Monday, April 17, 2017

दुर्ग भ्रमंती- पोलादी लोहगड

                   
लोहगड. लोहगड म्हटल की पुणे आणि परिसरातील दुर्ग प्रेमींना आठवतो तो हिरवाईने नटलेला विंचू कडा (विंचू काटा) आणि पावसाळा असो अथवा हिवाळा, लोहगडावर पसरलेले दाट धुके. लोहगड हा पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळ असलेला गिरीदुर्ग आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे निसर्ग सौंदर्य या गडाच्या सभोवती आपल्याला अनुभवण्यास मिळते. मावळ परिसरातील पवना नदीच्या खोऱ्यात असलेला आणि बोर घाटाचा संरक्षक म्हणून अभेद्यपणे उभा असलेला लोहगड हवा पालटासाठी खुप चांगले ठिकाण आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबई परिसरातील दुर्गप्रेमी सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी गडावर येत असतात. पुणे-लोणावळा लोकलने आल्यानंतर मळवली रेल्वे स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने मळवली गावात सर्व सुविधा आहेत. लोहगड परिसरात विसापूर (संबळगड), तुंग (कठीणगड) आणि तिकोणा (वितंडगड) हे किल्ले आहेत. तसेच भाजे आणि बेडसे या बौद्ध कालीन लेण्या देखील या परिसरात आहेत.
                 लोहगडाच्या पायथ्यापर्यंत वाहन घेवून जाता येते. मळवली गावातून गडाकडे जात असताना वाटेवर ‘गायमुख’ खिंड लागते. गायमुख खिंडीतून उजवीकडे लोहगड आणि डावीकडे विसापूर आहे. लोहगडाच्या या वाटेवर लोहगडवाडी हे गाव आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून पायऱ्या आहेत. आपण जसे गड चढू लागतो, तसे आपल्याला लोहगड परिसरातील निसर्ग सौंदर्य दिसू लागते.

लोहगडाचा इतिहास :
लोहगड केंव्हा बांधण्यात आला याची इतिहासात नोंद नाही. परंतु गडाच्या अभेद्य आणि पोलादी तटबंदीवरून गडाच्या इतिहासाबद्दल कयास बांधला जातो. लोहगडाजवळ दगडात कोरण्यात आलेल्या  भाजे आणि बेडसे या बौद्धकालीन लेण्या आहेत. त्यापूर्वी, म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे सांगण्यात येते. गडावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या सर्व राजवटीनी राज्य केलेले आहे. इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदशाहने निजामशाहीची स्थापना केली. त्यावेळी पुणे परिसरातील बहुतेक सर्व किल्ले जिंकून घेतले होते. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होता. इतिहासात अशी नोंद आहे की, इ. स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा निजाम शाह दुसरा बुर्‍हाण निजाम लोहगडावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये लोहगड आदिलशाहीच्या आधिपत्याखाली आला. त्यानंतर कालांतराने इ.स. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला. त्यावेळी लोहगड–विसापूर हा परिसर स्वराज्यात सामील करून घेतला. इतिहासातील नोंदीनुसार इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात लोहगड मोगलांच्या स्वाधीन करण्यात आला होता. त्यानंतर १६७० मध्ये झालेल्या लधाईमध्ये मराठ्यांनी मोघलांकडून किल्ला परत जिंकून घेतला. त्यानंतर पहिल्या सुरत लुटीच्या वेळी, लुटलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर ठेवली होती. इ.स. १७१३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला होता.
लोहगड इ.स. १७२० मध्ये कान्होजी आंग्रे यांच्याकडून पेशवाईकडे आला. त्यानंतर इ.स. १७८९ मध्ये नाना फडनीसांनी किल्ल्याचे बांधकाम करून घेतले. पुढे इ.स. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
लोहगडवाडीतून गडावर जात असताना वाटेवर चार दरवाजे लागतात. या दरवाज्यांच्यामध्ये असलेल्या नागमोडी वाटेने गडाकडे जावे लागते. पावसाळ्यामध्ये या वाटेवर पाणी आणि शेवाळे असते, त्यामुळे गडावर जात असताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
  
गणेश दरवाजा : गणेश दरवाज्यावर काही शिलालेख लिहिलेले आहेत. त्यावरून या दरवाज्याविषयी माहिती मिळते. दरवाजाच्या दोन्ही बाजूस गणेशाच्या मुर्ती आहेत. तसेच दरवाज्यावर लोखंडी अणकुचीदार खिळे आहेत. गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गणेश दरवाजा महत्वाचा आहे.

नारायण दरवाजा : नारायण दरवाजा पेशवाईत नाना फडनीसांनी बांधला होता. दरवाज्याच्या परिसरात धान्य साठवण्यासाठी एक भुयारी धान्य कोठार असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. गडावरील मुख्य दरवाज्यांपैकी नारायण दरवाजा आहे.

