Friday, June 12, 2015

‘जय जयललिता’


भारतीय राजकारण कसे व्यक्तिकेंद्रित आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. न्यायदेवतेला देखील थोड्याफार तडजोडी करून जयललितांना न्याय द्यावा लागला. तामिळनाडू राज्यातील राजकारणावर अम्मांचे वर्चस्व लक्षात घेऊन, त्यांनी गुन्हा केला असला तरी, त्यास बाजूला सारून न्यायालयाने तामिळनाडू जनतेने केलेल्या अम्मांच्या जयजयकारचा विचार करून त्यांना दोषमुक्त केले. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर १९९१  पासून आजवर वर्चस्व गाजवत आलेल्या जयललिता अम्मा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर पाचव्यांदा आरूढ झाल्या. न्यायालयाने अवैध मालमत्ता साठवणूक प्रकरणी (भ्रष्टाचार समजून) त्यांना आठ  महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पडले होते. मात्र कर्नाटक राज्यातील न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सुनावली गेलेली शिक्षा, तेथील उच्च न्यायालयाकडून स्थगित करून, अम्मांना भ्रष्टाचारी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. मागील वेळी अम्मांचे मुख्यमंत्रिपद गेले तेव्हा तामिळनाडूमध्ये काही लोकांनी आत्महत्या केल्या. अम्मांना कारागृहात ठेवण्यात आले तेव्हा तर दंगे उसळले, तसेच, सरकारी संपत्तीचे नुकसान करण्यात आले. यामुळे यापुढे जनक्षोभ उसळू नये, अशी कारणे देत अम्मांना निर्दोष मुक्त करण्यात आले. परंतु यामुळे भारतातील राजकारण आणि न्यायव्यवस्था यांचे खरे रूप पहायला मिळाले. अनेक कायदे पंडित यावर टीका करण्याच्या पलिकडे काहीही करण्यास सध्या तरी धजत नाहीत. जयललिता मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले पनिरसेल्वम काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या आसनास स्पर्श देखील केला नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अम्मांचा फोटो ठेवून ते मंत्रिमंडळाच्या बैठका घेत असत. त्या रिकाम्या खुर्चीसमोर कुर्निसात करून सर्वजण कामकाजास सुरुवात करत. या कालावधीत दुष्काळात भुकेने जेवढी माणसे मेली नसतील अथवा कारगिलच्या युद्धात जेवढ्यांना प्राण गमवावे लागले असतील त्यापेक्षा अधिक तामिळ लोकांनी आत्मघात करून घेतला. खरे तर या व्यक्तिकेंद्रित राजकारणात कोण आहेत या अम्मा याचा लेखाजोखा तामिळनाडूबाहेरील राज्यांना अधिक माहीत देखील नसेल.
स्वातंत्र्योत्तर काळात प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली प्रादेशिक पक्षांच्या यादीत अण्णा द्रमुक यांच्याकडून द्रमुक पक्षाची स्थापना करण्यात आली, अण्णादुराई हे चित्रपट व्यवसायात प्रचलित व्यक्ती होते, त्यामुळे एम.जी. रामचंद्रन यांनी चित्रपटात नायक म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर ते अण्णादुराई यांच्या द्रमुक पक्षात सहभागी झाले. एम.जी. रामचंद्रन यांची राजकीय ताकद वाढल्यानंतर त्यांनी स्वतःचा नवीनच अण्णाद्रमुक पक्ष स्थापन केला. एम्.जी. रामचंद्रन हे यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान होते. तिसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एम्जीआर् यांच्या कलेचा मान राखत पुढे त्यंाना भारतरत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. अशा या एम् जी आर् यांच्या नायिकेच्या भूमिकेत त्यावेळी जयललिता यांनी अनेक तमिळ चित्रपटांमधून काम केले. हे सारे सांगण्यामागचा उद्देश असा की, १९८३  नंतरच्या काळात कुमारी जयललिता यांचा तामिळनाडू तसेच देशाच्या राजकारणात प्रभाव वाढू लागला होता. प्रथमतः त्यांची १९८३  साली राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली अन् पक्षातही त्यांचे वजन वाढले. त्यांना अण्णाद्रमुकचे राष्ट्रीय सचिव करण्यात आल्यानंतर अम्मांचा खरा राजकीय प्रवास सुरू झाला. एमजी रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या पश्चात् मुख्यमंत्रिपदावर दावा करत असताना जयललितांनी एम् जी आर् यांच्या पत्नी जानकी देवी यांच्या विरोधात बंड केले. अन् १९९१  साली अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा हा किताब मिरवत त्या पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या.
अम्मांवरील मूळ आरोपांनुसार त्या मुख्यमंत्री असताना १९९६ साली ६६ कोटी रुपयांची अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी त्यांच्यावर हा खटला कर्नाटकातील एका न्यायालयात चालवण्यात आला. टू जी स्प्रेक्ट्रम, कोलगेट, सिंचन घोटाळा, व्यापम घोटाळा तसेच शारदा चिटफंड घोटाळ्यातील रकमेच्या तुलनेत ही अगदीच किरकोळ रक्कम. त्यावेळचे ६६  कोटी ही काय फार मोठी रक्कम नव्हे. तेव्हा २०  वर्षांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर अखेर त्यांना दोषमुक्त करण्यात आले. परंतु करुणानिधी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत. तसे असले तरी भाजपप्रणीत रालोआला भावी काळात अम्मांच्या पारड्यात असलेल्या लोकसभेतील ३७  खासदारांची गरज पडणार असून राज्यसभेत देखील अम्मा मदतनिसाच्या भाजप सरकारच्या भूमिकेत काम करू शकतात. त्यामुळे तूर्तास तरी अम्मांचा चाललेला जयजयकार थांबणार नाही, त्या निर्दोष असून निर्दोषच राहतील हे सत्य सिद्ध झाल्यासारखेच आहे. हे यापुढे प्रसारमाध्यमांवरील चर्चेच्या गुर्हाळांमधून देखील अगदी स्पष्ट करण्यात येईल.
अम्मांचा तामिळनाडूमध्ये एवढा प्रभाव आहे की त्यांच्या सुटकेनंतर आणि राज्यरोहणानंतर संपूर्ण तामिळनाडू राज्यात गुढ्यातोरणे उभारण्यात आली होती. अम्मांनी देखील मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच, त्यांच्यामुळे आत्मघात करवून घेतलेल्या लोकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली. अम्मा कँटीनच्या माध्यमातून तामिळ लोकांच्या मनामनात पोचलेल्या अम्मांनी तामिळनाडूमधील विकासात मोलाचा वाटा जरी उचललेला असला तरी, तामिळी जनतेला गुन्हेगार हा गुन्हेगार असतो हे समजायला हवे, नक्कीच...! परंतु सध्या तरी अम्मांच्या पाठीशी असलेली केंद्रातील राजकीय इच्छाशक्ती आणि तामिळ जनतेच्या मनातील त्यांच्या बद्दलचे अगाध प्रेम यामुळे त्या मुख्यमंत्रिपदी पुढेही कायम राहतील असे वाटते. साहजिकच पुढील काळात प्रसारमाध्यमांसहित तामिळ जनतेमार्फत चाललेला जयललितांचा जयजयकार असाच चालत राहणार आहे, हे मात्र नक्कीच.

त्यामुळेचजय जयललिता.

No comments:

Post a Comment