावन टाके गडावरील सर्वात मोठे टाके आहे. नाना फडणीसांनी हे टाके बांधल्याचा विशेष उल्लेख असलेला शिलालेख या टाक्यावर आहे.

पीर बाबा : टाक्याच्या जवळ उंचावर एक पीर बाबाच ठिकाण आहे. दर वर्षी या ठिकाणी पीर बाबाचा उरूस असतो, असे स्थानिकांकडून सांगण्यात येते.

विंचू कडा (विंचू काटा) : विंचू कडा (विंचू काटा) म्हणजे खुप लांब आणि रुंद अशी गडाची माची आहे. लोहगडावरून पाहिले असता गडाची ही माची विंचवाच्या नांगीसारखी दिसते, त्यामुळे यांस विंचूकाटा किंवा विंचूकडा असे म्हणतात. विंचू कडा (विंचू काटा) हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. कारण या माचीवरून गडाच्या आजूबाजूचा परिसर खुप मनमोहक दिसतो. विंचू कड्याच्या टोकावर एक बुरुज आहे. या बुरुजावरून परिसरातील दूरवरचा भाग नजरेच्या टप्प्यात येतो. 
भक्कम आणि संरक्षक तटबंदीत उभारलेला गड कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण लोहगड आहे. गडावर असलेल्या संरक्षक तटबंदी भेदून आक्रमण करणे शत्रू पक्षास खुप अवघड होते. त्यामुळे इतिहासात हा गड भक्कम अवस्थेत उभा होता. आज ही गड तसाच उभा आहे. केवळ गडावरील वास्तू नामशेष झाल्या आहेत. 
लोहगडावरून सह्याद्रीचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गडावर गर्दी करत असतात. यावेळी गड परिसरातील हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य एखाद्या निसर्ग चित्रासारखे दिसते. हे निसर्ग सौंदर्य आपल्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. हा अनुभव घेतल्यानंतर गड परिसर सोडून परत येण्यास नको वाटते.

Friday, April 14, 2017

शेतकरी संपावर गेला तर ?

         
   उत्तर प्रदेशात ज्या निकषांचा आधार घेवून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली त्या निकषांचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी दिली जावू शकते, किंवा जिल्हा बँकांकडून एक लाखापेक्षा कमी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी महाराष्ट्र सरकारने मागवली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या बातम्या केवळ प्रसार माध्यमातच आहेत का? सरकारी पातळीवर याबाबतीत काही हलचाली सुरु आहेत? याचा संक्षिप्त आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्षात दिसले की, माध्यमांकडून तत्सम आणखी काही बातम्या दाखवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील काही गावांमधील ग्रामस्थ शेतकरी संपावर जाणार आहेत? पुढील वर्षी ते काहीच पिकं घेणार नाहीत! कर्जमाफी देणे अथवा न देणे यापेक्षा शेतकरी संपावर गेला तर काय? हा अधिक गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर संपावर जाण्याची वेळ का यावी? याचा विचार केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव आणि राजकीय चढावोढ हे एक कारण असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती देखील यास कारणीभूत आहे.

              देशाच्या एकूण सिंचन क्षेत्रापैकी १८% च्या जवळपास महाराष्ट्रात सिंचन क्षेत्र आहे. महाराष्ट्राच्या एकूण ३०७.६ लाख हेक्टर भूप्रदेशापैकी सुमारे २२५.७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील क्षेत्र आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे २/३ क्षेत्र हे पिकांखालील क्षेत्र आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी मदत महणून कर्ज देण्यात जिल्हा सहकारी बँका, नाबार्ड आणि इतर बँकांची भूमिका महत्वाची असते. शेतकरी काही खाजगी सावकारांकडून देखील कर्ज घेतात. या सर्व गोष्टींचा विचार केला तर, शेतकऱ्यांना मुबलक कर्ज स्वरूपातील पैसा उपलब्ध असला तरी पाण्याअभावी नुकसानीतील शेती करावी लागते. कोरडवाहू शेती करावी लागते. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान देखील यास कारणीभूत आहे. याचा परिणाम म्हणून शेतीसाठी कर्ज- कोरडवाहू शेती –शेतमालाला हमीभाव नाही -पुन्हा कर्ज –आत्महत्या -दारिद्र्य हे कालचक्र शेतकऱ्यांच्या मागे सुरु होते. यावरती राज्यसरकारला उपया शोधायचा असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे तसेच महाराष्ट्र राज्य सिंचन आयोग – १९६२ च्या शिफारशींवर काम करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य सिंचन आयोग - १९६२ : महाराष्ट्रातील सिंचन आणि जलसंपत्ती विकाससंबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी स. गो. बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ७ डिसेंबर, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य सिंचन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. १९६२ मध्ये या आयोगाने आपला अहवाल सादर केला. अहवालात काही शिफारशी करण्यात आल्या, त्यानुसार
  • ज्या प्रदेशात प्रवाही सिंचन पद्धती राबवणे अशक्य आहे, तेथे विहीरीसारखी सिंचन साधने बांधण्यात यावीत.
  • कालवे आणि उपकालवे ज्या भागातून जातील,  त्या भागातील ग्रामीण जनतेच्या घरगुती पाणी पुरवठ्याच्या गरजा विचारात घेतल्या जाव्यात.
  • प्रकल्पातील निर्वासित लोकांचे प्रत्यक्ष पुनर्वसन करण्याची जबाबदारी राज्यशासनाने घ्यावी.
  • दर १० ते १५ वर्षांनी सिंचन धोरणाचे पुनर्विलोकन करण्यासाठी खास चौकशी आयोगाची नेमणूक करावी.
  • अधिक पाणी आवश्यक असणार्‍या उद्योगांना पुरेसे पाणी आहे त्याचा प्रदेशात उद्योग उभारणीस परवानगी देण्यात यावी.
             त्यावेळी सत्तेत असलेल्या राज्य सरकारकडून वेळोवेळी या समित्यांच्या शिफारशी विचारात घेण्यात आल्या. तसेच नवीन समित्या देखील स्थापन करण्यात आल्या. परंतु या शिफारशींचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी विचार करण्यास दिरंगाई करण्यात आली. त्यावेळची राजकीय इच्छाशक्ती, आणि काही प्रादेशिक कारणे यामुळे खास करून पश्चिम महाराष्ट्रात सिंचन क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळेच आज पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकर्यांपेक्षा सुस्थितीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्र देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रमाणात अधिक आहे.
सत्यशोधन समिती (सुकथनकर समिती) –१९७३ : १९७२ मधील दुष्काळाच्या पार्श्र्वभूमीवर सुकथनकर समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने पाटबंधारे विकास,  भूजलपातळी,  पिण्याचे पाणी या विषयांचा विशेष अभ्यास केला होता. सुकथनकर समितीच्या शिफारशींनुसार,
  • अवर्षणप्रवण क्षेत्रात मृदा आणि जलसंधारणाची कामे एकात्मिक पद्धतीने पाणलोट क्षेत्र आधारावर करण्यात यावीत.
  • पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मृदा आणि जलसंधारणासाठी लोकशिक्षणाला महत्त्व देण्यात यावे.
  •  लघुपाटबंधारे क्षेत्रात वनीकरण कार्यक्रम राबवण्यात यावा.
  • ठिबक सिंचनास प्रोत्साहन देण्यात यावे. सिंचन प्रकल्प लाभ क्षेत्रात भूसुधारणेची कामे करावीत.
