Saturday, May 20, 2017

दुर्ग भ्रमंती - नरवीर ‘सिंहगड’

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला सिंहगड (कोंडाणा किल्ला) पुणेकरांसाठी सर्वात जवळचे ठिकाण आहे. पुण्यातील दुर्गप्रेमी सिंहगडावर सतत गर्दी करत असतात. सह्याद्री पर्वताच्या भुलेश्वर डोंगररांगेवर पूर्वी "कोंढाणा" नावाचा प्राचीन किल्ला होता. तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव "सिंहगड" ठेवले. तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला कोंढाणा किल्ला, आजच्या स्थितीत पुणेकर मंडळींसाठी पर्यटनस्थळ म्हणून कार्यरत आहे. सिंहगडावरून परिसरातील पुरंदर, लोहगड, विसापूर, राजगड आणि तोरणा किल्ल्यापर्यंतचा प्रदेश दिसतो.
सिंहगडावर जाण्यासाठी पुणे मनपापासून आणि स्वारगेटहून गडाच्या पायथ्यापर्यंत पी. एम. टी. बस आहेत. तसेच सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे खडकवासला धरणाजवळून गडाच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहन घेवून जाता येते. पी. एम. टी. बसने गडाच्या पायथ्यापर्यंत गेल्यानंतर हातकरवाडी गावातून पुढे पायी जाण्यासाठी पायवाट आहे. गडावर जाण्यासाठी वाहनाने जाण्यापेक्षा या पायवाटेने गेल्यानंतर ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो.
सिंहगडावर पुणे दरवाज्यापासून ते शेवटी असलेल्या टिळक वाड्यापर्यंत (बंगल्यापर्यंत) सर्व ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच गडावर अनेक हॉटेल्स देखील आहेत.

पुणे दरवाजा मार्गे : पुणे-सिंहगड पी. एम. टी. बसने पुण्यातून निघाल्यानंतर खडकवासला धरणापासून सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते.
पुणे- कोंढणपूरमार्गे : पुणे- कोंढणपूर बसने कल्याण गावामध्ये पोहचल्यानंतर कल्याण दरवाज्यातून सिंहगडावर जाता येते. कल्याण दरवाजा सिंहगडाच्या पश्चिम दिशेस आहे.

कोंढाणा किल्ला / सिंहगड चा इतिहास :
कोंढाणा किल्ला केंव्हा बांधला असावा, याचा ज्ञात पुरावा नाही. परंतु कोंढाण्याचा इतिहास सुरु होतो तो आदिशाहीच्या सत्तेपासून. कोंढाणा गावामध्ये असलेला कोंढाणा किल्ला पूर्वी आदिलशाहीच्या अखत्यारीत होता. त्यावेळी आदिलशाहिने दादोजी कोंडदेव यांना किल्ल्याचा सुभेदार म्हणून नियुक्त केले होते. इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पुरंदरच्या तहावेळी कोंढाणा किल्ला मोघलांना देण्यात आला. त्यावेळी मुघलशाहीकडून सरदार उदयभान राठोड यांस कोंढाणा किल्ल्याचा गडकरी म्हणून नियुक्त करण्यात आले.
मराठेशाहीच्या इतिहासात कोंढाणा किल्ल्यावर घडलेल्या पराक्रमामुळे कोंढाण्याचे नामकरण ‘सिंहगड’ झाले, आणि किल्ला विशेषत्वाने प्रसिद्धीस आला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने, मुघलांकडे असलेला कोंढाणा किल्ला, मराठ्यांनी जिंकला खरा परंतु यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांना वीर मरण आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळी, “गड आला, पण माझा सिंह मात्र गेला”, असे म्हणत कोंढाण्याचे नामकरण ‘सिंहगड’ असे केले.

सिंहगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
पुणे दरवाजा : सिंहगडाच्या वाहन तळापर्यंत गेल्यानंतर सुरुवातीस पुणे दरवाजा आहे. गडावर प्रवेश करण्यासाठी पुण्याच्या बाजूने हा मुख्य दरवाजा आहे. पुण्याच्या बाजूस असणारे असे तीन दरवाजे आहेत. एका मागे एक अशा या तीन दरवाज्यामधून गडाकडे जाण्याकरिता वाट आहे.

दारूचे कोठार : पुणे दरवाज्यातून आत आल्यानंतर समोर दारूचे कोठार दिसते. दारूच्या कोठाराची थोडीफार पडझड झालेली आहे. परंतु हे सुस्थितीत आहे. पुणे परिसरातील पर्यटकांची याठिकाणी सतत वर्दळ असल्यामुळे, याठिकाणी सतत गर्दी असते. गडावर येथे तोफखाना असे लिहिलेली एक पाटी देखील आहे.

खांद कडा : पुणे दरवाज्यामधून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर खांद कडा दिसतो. या कड्यावरून सह्याद्री पर्वताच्या परिसरातील निसर्ग दिसतो. तसेच पुण्यातील इमारती देखील दिसतात.

कोंढाणेश्वर महादेव मंदिर : इतर किल्ल्यांप्रमाणे कोंढाणा किल्ल्यावर देखील एक यादवकालीन महादेवाचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते. मंदिरामध्ये  कोंढाणेश्वर महादेवाची पिंड आणि एक नंदीची मुर्ती आहे.

अमृतेश्वर मंदिर : कोंढाणेश्वराच्या मंदिरापासून थोडे पुढे गेल्यानंतर अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. यादव घराण्याच्यापूर्वी कोंढाणा किल्ल्यावर कोळ्यांची वस्ती होती, आणि भैरव हा कोळ्यांचा देव असल्यामुळे अमृतेश्वर मंदिरामध्ये भैरव आणि भैरवीच्या मुर्त्या आहेत. यामध्ये हातात राक्षसाचे मुंडके असलेली भैरवाची मुर्ती आहे.

नरवीर तानाजी मालुसरे स्मारक : अमृतेश्वर मंदिराच्या मागील बाजूने पुढे चालत गेल्यानंतर नरवीर  तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. उदयभान राठोडशी लढता लढता धारातीर्थी पडलेल्या नरवीर तानाजींच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे.

देव टाके : नरवीर तानाजी मालुसरे स्मारकाच्या जवळून पुढे गेल्यानंतर देव टाके आहे. या टाक्यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होत असे.

कल्याण दरवाजा : सिंहगडाच्या पश्चिम दिशेस कल्याण दरवाजा आहे. कोंढणपूर गावामधून पायथ्याच्या कल्याण गावातून गडावर आल्यानंतर कल्याण दरवाज्यामधून गडावर प्रवेश करता येतो. कल्याण दरवाज्यावर काही दगडी शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.

उदयभान राठोडचे स्मारक : मोगलांनी उदेभान राठोड यास कोंढाण्याचा गडकरी म्हणून नियुक्त केले होते. नरवीर तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्या लढाईमध्ये उदयभान देखील मारला गेला होता. या उदयभान राठोडचे देखील गडावर स्मारक आहे.

झुंजार बुरूज : सिंहगडाच्या दक्षिण दिशेस झुंजार बुरूज आहे. उदयभान राठोडच्या स्मारकापासून पुढे गेल्यानंतर झुंजार बुरुजावर येता येते. झुंजार बुरुजावरून पानशेतचा परिसर, राजगड, तोरणा आणि पुरंदर दिसतात.

तानाजी कडा : तानाजी कडा सिंहगडाच्या पश्चिम दिशेस आहे. नरवीर तानाजी मालुसरे याच बुरुजावरून मावळ्यांसह गडावर चढले होते. तानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड आणि त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा वेगळ्याप्रकारे सांगण्याची गरज नाही.

छत्रपती राजाराम महाराज स्मारक : छत्रपती राजाराम महाराज यांची सिंहगडावर समाधी आहे.  मुघलशाहीशी लढा देत असताना छत्रपती राजारामांचे सिंहगडावर निधन झाले होते. त्यावेळी छत्रपती राजाराम यांचे स्मारक सिंहगडावर बांधण्यात आले. पुढे पेशवाईमध्ये सिंहगडावर असलेल्या या स्मारकांची रीतसर व्यवस्था ठेवण्यात आलेली होती.

लोकमान्य टिळक यांचा वाडा : सिंहगडावर लोकमान्य टिळक यांचा एक वाडा आहे. इ.स. १९१५ साली लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची या वाड्यामध्ये भेट झाली होती. आगरकर आणि लोकमान्य टिळक सिंहगडावर आल्यानंतर येथे येत असत.

सिंहगड. सिंहगड आपणास मराठेशाहीच्या एका सरदाराच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. इतिहासात विजयी पताका मिरवणारा ‘सिंहगड’ आजच्या दिवशी मात्र आपल्याच लोकांनी बाटवला आहे. रेव्ह पार्ट्या, दारू पिवून दंगा करण्यासाठी आजकाल पुणे परिसरातील मंडळींसाठी सिंहगड पायथा एक प्रकारचा अड्डाच झाला आहे. अश्लील चाळे करण्यासाठीच जाऊन काही हे मुक्त ठिकाण असल्यागत गडावर प्रेमी युगुलं वावरत असतात. याच साठी नरवीर तानाजींनी बलिदान दिले का? याच साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सिंहगड ठेवले होते का? याचा विचार आजकाल खुप कमी लोक करत असावेत. त्यामुळेच सिंहगडावर दुर्गप्रेमी कमी आणि प्रेमी लोक अधिक असतात.
प्रशासनाच्या पुढाकाराने सध्या गडावर व्यवस्था राखली जात आहे. तरी देखील इतिहासातील वास्तवाचा पुरावा असलेल्या सिंहगडचे पावित्र्य, एक नागरिक म्हणून आपण देखील जपणे गरजेचे आहे. गडावर गेल्यानंतर स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या या ऐतिहासिक वारसा स्थळांना आपल्या भावी पिढ्यांसाठी एक आदर्श आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणून वारसारूपाने प्रदान करण्यास हातभार लावू शकतो.


हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 
- नागेश कुलकर्णी 

No comments:

Post a Comment