Saturday, January 24, 2015

पाहुण्यांचा पाहुणचार... ओबामा येणार, सुरक्षा व्यवस्थेची व्यवस्था

भारतासारख्या प्रजासत्ताक राष्ट्राची प्रजासत्ताक धोरणे पाहण्यासाठी म्हणा अथवा भारतातील अमेरिकन गुंतवणुकीला पाठबळ देण्यासाठी म्हणा. पण भारताच्या इतिहासात प्रथमच एक अमेरिकी राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहत आहेत. त्या दृष्टीने गृहमंत्रालयाने देखील सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त केलेला दिसून येतो.
            आजवरच्या इतिहासात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवण्यासाठी अनेक दिग्गज राष्ट्रप्रमुखांनी उपस्थिती लावली आहे. परंतु यावेळी प्रथमच भारतातर्फे आमंत्रण पाठवण्यात आले आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी ते स्वीकारले देखील. ओबामा येतायत...!
            २६ मे रोजी क्रांती झाली म्हणतात. भारतासारख्या लोकशाहीवादी राष्ट्रामध्ये सत्तांतर झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. हा हा म्हणता त्यांनी मागील सहा महिन्यांपासून अंतर्गत व्यवस्थेबरोबरच आंतरराष्ट्रीय संबंध, सलोखा वृद्धिंगत करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे, त्याचे फलस्वरूप आपणास विसरून चालणार नाही. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया वारीमधून पंतप्रधानांनी बरेच काही पदरी पाडून घेतले. भारताचा वाढता प्रभाव त्यामुळेच शेजारील राष्ट्रांच्या पचनी पडत नाहीये, हे यावरून आपणांस स्पष्ट होते. असो. ओबामा येतायत, तयारी तर व्हायला हवी...!
            आजवरचा विचार केला तर भारत-अमेरिकेचे संबंध एवढे काही विशेष जवळकीचे नाहीत. परंतु अचानक यामध्ये बदल झालाच कसा? ओबामा यायला तयार झालेच कसे? पंतप्रधानांनी त्यांना असे काय सांगितले असावे, जेणे करून ओबामा यायला तयार झाले? भारतासारखी बाजारपेठ, वाढती लोकसंख्या, नुकतेच बदललेले सरकार, एफ्डीआय्ला अनुकुल असणे तसेच भविष्यात भारताचा वाढणारा प्रभाव या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन ओबामांनी येण्यास होकार दिला असावा. यावेळी भारतअमेरिकेदरम्यान अनेक मुद्द्यांवर देखील चर्चा होऊ शकते. जागतिक व्यवहारातील दोन्ही देशांचा सामाईक दृष्टिकोन. झपाट्याने बदलणाऱ्या जगाकडे पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन अमेरिका कशी हाताळतेय हेच यामधून दिसून येईल.
            ओबामा संपुआ सरकारच्या काळात देखील भारत भेटीवर आले होते. त्यावेळची भेट ही काही हितसंबंध वाढवण्यासाठी नव्हती. परंतु मुंबई-दिल्ली-आग्रा अशी ऐतिहासिक स्थळे फिरून ओबामांनी त्यावेळी भारतीय संसदेच्या विशेष अधिवेशन सभेस देखील संबोधित केले होते.
            हा असतो खऱ्या लोकशाहीचा प्रभाव. भारतीय लोकशाहीचा...! ओबामा, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर २६ जानेवारी रोजी येणार, हे डिसेंबर २०१४ मध्येच जगजाहीर झाले.
            भारताने आमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले. मग नवाज शरिफांना फोनाफोनी झाली, असे बरेच काही ऐकिवात होते. अमेरिकन सुरक्षा सचिव भारतातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी व्हायब्रंट गुजरातपरिषदेच्या नावाखाली भारत दौरा करून गेले. परत जाते वेळी व्हाया पाकिस्तान? भारत-पाकिस्तान संबंध ताणलेले असतात. सदैव...! अमेरिकी राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर येतायत. त्या दृष्टीने जॉन केरी यांची धावती पाकिस्तान भेट. नंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला आर्थिक मदत याचा अर्थ तो काय लावायचा? नक्की ओबामा भारत भेटीवर येतायत ते भारतासाठी की आणखी काहीतरी गौडबंगाल उकरून काढण्यासाठी? जम्मू-काश्मीर सीमेलगत मागील एक महिन्यापासून सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरूच आहे. रक्षामंत्रालय आणि गृहमंत्रालयाकडून सुरक्षेचे सर्व नियम  पाळण्यात येत आहेत. शेवटी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पाहुणे असल्याकारणाने दिल्लीतील गल्ली-गल्लीवर सीसीटीव्ही नजर ठेवून आहेत. त्या अमेरिकेची स्वतःची व्यवस्थाही ओबामांना सुरक्षा पुरवणार आहे. हा सारा खटाटोप भारतातर्फे चालवला जातोय की अमेरिकेतर्फे हा चर्चेचा मुद्दा असला तरी पाहुण्यांच्या पाहुणचारामध्ये तिळमात्र कमतरता पडणार नाही, याची खात्री पटत आहे.
            भारतासारख्या विकसनशील राष्ट्राच्या खुल्या बाजारपेठेचे धनी होण्यासाठी ओबामा येत असतील; अथवा आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही. (पाकिस्तानला छुपी मदत करतात, ते चालते) असे दहशतवादी संघटनांना दाखवून देण्यासाठी येत असतील. पण २६ जानेवारी रोजी रंगणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या रंगारंग सोहळ्यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या शेजारी बसून समोरचा नेत्रदीपक नजारा पाहताना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे डोळ दिपणार आहेत, हे नक्कीच. विविधतेत एकता असलेल्या भारतीय संस्कृतीचे त्यांना यावेळी नक्की दर्शन होईल. भारतीय बनावटीचे संरक्षण साहित्य, विविध राज्यांमधील लोकनृत्ये, बालकलाकार, वास्तुशिल्पांचे नमुने तसेच भारतीय लष्करी जवानांची मानवंदना यांचा नजराणा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना संचलनावेळी अनुभवता येणार आहे. यामधून भारताच्या विशाल लोकशाहीचे दर्शन नक्कीच घडेल.
            खरे तर भारतासाठी ही सन्मानाची बाब आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा राष्ट्रप्रमुख भारतीय प्रजासत्ताक दिनी प्रथमच प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. परंतु या उपस्थितीबद्दल प्रसारमाध्यमांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यात ओबामा आल्याची फलश्रुती काय, हे भारतीय जनतेने ठरवायला हवे, भारत सरकारने ठरवायला हवे, अमेरिकेने भविष्यातील हितसंबंध जोपासण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
            नुसतेच असे नको व्हायला की, भारतीय संस्कृती म्हणतेअतिथी देवो भवम्हणून पाहुणा आला रे आला... पाहुणा आला रे आला... अन् गेलाही...!
          या वर्षीचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आवर्जून उपस्थित राहणार आहेत. यामागे काहीतरी विशेष कारण नक्कीच असले पाहिजे. त्या दृष्टीने भारत सरकारने सुरक्षेचा देखील चोख बंदोबस्त केला आहे.


                                                                                       - नागेश कुलकर्णी. 

No comments:

Post a Comment