  • जलसंपत्ती उपलब्धता आणि वापर यासाठी एक कायमस्वरूपी संघटना स्थापन करावी.
             सुकथनकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करताना राज्य सरकारने काही प्रशंसनीय कामे केलेली आहेत. परंतु त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यास विशेष हातभार लागलेला नाही. कृषी उत्पन्न समित्यांची स्थापना यामुळे शेतकऱ्यांना धान्य विक्री करण्यासाठी एक ठिकाण उपलब्ध झाले असले तरी यामधून काही दलाल देखील तयार झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची परीस्थिती बदललेली नाही.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी: शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, यासह काही महत्वाच्या शिफारशी स्वामिनाथन आयोगाने केल्या आहेत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयोग गठीत करणारे राजकारणी, या आयोगाच्या शिफारशी आमलात आणण्यासाठी मात्र टाळाटाळ करत आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आमलात आल्यानंतर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. स्वामिनाथन आयोगाच्या काही महत्वाच्या शिफारशींनुसार,
  • शेतकऱ्यांचा खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्याप्रमाणे असावे.
  • शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५०% असावा.
  • शेतमालाची आधारभूत किंमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत देण्याची व्यवस्था करावी.
  • बाजारभावाच्या चढउतारापासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता निधी’ ची स्थापना करावी.
  • आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढीचा शेतकऱ्यांना तोटा होवू नये, याकरिता इतर देशामधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावण्यात यावा.
  • दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करण्यात यावी.
  • कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा. पिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करण्यात यावा.
  • हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये, नैसर्गिक आपत्ती वेळी, पूर्वस्थिती येईपर्यंत गैर संस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे.
  • संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा रीतीने पिक विमा योजनेचा विस्तार आणि ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची स्थापना करावी.
  • पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉकच्या ऐवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण देण्यात यावे.
  • सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्यासाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करण्यात यावी.
  • शेतकऱ्यांना परवडतील या दरात बी-बियाणे आणि इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी.
  • संपूर्ण देशात प्रगत शेती आणि माती परीक्षण प्रयोगशाळेचे व्यवस्थापन करावे. शेतीला कायम आणि समप्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा करण्यात यावा.
                   आपण केवळ म्हणत असतो की, लाखांचा पोशिंदा बळीराजा जगला पाहिजे. परंतु आपण असे वागत नाही. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव देण्याची वेळ येते तेंव्हा राज्य सरकारला बाजारपेठेतील भाववाढ, मध्यमवर्गीय लोकांच्या समस्या याकडे देखील लक्ष द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बदलत नाही. याचा विचार करत असताना शेतकरी संपावर गेला आणि शेतकर्यांनी केवळ त्यांना लागते तेवढेच धान्य उत्पादन करण्यास सुरुवात केली? तर काय परिस्थिती निर्माण होवू शकते याचा, आपण सर्वसामान्य लोकांनी देखील विचार करणे आवश्यक आहे. आणि त्यादृष्टीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी केवळ आपुलकी व्यक्त करत बसण्यापेक्षा त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

