Friday, June 12, 2015

‘योग दिना’चे मोल

                 
भारतीय संस्कृतीची देणगी असलेला योग अभ्यास आणि ध्यान यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर गरज लक्षात घेता, संयुक्त राष्ट्रसंघातून २१  जून हाआंतरराष्ट्रीय योग दिनम्हणून साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार यापुढे भारतवर्षाची ही देणगी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाच्या निरोगी आयुष्यासाठी उपयोगी पडणार आहे. नियमित व्यायाम, योग्य आणि संतुलित आहार तसेच ध्यानधारणा यांचे मानवी जीवनातील वाढते महत्त्व लक्षात घेता, हा आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या देशामध्ये देखील उत्साहात साजरा करण्यासाठी, सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
            मागील वर्षीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेमध्ये योगासन आणि प्राणायाम यांचे महत्त्व समजावून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाभ्यासाची नितांत गरज असल्याचे सर्वांना समजावून सांगितले होते, तसेच भारतीय संस्कृतीमधील आरोग्य संवर्धनाचा पाया असलेला योगाभ्यास कसा उपयोगी आहे, त्यामुळे शरीरावर आणि मानवाच्या मानसिकतेवर काय परिणाम होतात हे देखील पटवून दिले होते आणि २१  जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार संयुक्त राष्ट्रसंघाने भारताची ही मागणी मान्य करत १७७  देशांच्या पाठिंब्याने २१  जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. योगाभ्यासाविषयी एक माहितीपुस्तिका सादर करत असताना, संयुक्त राष्ट्रसंघाने ११  डिसेंबर  २०१४  रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. यावेळी कॅनडा, अमेरिका आणि चीनसह एकूण १७७  देशांनी भारताच्या या भूमिकेचे स्वागत करत आपला पाठिंबा दर्शविला. यासाठी युनेस्कोने देखील पुढाकार घेतल्यामुळे युवकांसाठी मार्गदर्शनपर आणि प्रशिक्षण शिबिरांवर पुढील वर्षभरात भर देण्यात येणार आहे.
            मानवाच्या आयुष्यामध्ये नियमित व्यायाम, योगासने, ध्यानधारणा यांमुळे बदल होऊ शकतात. आयुष्य निरोगी आणि प्रसन्न राहू शकते, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पटले असल्याकारणाने, भारतीय संस्कृतीतील योगाभ्यासास महत्त्व प्राप्त झाले असून यावेळी देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी ज्या ज्या वेळी इतर देशांच्या दौर्यावर असतात त्यावेळी देशांमध्ये त्यांच्यासमोर योगाभ्यास शिकवणार्या कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. नुकतेच पंतप्रधान चीनमध्ये असताना चीनमधील शाळकरी मुलांनी पंतप्रधान मोदींच्यासमोर योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. तर सध्या भारतामध्ये येऊन योगासने आणि ध्यानधारणा यांचे प्रशिक्षण धेऊन आपल्या मायदेशी परत जाणार्या विदेशी नागरिकांची संख्या वाढत आहे. पर्यटनाच्या निमित्ताने भारतात आलेल्या नागरिकांमध्ये देखील योगाभ्यासाबद्दल उत्कंठा दिसून येते. सध्या देशामध्ये श्री श्री रविशंकर, रामदेव बाबा, कै. अय्यंगार गुरुजी यांच्या संस्थांमार्फत योगासनाचे महत्त्व पटवून दिले जात असून विदेशी नागरिकांची गर्दी येथे दिसून येते. रामदेव बाबा हे योगगुरू म्हणून ओळखले जातात. श्री श्री रविशंकर आणि रामदेवबाबा यांच्यामार्फत परदेशांमध्ये देखील ध्यानयोग शिबिरांचे आयोजन करण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढत आहे. नेपाळ, भूतान आणि चीनसारख्या शेजारील राष्ट्रांमध्ये या शिबिरांचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत बंगळूरू येथे नियमित योगाभ्यासाचे धडे दिले जातात.२१  जून रोजी साजर्या होणार्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने देखील त्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारतामध्ये असलेल्या सर्व देशांच्या राजदूतांना आमंत्रित करण्यात आले असून, या पहिल्यावहिल्या योगदिनाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन, विराट कोहली आणि शिल्पा शेट्टी हे लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करतील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
            राजपथावर होणार्या या कार्यक्रमात पंतप्रधानांसह भारतीय सैन्यातील काही अधिकार्यांसह सैनिक देखील सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या या साधनेची प्रतिमा योग्य रीतीने पोहोचविण्यासाठी तसेच प्रत्येक व्यक्तीस मानवी जीवनातील नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी यावेळी केंद्रीय आरोग्य आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. योगासने आणि ध्यानधारणा हा केवळ हिंदू संस्कृतीचा विचार नसून तो एक भारतीय विचार आहे. परंतु काही लोकांकडून सध्या भारतामध्ये जरी यास धार्मिक रंग दिला जात असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असल्या कारणाने हळुहळू योगाचे महत्त्व आणि मोल पुढील पिढ्यांच्या नक्कीच लक्षात येईल.
            देशातील शाळा-महाविद्यालयांमधून देखील यापुढे योगाभ्यासाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील नियमित व्यायाम आणि ध्यान यांचे महत्त्व पटवून देतानानिरोगी आरोग्यासाठीचा उपयोगी संदेशया दृृष्टिकोनातून योगासन अभ्यासाकडे पाहण्याचे प्रशिक्षण शाळांमधून दिले जाणार आहे. परंतु सध्या भारत देशातील तथाकथित सेक्युलरवाद मुस्लिमांनी सूर्यनमस्कार करू नये असे म्हणतो किंवा ध्यानधारणा करणे म्हणजे मूर्तिपूजेसमान असल्याचे मानतो. परंतु त्यांचा हेका लक्षात येत नाही की नमाज पढताना ते वज्रासनातच बसतात अथवा रोजा पाळतात म्हणजे उपवासच करतात. योग अभ्यास करताना सध्याच्या मानवाच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याची गरज लक्षात घेता, येथे धार्मिक अंधपणा आणणे अतिशय मूर्खपणाचे लक्षण ठरेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील समुदायाने योगाचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या प्रसारासाठी दिवस साजरा करण्याचे ठरवले असताना असे राजकारण थांबवायला हवे. भारतातील इतिहास हा वैद्यकशास्त्र आणि योगशास्त्र याबद्दल बरेच काही सांगून जातो, त्यामुळे योगासनांकडे धार्मिक भावनेने पाहणे चुकीचे ठरेल.

            आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात २१  जून रोजी योग अभ्यासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, तर दुसरीकडे भारतामध्ये काही मुस्लिम बांधवांच्या विरोधामुळे सूर्यनमस्कारांना योगदिनाच्या कार्यक्रमातून वगळण्यात आले आहे. ही धार्मिक तेढ दूर व्हायला हवी, कारण अमेरिका, चीन आणि रशियासारखे देश देखील या दिवशी योगाचे दैनंदिन आयुष्यातील निरोगी राहण्यासाठीचे महत्त्व त्यांच्या देशवासियांना प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगणार आहेत. त्यामुळे सध्याच्या युवा भारताने देखील व्यसन आणि वासनांधता यांपासून दूर राहत, निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि मनावरील ताण कमी करण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यानधारणा यांचा आधार घ्यायला हवा. त्यामुळे भविष्यातील भारत घडवण्यास नक्कीच हातभार लागणार आहे.

1 comment: