Monday, October 5, 2015

एका युगाचा अंत

३१ ऑक्टोबर हा इंदिरा गांधींचा स्मृतिदिन. ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांच्या निधनास ३१ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने...
भारताच्या पंतप्रधान, नेहरू कन्या, गूंगी गुडिया, एक जबरदस्त नेतृत्व असे काही शब्द कानावर पडले की आपणास आठवण होते ती श्रीमती इंदिरा गांधी यांची आणि ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी झालेल्या त्यांच्या हत्याकांडाची ; तसेच त्यानंतर सर्वत्र उसळलेल्या शीख विरोधी दंगलींची.

इंदिरा गांधी : एक प्रभावी नेतृत्व
            इंदिराजींचा जन्म १९  नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. नेहरूकन्या असल्याकारणाने त्या लहानपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत्या. नेहरूंच्या मृत्यूनंतर न खचता त्यांनी स्वत:चा राजकीय प्रवास सुरूच ठेवला आणि देशहिताचे अनेक निर्णय अंमलात आणले.
- १९५५  मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या.
- १९६४  साली प्रथमत: केंद्रीय मंत्रीमंडळात निवड.
- तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणीमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
- लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर २४  जानेवारी १९६६  रोजी प्रधानमंत्रिपदी विराजमान.
- १९६९  मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण असो वा पोखरण येथे पहिली अणुचाचणी असो, अशा अनेक घटनांमुळे त्या नेहमी चर्चेत असत.
- १९७७  साली देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला.

ऑपरेशनब्लू स्टारआणि इंदिरा गांधी:
            इंदिराजींनी १९७५ साली देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता, त्यामुळे त्या १९८०  पर्यंत सत्तेपासून दूर होत्या. मात्र १९८०  नंतर झालेल्या निवडणुकांत मतदारांनी त्यांच्यावर परत एकदा विश्वास दाखवला. पण त्यांना यावेळी पंजाबमध्ये सुरू असलेल्या फुटीरतावादी आणि उग्र खलिस्तानवादी शक्तींशी सामना करावा लागला, त्याचवेळी इंदिराजींनीऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला.

पंजाबमधील राजकीय घडामोडींना आलेला वेग :  
इ. स. १९८२ च्या ऑगस्ट महिन्यात अकाली दलाने धर्मयुद्ध मोर्चाची स्थापना केली. अन् दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडियन एअरलाईन्सचे विमान अपहरण करून लाहोरला नेले. पाकिस्तानने विमान उतरवण्यास परवानगी नाकारली म्हणून पुन्हा अमृतसरला पाठवले. तेव्हा अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली.
- २३ एप्रिल १९८३ ला पंजाब पोलिसचे डीआय्जी अवतार सिंह अटवाल हे सुवर्ण मंदिर परिसरात दर्शनासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली.
- जून  ते  ऑगस्ट  १९८३  दरम्यान अकाली दलातर्फे मोठ्या प्रमाणात बंद आणि रेल रोको पुकारण्यात आला.
- दहशतवाद्यांनी डिसेंबर १९८३  मध्ये सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त येथे आश्रय घेतला.
- फेब्रुवारी १९८४ ला प्रीतलारी मासिकाचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार सुमित सिंह शाम्मी यांची हत्या करण्यात आली.
- एप्रिल १९८४ ला अमृतसरमध्ये भारतीय जनता दलाचे प्रमुख हरबन्सलाल खन्ना यांची हत्या झाली.
- याच दरम्यान अकाली दल व केंद्र सरकार यांच्यामध्ये चाललेल्या वाटाघाटी विफल झाल्याने अकाली दलाच्या नेत्यांमधील असंतोष विकोपाला गेला.
- शेवटी इंदिराजी पंतप्रधान असल्याकारणाने केंद्र सरकारने ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय घेतला.

ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई आणि इंदिराजी :
            ३ जून १९८४ पासून भारतीय सेनेने सुवर्ण मंदिर परिसरात कारवाई सुरू केली होती. मंदिर परिसरातील इतर इमारतींचा ताबा घेऊन त्यावर मशीनगन्स बसवल्या गेल्या. ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालीन मेजर जनरल कुलदीप सिंह ब्रार हे करत होते.
मुख्यत: जर्नेल सिंह आणि त्यांचे साथीदार अकाल तख्त या अतिशय महत्त्वाच्या भागात लपून बसलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. जर्नेल सिंहाचे सशस्त्र समर्थक व इतर दहशतवादी दलांचे नेतृत्व तिथे शाबेग सिंह हे करत होते. (शाबेग सिंह हे पूर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते, १९७१ च्या भारत पाक युद्धात त्यांनी बांग्लादेशमधील मुक्तिवाहिनीच्या सभासद सदस्यांना प्रशिक्षित केलेले होते.)
            इंदिराजींच्या आदेशानुसारऑपरेशन ब्लू स्टारआखून भारतीय सैन्याने सुवर्णमंदिरामध्ये घुसून जर्नेल सिंह यांची हत्या केली खरी, परंतु याचे खरे परिणाम भोगावे लागले ते पुढे इंदिराजींना आणि इंदिराजींच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशाला. त्यावेळी भारत सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या ऑपरेशनमध्ये भारतीय सेनेचे ८३  जण मारले गेले. यामध्ये  मुख्य अधिकारी आणि  कनिष्ठ अधिकारी व ७५  जवान यांचा समावेश होता. सुमारे २००  जण जखमी झाले. तर ४००  पेक्षा जास्त दहशतवादी या कारवाईमध्ये मारले गेले.

ब्लू स्टारकारवाईचे परिणाम :
            कारवाई जरी पार पडली तरी देखील खलिस्तानवादी चळवळ लगोलग थंड झाली नाही. इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरामध्ये घडवून आणलेल्या कारवाईमुळे शीख समुदायामध्ये तीव्र रोष निर्माण झाला. त्यामुळे भारतीय सैन्यामध्ये असलेल्या काही शीख सैनिकांनी देखील बंडाचा पवित्रा घेतला. त्याचाच परिणाम म्हणून इंदिराजींच्या रूपाने या भारतभूमीला एक सच्चा राजकारणी नेता आणि भारतरत्न गमवावा लागला.
इंदिराजींची ३१  ऑक्टोबर १९८४  रोजी सकाळी त्यांच्या अंगरक्षकांकडूनच हत्या करण्यात आली.

इंदिराजींची हत्या :
            ३१  ऑक्टोबरच्या सकाळी इंदिराजी त्यांच्या राहत्या घरामधून कामानिमित्ताने बाहेर पडल्या. त्या त्यांच्या घरासमोरील बगीचामधून बाहेर उभ्या असलेल्या कारपर्यंत जात असताना त्यांचे अंगरक्षक असलेल्या दोन इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. सतवंत सिंह आणि बेअंत सिंह अशी नावे असलेल्या शीख समुदायातील या दोन तरुण अंगरक्षकांनी अक्षरश: गोळ्यांचा वर्षाव केला. एकामागून एक गोळी लागत गेली व शेवटी इंदिराजी जागीच धारातीर्थी पडल्या.
            सतवंत सिंहने त्याच्या हातांमध्ये असलेल्या स्टेनमगनमधून ३०  राऊंड फायर करून इंदिराजींवर गोळ्या झाडल्या. इंदिराजींच्या जागीच पडलेल्या त्या मृतदेहाकडे पाहत ते दोघेही तिथेच थांबले अन् बेअंत सिंह म्हणाला, ‘‘मला जे करायचे होते ते माझे करून झाले आहे, आता तुम्हाला काय करायचंय ते करा’’ (
 I have done what I had to do. You do what you want to do)
            इंदिराजी यांची हत्या झाली यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. सलमा सुलतान यांनी इंदिराजींची हत्या झाल्याचे दूरदर्शनवरून जनतेला सांगितले. इंदिराजीनंतर कोण असा प्रश्न त्यानंतर जनतेपुढे पडला त्यावेळी राजीव गांधी यांचे नेतृत्व समोर आले.

हत्येनंतर उद्भवलेली परिस्थिती :

            इंदिराजींच्या हत्येनंतर देशातील आणि विशेषत: दिल्ली स्थित शीख समुदायातील व्यक्तींच्या कत्तली करण्यात आल्या. देशात दंगल उसळली. राजीव गांधी पंतप्रधान झाले. परंतु देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होती एक शीख व्यक्ती. ग्यानी झैलसिंह हे देशाचे राष्ट्रपती होते.

No comments:

Post a Comment