Friday, January 25, 2019

महागठबंधनला कमी लेखून चालणार नाही!

मोदींचा अश्वमेध रोखण्याची प्रामाणिक इच्छा घेऊन म्हणा अथवा राजकीय इच्छा घेऊन म्हणा, नुकतेच ममता बॅनर्जी यांनी सर्व मोदी विरोधकांची टोळी एकाच व्यासपीठावर आणून उभी केली. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने कोलकाता येथे झालेला महागठबंधन मेळावा म्हणजे पूर्णपणे भाजप विरोधकांचे एकत्रिकरण नसले तरीही भाजपच्या गोटात चिंता निर्माण करणारे शक्तिप्रदर्शन नक्कीच होते. त्यामुळेच तर भाजपचे नेते महागठबंधनवर विविध माध्यमातून बोलू लागले आहेत. भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिला तर अशा गठबंधनांची सरकारे देशाने पाहिलेली आहेत. ती टिकली न टिकली हा भाग वेगळा, परंतु देवेगौडा व गुजराल यांच्यासह चंद्रशेखर हे अशाच तत्कालीन विरोधी पक्षांच्या असंतोषातून पंतप्रधानपदी विराजमान झालेले नेते आहेत. त्यामुळे आजवर अजेय राहिलेल्या भाजपने महागठबंधनला आणि त्यांच्या शक्तीप्रदर्शनास हलके घेणे परवडणारे नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट असताना भाजपला ३१.३४ टक्के तर इतर सर्व विरोधकांना ६८.६६ टक्के मते मिळाली होती. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांची ही सर्व मते संघटित होतीलच असे नाही, परंतु या विरोधी पक्षांचे एकत्रित राहून महागठबंधन झाले, तर सत्ताधारी पक्षासाठी ही नक्कीच धोक्याची घंटा असणार आहे. कोलकात्यात ममता बॅनर्जींनी आवर्जून बोलावलेल्या महागठबंधन मेळाव्यामध्ये देशातील राष्ट्रीय तसेच प्रादेशिक मिळून २० ते २२ पक्ष हजर होते. विरोधी पक्षातील ४० पेक्षा अधिक दिग्गज राजकारणी मंडळींनी भाजप तसेच एनडीएमधील असंतुष्ट नेत्यांसह या मंचावर एकजुटीचे शक्ती प्रदर्शन केले आहे. या मंचावरून २०१९ च्या निवडणुकीत मोदी व भाजपा यांचा पराभव करण्याच्या घोषणा केल्या गेल्या. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती आणि चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे नेतृत्वविषयक (पंतप्रधान पदाबाबतचे स्वप्नवत धोरण) धोरण वगळता बाकीच्या सर्व पक्षांचे भाजपा विरोधावर मतैक्य आहे. फारूक अब्दुल्ला, शरद पवार, शरद यादव, देवेगौडा, केजरीवाल, लालू पुत्र, डिमके नेते स्टॅलिन, चंद्रबाबू नायडू  यांच्यासह यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, हार्दिक पटेल यांची यावेळी उपस्थिती होती.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधकांनी एकजूट दाखवावी. जिथे जो प्रादेशिक अथवा राष्ट्रीय पक्ष मजबूत असेल, तिथे इतर पक्षांनी त्या पक्षाला साथ द्यावी, या उद्देशाने महागठबंधनच्या मंचावरून विविध नेत्यांनी भाषणे केली. तसे प्रादेशिक पातळीवर पाहता महागठबंधनमधील काही पक्ष मजबूत आहेत. नेतृत्व करत असलेल्या ममता बॅनर्जी स्वतः बंगालमध्ये सत्तेत आहेत. चंद्रबाबू नायडू, चंद्रशेखर राव त्यांच्या राज्यात सत्तेत आहेत. तसेच मायावतींच्या पक्षाचीसुद्धा राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे. २०१४ साली राष्ट्रीय पातळीवर एक जागा सुद्धा न जिंकता मतांच्या टक्केवारीनुसार बसपा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिलेला आहे. त्यांना ४.१ टक्के मते होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष तसेच लालू पुत्रांचा पक्ष यांची प्रादेशिक पातळीवर मजबूत बांधणी आहे. इतर पक्षही पूर्वी काही काळ सत्तेत राहिलेले आहेत. त्यामुळे मोदीविरोधात कागदावर भक्कम आणि सभांमध्ये एकजूट दाखवणारे हे ‘महागठबंधन’ प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात कितपत सक्षम ठरेल याबाबत शंका असली' तरी या सर्व पक्षांना कमी लेखून चालणार नाही. भाजपने देखील ही चूक केली, तर त्यांना ते महागात पडू शकते.

- नागेश कुलकर्णी

No comments:

Post a Comment