Friday, May 8, 2015

राजकीय राहुल

         
   राहुल. राहुल या शब्दाचा विविध भाषांमध्ये आणि विविध धर्मांमध्ये वेगवेगळा अर्थ निघतो.उपनिषदांमध्ये राहुल म्हणजे सर्व प्रजेची दुःखे नष्ट करणारा, बौद्ध धर्मामध्ये राहुल म्हणजे बंधन(Bondage), तर अरेबिकमध्ये याचा अर्थ होतो भटकंती करणारा प्रवासी. काँग्रेसचे भावी अध्यक्ष व सध्याचे युवराज राहुल गांधी यांच्या नावाचा अर्थ काय निघतो, हे त्यांनाच ठाऊक. बहुधा अरेबिक शब्दावरून त्यांनी अर्थ काढलेला असावा. उपनिषदांमधील अर्थ त्यांना मान्य नसणार, कारण काँग्रेस हा धर्मनिरपेक्षितांचा पक्ष आहे. त्यामुळे कदाचित अरेबिक अर्थ मान्य असेल.

            २०१४ साली नवीन सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस पक्षात एक प्रकारची मरगळ आली होती. जणु काही सारे संपलेच, अशा प्रकारे काँग्रेसने गाशा गुंडाळला होता. परंतु मागील दहा महिन्यांपासून संसदेच्या एका कोपर्यात बसलेला हा सर्वांत मोठा विरोधी पक्ष काल परवा अचानक जागा झाला. कारण काय? तर राहुल गांधी सुट्टीवरून परत आले म्हणे, ते तारणार यापुढे देशातील शेतकरी वर्गास. एका राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख नेता. भविष्यात पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारी व्यक्ती म्हणून ओळख असलेले राहुल गांधी अचानक ५६ दिवसांसाठी गायब झाले. परत आले ते धडाक्यात कामाला लागले. जनतेचे दुःख हे त्यांना त्यांचे दुःख वाटू लागले. शेतकर्यांच्या घरी जाऊन राहणे, गावोगाव पदयात्रा काढणे, याचा धडाका त्यांनी लावला. हे केवळ ५६ दिवसांच्या अज्ञातवासाने घडले? कोणी म्हणे त्यांनी विपश्यना केली. तर कोणी म्हणते थायलंडवारी करून आले. परंतु एका राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याने असे वागणे योग्य आहे का? एवढे दिवस देशाबाहेर राहून देशाचे प्रश्न यांना कसे काय समजले हो? संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हे अनुपस्थित होते. देशात गारांसह पाऊस पडला तेव्हाही अनुपस्थित होते, आणि आता बरा सरकारविरोधी सूर लावत शेतकर्यांचा कैवार घेत फिरत आहेत. सत्तेत असताना मागील १० वर्षांत शेतकरी हिताचे काही केले असते तर आज ही वेळ आली नसती. यामध्ये संपूर्ण दोष राहुल यांचा नाही. कारण ते अजूनही लहान आहेत. परंतु यूपीए सरकारच्या काळात शेतकरीविषयक, शेतीविषयक अनेक धोरणे राबविली गेली; जी मलमपट्टी करणारी, फक्त काडीचा आधार देणारी होती. त्यावर ठोस असा एखादा उपाय केला असता तर शेती आणि शेतकर्यांना आज हे दिवस आले नसते. नैसर्गिक आपत्तींचा आपण एका मर्यादेपलीकडे सामना करू शकत नाही, अथवा त्यांना रोखूही शकत नाही. शेतकर्यांना कर्जमाफी देऊन अथवा पुढच्या वेळी कर्ज देऊन शेतकरी आत्महत्या थांबल्या असे आजवर कधीच झालेले नाही. काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात शेतकर्यांसाठी तात्पुरत्या फायदेशीर योजना लागू केल्या. जर ठोस उपाययोजना करून शेतकर्यांस आर्थिक पाठबळ मिळवून दिले असते तर अनेक प्रश्न सुटू शकले असते.
            नैसर्गिक आपत्तीनंतर अनेक शेतांमधील पीक नष्ट झाल्यामुळे राहुल यांनी सरकारने शेतकर्यांना आर्थिक मदत करावी असे सुचवले. परंतु अशी वेळोवेळी मदत करत बसण्यापेक्षा शेतकर्यांना जर इतर जोडधंद्यांची साथ मिळवून दिली तर आर्थिक संकल्पीय अधिवेशन सुरू असताना सरकारने अशा योजनांमध्ये पुढाकार घेतलेला दिसतो. सॉईल हेल्थ कार्ड, मुद्रा बँक यामुळे शेतकरी वर्ग सधन होणार आहे. काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये बोलतेवेळी भाजप खासदार हुकुमदेव यादव यांनी काँग्रेस सरकारच्या अपयशी योजनांचा पाढा संसदेमध्ये वाचला. ज्यावेळी राहुल गांधी सुट्ट्या घेऊन (अज्ञातवासात) मजा करत होते, त्यावेळी हुकुमदेव यादव म्हणाले, आम्ही मनरेगा योजना दिली, याचे कौतुक काँग्रेस सदैव करत असते, परंतु मनरेगाने शेतकर्यांच्या हाताला मजुरी दिली, त्यांना मजूर केले, त्यांना शेतकरी म्हणून गर्वाने जगायला शिकवले नाही.
