Friday, May 19, 2017

दुर्ग भ्रमंती - सज्जनगड



|| दास डोंगरी राहतो, 
यात्रा रामाची पाहतो |
देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे ||

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांच्या इतिहासात स्वतःच्या विशिष्ठ पाऊल खुणा अस्तित्वात आहेत. मग आजच्या दिवशी त्या किल्ल्यावर काही अवशेष असतील अथवा नसतील, तरीही अनेक किल्ले स्वतःचे पावित्र्य आणि वेगळेपण जपून आहेत. त्यामध्ये सज्जनगडाचा रायगडाच्या बरोबरीने क्रमांक लागतो. समर्थ रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जाणून घेत असताना सज्जनगडाचा नामोल्लेख येतोच, त्यामुळे सज्जनगडाचे स्वराज्य स्थापनेत विशेष आणि महत्वपूर्ण योगदान आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील शंभू महादेव या नावाने ओळखली जाणारी एक डोंगररांग सातारा जिल्ह्यात पुर्व दिशेस विस्तृतपणे वाढत जाते. शंभू महादेव डोंगररांगेवरच सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या अगदी जवळ असलेल्या परळी गावाच्या डोंगरराईत हा किल्ला आहे. उरमोडी नदीच्या खोर्‍यात परळीचा किल्ला उभा आहे. सज्जनगड किल्ल्यावर समर्थ रामदासांची समाधी आहे. तसेच समर्थ रामदासांचे याठिकाणी अनेक दिवस वास्तव्य होते.

सज्जन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. कोणत्याही वाटेने गेल्यानंतर पायऱ्या चढून गडावर जावे लागते.

परळी गावामधून : सातारा गावामधून परळी गावामधून गडाकडे जाता येते. परळी गावातील गड पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.

गजवाडी पासून : सातारा परळी वाटेवर परळीच्या अलीकडेच गजवाडी गाव आहे. तेथून गडावर जाता येते. तेथून पुढे गडावर जाता येते.


सज्जन गडाचा इतिहास :
परळी गावाच्या शेजारी असलेल्या डोंगरावर पूर्वी आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, असे म्हणतात. त्यामुळे या किल्ल्यास अपभ्रंश स्वरुपात ‘अस्वलगड’ असे म्हटले जात असे, स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर असे सांगण्यात आले. सज्जन गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव असल्यामुळे, या किल्ल्यास परळीचा किल्ला असे देखील म्हणतात. सज्जनगडाची उभारणी शिलाहार घराण्यातील भोज राजाने ११ व्या शतकात केली असल्याचे इतिहासकारांकडून सांगण्यात येते. सज्जनगड हा किल्ला बहमनी राजाकडून वारसदार आदिलशाहीकडे वर्ग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो स्वराज्याच्या सेवेत दाखल झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीस मान देवून समर्थ रामदास स्वामी उर्फ नारायण विसाजी ठोसर हे परळीच्या किल्ल्यावर वास्तव्यासाठी आले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे "सज्जनगङ" असे नाव ठेवले, असे इतिहासातून समजते. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे पहिले छत्रपती या नात्याने छत्रपती शिवाजीराजे भोसले सज्जनगडावर समर्थ रामदासांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांनी युवराज संभाजी राजांना समर्थ रामदासांच्या सज्जनगडावरील वास्तव्यात पाठवले होते. दरम्यान युवराज संभाजीराजे भोसले  सज्जनगडावरून पळून गेले होते. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज याचं गुरु शिष्याच नात होत. समर्थ रामदासंकडून मार्गदर्शन घेण्याकरिता शिवाजी महाराज वेळोवेळी सज्जनगडावर जात असत अथवा पत्र व्यवहार करत असत. (यावर वाद असू शकतो, परंतु इतिहासातील नोंदींवरून हे मान्य करावेच लागेल.) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर तसेच प्रतापगडावरून अफजल खानाच्या वधाचा डाव आखत असताना,समर्थ रामदासांच्या अनुयायांनी म्हणजेच ‘रामदासी’नी छत्रपतींसाठी हेरगिरीचे काम केले असल्याची नोंद इतिहासात आढळते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इ.स. १६८२ मध्ये सज्जनगडावर श्रीरामाचे मंदिर बांधून तेथे राममूर्तींची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थ रामदासांचे निधन झाले. समर्थ रामदासांचे रामदासी, रामदासांच्या निधनानंतर देखील सज्जनगडावर श्रीराम मंदिरात रामदासांच्या समाधीजवळ राहत होते. यावेळी समर्थ रामदासांच्या शिष्या अक्कास्वामी यांनी मठाची व्यवस्था पाहिली होती. त्यानंतर इ.स. १७०० मध्ये फतेउल्ल खानाने सज्जनगडास वेढा देऊन, सज्जनगड मोगलांच्या ताब्यात घेतला. त्यावेळी गडाच्या विशिष्ठ ठिकाणावरून त्याचे ‘नौरसतारा’ असे नामकरण करण्यात आले होते. त्यानंतर मुघलांकडून इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी सज्जनगड पुन्हा मराठेशाहीच्या राजवटीखाली सहभागी करून घेतला. इ.स. १८१८ मध्ये सज्जनगड ब्रिटीशांच्या राजवटीत कंपनी सरकारच्या अधिपत्याखाली आला.

सज्जन गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

समर्थ दर्शन : सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत पोचत असताना, वाटेवर उजव्या बाजूस हनुमानाची उंच मुर्ती नजरेस पडते. गडाच्या पायथ्याजवळ असलेल्या वाहन तळाकडे जात असताना ही मुर्ती दिसते. या मूर्तीच्या परिसरात समर्थ दर्शन येथे, समर्थ रामदासांचा जीवनपट उलगडलेला आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाद्वार : सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत वाहनाने गेल्यानंतर, पायथ्यापासून गडाकडे जात असताना वाटेवर सर्वप्रथम ‘श्री छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ लागते. गडावर जाण्यासाठी मुख्य द्वार असल्यामुळे, दररोज रात्री ९ वाजता नियमाप्रमाणे द्वार बंद करण्यात येते. तसेच सकाळी द्वार उघडण्यात येते. शिवाजी महाद्वार खुप भक्कम आणि उंच आहे.

श्री समर्थ महाद्वार : शिवाजी महाद्वारातून पुढे गेल्यानंतर पुढे दुसरे द्वार लागते, ते म्हणजे ‘श्री समर्थ महाद्वार’ होय. आजही या दोन्ही द्वारांचे मुख्य दरवाजे रात्री ९ नंतर बंद होतात. या दोन्ही मुख्य महाद्वारांच्या तटबंदी भक्कम आहेत. गडाकडे जात असताना वाटेवर समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतीची प्रतिकृती स्वरूपातील छोटी मंदिरे आहेत.

रामघळ : श्री समर्थ महाद्वारातून पायर्‍या चढून गडावर प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस रामघळ आहे. रामघळ समर्थ रामदासांची एकांतात बसण्याची जागा होती.

अंग्लाई देवीचे मंदिर : गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे एक पाटी लावलेली दिसते, अंग्लाई देवी मंदिराकडे. या पाटीपासून पुढे गेल्यानंतर एक छोटे तळे आहे. याच परिसरात अंग्लाई देवीचे मंदिर आहे. अंग्लाई देवीची ही मुर्ती समर्थ रामदासांना डोहात सापडली असल्याची आख्यायिका सांगितली जाते.

पेठेतील मारुती मंदिर : गडावरील मुख्य पेठेत हे मारुती मंदिर आहे. समर्थ रामदास गडावर राहण्यास येण्यापूर्वीपासून हे मंदिर गडावरती आहे.

समर्थ रामदासांचे समाधी मंदिर आणि श्रीराम मंदिर : अंग्लाई देवीच्या मंदिराकडून परत येवून समाधी मंदिराकडे जात असताना वाटेवर संस्थानाचे कार्यालय, श्री समर्थ संस्थान कार्यालय आणि काही छोटी साहित्य भांडार वस्तूंची दुकाने आहेत. मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर विस्तीर्ण आणि भव्य असा सभामंडप आहे. सभामंडप परिसरात मंदिराचा मुख्य गाभारा आहे. सभामंडप परिसरातच समर्थ महाप्रसाद गृह आहे. समोरच श्रीरामाचे मंदिर, समर्थ रामदासांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थ रामदासांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. श्रीराम मंदिराच्याखाली तळ मजल्यावर समर्थ रामदासांचे समाधी मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूने गेल्यानंतर संस्थानच्या धर्मशाळेकडे जाण्यासाठी वाट आहे. सज्जनगडावरील धर्मशाळेत निशुल्क राहण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच मंदिर परिसरातील प्रसादालयात निशुल्क भोजन देखील करता येते.
सज्जनगडावर परिसरात कल्याण स्वामी यांचे स्मारक आहे. तसेच समर्थ रामदासांच्या शिष्या वेण्णा बाई आणि अक्काबाई स्वामी यांचे देखील समाधी वृंदावन मंदिर आहे. ब्रह्मपिसा स्मारक आहे. एकूणच काय तर सज्जनगड परिसर सध्या केवळ समर्थमय आहे.

धाब्याचा मारुती मंदिर : सज्जनगडाच्या पश्चिम तटबंदीजवळ समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. असे सांगण्यात येते की, गडाच्या या पश्चिम बाजूस छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांची भेट होत असे. धाब्याच्या मारुतीपासून ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता दिसतो.
सज्जनगड परिसरात आल्यानंतर साताऱ्याहून ठोसेघर धबधबा, अजिंक्यतारा किल्ला आणि कास पठार ही ठिकाणे देखील जवळ आहेत. पर्यटक सज्जनगडावर आल्यानंतर यासर्व ठिकाणी जावून येवू शकतात.
आजच्या दिवशी सज्जनगडावर पडलेल्या अवस्थेतील तटबंदी आहेत आणि गड म्हणून काही भग्न अवस्थेतील अवशेष आहेत. परंतु समर्थ रामदास स्वामींच्या समाधी स्थळामुळे सज्जनगडास विशेष श्रद्धास्थान प्राप्त झाले आहे. रामदासी आणि समर्थ रामदासांना श्रद्धास्थान मानणारे भाविक गडावर नियमित येत असतात. तसेच राम नवमीला गडावर उत्सव असतो. त्यामुळे समर्थांच्या या भूमीवर आपण पर्यटक म्हणून अथवा भाविक म्हणून गेल्यानंतर गडाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 

-    नागेश कुलकर्णी

No comments:

Post a Comment