Wednesday, April 12, 2017

दुर्ग भ्रमंती - पराक्रमी प्रतापगड

         
टेहळणी बुरुज 
  पराक्रमी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाच्या यशोगाथा आपण इतिहासात वाचत असतो. इतिहासकारांकडून ऐकत असतो. शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमावर आधारलेली गीते, भारुडे अगदी अंगावर शहारा येईपर्यंत ध्यानमग्न होऊन आपण ऐकत असतो. परंतु या पराक्रमी प्रतापगडावर आजच्या घडीला केवळ पर्यटनासाठी जाणारे लोक, गडाचे पावित्र्य जपत नाहीत. गडावर वाढत्या पर्यटनामुळे कचरा वाढत आहे. गडावर वास्तू कमी आणि हॉटेल्स, खानावळी जास्त आहेत. त्यामुळे गडावरील वास्तुंचे पावित्र्य आणि इतिहासाची आठवण नाहीशी होत असून एक दुर्गप्रेमी म्हणून याबद्दल काळजी वाटणे सहाजिक आहे. आपण सर्वांनी पुढाकार घेवून पराक्रमी प्रतापगडाचे पावित्र्य जपण्यासाठी गडास भेट देवून तेथे घडलेला इतिहास जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
             सह्याद्रीच्या पर्वत रांगेत जावळीच्या खोऱ्यात दाट जंगलामध्ये प्रतापगड किल्ला बांधलेला आहे. प्रतापगडाच्या पूर्वेस महाबळेश्वर पठार आणि घनदाट जंगल आहे. पश्चिमेकडे पार घाट आणि कोकण परिसर आहे. प्रतापगड सातारा जिल्यातील गिरीदुर्ग आहे. वाई परिसरातील जावळीच्या खोऱ्यात असलेला प्रतापगड महाबळेश्वर- पोलादपूर रस्त्यावर महाबळेश्वर पासून जवळच २१ कि. मी. अंतरावर आहे. राज्य महामार्ग ७२ ने प्रतापगडावर पोचता येते. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधील टेंभावर हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. किल्ल्याची चढाई जास्त अवघड नसून, पायथ्यापर्यंत आपण वाहन घेऊन जावू शकतो. महाबळेश्वरहून पोलादपूरला जाणारी एस.टी. (बस) कुमरोशी गावाजवळ आपल्याला सोडते. तेथून प्रतापगडला जाता येते. आपले स्वतःचे वाहन घेवून गेल्यानंतर आपण गडाच्या पायथ्यापर्यंत जावू शकतो. गडाच्या पायथ्याजवळ पार्किंगची आणि इतर सर्व व्यवस्था आहे. गडावर पायी जायचे असल्यास पार किंवा कुंभरोशी गावातून वर जाण्यासाठी वाट आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत पोचण्याच्या वाटे व्यतिरिक्त गडावर जाण्यासाठी पाच चोर वाटाही आहेत. त्यातील काही वाट आज वापरात आहेत.

प्रतापगडाचा इतिहास : 
          प्रतापगडाच्या डोंगराला पूर्वी भोरप्याचा डोंगर असे म्हणत असत. इ. स. १६५७-५८ मध्ये चंद्रराव मोरे यांच्याकडील जावळी परिसर जिंकून घेतल्यानंतर परिसरातील काही किल्लेही शिवाजी महाराजांनी जिंकले होते. त्यानंतर महाराजांनी प्रतापगडाची उभारणी केली. इ. स. १६५७ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगड उभारणीचे काम सुरु झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाच्या उभारणीमध्ये विशेष लक्ष दिले होते. नीरा आणि कोयना नदीच्या परिसरातील प्रदेशाचे संरक्षण करता यावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून गडाची उभारणी करण्यात आली होती. इ. स. १६५६-५७ मध्ये प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची ऐतिहासिक भेट होऊन त्यात महाराजांनी अफजलखानाचा वध केला. अफझल खानाच्या वधाने शिवाजी महाराजांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानभर झाले होते. अफजलखान वधाचा सर्व लेखाजोखा आपण अनेक पुस्तकातून वाचत असतो. तसेच इतिहासकारांकडून ऐकत असतो. महाराजांच्या शौर्य गाथेची साक्ष असणारा प्रतापगड आणि त्याच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर म्हणजे आजच्या स्वराज्याची एक प्रकारे पायाभरणी आहे.
          जावळीच्या प्रांतात गेल्यानंतर पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. गडाकडे जात असताना राज्य महामार्ग ७२ सोडून थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूस एक पायवाट दिसते. तेथे रस्त्याच्या कडेला दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ येथे अफजलखानाची कबर आहे. अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला. त्यावेळी संभाजी कावजी यांनी अफजल खानाचे शिर (मुंडके) गडावरील बुरुजात पुरले, अशी इतिहासात नोंद आहे. प्रतापगडावरील मुख्य टेहळणी बुरुज आणि त्यावर फडकत असलेला स्वराज्याचा ‘भगवा ध्वज’ शिवप्रेमी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते.


गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
महादरवाजा :
गडाच्या पायथ्याजवळ गेल्यानंतर वाहनतळावरून गडाच्या दक्षिण दिशेस असलेल्या टेहळणी बुरुजाजवळून पुढे जाणाऱ्या पायवाटेने आपण महादरवाज्यात येऊन पोहोचतो. गडावरील या महादरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो. तसेच सुर्योदयावेळी उघडला जातो. महादरवाज्यातून गडाकडे आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूस चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. 

भवानी देवीचे मंदीर :
गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे गडाच्या मध्यावर भवानी मातेचे दगडी बांधकामातील मंदीर आहे. या मंदीरात देवीची काळया पाषाणाची मुर्ती आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधून शाळिग्राम शिळा (दगड) आणून त्यामधून घडवलेली आहे. मंदिरामध्ये या मूर्ती शेजारीच शिवाजी महाराजांच्या दररोजच्या पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. भवानी देवीच्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या बाजूस समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आहे. त्यापुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर मंदिराजवळ येऊन पोहोचतो.

केदारेश्वर मंदीर आणि बालेकिल्ला :
बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यानंतर समोरच केदारेश्वराचे मंदीर आहे. बालेकिल्ला परिसरात केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईंच्या वाड्याचे अवशेष आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची राज सदर आहे. याच ठिकाणी असलेल्या बागेच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. हा पुतळा गडावरील आकर्षक ठिकाण आहे. या पुतळ्याच्या जागेवर पूर्वी शिवाजी महाराजांचा राहता वाडा होता. प्रतापगडावरील या पुतळ्याचे लोकार्पण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते. महाराजांच्या या पुतळ्याशेजारी शासकीय विश्रामधाम आहे. बालेकिल्ल्याच्या ईशान्य दिशेस दोन तळी आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर दऱ्या खोऱ्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले कोयना नदीचे खोरे दिसते. प्रतापगडाचे शेवटचे टोक याठिकाणी आहे.

टेहळणी बुरुज :
गडाच्या पायथ्याकडून महादरवाजाकडे जात असताना एक वाट टेहळणी बुरुजाकडे जाते. टेहळणी बुरुजावरून जावळीच्या खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य पाहता येते. याठिकाणी असलेला ‘भगवा ध्वज’ परिसरात दुरूनच दिसतो.
         विमानातून अथवा हेलिकॉप्टरमधून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. महाराष्ट्रातील इतर गडांपेक्षा प्रतापगडास भक्कम आणि आज ही चांगल्या अवस्थेत असलेली तटबंदी आहे. तसेच प्रतापगडाला महादरवाज्याशिवाय घोरपडीचे चित्र असणारा दिंडी दरवाजा देखील आहे. या दरवाज्यास राज पहाऱ्याचा दरवाजा असे ही म्हणतात. दिंडी दरवाज्याच्या शेजारी जवळच रेडका बुरूज, त्यापुढे यशवंत बुरूज आणि सूर्य बुरूज आहेत. प्रतापगडावर कडेलोट करण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी दोषी आरोपींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येत असे. प्रतापगडावरुन पश्चिम दिशेस असलेला रायगड आणि दक्षिण दिशेस असलेला मकरंदगड उन्हाळ्यामध्ये दिसतो. परंतु हिवाळ्यामध्ये याठिकाणी भरपूर थंडी आणि धुके असते. त्यामुळे परिसरातील प्रदेश दिसत नाही. प्रतापगडावर दुर्ग प्रेमींनी हिवाळ्यामध्ये जाणे आणि गडाचा परिसर पाहणे योग्य आहे. प्रतापगडावर गेलेल्या दुर्ग प्रेमींना येथे खवय्येगिरीची मेजवानी देखील मिळते. गडावरील हॉटेल्समध्ये झुणका भाकरीसह खेडेगावातील सर्व खाद्य पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध आहेत.
      पराक्रमी प्रतापगडाचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानासोबत झालेल्या लढाईमध्ये खानाचा वध केला नसता तर इतिहासामध्ये अफजल खान वधानंतर घडलेल्या इतिहासाची वेगळी नोंद असली असती. त्यामुळे या इतिहासाची जाणीव ठेवून पराक्रमी प्रतापगडास भेट देवून आपण छत्रपतींच्या पराक्रमास त्रिवार मुजरा करणे आवश्यक आहे.


हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 

No comments:

Post a Comment