Wednesday, April 12, 2017

शेतकरी कर्जमाफी वास्तव आणि राजकारण

      नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने, उत्तरप्रदेशात सरकार आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू असे जाहीरनाम्यात जाहीर केले होते. भाजपचे सरकार आल्यानंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. उत्तरप्रदेशातील ज्या शेतकऱ्यांनी एक लाखापेक्षा कमी कर्ज घेतले आहे, त्यांचे कर्ज माफ करण्यात आले. उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आणि त्यामुळे महाराष्ट्र, तामिळनाडूसह देशातील इतर राज्यांमधील विरोधी पक्षांना राजकारण करण्यास एक नवीन कारण मिळाले. खरतर शेतकरी कर्जमाफीचे वास्तव आणि त्यावर होत असलेले राजकारण यामधील फरक सामान्य नागरिक म्हणून आपण समजून घ्यायला हवा. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी आहे.
              भारतातील एकूण जलसिंचनाखालील क्षेत्राचा विचार केला तर सर्वाधिक म्हणजेच जवळपास ९८% जलसिंचन पंजाबमध्ये आहे. तर हरयाणामध्ये जवळपास ८५% क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. उत्तरप्रदेशमध्ये ७६% आणि महाराष्ट्रात हेच प्रमाण १८% च्या जवळपास आहे. यास जबाबदार कोण? देशाच्या सर्व राज्यांमध्ये कमी अधिकप्रमाणत जलसिंचनाखालील जमिनीचे प्रमाण बदलत जाते. २००९ साली केंद्र सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची ७१ हजार कोटींची कर्जे माफ केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरच थांबल्या का? शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झाला का? या गोष्टींचा विचार न करता, आजच्या दिवशी महाराष्ट्रात देखील कर्जमाफीवरून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत आहेत.
                  भारत देशाचा विचार केला तर भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे आपण म्हणतो, परंतु भारत देश स्वतंत्र झाल्यापासून कृषी क्षेत्र वाढीसाठी अथवा शेतकऱ्यांसाठी देशातील कोणत्या राजकीय पक्षांनी किती योगदान दिले? अथवा केवळ निवडणुकांच्या तोंडावरच घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची मते स्वतःच्या पारड्यात पाडून घेतली? या गोष्टींचा सामान्य नागरिक म्हणून किंवा सामान्य शेतकरी म्हणून आपण विचार करत नाही. कोणत्याही आजारावर कयमस्वरूपी इलाज करणे आवश्यक असते. परंतु हे राजकीय पक्ष केवळ मलमपट्टी करत असतात. आणि आजाराच्या खपल्या पुन्हा पुन्हा काढत असतात. कर्जमाफी हा देखील असाच प्रकार आहे. सत्तेत असणाऱ्या आणि वेळोवेळी विरोधात असणाऱ्या राजकीय पक्षांनी केवळ मलमपट्टी करण्यापेक्षा शेतकरी संपूर्णपणे कर्जमुक्त कसा होईल, आणि यासाठी काय करता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात झालेल्या सिंचन घोटाळ्याचा आढावा घेण्यासाठी चितळे समिती स्थापन करण्यात आली होती. ७० हजार कोटी रुपये खर्च करून झाल्यानंतर ही महाराष्ट्राच्या सिंचन क्षेत्रात एकूण किती टक्के वाढ झाली अथवा नेमका घोटाळा काय होता याचा अहवाल चितळे समितीने सादर केला. तत्पूर्वी २००९ साली शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ७१ हजार कोटीची कर्जमाफी दिली गेली होती. आणि २०१३ मध्ये महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यात आली. म्हणजेच राजकीय पक्षांचे हे निर्णय शेतकऱ्यांच्या हितांचे नसून ‘एक हात से लो और दुसरे हात से लो’, या प्रकारातील आहेत. राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांसाठी किंवा शेतीसाठी काहीच केले नाही असे ही म्हणता येणार नाही. परंतु राजकारण्यांचे आजवरचे सर्व निर्णय राजकीय इच्छाशक्तीने प्रेरित असतात. सर्व राजकीय पक्षांनी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेले निर्णय शेतकऱ्यांसाठी तात्पुरते दिलासादायक असले तरी दीर्घकालीन चिंता वाढवणारे ठरत आहेत.
           उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर, महाराष्ट्रातही विरोधी पक्षांसह सत्तेत असलेल्या शिवसेनेसह सर्व पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी उचलून धरली आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून यासाठी संघर्ष यात्रा काढून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. विधानसभेत देखील गदारोळ सुरु आहे. यासर्व राजकारणाची फलश्रुती म्हणून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, तर काय कायमस्वरूपी शेतकरी कर्जमुक्त होणार आहे का? किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? किंवा यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावेच लागणार नाही? अशी परिस्थिती निर्माण होणार आहे का? याबाबत काहीच विचार नसलेल्या विरोधकांकडून कर्जमाफीची जी मागणी होत आहे. त्याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. कारण मागील हंगामात पुरेसा पाऊस झालेला आहे. त्यमुळे शेतीचे उत्पन्न देखील चांगले झाले आहे. असे असताना देखील कर्जमाफी करणे चुकीचे आहे.
             महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोल असला तरीही, मागील वर्षी अपेक्षेपेक्षा अधिक पाऊसकाळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर आहे अथवा वाढले आहे. दरम्यान महराष्ट्र सरकारने राबवलेल्या काही योजनांमुळे देखील शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. जलयुक्त शिवार योजना, युरियाचे निम कोटिंग करणे, माती परीक्षण केंद्रांची उभारणी, फळांवर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राची उभारणी, जिल्हा स्तरावर शासकीय शितगृहे आणि शासकीय गोदामांची उभारणी यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती पूर्वीपेक्षा बदलली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील आवर्षणग्रस्त भागात यावर्षी उन्हाळ्यातील परिस्थिती मागील वर्षीपेक्षा वेगळी आहे. हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की, महराष्ट्र सरकारने चालवलेल्या काही योजना खरच अभिनंदनीय आहेत. या योजना शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू शकत नसतील परंतु भविष्यात कर्जमुक्ती नक्की देवू शकतील. यासर्व योजनांचा विचार करता महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी खर तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यापेक्षा शेतकरी कर्जमुक्त कसा होईल यादृष्टीने विचार करून सरकारी पक्षावर दबाव आणणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नाला हमी भाव देणे, उत्पन्नाच्या वाढीसाठी प्रयत्न करणे, शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन सिंचनाखाली येण्यासाठी त्यांना मदत करणे तसेच शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करण्यास उपयुक्त योजनांची माहिती देणे. यादृष्टीने प्रयत्न केल्यानंतर कालांतराने शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार आहे. त्यामुळे केवळ शेतकरी कर्जमाफीचे राजकारण करण्यापेक्षा त्यामागील वास्तव जाणून घेवून सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच भविष्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार आहे, अन्यथा कर्जमाफी पुन्हा आत्महत्या पुन्हा कर्जमाफी पुन्हा आत्महत्या हे चक्र सुरूच राहणार आहे.