Sunday, May 3, 2015

‘गजेंद्र’ राजकारण

                        संसद भवनापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या जंतर मंतर मैदानावर आम आदमी पक्षातर्फे शेतकऱ्यांसाठी घेतल्या गेलेल्या सभेत एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त सर्व प्रसारमाध्यमांनी अगदी ब्रेकिंग न्यूजच्या थाटात देशाच्या कानाकोपऱ्यात पसरवले. अगदीच आत्महत्या झाल्याच्या क्षणाचे छायाचित्रण पण दाखवले गेले. यावरून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, ही अखेर आत्महत्या होती की, राजकीय स्टंटबाजी करण्याच्या उद्देशाने केलेला प्रयोग अयशस्वी होतो आहे याचे प्रतीक होते. परंतु यामुळे मात्र देशातील शेतकरी वर्गातील विचारवंतांच्या काळजाचा ठोका मात्र नक्कीच चुकला आहे.

            भारत हा शेतीप्रधान देश आहे अन् बळीराजा हा शेतीचा कर्ताधर्ता, लाखोंचा पोशिंदा म्हणवला जातो. या शेतकरी वर्गावर अशी वेळ येण्यामागे आजवरची राबवली गेलेली सरकारी धोरणे एकपक्षी कारणीभूत आहेत, असे म्हणता येईल का? हरितक्रांतीनंतरचा सुधारत चाललेला देश आणि त्यानंतर बदलत चाललेली देशातील शेतीची परिस्थिती यामुळे मधला काही काळ शेतकरी वर्ग नक्कीच सुखावला गेला होता. परंतु काही प्रमाणात सरकारी धोरणांत गफलत झाल्याचे दिसून येते, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी, मजूर, बेरोजगार होऊ लागले अन् मागील पाच वर्षांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. संसदेमध्ये चर्चेवेळी भाजप खासदार हुकुमदेव यादव यांनी शेतकऱ्यांच्या अवस्थेला मागील ६० वर्षे देशावर राज्य करणारी काँग्रेस सरकारे असल्याचे म्हटले आहे. एक प्रकारे हे खरेही असेल, हुकुमदेव यादवांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस सरकारच्या कालावधीत जमीनदारी जाऊन शेतकऱ्यांच्या हाती शेती आली पुढे चालून याच शेतकऱ्यांना शेतीतील अपुऱ्या सुविधांमुळे शेतीला परवडणे अवघड होऊन बसले, त्यामुळे लोक शेती विकून शेतमजूर झाले हे काँग्रेसचे देणे
            भाजपने असे केले, काँग्रेसने तसे केले असे ओरडत बसण्याची ही वेळ नाही. यापुढे काय करायला हवे, यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय निर्णय घेतले जावेत. परंतु या राजकीय पक्षांना त्यांच्या राजकीय निष्ठेपुढे आणि सत्तेपुढे हे कधी सुचणार. त्यात अरेरावीखोर माध्यमे सरकार विरोधी कामे करण्यास तत्पर असतातच. नवख्या आम आदमी पक्षाने देखील एवढ्या खालच्या थराचे राजकारण करावे? त्याला काय म्हणावे. (जर केले असेल तर) त्यांनी राजकारण करून एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणे अथवा आत्महत्या करण्याची स्टंटबाजी करायची होती. परंतु अनवधानाने त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवला. हे निव्वळ निषेधार्ह आहे. अशाने तुम्ही राजकारण कराल अथवा समाजकारणही कराल. परंतु सत्तेच्या बाजारात लोकशाहीचा जो मजाक लावला आहे, त्याबद्दल स्वतःला समाधानी कधीच म्हणवू शकणार नाही.
            गजेंद्र. गजेंद्र सिंह. मूळचा राजस्थानातील असलेला हा शेतकरीआपचा कार्यकर्ता होण्याआधी भाजप आणि समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता होता. त्या शेतकऱ्यास निवडणूक लढवायची होती आणि जंतरमंतरवरील सभेच्या आधी मागील काही दिवसांत तो मनिष सिसोदिया यांच्या संपर्कातही असल्याचे पोलिसांकडून सादर केलेल्या प्रथमदर्शनी अहवालात म्हटले आहे. या शेतकऱ्याने खरेच गळफास लावून घेण्यासाठी हे सारे केले की त्याला स्टंटबाजी करायची होती पण अनवधानाने भलतेच होऊन बसले. स्टंटबाजी करायची होती तर या साऱ्यामागील खरा सूत्रधार कोण? आप? भाजप? की काँग्रेस? कोणीही असो. पण गजेंद्रत्यांच्या जीवाला मुकले. आत्महत्येनंतर त्यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये बरेच काही लिहून ठेवले होते. सारे काही पूर्वनियोजित असल्यासारखे वाटत होते. परंतु पोलिसांकडून विचारपूस केली असता त्या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्या शेतकऱ्याचे नसल्याचे समजले. यास त्या शेतकऱ्याच्या मुलीने आणि भावाने दुजोरा दिल्याचे प्रसारमाध्यमांमधूनच बोलले जात आहे. तर एका नामांकित वृत्तवाहिनीवर चालत असलेल्या एका चर्चेच्या गुऱ्हाळावेळीआपचे नेते आशुतोष यांना त्यांचे रडणे रोखता आल्याचे प्रसार माध्यमांवरून दाखवण्यात आले. आशुतोष धाय मोकलून रडले. त्यांनी काँग्रेस आणि भाजपने यामागे राजकारण चालवल्याचा आरोप केला. तर भाजपने आणि काँग्रेसने आपला धारेवर धरले आहे. यामध्ये मूळ मुद्दाच बाजूला गेल्याचे दिसून आले, आणि यामध्ये हद्दच पार करत त्या वृत्तवाहिनीने, प्रसिद्धीसाठी त्या शेतकऱ्याच्या मुलीला चर्चेसाठी बोलावले होते. (किती हा मूर्खपणा?) येथे शेतकरी आत्महत्या भूमी अधिग्रहण आणि शेतीसंबंधी मुद्दे बाजूला ठेवत, इतर घोडा बाजार, सत्ताकरण दिसून येते. अशाने देश प्रगती करू शकेल?

