Friday, March 20, 2015

'गोवंश हत्याबंदी कायदा’ आणि मनुष्यप्राणी

                            महाराष्ट्र प्राणी संरक्षण (दुरुस्ती) मसुदा, 1995.
महाराष्ट्र सरकारनेगोवंश हत्या बंदी कायद्याबाबत उचललेले पाऊल, राष्ट्रपतींनी 19 वर्षांनंतर मान्य केले. राष्ट्रपतींनी या ऐतिहासिक कायद्यावर निर्णय देऊन गोवंश संवर्धनाविषयी महाराष्ट्रात तरतूद केली जावी असा आदेशही दिला आहे. परंतु या गोवंश हत्या बंदी कायद्यासहिंदूंचा कायदाया दृष्टीने अथवा धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने याकडे पाहिले जात आहे, याबाबत खंत वाटते. पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवास जगण्याचा अधिकार आहे. शेवटी मनुष्य हा देखील एक प्राणीच आहे.
1995 साली महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपतींच्या संमतीसाठी गोवंश हत्याबंदी कायद्याचा मसूदा पाठवला होता. हा कायदा महाराष्ट्र राज्यात लागू होण्यास आणि राष्ट्रपतींकडून स्वाक्षरी होऊन कायदा पास होण्यास 19 वर्षांचा कालावधी लागला. त्यासाठी देखील सेना-भाजप सरकार म्हणजेच सध्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याचा राष्ट्रपतींकडे पाठपुरावा करावा लागला. त्यावर मग विरोधकांकडून ओरड सुरू झाली. लोकांनी काय खावे, काय प्यावे हे आता सरकारच ठरवणार का? किंवा, त्या व्यवसायावर आधारित लोकांच्या भविष्याचे काय? किंवा, भारत हा सर्वाधिक मांस निर्यात करणारा देश आहे, देशाचे राष्ट्रीय उत्पन्न या व्यवसायावर अवलंबून आहे, तर मग हा कायदा का? असे प्रश् उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्यावर एकच म्हणावेेसे वाटते की, गाय आणि गोसंवर्धन हा विषय केवळ हिंदूंपुरताच मर्यादित नको रहायला. या कायद्यास धार्मिक रंग दिला जाऊ नये! हा विषय केवळ हिंदूंपुरता मर्यादित नसून या पृथ्वीतलावरील सर्व मनुष्यप्राण्यांशी संबंधित असा हा विषय आहे.
महाराष्ट्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत व्हायला हवे. प्राणीसंवर्धन करायला हवे, पृथ्वीचा समतोल ढासळतोय, सरकार वनसंवर्धन आणि प्राणी संवर्धनाबाबत सजगता दाखवत नाही, असे एकीकडे ओरडणारे so called प्राणी मित्र असतात(त्यांना खूप काळजी असते प्राण्यांची) तर दुसरीकडे या निर्णयास धार्मिक रंग देणारे देखील आढळतात. मुख्यमंत्र्यांनामुस्लिमविरोधीम्हणून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असणारे विरोधक, डाव्या विचारशक्तींची मुक्ताफळे तर अजबच वाटतात. एका डाव्या विचाराने आलेला हा मतप्रवाह आहे, कीसावरकर म्हणत असत, गाय ही मरेपर्यंत उपयोगात येते.’ सावरकरांच्या विचारांशी यांचे विचार बरे जुळले हो? हा भांडणाचा मुद्दा नसून स्वागतार्ह निर्णय आहे, हे या विचारवंतांना कोण समजावणार? आता मान्य आहे, की या व्यवसायावर आधारलेल्या व्यक्तींनी काय करायचे? त्यांनी भविष्यात निर्वाह कसा करावा? परंतु सरकारने या गोष्टींचा काही ना काही विचार केलेला असावा. केंद्र सरकारने Corporate Tax कमी केला आहे. तसेच, राज्य सरकारांना अधिक अधिकार देत, राज्यांना अधिक पैसाही दिला आहे. याचा उद्योगांना चालना देण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे रडत बसण्याची काही गरज नाही, अशी दुतोंडी भूमिका घेणार्या प्रत्येकाने नक्कीच खासा विचार करायला हवा.
हिंदूंना गाय पवित्र. मग हा कायदा पास केला गेल्यानंतर आता गोवंश संवर्धनाची जबाबदारी वाढली असून राज्य सरकार आणि समाजातील सर्वांनी याकडे लक्ष द्यायला हवे. देशात जवळपास 26 राज्यांमध्ये गोहत्या बंदी आहे. प्रत्येक राज्यातील जिल्हा स्तरावर अथवा ज्या ठिकाणी वने आहेत त्या ठिकाणी गोसंवर्धनाची सोय सरकारकडून केली जावी. वनक्षेत्राच्या परिसरात गोसंवर्धनासाठी गोशाळा उभारण्याची तरतूद केल्यास त्यावर देखील व्यवसाय उभारले जाऊ शकतात. गोमूत्रापासून विद्युतनिर्मितीवर देखील परदेशांमध्ये विचार केला जात आहे. गाय पवित्र आहे. औषधनिर्मितीसाठी देखील आयुर्वेदात गायीचा उपयोग आहे. शेवटी सत्य लपवता येत नाही. परंतु यावर काम करण्याची गरज आहे. हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील गोमाता म्हणत गाईला पूज्य मानले असले तरी, गोसंवर्धनासाठी आता त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. गाईंनी दूध देणे बंद केल्यानंतरच्या परिस्थितीत, गाई मोकाट जनावरे म्हणून शहरांमध्ये रस्त्यांवर सोडून देता गोसंवर्धन करण्यात यावे.
देशातील वाघांची संख्या कमी होत आहे किंवा जगात वाघ नामशेष होत आहेत, अशी ओरड केली जाते. अशा विचारवंतांना सांगावेसे वाटते, की वाघ तुम्हाला कधी कामी येतो का हो? जी आई (गोमाता) आपल्याला जन्मभर पोसते तिलाच आपण ठार मारणार का? उणेपुरे वीसेक वर्षांचे आयुष्य असते गोवंशाचे. बैलदेखील म्हातारा होईपर्यंत शेतकर्याची साथ सोडत नाही. शेतीत राब राब राबतो. शेतकरी त्याला त्यावेळी राजा सर्जा म्हणून संबोधतो. परंतु वय झाल्यानंतर खाटीक या मनुष्य प्राण्याच्या हवाली करून मोकळा होतो. असे का? आता तुम्ही पाप-पुण्याचा विचार करत नाही का? हे हिंदू संस्कृतीत बसते का? शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदायातील असतो. मग हा व्यवहार विठुरायास तरी आवडेल? असो, हा धार्मिक मुद्दा नसून पृथ्वीतलावरील प्राणी संवर्धनाचा आहे आणि आपणही एक प्राणीच आहोत हे मनुष्याने विसरता कामा नये. पृथ्वीतलावरील अन्नसाखळी देखील मानवाच्या पराक्रमामुळे ढासळत चालली आहे. आपण म्हणतो, की बिबट्या, वाघ आज यांच्या घरात शिरला. त्यांच्या घरात शिरला. परंतु तो आपल्या घरात शिरलेला नसून आपण त्याच्या घरावर (जंगलावर) कब्जा केलेला असतो. राज्य शासनाने यावर उपाय म्हणून अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी आणि प्राणीमित्रांच्या इच्छेखातर गोशाळा, वनक्षेत्राच्या आसपास उभाराव्यात. जेणेकरून वाघ, सिंह यासारख्या मांसभक्षक प्राण्यांच्या संवर्धनात देखील या गोशाळांचा उपयोग केला जाईल; म्हणजेच एखाद्या गाईच्या मृत्यूनंतर अथवा खूप वय झाल्यानंतर त्या जनावरास जंगलांमध्ये वाघ सिंहांच्या कळपात भक्ष्य (अन्न) म्हणून सोडण्यात यावे. यामुळे अन्नसाखळी देखील टिकून राहील आणि सरकारवरदेखील अधिक जनावरे सांभाळण्याचा भार राहणार नाही. याबाबत विचार व्हायला हवा, नक्कीच...!

आता पुढे बोलायचे झाले तर, भारतीय संस्कृती काय सांगते याचाही विचार व्हायला हवा...! याचा विसर पडतोय असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते. भविष्यात ही वसुंधरा, जिचा तोल ढासळतोय, हवामानात बदल होतोय अशी चौफेर बोंब ठोकली जातेय, आणखी आणखी धोक्यात येणार आहे. ही नुसतीच बोंब आहे. याचा कितपतविचारकेला जातोय? याचाही विचार केला गेला पाहिजे. फक्त अहवाल सादर करून आणि काही थातुरमातुर उठाठेवी करून पृथ्वीच्या संवर्धनाविषयी मनुष्य प्राण्याकडून काही केले जाऊ शकत नाही. त्यासाठी पृथ्वीतलावरील सर्व प्राणिमात्रांचे संवर्धन-संगोपन व्हायला हवे. त्यातल्या त्यात विकसित झालेल्या मनुष्यावर ही जबाबदारी असल्यामुळे आपण शहाण्यासारखे वागावे.
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या समर्थकांची आणि विरोधकांची देखील समसमान जबाबदारी आहे असे शेवटी म्हणावेसे वाटते. असे कायदे अंमलात आल्यास ते पृथ्वीच्या समतोलाच्या दृष्टीने देखील फायदेशीर ठरू शकतात. आणि ज्यांना मांस खायचेच आहे त्यांनी गोमांस खाल्ले नाही म्हणून ते मरत नाहीत. किंवा गोमांस खाल्लेच नाही म्हणून लवकर मेला असेही ऐकिवात नाही. हे लक्षात ठेवावे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्यास सन्मार्गाने जगण्याचा अधिकार आहे. मनुष्य प्राणी जाणिजे जो धर्म...!

2 comments: