Wednesday, April 26, 2017

दुर्ग भ्रमंती - रयतेचा रायरेश्वर

रायरेश्वर मंदिर 
रायरेश्वर. कोणी याला किल्ला म्हणेल. कोणी डोंगर. तर कोणी केवळ रायरेश्वराचे मंदिर म्हणेल, परंतु रायरेश्वर म्हटले की, ‘स्वराज्य स्थापनेची शपथ’ हा इतिहासातील प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. इतिहासातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात काही निवडक मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, आणि रायरेश्वर पठाराची इतिहासात नोंद झाली. सतराव्या शतकाच्या मध्यावर शिवशाहीतील ही प्रेरक घटना त्यावेळी घनदाट अरण्यात असलेल्या रायरेश्वराच्या साक्षीने घडली. रायरेश्वर पठारावरील रायरेश्वर याठिकाणी महादेवाचे मंदिर आहे. रायरेश्वराच्या मंदिरात सभामंडप, समोर भग्न अवस्थेतील नंदी आणि महादेवाची पिंड असलेले छोटेसे गर्भगृह आहे. इतिहासातील नोंदीनुसार मूळ रायरेश्वर मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिरपरिसरात छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेत असल्याचा एक फोटो देखील आहे. तसेच रायरेश्वर पठारावर पांडव लेण्या देखील आहेत. या पांडव लेण्यापर्यंत पावसाळ्यात जाणे अशक्य असल्यामुळे पावसाळा नसताना या परिसरात जाणे सोयीचे आहे.
रायरेश्वराच्या डोंगरावर केंजळगडाच्या वाटेने चालत गेल्यानंतर समोर आपणास विस्तीर्ण पसरलेले पठार दिसते. रायरेश्वराच्या या पठारावर वर्षा ऋतूमध्ये विविध प्रकारची फुले पहावयास मिळतात. तसेच पठारावर ग्रामस्थांकडून भात शेती केली जाते. भातशेती कशी असते, हे पाहण्यासाठी या परिसरात आपण जावू शकतो. वातावरण चांगले असेल तर रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून आपली चौफेर नजर जावू शकते. रायरेश्वराच्या पठारावरून, पठार फिरत असताना परिसरात असलेले पांडवगड, विचित्रगड, वैराटगड, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, चंद्रगड, रुद्रमाळ, मंगळगड, मकरंदगड हे किल्ले दिसतात.

रायरेश्वराचा इतिहास :
किल्ला म्हणता येईल, असे काहीच अवशेष या परिसरात नाहीत, सध्याच्या परिस्थितीत काही ग्रामस्थ मंदिराच्या शेजारी घरे बांधून राहतात. रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर खुप प्राचीन आणि पांडवकालीन आहे. स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठेशाहीच्या इतिहासात खुप महत्व आहे.

रायरेश्वरला जाण्यासाठीचा मार्ग :
रायरेश्वर पठार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. पुण्याहून एस. टी. महामंडळाच्या बसने भोरपर्यंत गेल्यानंतर, पुढे केंजळगड आणि रायरेश्वरला जाता येते. रायरेश्वरला जाण्यासाठी भोरमार्गेच जावे लागते.

टिटे धरणाजवळून : पुण्याहून भोरमार्गे आंबवडे (भोर) गावातून टिटे धरणाजवळून रायरेश्वरावर जाता येते. पावसाळ्यातील दुर्ग भ्रमंतीसाठी ही वाट थोडी अवघड आहे.

केंजळगडमार्गे : केंजळगडावरून रायरेश्वरला जाण्यासाठी रस्ता आहे. केंजळगडाच्या पायथ्यापासून पुढे जाणारा एक डांबरी रस्ता, रायरेश्वराच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जातो. या वाटेने आपण वाहन घेवून रायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत जावू शकतो. यामार्गे रायरेश्वराच्या पायथ्यापासून काही ठिकाणी शिडीने तर काही ठिकाणी पायऱ्यांच्या वाटेने रायरेश्वराचा डोंगर चढावा लागतो. डोंगर चढून वर गेल्यानंतर समोर विस्तीर्ण पठार नजरेस पडते. तेथून पायवाटेने रायरेश्वराच्या मंदिराकडे जाताना पठारावरील भातशेती दिसते. तसेच पावसाळ्यात या परिसरात गेल्यानंतर, पठारावर दाट धुके दिसते.