हनुमान दरवाजा : हनुमान दरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. हनुमान दरवाज्यामधून गडाच्या आवारात प्रवेश करता येतो. हनुमान दरवाज्यामधून पुढे गेल्यानंतर आपण गडाचा परिसर पाहू शकतो. या परिसरात माकडांचा वावर जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे पर्यटकांनी सोबत नेलेल्या वस्तू माकडे हिसकावून घेणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. गडावर वास्तुंचे काही भग्न अवशेष आहेत.

महादरवाजा: महादरवाजा लोहगडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. नागमोडी वाटा पार करून आपण महादरवाज्याच्या पायथ्यापर्यंत पोचतो. त्यानंतर उंचावर असलेल्या गडाकडे जात असताना काही पायऱ्या चढून जावे लागते. महादरवाज्याचे काम नाना फडणीसांनी पूर्ण करवून घेतले होते. महादरवाज्यातून गडावर पोचल्यानंतर समोर एक मंदीर दिसते.

लोहगडावरील राजाराणीचे मंदीर : गडावर प्रवेश केल्यानंतर भग्न अवस्थेतील काही वास्तू आहेत. त्यामध्ये हे पडझड झालेले राजाराणीचे मंदीर देखील आहे. इतिहासातील नोंदीनुसार ही एका राजपूत किल्लेदाराच्या बायकोची समाधी असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या जवळच शेजारी राजसदर आणि लोहारखान्याचे अवशेष आहेत. मंदिराच्या बाहेर चुन्याचा घाना बनवण्याची गोलाकार तळी आहे. त्याच्या जवळच ध्वजस्तंभ आहे, त्यावर भगवा जरीपटका अखंड फडकत असतो. भग्न अवस्थेतील या वास्तूंच्या परिसरात एक तोफ लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या पुढे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. राजाराणी मंदिराच्या पुढे गेल्यानंतर लक्ष्मी कोठी आणि शिवमंदिर आहे.

लक्ष्मी कोठी: लक्ष्मी कोठी ही दगडांमध्ये कोरलेली गुहा आहे. येथे लोमेश ऋषींनी तपस्चर्या केल्याचे सांगण्यात येते. गडावरील सर्वात पुरातन वास्तूंपैकी लक्ष्मी कोठी ही गुहा आहे. लक्ष्मी कोठीला तळ मजला देखील आहे. पावसाळ्यामध्ये या कोठीमध्ये काही प्रमाणात पाणी साठलेले असते. पर्यटक गडावरील वास्तव्यासाठी लक्ष्मी कोठीचा वापर करतात.

शिवमंदिर : गड परिसरात भग्न अवस्थेतील शिवमंदिर आहे. मंदिराच्या पुढे एक छोटासा तलाव आहे. हा छोटासा तलाव अष्टकोनी आकाराचा आहे. या तलावाच्या बाजूस पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेले टाके आहे. शिवमंदिराचा जीर्नोधार करण्यात आलेला आहे. 

बावन टाकं : शिवमंदिर परिसरासह गड माथ्याच्या परिसरात ४० पेक्षा अधिक पाण्याची टाकी आहेत. त्यामध्ये नाना फडणीसांनी बांधलेल्या टाक्यांमध्ये बावन टाके गडावरील सर्वात मोठे टाके आहे. नाना फडणीसांनी हे टाके बांधल्याचा विशेष उल्लेख असलेला शिलालेख या टाक्यावर आहे.

पीर बाबा : टाक्याच्या जवळ उंचावर एक पीर बाबाच ठिकाण आहे. दर वर्षी या ठिकाणी पीर बाबाचा उरूस असतो, असे स्थानिकांकडून सांगण्यात येते.

विंचू कडा (विंचू काटा) : विंचू कडा (विंचू काटा) म्हणजे खुप लांब आणि रुंद अशी गडाची माची आहे. लोहगडावरून पाहिले असता गडाची ही माची विंचवाच्या नांगीसारखी दिसते, त्यामुळे यांस विंचूकाटा किंवा विंचूकडा असे म्हणतात. विंचू कडा (विंचू काटा) हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. कारण या माचीवरून गडाच्या आजूबाजूचा परिसर खुप मनमोहक दिसतो. विंचू कड्याच्या टोकावर एक बुरुज आहे. या बुरुजावरून परिसरातील दूरवरचा भाग नजरेच्या टप्प्यात येतो. 
भक्कम आणि संरक्षक तटबंदीत उभारलेला गड कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण लोहगड आहे. गडावर असलेल्या संरक्षक तटबंदी भेदून आक्रमण करणे शत्रू पक्षास खुप अवघड होते. त्यामुळे इतिहासात हा गड भक्कम अवस्थेत उभा होता. आज ही गड तसाच उभा आहे. केवळ गडावरील वास्तू नामशेष झाल्या आहेत. 
लोहगडावरून सह्याद्रीचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गडावर गर्दी करत असतात. यावेळी गड परिसरातील हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य एखाद्या निसर्ग चित्रासारखे दिसते. हे निसर्ग सौंदर्य आपल्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. हा अनुभव घेतल्यानंतर गड परिसर सोडून परत येण्यास नको वाटते.

No comments:

Post a Comment