Thursday, July 2, 2015

‘ललित’ टिवटिवाट

ललित मोदींनी काही दिवसांपासून ट्विटरवर जो काही टिवटिवाट सुरू केला आहे, त्यामुळे प्रसारमाध्यमांना चर्चेची गुर्हाळे उपलब्ध झाली असली तरी, सरकार अणि माध्यमे देखील मुख्य मुद्द्यापासून भरकटली आहेत असे दिसते. आय्पीएल्चे सर्वेसर्वा असताना त्यांनी जो काही घोटाळा केला, तो लपवण्यासाठी म्हणा अथवा कारवाईस प्रत्यक्ष सामोरे न जाता सर्वांना खेळवत ठेवण्यासाठी म्हणा, ललित मोदींचा हा ललित टिवटिवाट सुरू असल्यागत वाटते. कारण एखाद्या वेळी आपणास त्यांना समजावून सांगता आले नाही तर त्यांना गोंधळात टाकणे, कधीही फायद्याचे ठरते, हीच रणनीती बहुधा मोदी अवलंबीत असावेत आणि त्याला आपले हे टीआर्पीवाले (प्रसारमाध्यमे) बळी पडत आहेत.
ललित मोदींनी भ्रष्टाचार केला, हे उघड असताना ते त्यावेळी देशाबाहेर निसटून जाऊच कसे शकले? सरकार भाजपचे होते अथवा काँग्रेसचे हा येथे मुद्दाच नाही. एखाद्या व्यक्तीस गुन्हेगार असताना देखील देशाबाहेर जाण्याची मुभा कशी काय मिळू शकते? आपल्या देशाच्या न्यायसंस्थेत असे खटले जलदगतीने एखाद्या सेलिब्रिटीला जामीन मिळवून देण्यासाठीच चालवले जाऊ शकतात. सलमान खानला जामीन मिळवण्यासाठी 48 तासांचा देखील अवधी लागला नाही. तेच ललित मोदी (आय्पीएल् घोटाळा) प्रकरणाच्या चौकशीचे गुर्हाळ आज देखील सुरू आहे. आपल्याकडे इतर वेळी सरकारी कार्यालयांमध्ये गेल्यास एकच प्रकार पहावयास मिळतो, (येथे फक्त कागदी घोडे नाचवले जातात). भ्रष्टाचारी राजकारणी, मोठमोठ्या सेलिब्रिटींना आपल्यापरीने सरकार चालवण्याची जणू सवयच लागलेली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री असताना वसुंधराराजे शिंदे यांनी ललित मोदींना बाहेर जाण्यास मदत केली किंवा परराष्ट्रमंत्री या नात्याने सुषमा स्वराज यांनी आपले अधिकार वापरून मोदींना (ललित मोदींना) ब्रिटन सरकारकरवी बाहेरदेशी जाण्याचा व्हिसा मिळवून दिला! किंवा मोदी यांच्या कॅन्सरग्रस्त पत्नीच्या उपचारासाठी हा व्हिसा मंजूर करण्यात आला होता. या बाबी अशा अचानकपणे प्रसारमाध्यमांच्या नजरेत कशा काय आल्या? असा भ्रष्टाचार करायचाच असता तर या सर्व गोष्टी यांनी एवढ्या सहजासहजी उघड होऊ दिल्या असत्या का? हा सर्व प्रकार कितपत खरा आणि कितपत खोटा, किंवा कोण्या विरोधकाने सोडलेली ही पुडी असावी; किंवा मग ललित मोदी आणि राजे-स्वराज यांमध्ये काहीतरी बिनसले असावे म्हणून हा प्रकार उजेडात आला. परंतु जनतेने येथे खरे तर मनापासून प्रशंसा करायला हवी तीललित टिवटिवाटकरणार्या ललित मोदी यांची, कारण भ्रष्टाचार करून देखील बेशरमसारखे याला भेटलो, त्याला भेटलो, याने असे केले, त्याने तसे केले, असे ट्विटरवर सांगत फिरत आहेत. स्वतःवरील आरोप लपविण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्वतंत्र नागरिकच्या मागील अंकात ज्येष्ठ भाऊ तोरसेकर यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचवली. 1960 च्या दशकात तेजा नामक एका बड्या उद्योगपतीचे संबंध इंदिरा गांधी आणि नेहरू यांच्याशी होते. तेजाने स्वतःच्या ओळखीच्या बळावर राजीव गांधींना परदेशातील कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून दिली होती. त्या बदल्यात नेहरू-इंदिरांनी त्याला देशातील उद्योगांचे काही कॉन्ट्रॅक्टस् पुरवले होते. हा सारा प्रकार तर भ्रष्टाचाराचाच झाला! ललित मोदी-सुषमा स्वराज यांच्या बाबतीत हाच प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. आता