रायरेश्वराच्या पठारावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

रायरेश्वर पठार : रायरेश्वर डोंगराच्या पायथ्यापासून केंजळगडमार्गे डोंगर चढून वर गेल्यानंतर समोर रायरेश्वराचे विस्तीर्ण पठार नजरेस पडते. रायरेश्वर पठाराची उंची साधारणता ४००० मीटरच्या जवळपास आहे. या पठारावर विविध प्रकारची फुले नजरेस पडतात. संपूर्ण पठारावर रानफुले उमललेली आहेत. पाय वाटेने रायरेश्वराच्या मंदिराकडे जात असताना वाटेवर तलाव आहे. पावसाळ्यात या तलावात स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी साचलेले असते. तलावाच्या या परिसरात खुप मोठ्या प्रमाणात धुके पसरलेले असते. त्यामुळे धुके असताना सावधपणे पायवाटेने पुढे जाणे आवश्यक आहे. रायरेश्वराच्या पठारावर पावसात भातशेतीची मशागत करणारे शेतकरी बांधव देखील आपल्या नजरेस पडतात.

पांडव लेण्या : रायरेश्वराच्या पठारावर फिरत असताना एका ठिकाणी गुहे सारख्या, दगडात कोरलेल्या पांडव लेण्या आपल्या नजरेस पडतात. पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड धुके आणि पाणी असते. पठारावरून नाल्यामार्गे पाणी खाली दरीमध्ये पडत असताना दिसते. याच परिसरात छोट्यामोठ्या अशा नाल्यांना धबधब्याचे स्वरूप आल्यासारखे दिसते.

पाण्याचे टाके : रायरेश्वर मंदिराच्या परिसरात गाववस्तीकडे जात असताना वाटेवर पाण्याचे टाके आहे. गावातील राहणारे लोक याच पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. पाण्याच्या टाक्यात दगडामध्ये कोरलेले एक गाईचे मुख आहे. या गाईच्या मुखातून सतत टाक्यामध्ये पाणी पडत असते.

रायरेश्वर मंदिर : शेवटी रायरेश्वराच्या मंदिराजवळ पोचल्यानंतर असे लक्षात येते की, केवळ ग्रामीण भागातील खेडेगाव असल्यासारखा हा परिसर आहे. रायरेश्वराच्या मंदिरात महादेवाची पिंड आहे. आणि भग्न अवस्थेतील नंदीची मुर्ती आहे. तसेच मंदिराचा देखील वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला असावा हे तेथील परिस्थितीवरून लक्षात येते. मंदिरावर पत्रे टाकलेले आहेत. परिसरात राहणारी ग्रामस्थ मंडळी मंदिरात सर्व व्यवस्था पाहतात. हे मंदिरातील स्वच्छता पाहून लक्षात येते.

मंदिर परिसरातील शिवाजी महाराजांची मुर्ती :
रायरेश्वर मंदिराच्या परिसरात, मंदिराच्या एकदम समोर छत्रपती शिवाजी महाराजांची एक आसनस्थ मुर्ती बसवण्यात आलेली आहे. तसेच मंदिराच्या परिसरात एक विस्तीर्ण सभामंडप देखील आहे. येथील ग्रामस्थांनी सांगितले, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री दिवशी रायरेश्वराच्या दर्शनासाठी याठिकाणी लोकांची गर्दी असते.
किल्ला म्हणून कोणतेही अवशेष रायरेश्वरी अस्तित्वात नसले, तरीही मराठेशाहीच्या इतिहासातील महत्वपूर्ण क्षण रायरेश्वराच्या मंदिराने अनुभवलेला असल्यामुळे या परिसरास विशेष महत्व आहे. आणि हे महत्व, हे पावित्र्य हा परिसर आज ही टिकवून आहे. त्यामुळेच सूर्यास्ताच्या वेळी रायरेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या छत्रपतींच्या मुर्तीचे रूप खुप मनमोहक दिसते.
स्वराज्य स्थापनेच्या शपथेचा साक्षीदार असलेला ‘रयतेचा रायरेश्वर’ परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. आपण पर्यटक म्हणून या परिसरात गेल्यानंतर, छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष असलेल्या या रायरेश्वर पठाराची निसर्गरम्य दृश्ये डोळ्यांमध्ये साठवून परतीच्या वाटेला निघत असताना, प्रसन्न चित्ताने डोंगराच्या पायऱ्या उतरू लागतो.

हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 

No comments:

Post a Comment