Monday, September 21, 2015

अजिंक्य योद्धा : पहिले बाजीराव पेशवे (इ.स. १७०० - इ.स. १७४० )

रणधुरंधर, अजिंक्य योद्धा म्हणून ख्याती असलेले पहिले बाजीराव पेशवे यांची १८  ऑगस्ट रोजी ३१५  वी जयंती साजरी करण्यात आली , यावेळी या थोर मराठी वीराच्या आठवणींनी पुण्यातील शनिवारवाडा परिसर उजळून निघाला. खरे पाहता मराठा राज्याचे चौथे छत्रपती श्री शाहू राजे यांच्या कालखंडात बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर त्यांचे प्रथम पुत्र म्हणून बाजीरावांची पेशवा पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. वयाच्या अवघ्या विशीतला हा तरुण मराठेशाहीचा पंतप्रधान (पेशवा) झाला आणि जीवनाच्या अखेरपर्यंत अजिंक्य राहिला.
बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाई यांना इ.. १७०० मध्ये १८ ऑगस्ट रोजी पुत्ररत्न झाले. त्यांना त्यावेळी असे वाटलेही नसेल की त्यांचा हा पुत्र मराठी राज्याचा एक अजिंक्य सेनानी म्हणून नावारूपास येईल. या मराठी वीराने अवघ्या २० वर्षे वयात पेशवाईची वस्त्रे परिधान केली अन् पार दिल्लीच्याही तख्ताला हादरे दिले. उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक अजिंक्य पराक्रम केले. थोरल्या बाजीरावांची अशी ख्याती होती की ते हाती घेतलेली लढाई जिंकूनच परत येतात. लढायांच्या वेळी वेगवान हालचाली करणे हेच त्यांचे प्रमुख हत्यार होते. शत्रू सावध होण्याआधीच ते त्याच्यावर अशी काही झडप घालायचे की त्याला सावरून प्रतिकार करण्यासदेखील वेळ मिळत नसे, त्यांच्या लढाईतील या कौशल्यामुळे आपण मैदानी लढाया लढून जिंकू शकतो असा आत्मविश्वास मराठी राज्यातील प्रत्येक सैनिकात त्यांनी जागृत केला होता. बाजीरावांच्या या कौशल्यामुळे त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना ब्रिटिश फील्डमार्शल बर्नाड मॉन्टगोमेरी म्हणतो, The Palkhed Campaign of 1727 - 28 in which Bajirao, out generalled Nizam-Ul-Mulk, is a masterpiece of strategic mobility.'
            संपूर्ण भारतवर्षात त्यांच्या तलवारीच्या पात्याचा दरारा निर्माण करणारे आणि छत्रपती शाहूंच्या गादीचा पुण्यातून गाडा हाकणारे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या लढवय्या नेतृत्वामुळेच खरे पाहता मराठी साम्राज्याचा विस्तार त्यावेळी होऊ शकला. बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर (..१७२०) छत्रपतींच्या दरबारातील लोकांना परंपरागत पेशवेपद बाजीरावांकडे देऊ नये असे वाटत होते. परंतु शाहू महाराजांच्या आदेशानुसार पेशवाईची वस्त्रे आणि शिक्केकट्यार बाजीरावांना देण्यात आली.
            श्रीमंत बाजीरावांचा जन्म १८ ऑगस्ट १७००. १७ एप्रिल १७२० रोजी पेशवाईची सूत्रे हातात घेतली. पेशवाई स्वीकारताना वयाची २०  वर्षे देखील पूर्ण झाली नव्हती. निजामासोबत मुंगी शेवगावचा तह  मार्च १७२८ . पुण्यामध्ये शनिवारवाडा बांधला १७३२. दिल्लीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले २९  मार्च १७३७. निजामाकडून भोपाळच्या लढाईत माळव्याचे संपूर्ण अधिकार घेतले जानेवारी १७३८. बाजीराव पेशव्यांचा २८ एप्रिल १७४० रोजी मध्य प्रांतात मृत्यू झाला. शाहू महाराजांचा विश्वास सार्थ ठरवत आणि स्वतःच्या फटकळ व एक घाव दोन तुकडे स्वभावाला दृढ करत त्यांनी मराठी साम्राज्य वाढविले. अवघ्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत, माळवा (डिसेंबर १७२३ ), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी, १७२८), अहमदाबाद (१७३१), उदयपूर (१७३६), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसई (मे १७३९) या आणि अशा ३६ छोट्या मोठ्या लढाया लढल्या आणि जिंकल्यादेखील. या लढाया सुरू असतानाच त्यांनी पुण्यात शनिवारवाडा बांधला आणि सातार्याच्या राजगादीएवढेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. पेशवे पंतप्रधान असूनदेखील साम्राज्याची सारी सूत्रे त्यावेळी पुण्यातून चालवली जाऊ लागली. बाजीरावांनी शनिवारवाडा बांधला तो १७३२ साली, शनिवारवाड्यासंदर्भात एक दंतकथा प्रचलित आहे, बाजीरावांनी त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना पाहिले, त्यावेळी ते दृश्य पाहून पेशव्यांना आश्चर्य वाटले व त्या जागी एक भुईकोट किल्ला बांधण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. हाच तो शनिवार वाडा.
श्रीमंत बाजीराव पेशव्यांना ‘‘राऊ’’ असे देखील म्हटले जात असे. बाजीरावांचा विवाह काशीबाई साहेबांबरोबर झाला. त्यांना काशीबाईंपासून श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे, जनार्दन आणि रघुनाथराव पेशवे ही तीन पुत्ररत्ने झाली तर सर्वश्रुत मस्तानीपासून समशेरबहादूर हा मुलगा झाला. समशेर बहादूरला कृष्णराव असेेदेखील म्हटले जात असे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी कोणालाही न जुमानता मस्तानीला शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.
            चिमाजी अप्पा हे बाजीरावांचे धाकटे भाऊ होते. यांनी देखील मराठी सत्तेला वाढवण्यास हातभार लावलेला होता. अक्षरशः या दोन भावांनी मराठी सत्तेचा दबदबा दख्खनपासून रूमशामपर्यंत विस्तारला होता. श्रीमंत पेशवे घराणे खरेच मुत्सद्दीपणे आणि कर्तबगारीने मराठेशाहीसाठी लढले पण या लढाईची आणि मराठेशाहीची मुहूर्तमेढ श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी रोवली होती हे महत्त्वाचे आहे.  फूट शरीरयष्टी असलेला त्यांचा देह अगदी उंचापुरा, पिळदार शरीर, तांबूसगौर वर्ण, लांबट हात, निकोप प्रकृती, कोणीही मोहित होईल असा चेहरा, तेजस्वी कांती असाच होता. असे उमदे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे कोणावरही त्यांची सहज छाप पडे. श्रीमंत बाजीराव पेशवे पांढरे व फिकट रंगाचे कपडे वापरीत असत. स्वतःची कामे न्यायनिष्ठुरपणे स्वत करणे यावर त्यांचा भर असे, एक व्यक्ती म्हणून देखील त्यांचे व्यक्तिमत्त्व राजेपणाला साजेसेच असल्यामुळे त्यांचा तो चिरकाल टिकणारा रुबाब पाहून जनतेला आणि सैन्याला देखील हुरूप येत असे. त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच सारी मराठी फौज त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाली होती.
          
  २ एप्रिल १७२०  रोजी बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर बाजीराव पेशवे झाले. परंतु त्यांच्या नेतृत्वकौशल्यामुळे आणि लढायांमधील अपराजित योद्धा या रुबाबामुळे काही कालावधीतच मराठी साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेच शासक झाले आणि मराठी छत्रपती गादी ही केवळ नावापुरतीच राहून गेली. पेशव्यांची राजधानी पुणे येथे असल्यामुळे सत्तेची सर्व सूत्रे पुणे येथूनच हलवली जाऊ लागली. ‘‘पेशवे’’ ही त्यांना दिलेली उपाधी होती. पेशवा म्हणजे पुढे जाणारा. बाजीरावांचे पूर्ण नाव होते, श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट.
            श्रीमंत बाजीराव अक्षरशः जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत लढाया लढले आणि जिंकलेदेखील. २७  फेब्रुवारी १७४० रोजी नासीरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठणचा तह केला आणि त्या तहामध्ये नासीरजंगने हंडिया व खरगोण हे दोन परगणे बाजीरावांना दिले. या परगण्यांची व्यवस्था लावण्यासाठी श्रीमंत बाजीराव खरगोणला गेले असता त्यांची प्रकृती अचानक बिघडली. नर्मदा नदीच्या तीरावर त्यावेळी डेरा पडलेला होता. २८  एप्रिल १७४०  (वैशाख शुद्ध १६६२ ) रोजी रावरखेडी येथे विषमज्वराने त्यांचा जीवनप्रवास संपला. एका लढवय्या नेत्याच्या त्यावेळी झालेल्या अकस्मात मृत्यूने हादरून न जाता, मराठेशाही तशीच पुढे बलवान होत गेली व पुढे विस्तारत गेली. पार अटकेपार झेंडे रोवले गेले. मराठेशाहीचा जरीपटका मानाने डोलू लागला. मात्र या जरीपटक्याचा, मराठेशाहीचा पाया रोवला होता तो या श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनीच.

            अशा या मराठेशाहीच्या पेशवे पंतप्रधानांच्या आठवणींनी आजदेखील शनिवारवाडा परिसर उठून दिसतो. शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाज्यासमोरील बाजूस असलेला श्रीमंत बाजीरावांचा पुतळा हेच दर्शवितो की मराठेशाहीचे रक्षणकर्ते पंतप्रधान पेशवे श्रीमंत बाजीराव बल्लाळ भटमराठेशाहीच्या रक्षणासाठी आत्तादेखील खंबीरपणे उभे आहेत.’

No comments:

Post a Comment