Saturday, August 8, 2015

कलाम सर सलाम


‘कलाम सर’, ‘मिसाइल मॅन’, ‘भारतरत्न’, लोकांचे राष्ट्रपती, एक आधुनिक काळातील वैज्ञानिक ऋषी, देशाचा इंजिनिअर अशा एक ना अनेक नावांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर केला जातो. परंतु खरे तर हे व्यक्तिमत्व अखेरपर्यंत एका प्राध्यापकाच्याच वेशात राहिले. वयाची 80 वर्षे सरून गेली असताना देखील ज्ञानाचा हा अगाध सागर, एखाद्या तरुण प्राध्यापकास देखील लाजवेल अशा तर्‍हेने वाहत राहिला. कलाम सरांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील ते शिलाँग-मधील एका कॉलेजमध्ये व्याख्यान देत होते. त्यामुळेच तर अशा या चिरतरुण आधुनिक काळातील विज्ञान ऋषीला वय वर्षे 96 उलटून गेलेल्या अर्जन सिंग या भारतीय सैन्यातील मार्शलने लष्करी गणवेशात येऊन सलाम केला. कलाम सर सलाम...!
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, यांच्यासारखं व्यक्तिमत्व खरं तर एका युगामध्ये एकदाच घडतं, असं म्हणाव लागेल, अगदी विज्ञाननिष्ठ प्राध्यापकापासून ते देशाचा राष्ट्रपती होऊन आपण राजकीयदृष्ट्यादेखील किती सक्षम आहोत हे दाखवण्यापर्यंत कलाम सरांनी अष्टपैलुत्वाचा नवा अध्याय देशासमोर रचला. देशाच्या
सर्वोच्च नागरी पदावर प्रथमच एखादी गैरराजकीय व्यक्ती स्थानापन्न झाल्यामुळे देशातील जनतेने देखील कलाम सरांचे त्यावेळी स्वागतचं केले. त्यामुळेच देशातील सर्वात लोकप्रिय आणि युवा वर्गामध्ये मिसळणारे ‘लोकांचे राष्ट्रपती’ हा बहुमान कलाम सरांना मिळाला. तसे पाहता काही वेळाच असे होत असावे, की यशाला देखील एकाच व्यक्तीच्या मागे लागून, त्या व्यक्तीकरवी समाजमनावर बिंबवण्याची इच्छा झाली असावी. कलाम सरांबाबत असे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण सध्या स्थितीत जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला देखील कलाम सरांनी पोखरण-2 (11 मे 1998 - 13 मे 1998) ला घडवून आणलेल्या जमिनीअंतर्गत अणुस्फोटाबाबत माहिती होऊ दिली नव्हती. अमेरिकेच्या ताकास तूर लागू न देता ‘ऑपरेशन शक्ती’ या नावाने ओळखला जाणारा पोखरण-2 येथील जमिनीअंतर्गत अणुस्फोट घडवून आणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बरोबरीने कलामसरांनी देखील भारत देश अणुशकतीच्या बाबतीत अग्रेसर असल्याचे सार्‍या जगाला दाखवून दिले होते. त्यामुळेच तर कलाम सरांच्या निधनानंतर अमेरिकेच्या व्हाइट हाऊसवरील त्यांचा राष्ट्रीय ध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर उतरवून, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमतःच एखाद्या भारतीय नागरिकास या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
कलाम सरांच्या आयुष्याचा प्रवास तसा पाहता खडतरच होता, त्यावरही मात करत या विज्ञाननिष्ठाने अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्यरीत्या सांगड घालत देशामध्ये वैज्ञानिक क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. इस्रो, डीआरडीओ आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करत असताना कलाम सरांनी अनेक नवनवीन संशोधनांस नवे रूप दिले. भारताच्या अंतराळ संशोधनातील महत्त्वाच्या एस्.एल्.व्ही. आणि पी.एस्.एल्.व्ही या उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीमध्ये कलाम सरांचेच मार्गदर्शन कामी आलेले होते. एस्.एल्.व्ही.