Friday, March 13, 2015

राजकीय छिद्रान्वेष


राजकीय छिद्रान्वेष
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जी काही उलथापालथ सुरू आहे, ती आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न पाहता, सध्याचे महाराष्ट्रातील  सर्व पक्षीय राजकीय नेतृत्व महाराष्ट्राला भविष्यात कोणत्या दिशेने घेऊन जाईल याबाबत आता साशंकता वाटत आहे. जनताही यांच्या छिद्रान्वेषी राजकारणास कंटाळली आहे. कोण कोणासोबत आणि कोण कोणाविरुद्ध राजकारण करतेय याचा थांगपत्ता लागणे सध्या कठीण झाले आहे. निवडणुका होऊन उणेपुरे शंभर दिवसही झाले नाहीत. एकमेकांना गोंजारत युतीची मित्रपक्षांसहित सत्ता आली खरी... परंतु हा सेना भाजपचा संसार सुरळित सुरू आहे असे अजिबात वाटत नाही. एकमेकांची उणी दुणी काढायची... मी काय म्हणालो आणि तू काय म्हणालास यामध्येच या सरकारने शंभर दिवसांचा कालावधी पूर्ण केला. त्यामुळे जनतेचा मात्र अपेक्षाभंग झाला आहे असे वाटते. कारण महाराष्ट्रातील मराठी जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारत भाजप सेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी अतिशय विश्‍वासाने कौल दिलेला होता. परंतु आता भलतेच काहीतरी होताना दिसून येत आहे.

सेना-भाजप सत्ता संघर्ष -
आधी तर सत्तेचे धागे जुळत नव्हते. एकदाचे जुळले तर आता ते वळत नाहीत. खरे पाहता सत्तेत सहभागी असल्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका टिप्पणी करत बसण्यापेक्षा जनतेची कामे करायला हवीत. निवडणुकीवेळी दिलेली आश्‍वासने पूर्ण करायला हवीत. नाइट लाइफचा पअ्रश्‍न सोडवाल तर सार्‍या जनतेचा प्रश्‍न सुटतो असे होत नाही; अथवा मुख्यमंत्री एक रात्र एका गरीब शेतकर्‍याच्या घरी जाऊन राहिले म्हणून नागपूरकर मुख्यमंत्र्यांना शेतीतील सारेच कळायला लागले असेही होत नाही. सेना भाजपतील सत्ता संघर्षात या दोन्ही पक्षांनी जमिनीवरती राहून एकत्रितपणे महाराष्ट्राचा गाडा पुढे नेला पाहिजे. तसेच ज्या मित्रपक्षाच्या मतांच्या बळावर तुम्ही आज सत्तेत आहात त्यांनाही न विसरता, त्यांची महामंडळावर बोळवण करण्याचा विचार न करता काहीतरी विधायक धोरण अवलंबिले पाहिजे.
शिवसेना - भाजपमधील अंतर्गत कलह आणि एकमेकांविरोधी वरचढ होण्याची भूमिका यामुळे सत्ता तर मिळवता आली आहे, परंतु टिकवणे कठीण जातेय, अशी परिस्थिती या दोन्ही पक्षांनी निर्माण केली आहे. भाजपमधील नाथाभाऊंचा एल्गार संपत नाही तोवर शिवसेनेकडून रामदास कदमांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यात प्रसारमाध्यमे देखील या प्रकारांना खतपाणी घालतात या गोष्टींवर समन्वय साधला जायला हवा. त्याशिवाय पर्याय निघणार नाहीत.

शिवसेनेचे भाजपवर सामनास्त्र -
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकामधून भाजपवर सतत टीकाटिप्पणी केली जाते. अहो पण का? मित्रपक्ष आहे ना तो! भाजपवाले तसे आहेत तर मग तुम्ही का बरे सत्तेत सहभागी आहात त्यांच्यासोबत??? पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित सर्वांवर चौफेर फटकेबाजी करत सामनामधून अग्रलेख लिहिले जातात, एक प्रकारे शिवसैनिकी डोस पाजला जातो, असे म्हणतात परंतु याची गरज काय? मित्रपक्ष आहात तर समन्वयकाची भूमिका घेऊन आपसात मिटवून घेऊन चर्चा केल्यासही प्रश्‍न सुटू शकतात. त्यात सेनेकडून सतत एकटे लढण्याची भाषा केली जाते. याचा जनतेने काय अर्थ घ्यायचा? जनतेने दिलेला हा राजमुकुट देखील टिकवता यायला हवा. सत्तेची मस्ती डोक्यात जायला नकोय, आणि यामध्ये दोघांचे भांडण आणि तिसर्‍याचा लाभ असे झाल्यास जनतेने काय मिळवले?

भाजपची भूमिका -
नुकतेच राज ठाकरे बर्‍याच दिवसांनी बोलताना म्हणाले की, ‘भाजपचे महाराष्ट्रातील सरकार हे दिल्लीच्या तालावर नाचते!’ परंतु असे होताना दिसत नाही कारण स्वच्छ प्रतिमेच्या देवेेंद्र फडणवीसांकडून कामे होण्याची जनतेला अपेक्षा आहे. परंतु त्यांच्यासाठी पक्ष पातळीवरील राजकारणाचा भाग म्हणून सेना भाजप वाद हा अवघड जागेचे दुखणे होऊन बसला आहे. रामदास कदम राज्य मंत्रिमंडळात आहेत. ते पक्षाचा विचार न करता काम करतायत हे जनतेच्या दृष्टीने स्वगतार्हच आहे परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणे कितपत योग्य आहे? या आधीच्या सरकारांवेळी असे झाले असते तर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांवरती कारवाई केल्याची उदाहरणे आहेत. परंतु युती असल्याकारणाने मुख्यमंत्री तसा निर्णय घेऊ शकत नाहीत.
युती टिकवायची असेल तर दोन्ही बाजूंनी तेवढेच प्रयत्न व्हायला हवेत पण असे होताना दिसत नाही. निवडणुकांनंतर भाजपने तर शिवसेनेच्या स्वाभिमानास जागृत केले. पार टोकाची भूमिका घेत एकमेकांवर राजकीय चिखलफेक करत निवडणुका लढवल्या. शिवसेनेने काय मिळवले? पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पूर्वज काढले, भाजपला परकीय म्हणून हिणवले अन् शेवटी त्यांच्याशीच युती केली सत्ता सोपानाचा मोह सोडला नाही का? हे सारे कशासाठी? ही छिद्रान्वेषी प्रवृत्ती कशासाठी? भाजप देखील त्याच गटातील सेनेला नामोहरम करण्याचा एकही मुद्दा भाजपने सोडला नाही अन् शेवटी बहुमतासाठी सेनेचा पाठिंबा घेतलाच. मग आता सुखाने नांदायचे सोडून चाललेल्या त्यांच्या भांडणांना वर्‍हाडी मंडळी (जनता) कंटाळली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी तरी एक ज्येष्ठ नेता म्हणून युतीच्या बाजूने कौल देत इतर नेत्यांना समजुतीने सांगणे गरजेचे होते. परंतु तेही असे का वागत आहेत? कुठे घेऊन जाताय महाराष्ट्र माझा? आमच्या संपर्कात इतर पक्षांची आमदार मंडळी आहेत.’ असे विधान यावेळी करणे गरजेचे आहे का?
भाजपाध्यक्ष अमित शहांनी देखील परवा परवा नागपुरात स्वबळाचा नारा दिला. त्यावर शिवसेनेनेही कामाला लागा म्हणत मुंबई मनपाच्या निवडणुकांच्या प्रचाराचा श्रीगणेश केला. यामध्ये जनतेची काय चूक? जनतेला आता लवकर पुनश्‍च निवडणुक नको आहे! त्यामुळे युती सरकारने सत्तासंघर्ष न करता जनहितार्थ कामे करून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जायला हवे.

‘रा’ राजकारणाचा आणि राष्ट्रवादीचाही...
महाराष्ट्रातील राजकारण म्हटले की शरद पवार साहेब हे नाव आधी डोळ्यासमोर येते. पवार साहेबांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारणाचे पानही हलत नाही असे म्हणतात. राष्ट्रवादीकडून चौफेर फटकेबाजी करत प्रत्येक पक्षाची कोंडी केली जाते. न मागता भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका असो वा काँग्रेसपासून फारकत घेण्याची भूमिका असो. प्रत्येक बाबतीत राजकारण आणि राष्ट्रवादी हे सूत्र खरेच वाखाणण्याजोगे होते. भाजप सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेस पाठिंबा असो वा बारामतीतील पवार मोदींचा व्हॅलेंटाईन डे असो. पवार साहेबांच्या खेळीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम दिसून येतो. यामुळे शिवसेनेला खेळवत ठेवणे आणि त्याचबरोबर युती सरकारच्या सत्तेवर टांगती तलवार असल्याचे चित्र निर्माण करणे यामध्ये राष्ट्रवादी सध्या तरी यशस्वी झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रणी स्थान असलेल्या पवार साहेबांकडून सध्या सत्तेत असलेले सरकार किती दिवस सत्तेत राहू शकते याची सूत्रे हलवली जाऊ शकतात; असे सांगितल्यास सामान्य माणसाला विश्‍वास बसणार नाही; परंतु राष्ट्रवादी प्रत्येक वेळी दुटप्पी भूमिका घेताना दिसून येते.

एकाकी काँग्रेस -
प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेल्या अशोक चव्हाणांना शून्यातून विश्‍व निर्माण करण्याची गरज आहे, असे दिसून येते. पक्षांतर्गत सुरू असलेला कलह शमवत पक्षबांधणीसाठी समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन पक्ष संघटना बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर राज्य पातळीवरील आणि देश पातळीवरील काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. शेवटी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पक्षावर आत्मपरीक्षणाची वेळ येते म्हणजे विचार व्हायलाच हवा. पक्षांतर्गत बंडाळी, नारायण राणेंच्या हालचाली आणि केंद्रीय नेतृत्व पाहता जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर काँग्रेस कितपत पाण्यात आहे हे पाहणे आवश्यक आहे. पक्ष पातळीवरील राजकारण कितीही योग्य वा अयोग्यपणे चालत असो, त्याचे जनतेला काय देणे घेणे? मतदान करून जनतेने आपले काम केले आहे. आता युती टिकवून जनहितार्थ कार्यक्रम राबवणे हे सरकारचे काम आहे. नुकताच झालेला अवकाळी म्हणावा असा पाऊस. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, राज्यातील उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या दृष्टीने कार्य करण्यावर सेना भाजप सरकारने भर दिला पाहिजे. कारण मध्यावधी निवडणुकांसाठी जनता सध्या तयार नाही.
शेवटी असेच म्हणावेसे वाटते की युती सरकार पाच वर्षे टिकावे. केंद्राच्या मदतीने राज्याचा विकास साधला जावा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही काँग्रेससह समविचारी पक्षांचा विरोधकाच्या भूमिकेत प्रभाव दिसून यावा. कारण विरोधक असल्याखेरीज सरकारवर वचक राहत नाही.
जयहिंद. जय महाराष्ट्र...!



No comments:

Post a Comment