Friday, April 24, 2015

नवा ‘जनता’ प्रयोग

नुकतेच संसदेमध्ये, भाजप खासदार हुकूमदेव यादव यांनी जनता परिवार म्हणजे,‘बिखरे हुए टुकडे हजार, कोई यहाँ गिरा तो कोई वहाँ गिराअसे म्हणत जनता पक्षांची परिस्थिती मांडली होती. हाच जनता पक्षांचा समूह पुन्हा एकदाजनता परिवारया नावाने एकत्र आला आहे. भाजप-काँग्रेसेतर तिसरी प्रबळ आघाडी उभी करण्याचा मनीषा बाळगून एकत्र आलेला हाजनता परिवारयापुढील राजकारणात किती दिवस एकत्र राहून जनतेची, आपला परिवार म्हणून सेवा करतो हे पाहण्याजोगे असेल.
आजवर देशातील राजकारणात काँग्रेस भाजप व्यतिरिक्त तिसर्या प्रबळ आणि प्रमुख एकसंघ पक्षाची भूमिका कधी समाजवादी तर कधी डाव्या पक्षांनी निभावली असली तरी ते एक प्रकारचा तगडा विरोध उभा करू शकलेले नाहीत. जनता पक्षांमधील संधीसाधू राजकारणामुळे जनता परिवारातील महत्त्वाकांक्षा सदैव अंतर्गत यादवी युद्ध आणि कलगीतुरे यांसभोवतीच फिरताना दिसून येतात. लोकसभेमध्ये १५ आणि राज्यसभेत ३० खासदार असणारा हा जनता परिवार एकमेकांचे उणेदुणे लपवत एकत्र आला आहे. यामध्ये उत्तरप्रदेशमध्ये प्रभावक्षेत्र असलेल्या मुलायमसिंहांच्या अध्यक्षतेखालीसमाजवादी जनता पार्टीया नावाने हा जनता परिवार यापुढे एकत्रित असणार आहे. (किती दिवस ते माहीत नाही!) त्यांचे निवडणूक चिन्ह हे देखील सायकल हेच (समाजवादी पार्टीचे जे होते ते) ठरवण्यात आले आहे. किती आश्चर्यकारक? समाजवादीसहित जनता परिवारातील इतर पक्षांचा किती हा समजूतदारपणा? एकवेळ लालूप्रसाद यादव आणि मुलायमसिंह हे व्याही असल्यामुळे, त्या दोघांचे वागणे योग्य असल्याचे म्हणता येईल. परंतु देवेगौडा, चौटालांसहित नितीशकुमार यांनी देखील मुलायमसिंहांच्या नेतृत्वाला मान्यता दिली, म्हणजे हे वाखाणण्याजोगे आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजेच पाच खासदार मुलायमसिंह यांच्यासमाजवादी सायकलचे निवडून आलेले होते. त्यामुळेच त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडलेली असावी. तसेही अखिलेश यादव यांचा नाकर्तेपणा कोणत्या ना कोणत्या मार्गाने लपवण्याची गरज होतीच, म्हणून मुलायमसिंहांनी आपल्या वार्धक्यजीवनातील पुढील राजकारणाची सोय म्हणून हे नेतृत्त्व स्वीकारणे कौतुकास्पद आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना आवश्यक वाटलेले हे पाऊल ठरू शकते.
लोकसभा निवडणुकीनंतर देशातील सर्व राज्यांमध्ये वाढत चाललेला भाजपचा प्रभाव आणि बिहारमध्ये पुढील काही दिवसांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, एकमेकांच्या घरावरून कधी वारा वाहू लागला तर श्वास घेणे थांबवणारे लालू आणि नितीश यांचे मनोमिलन या निमित्ताने झाले. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, भारतीय राष्ट्रीय लोकदल, समाजवादी जनता पक्ष, जनता दल धर्मनिरपेक्ष या पक्षांनी एकत्र मोट बांधून जनता परिवाराच्या विलिनीकरणाची घोषणा केली. नव्या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुलायमसिंह यादव यांच्या नावाची घोषणा शरद यादव यांनी केली. लोकसभेत पक्षाचे नेतृत्त्व मुलायमसिंहांकडे तर राज्यसभेत शरद यादवांकडे असेल असेही यावेळी मोठा गाजावाजा करून सांगण्यात आले. पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राजदचे लालूप्रसाद यादव, जेडीयूचे नितीशकुमार आणि शरद यादव, जदयू धर्मनिरपेक्षचे एच.डी. देवेगौडा, आय्एन्एल्डी.चे अभय चौटाला यांनीजनता परिवारच्याछत्राखाली एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. काँग्रेस आणि भाजपाविरोधी ही एकसंध आघाडी असल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले. परंतु आपल्या आपल्या मतदारसंघांपुरते अथवा राज्यांपुरते उरलेल्या या छोट्या पक्षांचा समूह एकत्र आला तरी काय चमत्कार होऊ शकेल याबाबत बोललेलेच बरे. या जनता परिवाराच्या नव्या खेळापासून रामविलास पासवान आणि अजितसिंग, नवीन पटनायक यांसारखे दिग्गज मात्र दोन हात अंतर ठेवून आहेत. कारण त्यांना यानंतर पुढे होऊ घातलेल्या भांडणांचा अंदाज आलेला असावा.
अनेक वेळा परस्परांना पाण्यात पाहणारे हे सारे नेते आज एकत्र आले आहेत खरे निमित्तमात्र, परंतु त्यांच्या राज्यांच्या बाहेर ते प्रचारासाठी गेले तर त्यांना कोणी ओळखणार देखील नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यात एच्.डी. देवेगौडा यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहत, राज्यसभा जवळ केलेली. उत्तर भारतामधील जनता बहुधा त्यांना ओळखूही शकणार नाही. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये जनता परिवाराचा प्रयोग थोडाफार यशस्वी होऊ शकेल परंतु तेथे देखील भाजप, काँग्रेस आणि बसपासहित इतर छोट्यामोठ्या राजकीय पक्षांची रेलचेल मोठ्या प्रमाणात आहे. अशा स्थितीत हा प्रयोग यशस्वी होणे प्रश्नांकित आहे.
इतिहासामध्ये राम मनोहर लोहिया यांच्या विचारांवर चालणारा हा जनता पक्षांचा मेळावा आजवर जेव्हा जेव्हा एकत्र आला, त्यावेळी जनतेने या सर्वांवर विश्वास टाकलेला दिसून येतो. खासकरून उत्तर भारतीय जनतेने यांना सत्तेवर आणले. १९७७ साली तात्पुरती सोय म्हणून तयार झालेला जनता परिवार आणि आता दिसत असेलेले हे नेते त्यावेळी युवा नेते होते. त्यांच्या बळावत गेलेल्या राजकीय महत्त्वाकांक्षांमुळे अनेक वेळा वेगळी चूल मांडून झाल्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने हे नेते परत एकत्र येतात. मात्र आपापल्या पक्षाचे विचार राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचारांशी जुळते असल्याचे प्रत्येकजण सांगतात. या जनता परिवाराचा प्रयोग देशाच्या राजकीय पटलावर नवा नाही. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली आणि मोरारजी देसाई यांचे नेतृत्व मान्य करून पंधराच्यावर म्हणजेच जवळपास अडीच डझन पक्ष एकत्र आले होते. परंतु सत्तापिपासू धोरणे आणि परस्परांविरोधातील अहंकार यांमुळे हे तग धरू शकले नाहीत. इंदिरा गांधी सरकारला आव्हान देण्याचा एक छोटासा प्रयत्न यावेळी या जनता परिवारातील नेत्यांनी करून पाहिला होता, त्यामध्ये काँग्रेसमधील काही दिग्गजांनी, जनता परिवाराच्या साथीने महाराष्ट्रात देखील सत्तेच्या नादात पुलोदचा प्रयत्न करून पाहिला. या सर्व घटनांचे राजकीय विश्लेषण करताना या राजकीय पुढार्यांचा सत्तेचा ओढा पुढील काळात वाढताना दिसून आला. नितीशकुमार, मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसाद यादव यांना त्यावेळेपासून पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली. तर जनता परिवाराच्या साथीने काँग्रेसमधील काही नेते मंडळींना आठ खासदारांवरही पंतप्रधान होता येते, असे स्वप्न पडू लागले.
देशाच्या राजकारणात १९८९ साली असाच परत एकदा जनता परिवार एकत्र आल्याचे इतिहास सांगतो. जनता दल, असम गणपरिषद, द्रमुक आणि तेलगु देसम पक्ष यांची मोट बांधत व्ही. पी. सिंगांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मोर्चा अस्तित्वात आला होता. एन्. टी. रामाराव या पक्षांच्या विलिनीकरणाचे संयोजक होते. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मोर्चा अस्तित्वात आला होता. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी यावेळी काँग्रेस नेत्यांनी आणि भाजपने देखील राष्ट्रीय मोर्चास बाहेरून पाठिंबा दर्शविला होता. अवघ्या वर्षाच्या कालावधीत व्ही.पी.सिंग आणि काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावरून पंतप्रधान झालेले चंद्रशेखर असे दोन पंतप्रधान देणारा राष्ट्रीय मोर्चा १९९१  साली पुन्हा एकदा विभक्त झाला.
१९९६ ते १९९८  च्या दरम्यान देशात राजकीय अस्थिरता निर्माण करण्यास जनता परिवारच जबाबदार ठरलातीन पंतप्रधानांमुळे अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली असताना जनता परिवारने देशात अनेक विचित्र निर्णय घेऊन, ते राष्ट्रीय ऐक्य टिकवू शकत नसल्याचे सिद्ध केले. जनता परिवाराच्या एकत्रीकरणाच्या उपकारामधून पंतप्रधान झालेल्या इंद्रकुमार गुजराल यांनी त्यावेळीरॉतर्फे देशाच्या बाहेर चालणार्या सर्व कारवाया थांबवल्या होत्या. १९९६  सालीसंयुक्त मोर्चाअसे नाव पुढे करून एकत्र आलेल्या जनता परिवारामध्ये भाकप, सपा आणि तमिळ मनिला काँग्रेससह एकूण सात पक्ष एकत्र आले होते. संयुक्त मोर्चाचे नेतृत्त्व स्वीकारून व्ही. पी. सिंगांच्या नकारामुळे राज्यसभेवर असलेले एच्.डी.देवेगौडा पंतप्रधान झाले. पण पुन्हा काही कारणास्तव राजकीय उलथापालथ होऊन इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले. परंतु अल्पावधीतच भाजपाच्या वाढत्या शक्तीपुढे आणि काँग्रेसच्या राजकारणामुळे हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करू शकले नाही. त्यानंतर निवडणुका होऊन भाजपचे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर हा जनता पक्षांचा समूह विरोधी पक्ष म्हणून सुद्धा उरलेला नव्हता. ‘जनता परिवारया शब्दावर माथेफोड करणार्या या राजकीय पक्षांना केंद्रात आजवर एकदाही स्थिरता टिकवून ठेवता आलेली नाही. व्ही.पी.सिंग, एच्.डी.देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांची कारकीर्द अल्पायुषी ठरली तर मोरारजीभाईंना त्यांच्या राजकीय ज्येष्ठतेचा योग्य फायदा घेता आला नाही.
इतिहासाची पुनरावृत्ती करत २००९ सालच्या लोकसभा निवडणुकांवेळी एकमेकांपासून वेगळी चूल मांडलेले हे समाजवादी राजकीय संघटक पुन्हा एकदा एकत्र येऊन तिसर्या मोर्चाचे स्वप्न रंगवताना दिसून आले. पण आपापल्या राज्यांपुरते मर्यादित असलेले हे पक्ष, स्वराज्याच्या बाहेर मोर्चासाठी ताकद उभी करू शकल्यामुळे आणि काँग्रेसच्या यूपीए एकच्या कालावधीत मुलायमसिंह, लालू यादव, पासवान यांनी कार्यकाल उपभोगल्यामुळे हा तात्पुरता प्रयोग देखील अयशस्वी होण्यास वेळ लागला नाही. या प्रकारे जनता परिवारातील नेतृत्वांनी आजवर धरसोड केलेली आहे. परंतु यांमधून स्वतःचे अस्तित्व टिकवून कधी काळी जनता परिवारासोबत तात्पुरते मनोमिलन केलेले काही पक्षही आहेत. तामिळनाडू पुरता मर्यादित जयललिता यांचा अण्णा द्रमुक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील चंद्राबाबू नायडू सर्वेसर्वा असणारा देलगू देसम आणि बिजू पटनायक यांच्या आशीर्वादांवर चालणारा ओरिसातील नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल, हे स्वतःचे अस्तित्व आजही स्वतंत्ररीत्या टिकवून आहेत. परंतु उत्तरप्रदेश आणि बिहारमधील हे यादव घराणे, यादवी युद्धात स्वतःचा र्हास कसा करून घेता येईल, याचे नवनवीन प्रयोग करताना आढळून येतो. जनता परिवाराच्या विलिनीकरणाचा खरा फायदा बिहार निवडणुकीच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात नितीशकुमारांना होऊ शकतो. कारण लालू यादवांना निवडणूक लढवण्यास बंदी आहे. परंतु नितीशकुमारांची पंतप्रधानपदाशी मनीषा आणि त्यांचे राजकारण पाहता मुलायमसिंह यादव यांचे नेतृत्व ते मान्य करतील असे वाटत नाही.
भाजप आणि काँग्रेसला तिसरा पर्याय उभा करू असे उभा करू असे छातीठोकपणे सांगत हे सारे पक्ष आज जरी एकत्र आले असले तरी, त्यांनी एक लक्षात ठेवायला हवे की, घडलेला इतिहास हा नेहमीच वर्तमानाचे भविष्य ठरवत असतो, त्यामुळे आजवर जनता परिवारातील पक्ष इतिहासात ज्याप्रकारे वागत आले आहेत, तसे यापुढेही वागणार नाहीत याचा भरवसा देता येत नाही. सत्तेची स्वप्ने पाहणारे हे सारे नेते आणि त्यांच्या रिकाम्या राजकीय डोक्यांना सुचलेला हानवा जनता प्रयोगम्हणजेचमजबूरी का नाम जनता परिवारअसे म्हणता येईल. यांचे सर्वांचे भविष्य येणारा काळच ठरवेल.

No comments:

Post a Comment