Monday, May 1, 2017

दुर्ग भ्रमंती - परम प्रतापी पुरंदर

ज्याप्रमाणे प्रतापगडाने पराक्रमी इतिहास अनुभवलेला आहे, त्याचप्रमाणे पुरंदरनेदेखील मोरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम पाहिलेला आहे. पुणे परिसरातील इतर किल्ल्यांच्या दृष्टीने पुरंदरचा इतिहास खुप महत्वाचा आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. तसेच पेशवे कालीन इतिहासात देखील पुरंदरावर पेशव्यांचे विशेष वर्चस्व होते. त्यामुळेच इतिहासात पुणे आणि कोकणच्या वाटेवर असलेल्या पुरंदर किल्ल्याला इतिहासात विशेष महत्व होते. पुरंदरपासून जेजुरी गड जवळ आहे.

 
पोवाडे गाणारे शाहीर आणि इतिहासकार, पुरंदरचे वर्णन करत असताना म्हणतात,
 
अल्याड जेजुरी,

पल्याड सोनोरी |

मध्ये वाहते कऱ्हा,

पुरंदर शोभतो शिवशाहीचा तुरा ||
 
पुरंदर किल्ला बांधण्यात आलेल्या डोंगराचे नाव ‘इंद्रनील पर्वत’ असे होते. त्यामुळे पुरंदर म्हणजे इंद्र, याप्रमाणे किल्ल्यास पुरंदर हे नाव देण्यात आले असावे असा कयास आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. नारायणपूरमध्ये यादवकालीन महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. त्यामुळे हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वी बांधण्यात आला असावा असे इतिहासकार सांगतात.

पुण्याहून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी सासवडला आल्यानंतर नारायणपूरकडे जाणाऱ्या एस.टी.बसने आपण किल्ल्यापर्यंत पोहचू शकतो. तसेच स्वतःचे वाहन घेवून गेल्यानंतर याच मार्गाने पुरंदरच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते. सासवड हे पुणे जिल्ह्यातील पुणे जेजुरी रस्त्यावरील तालुक्याचे ठिकाण आहे.
 
 
पुरंदरचा इतिहास :
एका आख्यायिकेनुसार द्रोणगिरी पर्वत उचलून नेत असताना, हनुमानाकडून पर्वताचा काही भाग या परिसरात खाली पडला होता, तोच हा डोंगर. पुढे यास ‘इंद्रनील पर्वत’ असे देखील म्हटले गेले.

पुरंदर किल्ल्याबाबतच्या इतिहासातील नोंदीनुसार बहामनी राजवटीमध्ये हा किल्ला चंद्र संपत देशपांडे यांच्या ताब्यात होता. त्यांनी पुरंदर किल्ल्यावर पुर्ननिर्माणास प्रारंभ केला. त्यानंतर इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमधील अनेक किल्ले स्वराज्याला जोडून घेतले होते. म्हणूनच शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढण्यास पाठवले होते. तेंव्हा पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज देवून, लढाई जिंकली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचा कारभारी म्हणून नेमले.

इतिहासातील महत्वाची घटना या पुरंदरच्या पायथ्याशीच घडलेली आहे. ती घटना म्हणजे पुरंदरचा तह. दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग, औरंगजेबाच्या सांगण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि दख्खन प्रांतातील त्यांच्या कारवाया थांबवण्यासाठी शिवाजी राजांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याच्या हेतूने, दख्खन प्रांतात दाखल झाले होते. त्यावेळी छत्रपतींचे मावळे आणि खानच्या शिबंदीमध्ये पुरंदरजवळ लढाई झाली होती. दिलेर खानाने लढाईच्या शेवटच्या टप्प्यात वज्रगड ताब्यात घेवून पुरंदरावर हल्ला केला, त्यावेळी पुरंदरच्या माचीवर दिलेर खानाची आणि मुरार बाजींची लढाई झाली होती. लढाईमध्ये शेवटपर्यंत लढा दिल्यानंतर मुरारबाजी धारातीर्थी पडले आणि पुरंदरही पडला. पुरंदर किल्ला पडल्याचे समजताच छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले. त्यानंतर ११ जून १६६५ रोजी झालेला ’पुरंदरचा तह’ इतिहासात प्रसिद्ध आहे. पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी पुणे परिसरातील २३ किल्ले मोघल साम्राज्यास दिले होते. पुरंदरचा तह जरी झालेला असला, तरीही पुरंदर परिसराने मुरार बाजींचा परम प्रताप पाहिलेला होता, त्यामुळे या पुरंदर किल्ल्यास ‘परम प्रतापी पुरंदर’ अशी उपाधी नकळतपणे मिळते.

त्यानंतर मराठेशाहीतील सरदार निळोपंत मुजुमदार यांनी किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुरंदर ताब्यात घेवून त्याचे नाव ’आजमगड’ ठेवले होते. त्यानंतरच्या लढाईमध्ये मराठेशाहीतील सरदाराने पुरंदर परत स्वराज्यात आणला, त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी किल्ला पेशव्यांच्या स्वाधीन केला. पुण्याच्या आधी पुरंदर किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. दरम्यान पेशवाईतील श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म पुरंदरावर झाला. त्यानंतर इंग्रजांनी इ.स. १८१८ मध्ये पेशवाईच्या पडावानंतर पुरंदर ताब्यात घेतला.
 
पुरंदर किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. सह्याद्री पर्वताच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही डोंगररांगा पुर्व दिशेस विस्तृतपणे वाढत जातात, त्यापैकी एका डोंगर रांगेवर सिंहगड आहे. त्याच्याच पुढे भुलेश्वरजवळ, याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड किल्ले आहेत. कात्रजचा घाट, बापदेव घाट, दिवेघाट चढून गेल्यानंतर पुरंदरच्या पायथ्याशी पोहचता येते.

पुरंदरच्या पायथ्यापासून मुरारगेटने किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर समोर "पद्मावती तळे" दिसते. त्याच्या पुढे इंग्रजांच्या काळात बांधलेले एक चर्च आहे. चर्चपासून पुढे गेल्यानंतर "वीर मुरार बाजींचा” पुतळा आहे.
 
बिनी दरवाजा : बिनी दरवाज्यामधून किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर “वीर मुरारबाजीं” चा पुतळा दिसतो. किल्ल्याच्या उत्तर दिशेस असलेल्या माचीवरील हा एकमेव दरवाजा आहे. बिनीच्या दरवाज्यातून पुढे गडाकडे थोडे पुढे गेल्यानंतर ‘पुरंदरेश्वर’ मंदिर आहे.
 
पुरंदरेश्वर मंदिर : हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले महादेवाचे पुरंदेश्वर मंदिर, गडावरील मुख्य स्थान आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिरात देवेंद्र इंद्र देवाची मूर्ती आहे. पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. पुरंदेश्वर मंदिराबाहेर एक विहिर आहे, या विहिरीस "मसणी विहीर" असे म्हणतात.
 
राजाळे तलाव आणि भैरवखिंड : पुरंदरेश्वर मंदिरापासून पुढे चालत गेल्यानंतर उत्तर माचीच्या टोकावर राजाळे तलाव आहे. राजाळे तलावाच्या पुढे पुरंदर आणि वज्रगड यांच्यामध्ये भैरवखिंड आहे. भैरव खिंडीतून वज्रगडाकडे जाण्यासाठी वाट आहे.
 
पेशव्यांचा वाडा : पुरंदेश्वर मंदिराच्या एका बाजूस पेशव्यांच्या दुमजली वाड्याचे भग्न अवशेष दिसतात. पेशवाईच्या सुरुवातीस बाळाजी विश्वनाथ यांनी हा वाडा बांधून घेतला होता. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते.
 
दिल्ली दरवाजा : पुरंदर किल्ल्याच्या उत्तर दिशेस हा दरवाजा आहे. दरवाज्यावर हनुमानाची मुर्ती आहे. दिल्ली दरवाज्यातून आत गेल्यानंतर "गणेश दरवाजा" आहे. गणेश दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर "बावटा बुरुज" आहे. पूर्वी येथे ध्वज लावला जात असे.
 
कंदकडा : गणेश दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर समोर पूर्व दिशेस पसरलेला कंद कडा नजरेस पडतो. या कड्याच्या शेवटी कंदकडा बुरूज आहे. कंदकडा पाहून परत गणेश दरवाज्याजवळ आल्यानंतर शेंदर्‍या बुरुजाकडे जाता येते.
 
शेंदर्‍या बुरूज : हा बुरुज पद्मावती तळ्याच्यामागे आहे. स्थानिकांकडून सांगण्यात येते की, शेंदर्‍या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा गडावरील उपस्थित सोननाक यांनी त्यांचा मुलगा आणि सून यांचा बळी देवून बुरूज उभा केला होता.
 
केदारेश्वर मंदिर : पुरंदरचे मूळ दैवत असलेल्या केदारेश्वर मंदिरात जाण्यासाठी दगडी जीना बांधलेला आहे. तसेच या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीला भाविक केदारेश्वराच्या दर्शनासाठी आजही येत असतात. केदारेश्वराचे मंदिर पुरंदर किल्ल्यावरील सर्वात उंचावरील ठिकाण आहे. मंदिर परिसरातून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहीडा, मल्हारगड हे किल्ले दिसतात. केदारेश्वर मंदिराजवळच केदारगंगेचा उगम होतो.

आजच्या परिस्थितीत पुरंदर किल्ला आणि वज्रगड भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सुरेक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला बंदच असतो. आणि वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. भारतीय सैन्याकडून पुरंदर किल्ल्यावरील कंदकडा, केदार दरवाजा आणि बावची माची सुरक्षेच्या कारणास्तव तारांचे कुंपण घालून बंद करण्यात आली आहेत. तसेच भैरवखिंड आणि वज्रगड परिसरात जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.

मुरार बाजींच्या परम प्रतापाची साक्ष देणारा पुरंदर आज भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे गडावर सुरक्षा व्यवस्था अधिक असते. परंतु इतिहासातील लढायांची आठवण करून देणारा हा किल्ला पाहिल्यानंतर मराठेशाहीचा सार्थ अभिमान वाटतो.

हा लेख महा तरुण भारत साठी लिहिलेला आहे .

नागेश कुलकर्णी

No comments:

Post a Comment