राहुल गांधींच्या पूर्वजांनी कधी शेती केली होती का? हे माहीत नाही. परंतु यांना ५६ दिवस अज्ञातवासात राहून बरेच काही कळायला लागल्याचे अवसान काँग्रेसला सध्या चढले आहे. काँग्रेस पक्षाच्या इतिहासाचा आधार घेत, १९७७ साली सत्तांतर झाल्यानंतर इंदिराजींनी परत सत्ता हस्तगत करण्यासाठी देशभ्रमंतीचा जो सपाटा लावला होता, त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल ठेवत संसदेत एकेकाळी झोपा काढणारे राहुल गांधी आज राज्या-राज्यांमधून फिरत आहेत. हा त्यांचा स्वतःचा विचार नक्कीच नसावा. कारण २६  जानेवारी रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा देशात आले असता, त्यांना भेटण्यास ऐनवेळी नकार देऊन सोनिया गांधींना पाठवणारे राहुल, राज्यांमधून पदयात्रा काढणे शक्य नाही. यामागे काँग्रेसजनांना त्यांचे पुढील राजकीय भविष्य शोधायचे आहे, आणि त्यासाठी त्यांना सध्या घराण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे एप्रिल-मे च्या तळपत्या उन्हामध्ये काँग्रेसजन आपल्या युवराजांसह गावोगावी, दारोदारी भटकत आहेत. पंजाब, विदर्भ, तेलंगण या भागातील शेतकर्यांचा व्यथा  जाणून घेण्याचा प्रयत्न युवराजांनी केला खरा, परंतु मागील वेळी विदर्भात ते ज्या कलावती नामक स्त्रीच्या घरी एक रात्र राहिले होते, तिचे प्रश्न समजून घेतले होते? तिची परिस्थिती अजूनही जैसे थेच आहे. काहीच बदल नाही. मग? या राजकीय भटकंतीचा उपयोग काय?
            पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश यात्रेवरून परत आल्यानंतर, राहुल यांनी त्यांना सल्ला दिला की, आलाच आहात, तर देशातील शेतकर्यांना भेटून या! हे किती हास्यास्पद विधान आहे! पंतप्रधान देशाचा प्रतिनिधी म्हणून परदेशात गेले होते, सुट्टीतील मजा अनुभवायला नव्हे. राहुल यांचे डावपेच त्यांच्या सहकार्यांसोबत त्यांना केदारनाथाच्या दर्शनास देखील घेऊन गेले. अशा वेळी प्रसारमाध्यमे अगदी खंबीरपणे राहुल यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गाताना दिसून आली. ही केवळ राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीने चालवलेली उठाठेव असल्याचे दिसून येते. त्यांनी रेल्वेमधून प्रवास करत पंजाब गाठले. तेथील शेतकरी (काँग्रेसचे काही नेते) मंडळींशी संवाद साधला आणि परत संसदेत येऊन, पंजाबातील माहिती देऊ लागले. राहुल यांच्याकडून मिळालेली माहिती आणि संसदेसमोर त्यांनी मांडलेली माहिती अर्धवट असल्याचे यावेळी दिसून आले. पंजाबातील अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी त्यांचे पितळ उघडे पाडले. तसेच भूमी अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून देखील राहुल यांच्या रूपात एक प्रमुख राजकीय नेता विरोधक म्हणून उभा करण्याचा चाललेला प्रयत्न देखील काहीसा वेगळ्या मार्गाने जातो असेच वाटते. कारण शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, परत आत्महत्या, सूटबूटवाल्यांचे वाढलेले प्रस्थ हे काँग्रेसच्या मागील सरकारच्या कार्यकाळात उद्भवलेले प्रश्न आहेत. परंतु राहुल गांधींच्या नेतृत्व गुणांनीच हे प्रश्न उपस्थित करून भाजप सरकारच्या मागील १० महिन्यांच्या कारभाराचे पितळ उघडे पाडल्याचा खोटा आव आणण्याचा प्रयत्न काँग्रेसधार्जिणे करत आहेत. सध्या सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी कसा का असेना, परंतु एखाद्या सक्षम विरोधकाची गरज आहे. कारण सत्तेसमोर शहाणपण चालत नाही आणि सत्ता गेल्याखेरीज शहाणपण येत नाही. या दोन्ही बाजू राहुल यांच्या, राजकीय राहुलगिरीमुळे पुढे येतील. कारण सत्तेवर असलेल्या एखाद्या राजकीय पक्षास प्रबळ विरोधक नसेल, तर लोकशाहीमध्ये देखील सत्तेवर असणारे सत्ता डोक्यात गेल्यागत वागू लागतात आणि नाही नाही म्हणता, पहिले पाढे पंचावन्न होऊन बसतात.
            तसे पाहता काँग्रेस जनांना राहुल गांधींशिवाय पर्याय नाही. सत्ताधारी पक्ष त्यांच्याबाबत काहीही बोलला असला तरी, राहुल यांनी सध्या तरी डगमगून न जाता, ज्येष्ठ काँगे्रसजनांचा सल्ला घेत (कसा का असेना) पक्षबांधणी करून, एक प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी. त्यामुळे सरकारवर देखील काहीसा अंकुश राहील आणि भविष्यातील युवराजांची स्वप्ने देखील पूर्ण होतील. यासाठी त्यांना बरेचसे परिश्रम करावे लागणार आहेत, हे मात्र नक्की. कारण मोदी लाटेसमोर आजवर भलेभले गडगडले आहेत, तेथे यांना परत स्थानापन्न होण्यासाठी आलेली मरगळ झटकून काही ना काही करत राहणे, हाच उद्योग पुढील चार वर्षे तरी करावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment