Thursday, April 6, 2017

दुर्ग भ्रमंती - राजराजेश्वर राजगड

पाली दरवाजा 
राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी. पुणे जिल्ह्यातील भोर–वेल्हे तालुक्याच्या सीमाभागात असणारा राजगड म्हणजे दुर्गप्रेमी पर्यटकांसाठी मध्यवर्ती किल्ला आहे. तीन दिशांना पसरत गेलेल्या तीन माच्या आणि मधोमध बालेकिल्ल्याची सोंगटी अशी या किल्ल्याची रचना आहे. राजगड किल्ल्यावरून परिसरातील तोरणा, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रायगड, लिगांणा, रोहीडा, रायरेश्वर, लोहगड आणि विसापूर हे किल्ले दिसतात.

नीरा-वेळवंडी नद्यांच्या खोऱ्यात मुरुंबदेवाचा डोंगर आहे. या डोंगरावरचा किल्ला म्हणून बहामनी राजवटीत राजगडास पूर्वी मुरुंबदेव असे नाव होते. मुरुंबदेव किल्ला काही दिवस निजामशाही तर काही दिवस आदिलशाहीच्या आधिपत्याखाली होता. इ.स. १६३० च्या सुमारास शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला, दरम्यान हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या शिवाजी राजांनी मुरुंबदेव किल्ला केंव्हा जिंकून घेतला याची इतिहासात नोंद नाही. परंतु रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर तोरणा किल्ला शिवाजी राजांनी काबीज केला. त्यानंतर मुरुंबदेव काबीज करून त्यावर बांधकाम आणि किल्ल्याची डागडुजी सुरु केल्याचा अंदाज इतिहासावरून लावता येवू शकतो.  मावळ प्रांतात  राज्यविस्तार करण्यासाठी तोरणा आणि मुरुंबदेव हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. इ.स. १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. स्वराज्याची २६ वर्षे राजधानी या व्यतिरिक्त राजगडावर राजारामांचा जन्म आणि महाराणी सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे छत्रपती  शिवाजी  महाराजांचे पहिले राजकीय केंद्र होते. परंतु राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी रायगडावर नेली.

पुणे बसस्थानकाहून महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या बसने किंवा खाजगी वाहनाने गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पुणे-राजगड या बसने वाजेघर या गावी उतरून गुप्त दरवाज्याने राजगडावर जाता येते. पुणे-वेल्हे बसने वेल्हेमार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करून पाली दरवाज्याने राजगडावर जाता येते. हा रस्ता पायऱ्यांचा असून सर्वात सोपा आहे. पुणे-वेल्हे मार्गासनी गावातून साखरगावमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. तेथून गुंजवणे दरवाज्याने राजगडावर जाण्यास थोडासा अवघड रस्ता आहे. तसेच गुंजवणे गावातून एक रस्ता जंगलातून सुवेळा माचीवर येतो.

राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. ४ फेब्रुवारी १७०३ रोजी औरंगजेबाने राजगडावर आक्रमण केले होते. गड जिंकल्यानंतर इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड’ असे ठेवले होते. शत्रूला जिंकण्यास अतिशय कठीण असा "राजराजेश्वर राजगड" त्याच्या वैभवासाठी आणि बालेकिल्ल्याच्या सुरक्षित ठिकाणासाठी स्वतःची इतिहासात वेगळी ओळख दर्शवतो. तर किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी राजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दर्शवतो.

पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग खुप प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या आहेत. पाली दरवाजाचे प्रवेशद्वार उंच आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून पुढे आल्यानंतर एक प्रवेशद्वार आहे. या दुसऱ्या प्रवेशद्वारावर अभेद्य आणि बुलंद बुरुज आहेत. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके आहेत. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत आल्यानंतर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

पद्मावती माची :
राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. या पैंकी सर्वात प्रशस्त आणि विस्तीर्ण माची म्हणजे पद्मावती माची. पूर्वी पद्मावती माचीवर लष्करी केंद्र आणि निवासाचे ठिकाण होते. पद्मावती देवीचे मंदिर, महाराणी सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे, रत्नशाला आणि  सदर या वास्तू आजही येथे आहेत. राजगडावर पद्मावती मंदिरामध्ये रात्रीच्यावेळी पर्यटक राहू शकतील अशी व्यवस्था आहे.
शिवाजी महाराजांनी  किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यानंतर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधल्याची इतिहासात नोंद आहे. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे. मंदीर परिसरातील वास्तुंचे अवशेष आजही छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष म्हणून उभे आहेत.

सुवेळा माची :
सुवेळा माची गडाच्या पूर्वेस आहे. सुर्योदयास सुवेळा माचीवरून सुर्योदय पाहण्यासाठी पर्यटक येत 
असतात. पद्मावती माचीकडून बालेकिल्ल्याकडे जाताना  सुवेळा माची आणि संजीवनी माचीकडे जाण्यासाठी पायवाट आहे. सुवेळा माचीकडे जात असताना वाट निमुळती होत जाते. गडावर  चिलखती बुरूज आणि  चिलखती तटबंदी हे या दोन्ही माच्यांचे वैशिष्ट्य आहे.
शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेतल्यानंतर किल्ल्याच्या पूर्व आणि पश्चिमेकडील डोंगररांगेलवर भक्कम तटबंदी बांधली. गडाच्या पुर्व दिशेस असल्यामुळे या माचीस सुवेळा माची असे नाव म्हणतात. सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे. तसेच रामेश्र्वर मंदिर आणि काळेश्र्वरी बुरुज आहे.

संजीवनी माची :
संजीवनी माची ही गडाच्या पश्चिम दिशेस आहे. पाली दरवाज्याने गडावर गेल्यास संजीवनी माचीकडे जाणारी निमुळती वाट दिसून येते. सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. संजीवनी माचीवर घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीवर विस्तीर्ण पाण्याची टाकी, विशिष्ठ अंतरावर बुरूज तसेच भुयारी मार्ग आहेत. भुयारी मार्गांनी संजीवनी माचीच्या बाहेरील तटबंदीकडे जाता येते.तोरण्यावरून राजगडावर येण्यासाठी संजीवनी माचीवर आळू दरवाजा हा एकमेव मार्ग आहे. आळू दरवाजा सद्य स्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात तसेच पाण्याची टाके देखील आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.

बालेकिल्ला :
राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला.बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. बालेकिल्ल्याकडे जाणारे बिकट चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा महादरवाजा आहे. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननी मंदिर आणि चंद्रतळे आहे. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि संजीवनी माचीचा परिसर दिसतो. उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, राजवाड्यांचे अवशेष आढळतात.

राजगडावरील अभेद्य तीन दिशांच्या तीन माच्या, गडाच्या मध्यावर असलेला बालेकिल्ला, ३ प्रमुख दरवाजे, गडावरील अभेद्य तटरक्षक दुहेरी चिलखती तटबंदी, दुहेरी-तिहेरी बांधणीचे बुरुज हे गडबांधणीतील अभिनव प्रयोग आहेत. शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणीत एका शास्त्राचा वापर करून नवनिर्माणाची उभी केलेली नांदी म्हणजे राजगड असे म्हणता येईल. गडाचे सौंदर्य आणि इतिहास पाहता, गड खरच राजराजेश्वर दुर्गराज शोभतो. राजगड हा दुर्ग वास्तुशास्त्राचा सर्वोत्तम नमुना आहे. बुलंद आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
राजगडचे हे वास्तुवैभव पाहून फक्त मला एवढेच आठवते (साभार संग्रह),

"हे शिवसुंदर मंदिर बघता। क्षणभर थांबे रवी मावळता
दिग्गज आणति अभिषेकाला स्वर गंगेचे घडे ॥
उभे हे राजगडाचे कडे, उभे हे राजगडाचे कडे..."





- नागेश कुलकर्णी 
हा लेख  मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे . 

No comments:

Post a Comment