Thursday, January 17, 2019

देशाच्या राजकीय पटलावर


आजच्या दिवशी लोकसभा निवडणुकीस अगदी कमी कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत अनेक ठिकाणी अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अगदी शतरंजचा (चेसचा) डाव खेळला जावा, तसा शह-प्रति‘शहा’चा डाव सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांची राजकीय आणि मानसिक तयारी सुरु आहे. दक्षिणेतील कर्नाटक राज्यामध्ये कुमारस्वामींचे सरकार दोलायमान स्थितीत होऊ घातले आहे. तर भाजपला सोडचिट्ठी देत असताना, पूर्वोत्तरातील अरूणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अपांग यांनी अटलजींच्या भाषेतील ‘राजधर्म’ची आठवण करून दिली आहे आणि अपांग आता तृणमूल काँग्रेसचे व्यासपीठ जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशात दोनच पक्षांचे महागटबंधन होत आहे, तर नुकतेच दक्षिणेतील तामिळनाडूमध्ये एका कार्यक्रमादरम्यान डिएमके नेते स्टैलिन यांनी राहुल गांधी हे युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात सेना-भाजपचे कुरघोडीचे राजकारण सुरुच आहे, तर पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या यात्रेस न्यायालयाने परवानगी नाकारली म्हणून ममता बॅनर्जी आनंदी आहेत. हे सर्व राजकारण सुरु आहे ते, येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर. परंतु या शह-प्रतिशहाच्या राजकारणाकडे लक्ष देऊन पाहिले तर पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांची जोडी सर्वांना पुरून उरते आणि वरचढ दिसते हे दिसून येते. 

अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. याबाबत काल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. दिल्लीतील एम्समध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. परंतु राजकारणाच्या घसरलेल्या पातळीचा दर्जा म्हणा अथवा अमित शहांचे राजकारण म्हणा, शहांना झालेल्या या आजारावर टीका करताना काँग्रेसचे खासदार हरिप्रसाद यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की,“अमित शहा को सुअर जुकाम हो गया, शहा यांना कर्नाटकच्या जनतेचा शाप लागला आहे, जर कर्नाटकच्या सत्तेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर अमित शहा यांना गंभीर आजार होईल.” तिकडे काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी वेळोवेळी सुडाचे राजकारण करू नका असा सल्ला देत असतात, परंतु त्यांचा हा बहुमुल्य सल्ला त्यांच्याच पक्षातील खासदारांच्या पचनी पडताना दिसत नाही. (यास राहुल गांधी यांची जादुकी झप्पी डिप्लोमसी देखील म्हणता येईल.) दुसरीकडे आजारी असलेल्या अरुण जेटली यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, म्हणून राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रार्थना केली आहे. याचा अर्थ असा होतो की, चेसच्या डावामध्ये एकमेकांवर कुरघोडी करत असताना, हे नेते मंडळी ‘ट्विटर’ या एका नव्या माध्यमाचा उपयोग करत आहेत. याच ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसचे राफेल विमान भुर्रर्र भुर्रर्र उडतं आहे. भ्रष्टाचाराच्या पुराव्या अभावी हे राफेल विमान जमिनीवर काही उतरू शकलेले नाही.

तिकडे गोव्यात धरणीला खिळून असलेल्या तरीही आनंदी आणि उत्साही असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्या घरामध्ये राफेलच्या संबंधित फाईल असल्याचा आरोप करून, काँग्रेसने चेसचा एक प्यादा पुढे केला होता. त्याचे पुढे काय झाले? काहीच नाही. बहुदा तो डाव वाया गेला असावा. या डावास प्रतिशह म्हणून केंद्र सरकारने सर्वसाधारण प्रवर्गांसाठी सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांची सत्ता गमावल्यानंतर लोकसभा निवडणुकीत लाभ मिळावा यासाठीचा हा डाव टाकलेला आहे, हे अगदी स्पष्ट आहे. तसेच असलेला नसलेला राफेलचा मुद्दा देखील यामुळे झाकला गेला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये कधीकाळी एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने  अपेक्षेनुरूप युतीची अर्थात महागठबंधनची घोषणा केली. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या एकूण ८० जागांपैकी प्रत्येकी ३८ जागा हे दोन्ही पक्ष लढविणार आहेत, तर रायबरेली व अमेठी या दोन जागांवर उमेदवार उभे करण्यात आलेले नाहीत. उर्वरित दोन जागा सहयोगी पक्षांसाठी सोडण्यात येतील, असे त्यांनी घोषित केले आहे. त्यामुळे या युतीचा खरा फायदा व खोटा तोटा कोणाला होणार आहे तसेच हे महागठबंधन असे किती दिवस टिकणार आहे, हे येणारी लोकसभा निवडणुकीचं ठरवणार आहे. कारण भाजपनेही प्रतिडाव टाकलेला असणार हे नक्की आहे. तसे पाहता भाजपने टाकलेला प्रतिडाव विरोधकांना व प्रसारमाध्यमांना कळण्यास वेळ लागू शकतो.
पाच वर्षांपूर्वी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्यासाठी छोट्या मोठ्या विविध प्रादेशिक पक्षांची जणू रीघ लागली होती. परंतु आज चित्र बदललेले आहे. रालोआतील छोटे छोटे घटक पक्ष एकामागोमाग एक भाजपाची साथ सोडून निघून जात आहेत. यामागे त्यांची सत्ता लालसा म्हणा अथवा अमित शहांचे राजकारण म्हणा, दोन्ही पैकी एक काहीतरी कारणीभूत आहे. परंतु शहांसाठी देखील ही अपरिहार्य गोष्ट आहे. शेवटी त्यांना देखील डाव-प्रतिडाव खेळत, स्वतःच्या राजाला चेक मेट न होऊ देता राजकारण करायचे आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ए.एन.आय.ला मुलाखत दिली. मोदी अनेक दिवसांनंतर माध्यमांना सामोरे गेले. त्यावेळी काही राजकीय मुद्द्यांवर बोलणे त्यांनी टाळले होते. परंतु शहा यांनी राजकीय मुद्द्यांवर बोलत असताना आजवर प्रत्येक आरोपाचे योग्य खंडन केलेले आहे. यावरून असे लक्षात येते की सरकारी स्तरावरील विषयांवर मोदींनी प्रखर आणि योग्य बाजू मांडावी व काही विषयांवर पक्षाध्यक्ष म्हणून अमित शहा यांनी बाजू मांडावी, हे सूत्र भाजपमध्ये सर्वमान्य आहे. या सूत्रानुसार हे सर्वजण वागतात. त्यामुळेच येणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या ‘जादूकी झप्पी डिप्लोमसी’चा विजय होतो की शहा यांच्या राजकीय कौशल्यांचा विजय होतो, हे येणारी लोकसभा निवडणूक व शेवटी जनताच ठरवणार आहे. 

- नागेश कुलकर्णी


No comments:

Post a Comment