-3 या उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीबाबत कलाम सरांनी पत्रकारांशी बोलताना एक किस्सा सांगितला होता, तो येथे आवर्जून सांगावासा वाटतो. कलाम सर - ‘एकदा रात्री उशीरापर्यंत कलाम सर त्यांच्या कार्यशाळेमध्ये काम करत बसले होते. (थुंबा येथील कार्यशाळा) त्यावेळी तेथे विक्रम साराभाई आले आणि त्यांना पाहून म्हणाले की, एवढ्या रात्री एकटाच हे काय करतो आहेस?, त्यावर कलाम सर म्हणाले की, ‘सर मला अंतराळ संशोधनात काम करण्याची खूप इच्छा आहे, त्यामुळे एक संशोधन करत आहे, त्यावर विक्रम साराभाई म्हणाले की, ‘तू केवळ काम न करत राहता, डोळ्यासमोर एक व्हिजन ठेव आणि काम कर, अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तिसर्‍या टप्प्यासाठी तू काम सुरू कर, कारण अमेरिकेकडे पहिल्या टप्प्याचे संशोधन आहे.’ त्यावर कलाम सरांनी तिसर्‍या टप्प्याचे काम (एस्.एल्.व्ही-3) सुरू केले. पुढे दोन वर्षांच्या कालावधीनंतर श्रीमान् विक्रम साराभाई परत एकदा कलाम सरांना भेटायला आले, यावेळी त्यांनी विचारले, की काम झोल असेल तर, तुझे संशोधन उद्या येथे येणार्‍या कॅनडातील शिष्टमंडळापुढे सादर कर. कलाम सरांनी त्याप्रमाणे हे तिसर्‍या टप्प्यातील संशोधन कॅनडातील त्या शिष्टमंडळासमोर सादर केले आणि त्यावेळी ते तिसर्‍या टप्प्यातील संशोधन पाहून आश्‍चर्यचकित झालेल्या त्या कॅनडातील शिष्टमंडळाने कलाम सरांचे ते (एस्.एल्.व्ही-3) पेटंट विकत घेतले.’ हे सर्व सांगण्यामागचा उद्देश हाच की डोळ्यासमोर एखादे व्हिजन ठेवल्यानंतर ती पूर्णत्वाकडे घेऊन गेल्यानंतरच माणसाने सुखाची झोप घ्यायला हवी. ही व्हिजनच भविष्यातील भारतास घडवू शकेल याचसाठी कलाम सरांनी भारतासाठी ‘व्हिजन 2020’चा पाया रचला होता.
इस्रो आणि डी.आर्.डी.ओ.मध्ये असताना देखील सरांनी अनेक प्रकल्पांना नावारूपास आणले. एस्.एल्.व्ही-3 च्या उभारणीनंतर कलाम सरांनी पी.एस्.एल्.व्ही. ची उभारणी केली. तसेच इस्रोमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत असताना भारतीय बनावटीच्या रोहिणी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यामध्येदेखील कलाम सरांचे योगदान होते. तसेच डी.आर.डी.ओ.मधील अग्नी आणि पृथ्वी या जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांच्या बांधणीमध्ये देखील कलाम सरांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यामुळेच तर त्यांना ‘मिसाईल मॅन’ ही उपमा बहाल करण्यात आली.
कलाम सरांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे ‘ऑपरेशन शक्ती’ (पोखरण-2). त्यावेळी कलामसर आणि राजगोपाल चिदंबरम् यांच्या नेतृत्वाखाली शक्ती 1 ते शक्ती 5 अशा एकूण पाच अणुबॉम्बचा अणुस्फोट घडवून आणून भारताने अणुचाचणी यशस्वीरीत्या पार पाडली होती. यावेळी भारतावर काही कारणास्तव अनेक प्रकारचे निर्बंध असल्याकारणाने ‘ऑपरेशन शक्ती’चे कामकाज रात्रीच्या वेळी करावे लागत असे. कलाम सर त्यांच्या सहकार्‍यांसमवेत लष्करी गणवेशामध्ये उंटावरती बसून पेट्रोलिंगला निघालेल्या लष्करी अधिकार्‍यासारखे घटनास्थळी पोचतं, रात्रभर अंधारामध्ये, अमेरिकन उपग्रहांची नजर चुकवत काम करत आणि सकाळी ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण करून परत त्यांच्या बेस कॅम्पवर येत असत, या सर्व घटनेला मूर्तरूप देत असताना कलाम सरांच्या वैज्ञानिक आणि राजकीय कल्पनाशक्तीच्या बळावरचं, हा प्रयोग यशस्वी होऊ शकला. कलाम सर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या या यशस्वी ऑपरेशन शक्ती नंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील त्यांचे भरभरून कौतुक केले होते. तसेच नंतर भारताच्या भेटीवर आलेल्या प्रत्येक अमेरिकन राष्ट्रपतींनी देखील आवर्जून कलाम सरांना भेटण्याची वेळ मागून घेतली. जगभरातील 40 च्या वर विद्यापिठांनी मानद डॉक्टरेट देऊन कलाम सरांचा पुढील काळामध्ये आदर सत्कार केला. परंतु भारत सरकारतर्फे कलाम सरांना कोणताही उचित पुरस्कार दिला गेला नाही, कारण ‘भारतरत्न’ या पुरस्कारासही आपलासा वाटणारा या प्राध्यापकास हा पुरस्कार 1997 सालीच देण्यात आला होता. त्यामुळे पुढे चालून राजकारणात उतरायची इच्छा नसताना देखील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवून राष्ट्रपती ‘लोकांचा राष्ट्रपती’ होण्याचा बहुमान कलाम सरांना लाभला.
एक स्वच्छ प्रतिमेचा, राजकारणाची कसलीही जाण नसलेला आणि तरी देखील एक कणखर राष्ट्रपती म्हणून डॉ. कलाम सरांची राष्ट्रपतिपदाची कारकीर्द सर्वश्रुत आहे. राष्ट्रपती भवनात प्रवेश करत असताना मोजक्या वस्तूंनिशी (एक बॅग कपड्यांची आणि इतर दोन ते तीन बॅगा पुस्तकांच्या) प्रवेश करणारा देशाचा सर्वोच्च  प्रमुख प्रसारमाध्यमांसहित देशाने प्रथमच पाहिला असावा. सोनिया गांधींचा विदेशीचा मुद्दा आणि भारत-अमेरिका अणुकरार याबाबत एक राष्ट्रपती म्हणून डॉ. कलाम सरांनी यावेळी महत्त्वाची भूमिका निभावली होती. लोकांमध्ये मिसळून राहणार्‍या राष्ट्रपतींनी तत्कालीन एन्डीए सरकार जाऊन यूपीए सरकार 2004 साली सत्तेत आल्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान होऊ नये याखातर भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपतींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु कुठल्याही दबावाला बळी न पडता, पंतप्रधानपदावर विराजमान होणारी व्यक्ती भारतीयच असायला हवी असा निर्णय देत डॉ. कलाम सरांनी डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी विराजमान केले होते. तसेच यूपीए सरकारशी अतिशय सौहार्दाचे आणि विनयपूर्वक संबंध असलेल्या राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी त्यावेळी ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ हे बिल संसदेच्या पुनर्विचारार्थ पाठवले होते. राष्ट्रपतींनी कॅबिनेटच्या मर्जीविना असा निर्णय घेतल्याचे कारण पुढे करून सरकारने त्यावेळी राष्ट्रपतींच्या वागणुकीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु अगदी राजकारणाची जाण नसली तरी एक उत्तम आणि कार्यशील राष्ट्रपती म्हणून काम करणार्‍या कलाम सरांनी ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट बिल’ संसदेस पुनर्विचारार्थ पाठवण्याचा आपला निर्णय कायम ठेवला होता. कलाम सरांच्या अशा या सरळ आणि निर्भीड वागणुकीमुळे राजकीय नेतृत्वाला देखील ते हवेहवेसे वाटत होते. राष्ट्रपतिपदावर असतानाच भविष्यातील भारताचे सध्याच्या युवापिढीला कलाम सरांनी स्वप्न दाखवण्यास सुरुवात केली होती. याखातर युवकांनी डोळ्यासमोर एक व्हिजन ठेवून काम करावे असे सतत कलाम सर सांगत असत. त्यामुळेच भविष्यात भारत नक्की महासत्ता होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भारताला ‘व्हिजन 2020’ चे स्वप्न दाखवले होेते. राष्ट्रपती भवनामधून, (25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007) आपली कारकीर्द पूर्ण केल्यानंतर बाहेर पडतेवेळी केवळ आपल्यासोबत एक कपड्याची बॅग आणि इतर तीन पुस्तकांच्या मोठ्या बॅगा बाहेर घेऊन पडणार्‍या या प्राध्यापक राष्ट्रपतीस खराच मनापासून सलाम...!
आयुष्यात जगत असताना डोळ्यासमोर एक ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी अविरत झगडत राहिल्यास आयुष्य सार्थकी लागते, असे मरेपर्यंत सांंगत राहणार्‍या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (अवुल पाकिर जैनुलाब्द्दीन अब्दुल कलाम ) सरांना वैमानिक व्हायचे होते, परंतु त्याही पेक्षा मोठे स्वप्न उराशी बाळगून ज्ञानसागराचा ध्यास घेतलेल्या या प्राध्यापकाने आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत अनेक कलाम (आदरभाव आहे) घडवले. आधुनिक काळातील या विज्ञानऋषीस विद्यार्थ्यांशी संवाद साधन असतानाच आयुष्याचा शेवट करवून घ्यावासा वाटला हा एक योगायोगच म्हणावा लागेल. अग्निपंखात देशाच्या ‘मिसाइल मॅन’ला आदरपूर्वक, भावपूर्ण श्रद्धांजली...!

आणि भारतातील युवापिढीकडून कलाम सरांना अखेरचा सलाम...!

No comments:

Post a Comment