Friday, October 2, 2015

उत्सवी उन्माद

प्रति,
गणपती बाप्पा,
            बाप्पा! तुझ्या उत्सवकाळात सर्वांना केवळ धमाल, खूप मज्जा आणि मज्जाच मज्जा या पलिकडे दुसरे काही सुचत नाही. 10 दिवसांच्या तुझ्या वास्तव्यकाळात अनेक मंडळकारी उद्योगींना आयतेच उद्योग मिळतात. ते तुझ्या श्रद्धेपोटी हे सर्व करतायत की स्वतःच्या जीवाची ऐश करवून घेण्यासाठी हेही तेच ठरवत असतात. कर्णकर्कश आवाजी डी.जे. आणि यांचा नाच त्याला कुठे कुठे तळीरामांची साथ, बस्स म्हणजे या उद्योगींच्या भक्तीभावाने त्यावेळी अगदी स्वर्गच जवळ केलेला असतो. आमचं मंडळ मोठ की तुमचं मंडळ मोठं आणि कोणाचा डी.जे. जोराचा आवाज करतो. या स्पर्धेमध्ये बाप्पा तुझ्याकडे दुर्लक्ष करणारे हे मंडळ तुला देखील छोट्या छोट्या तुकड्यांध्ये वाटून घेतात.

..वि.वि.
बाप्पा, पत्रास कारण की,
            तुझे तिकडे सारे काही क्षेम असावे अशी आशा करतो, कारण इकडे काहीच क्षेमकुशल नाही. पुण्यातील गणेशोत्सवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशभर नव्हे तर जगभर गणोशोत्सवांची सुरुवात करण्यात आली होती. बाप्पा! टिळक महाराजांनी जो उद्देश आपल्या डोळ्यांसमोर ठेवून तुला देवळामधून बाहेर काढून रस्त्यांवरती सर्वत्र सार्वजनिक स्वरुपात विराजमान केलं, त्या उद्देशांना आज मूठ माती देत हे उद्योगी मंडळ केवळ भंपकपणा आणि उधळपट्टी करत, या उत्सवाचा उन्मादी नाद सादर करत आहेत. बाप्पा तुझे कान आणि शरीर ठीक असावे, ही तुझ्याच चरणी सदिच्छा, कारण तुझ्या विसर्जनावेळची स्थिती पाहता, तो DJ तो नाच अन ते सर्व काही श्रद्धे पलीकडचे असते. महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे वातावरण आहे, म्हणून काही मंडळे तुझे विसर्जन कृत्रिम हौदामध्ये केले, तर काहींनी अक्षरशः पुण्यातील मुठा नदीपात्रात तुझ्या मूर्तींना नदी पात्रातील शुद्ध पाण्याने शाहीस्नान करविले. नुसताच ढीग साचला होता नदीपात्रात, आणि वरतून इतर मूर्ती विसर्जित करत असताना मूर्ती नदीमध्ये फेकून देण्याचे कामही काही लोक करत होते. बहुधा
बाप्पा तुझ्या अंगाला यावेळी खरचटले देखील असणार!

बाप्पा! पत्रास कारण की,
            स्वच्छ भारताच्या केवळ वल्गना करणार्या आणि रस्ता स्वच्छ करताना किंवा ह्या तशाप्रकारे सेल्फीशीगिरी (सेल्फी काढणार्या) तुझ्या भक्तांनी तुझ्या मूर्तींना गटारातील पाण्याचा रस्ता दाखवला. तसेच पुण्यातील चौकाचौकात कचर्याचे ढिग साचवून रस्त्या-रस्त्यावर कचरा जमवून, चांगलाच गणेशोत्सव साजरा केला. जे पुण्यात झाले तेच मुंबई आणि इतर ठिकाणीही होते. बाप्पा मुंबईचा समुद्रकिनारा कचर्याच्या ढिगांनी खचून भरला होता. यामूधन असा प्रश्न पडतो की, टिळक महाराजांनी जी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली होती, त्या उद्दिष्टांची पूर्तता यावेळी कितपत पूर्ण केली जात आहे. विविध उद्योगीमंडळांकडून जगभरातील स्वतः केलेल्या चुकांचे परिणाम दाखवणारे देखावे, मनुष्याच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करणारे देखावे दाखवले जातात. परंतु होणार्या प्रबोधनातून स्पष्ट होणार्या चिंतेप्रति हे लोक कितपत सजग असतात?

बाप्पा पत्रास कारण की,
            मानाच्या गणपतींच्या मिरवणूकीदरम्यान, बाप्पा- पुण्यातील गल्ली बोळांत तुफान गर्दी असते, पुण्यातील लक्ष्मी रोड ते अलका टॉकिजजवळचा टिळक चौक या परिसरात तर 2 दिवस मिरवणूक चालते म्हणे. बाप्पा! तिथे काही तळीराम तर दिवसभर उच्छाद मांडतात. या सर्व गोष्टी तू मात्र शांतपणे पाहतोस. रस्त्यांवरील चेंगराचेंगरीत लहान मुले, अबालवृद्ध आणि स्त्रियांचे हाल होतात, त्यात उन्हाचा कडाका
सुरू असताना मिरवणुकांधून दुष्काळ आणि तत्समसंबंधी देखावे दाखवले जातात. बाप्पा! तू आगमानावेळी थोडासा पाऊस घेऊन आलास, तसाच जातेवेळीदेखील पाऊस देऊन गेला असतास तर बरे झाले असते.

बाप्पा पत्रास कारण की,
            तुझ्या विसर्जनाच्या दुसरे दिवशी पुण्यातील (विसर्जनाची मिरवणूक तब्बल 28 तास चालली) सकाळी पुण्यातील डेक्कन परिसरात माळवाडीकडून येणारी एक रुग्णवाहिका गरवारे महाविद्यालयाजवळ तब्बल पाऊणतास ताटकळत थांबली होती, कारण पुढे तुझी भली मोठी मिरवणूक सुरू होतीतळीरामांची सकाळी सकाळी डेक्कन कॉर्नरला जत्रा भरली होती. तर एका वृद्ध आजोबांना त्यांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी रिक्षा देखील मिळत नव्हती.
बाप्पा! तुझ्या या मिरवणुकांची खरच गरज आहे का? आणि त्यादिवशी जे पुण्यात झाले ते दृश्य देशात इतर ठिकाणीही झाल्याचे ऐकिवात आहे. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनास व्ही. आय्. पी. रांगेतून जाण्यार्या एका युवतीस तेथील स्थानिक पोलिसांनी भयानक चोप दिल्याचा प्रकार समोर आला. बाप्पा म्हणजे आता तुझे दर्शन घेणे देखील घातक ठरू शकते का?

बाप्पा पत्रास कारण की,
            मी तुझ्या विसर्जन मिरवणुकीवेळी पुणे परिसरातील मूर्ती विसर्जनातील उत्सवी उन्मादाची विदारकता पाहिली. नशेमध्ये धुंद असलेल्या तुझ्या नामधारी भक्तांकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण न होता वेगळीच दृश्ये येथे पहावयास मिळाली, खरं तर लाज वाटली आणि तुझी माफीदेखील मागाविशी वाटली. तुझ्या या उन्मादी उत्सवकाळात आणखी धोका वाढू शकतो, त्यामुळे पुढच्या वर्षी यायचे की नाही याचा तू विचार कर आणि तुझ्या या काही उन्मादी/उद्योगी मंडळांनी तुझ्या उत्सव काळात पर्यावरणाचे रक्षण करून उत्सव साजरा करण्याची शपथ घेतली तरचं तू ये, नाही तर टिळक महाराजांनी ज्या उद्देशाने ही सार्वजनिक उत्सवाची पद्धत रूढ
केली होती, ती सध्या वाहवत जाताना दिसतेच आहे.
तरी, बाप्पा तुझ्या या उन्मादी भक्तांना माफ कर आणि पुढील वर्षीच्या उत्सवात त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत त्यांना मार्गदर्शन कर.

कळावे.

तुझाच एक भक्त.

No comments:

Post a Comment