            राजकारण्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा या घटनेमधून धडा घेत पुढील नियोजन ठरवायला हवे. देशाला अशा खालच्या थराच्या राजकारणाचा वीट आलेला आहे. खरेतर आप आणि काँग्रेसकडून सरकारविरोधी राजकारण होणे अपेक्षित होते, परंतु भूमी अधिग्रहणावरून झालेले हे राजकारण पंतप्रधानांच्या देखील जिव्हारी लागल्याचे दिसून आले. लोकसभेमध्ये बोलताना पंतप्रधानांनी सर्व पक्षीय शोकसंदेश सादर करताना, गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तर यावेळी यावर देखील राजकारण करत गजेंद्र सिंह यांचे स्मारक व्हावे, अशा प्रकारच्या विचित्र मागण्या आम आदमी पक्षाकडून केल्या गेल्या. याला नक्कीच संवेदनशील राजकारण म्हणता येणार नाही. राजकारण करण्यात तरबेज असणाऱ्या काँग्रेस, भाजपसारख्या पक्षांनी देखील असा विचार केला नसेल, जो विचार राजकारणात नुकतेच बाळ असलेल्या आम आदमीने ही स्टंटबाजी करण्याच्या प्रयत्नात करताना भलतेच होऊन बसले. त्यात भरीस भर म्हणून विचित्रपणाचे टोक गाठलेला प्रसारमाध्यमांचा छिद्रान्वेषी समूह, या आत्महत्येच्या प्रयत्नाचे प्रत्यक्ष चित्रण करून, टीआर्पीसाठी त्या जीवाला वाचवण्याचा कोठूनच प्रयत्न झाल्याचे दिल्ली पोलिसांच्या, आणि आम आदमी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले, त्यावर नंतर एकमेकांवर आगपाखड सुरू झाली. परंतु हा सारा थरार घडत असताना आम आदमीतर्फे सुरू असलेली सभा मात्र थांबविली गेली नाही. अगदी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल देखील बराच वेळ बोलत राहिले! मग प्रश्न पडतोय, ही खरेच आत्महत्या होती की स्टंटबाजी करण्याच्या उद्देशाने चालवलेला राडा होता. (जर आप यामध्ये सहभागी असेल तर) चर्चेदरम्यान आत्महत्या करणारी ही व्यक्ती शेतकरी होती की नाही येथपासून स्टंटबाजी होती, येथपर्यंत अखेर तर्कवितर्क लढवले गेले. सत्तेच्या छायेखाली आणि आरोपप्रत्यारोपात त्या निष्पाप म्हणा अथवा स्टंट करावयास गेलेल्या एका जिवाचा हाकनाक जीव मात्र यावेळी गेला.
            काही राजकारणी असे असतात तर काही माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यासारखे असतात. शास्त्रीजींनी १९६६ साली देशातील जनतेला (त्यावेळी तर या वेळेपेक्षा अधिक शेतकरी होते) आठवड्यातून एक वेळ उपवास करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या विनंतीस मान देऊन, नागरिकांनी उपवास करणे पसंत करून त्यांचा मान राखला. परंतु आजकालचे राजकारणी काय राजकारण करतायत हे प्रत्यक्षदर्शी आहेच. त्यात स्टंटबाजी आणि इतर गोष्टींमुळे जनतेपर्यंत कोणत्या प्रकारचा संदेश पोचवला जातोय, यावर प्रसारमाध्यमांनी कटाक्ष टाकायला हवा. फक्त टीआर्पी वाढवून आणि राजकारण्यांचे पाय धुवून शेतीचे प्रश्न सुटणार नाहीत.

आम आदमी पक्षाच्या सभेमध्ये झालेला हा प्रकार, यामागे काहीही राजकारण असो, ती व्यक्ती शेतकरी असो वा नसो, परंतु गेलेल्या त्या व्यक्तीचे जीवन मात्र परत येणार नाही, त्यामुळे चाललेला हा अघळपघळपणा यापुढे तरी या राजकीय पक्षांनी थांबवायला हवा. तसेच आशुतोष यांच्यासारख्या विचारवंताने प्रसारमाध्यमांसमोर एक मुलगी- जिचे वडील आत्महत्या करून वारले, त्यामुळे ती रडतेय, तर तिला पाहून त्यांना रडू कोसळले. जेव्हा देशातील लाखो शेतकऱ्यांचे कुटुंबीय अशा प्रकारे प्रसारमाध्यमांच्या समोर उभे केल्यास या नेत्यांचे काय होईल, याचा विचार व्हायला हवा. सरकारने आणि सरकारच्या विरोधकांनी (माध्यमांसहित) अशा जबाबदारीस सामोरे जाण्याची धारणा करायला हवी.

No comments:

Post a Comment