हा भ्रष्टाचार आहे की नाही, हे कसे ठरवायचे इथपासून चर्चेला उधाण आहे. त्यात भर म्हणून श्रीमान ललित मोदी यांची टिवटिव करणारी ट्विटरवरील चिमणी, शशी थरूर, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वद्रा यांची देखील नावे घेऊन बसली. या सर्व ट्विट्समधून साध्य काय होईल हे ललित मोदी यांनाच माहीत, परंतु सध्या तरी जनतेमध्ये प्रसारमाध्यमांकरवी जो काही संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूलाच राहतो आहे, असे वाटते. ललित मोदी यांची ही टिवटिव अशीच सुरू राहिली तर, देशातील प्रत्येक नागरिकास वाटू लागेल, कीमला सोडून ललित मोदी देशातील इतर सर्वांना भेटला असावा’.
या प्रकरणात ललित मोदींनी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही भेटलो, असे म्हटले आहे. या भेटीगाठीमधून आणि नंतर उघड असे ट्विट करून ते काय साध्य करू इच्छित आहेत, हे मात्र स्पष्ट केेलेले नाही. वसुंधराराजे शिंदे आणि सुषमा स्वराज यांनी आपल्या पदाचा नैतिकच्या आधारावर तपास जोवर पूर्ण होत नाही तोवर राजीनामा द्यावा किंवा द्यायला हवा, यावर देखील माध्यमे अफलातून चर्चा करत आहेत. त्यावर माध्यमांमधूनच एके काळचे भाजपचे भीष्माचार्य आणि आजकाल वयाची पंचाहत्तरी ओलांडली असल्याकारणाने पक्षाकडून ब्रेन डेड म्हणून बाजूला सारल्या गेलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी देखील स्वराज यांना, भविष्यातभाजपाचे स्वराजटिकवून ठेवायचे असेल तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा असा फुकटचा सल्ला दिला. यामध्ये चूक काहीच नाही. एक मार्गदर्शक म्हणून अडवाणींनी योग्य सल्ला दिला. परंतु येथे अशी चिखलफेक झाल्यास प्रत्येकानेच राजीनामा देत गेल्यास सरकार कोण चालवणार? उद्या उठून हे ललित मोदी पंतप्रधानांना पण भेटलो असे ट्विट करतील! मग काय करणार? असो.
ललित मोदी यांच्या ट्विट्समध्ये भलेही काही तथ्य असेल, परंतु अशा प्रकारे उघडपणे सोशल मीडियावरून एखाद्या बाबतीत एखाद्या आरोपीने गवगवा करणे, कितपत योग्य आहे, या प्रकरणाची खरेच शहानिशा व्हायला हवी. राजकारण्यांच्या या आदळआपटीमुळे क्रिकेट खेळाच्या रंगाचा बेरंग होत असताना, एखाद्या भ्रष्टाचार्याने भारतीय क्रिकेट टीममधील सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा तसेच वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो यांचे बुकींशी संबंध असल्याचे ट्विट केले तर? अशा वेळी खरे तर ब्रिटनमध्ये जाऊन या मोदी महाशयांना भारत सरकारने हातामध्ये बेड्या ठोकून पकडून आणायला हवे. कारण उद्या ते क्रिकेट कॅप्टन महेंद्रसिंग धोनी अथवा अन्य कोणा खेळाडूला देखील या चौकशीच्या घेर्यात घेण्यास पुढेमागे पाहणार नाहीत. तसेही चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंचा आय्पीएल् स्पॉटफिक्सिंगमध्ये हात असल्याचा संशय आहेच, त्यामुळे ललित मोदी येथेही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या महाशयांची हद्द म्हणजे हे रॉबर्ट वद्रा आणि प्रियंका गांधींना कोणत्या संदर्भात भेटले असतील आणि त्यांच्याही भेटीचे ट्विट का बरे केले असेल?

सध्या तरी ललित मोदी यांच्या ललित टिवटिवाचे गौडबंगाल एका भल्यामोठ्या गुलदस्त्यात आहे. येथे केवळ आणि केवळ प्रसारमाध्यमांना दुपारची आणि संध्याकाळची चर्चासत्रे आयोजित करण्यास नवा विषय मोदींनी मिळवून दिला आहे. शेवटी एवढा टिवटिवाट केल्यानंतर चर्चा तर होणारच!

No comments:

Post a Comment