Saturday, April 6, 2019

पवारांचा उत्तरार्ध


ज्या व्यक्तीची उभी हयात केवळ राजकारण करण्यात आणि इतर पक्षातील राजकारणी मंडळींची घरे फोडण्यात गेली, त्या आदरणीय पवार साहेबांच्या घरात गृहकलह सुरु असल्याच्या बातम्या ऐकिवात आहेत. याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादम्यान वर्धा येथील सभेमध्ये भाष्य केले. पंतप्रधानांनी निवडणुकांच्या तोंडावर केलेले भाष्य राजकीय असले, तरी यामधील सत्यता पडताळणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गृहकलह हा शब्द काही नवा नाही. त्यात काका-पुतणे हा सत्ता संघर्ष महाराष्ट्राने आजवर अनेक वेळा अनुभवलेला आहे. आजवर महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांचा गृहकलह वेळोवेळी समोर आलेला आहे. यामध्ये नाईक, ठाकरे, मुंडे, क्षीरसागर कुटुंबातील काका पुतण्यांचा वाद आणि संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. राज्याच्या सर्व राजकीय घराण्यांमधील या सत्ता वादामध्ये कळत नकळत कुठे तरी पवार साहेबांचा हात होता अथवा असावा अशा आशयाच्या बातम्या देखील त्या त्या वेळेस महाराष्ट्राने ऐकलेल्या आहेत. मुंडे काका पुतण्याचा झालेला वाद आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेला प्रवेश हे याचे उत्तम उदाहरण आहे.

सुप्रिया सुळे यांच्या राजकारणातील प्रवेशापूर्वी पवारांच्या कुटुंबात एक वेगळेपणा जाणवत होता. सारेकाही अलबेल होते. परंतु सुप्रिया सुळे यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर हे चित्र बदलत गेले. पवार साहेबांची प्रत्येक गोष्ट आज्ञाधारपणे ऐकणाऱ्या अजित पवार यांनी पक्षामध्ये स्वतःचे वजन वाढवण्यास सुरुवात केली. त्यामुळे सत्ता काळात त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह जलसंपदा मंत्रालयासारखी ताकदवर खाती आली. पवार साहेब केंद्रात असताना राज्यातील राजकारणात अजित पवारांचा वरचष्मा वाढू लागला व कुटुंबातील नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात झाली. त्यामुळे ‘पेराल ते उगवते’ या उक्तीप्रमाणे पवार साहेबांच्या बाबतीत हेच घडत आहे.

देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा असलेला वरचष्मा लक्षात घेऊन वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधानाची पवार कुटुंबातील सध्याच्या राजकीय संघर्षावर भाष्य केले. कारण मोहिते पाटील पिता-पुत्राला शह देण्यासाठी पवार साहेबांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची केलेली घोषणा आणि त्यानंतर काही दिवसात घेतलेली माघार हा राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला होता. पवार साहेबांची माढ्यातून माघार आणि त्याचवेळी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची मावळमधील उमेदवारी यावरून झालेल्या राजकारणाचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी; राष्ट्रवादी पक्ष संघटना आणि कौटुंबिक ऐक्यावर शरद पवारांचा प्रभाव राहिला नाही असे म्हटले आहे. यामध्ये किती तथ्य आहे, हे पाहण्यासाठी पवार कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीतील पार्थ पवार आणि रोहित राजेंद्र पवार यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करावा लागेल.

रोहित राजेंद्र पवार हे पवार साहेबांचे नातू आहेत. ते जिल्हा परिषद सदस्य आहेत. मागील काही दिवसांपासून रोहित पवार हे सावलीसारखे आजोबांच्या सोबत फिरत आहेत. पवार साहेब देखील आपल्या नातवांना राजकारणाचे बाळकडू पाजत आहेत. यामध्ये पार्थ पवारांच्या तुलनेत रोहित पवार हे पवार साहेबांच्या अधिक जवळ असल्यासारखे जाणवते. पवार साहेबांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर रोहित पवार यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट देखील केलेली होती.

पवार कुटुंबातील ‘गृहकलह’ 

राज्यसभेतील खासदारकीच्या माध्यमातून पवार साहेबांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अजित पवार-सुप्रिया सुळे यांच्यातील वादाची चर्चा त्यावेळी सुरु झाली होती. पवार साहेबांचे राजकीय वारस अजित पवार आहेत असे वाटत असताना सुप्रिया सुळे यांचे राजकारणात आगमन झाले.

त्यानंतर २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे आघाडीचे सूत्र होते. मात्र, त्यावेळी केंद्रात मंत्री असलेल्या शरद पवार यांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिले. अजित पवारांचा पक्षात वाढता राबता पाहता शरद पवारांनी खेळलेली ही खेळी होती. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या तसेच पुणे जिल्ह्याच्या राजकारणात तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अजित पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फळी तयार झाली. दरम्यानच्या काळात अशा इतरही काही घटना घडत होत्या.

आजच्या घडीला पवार साहेबांच्या तिसऱ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे. यामध्ये पवार साहेबांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे पुत्र रोहित पवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्यातील राजकीय स्पर्धेची चर्चा होत आहे. रोहित यांनी उद्योजकतेच्या माध्यमातून आपले एक वेगळे आणि स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. याच माध्यमातून रोहित पवार यांनी बारामती तालुक्यातून स्व कर्तृत्वाने जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून ते आमदारकीची निवडणूक लढविणार असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणात नवीन असलेल्या पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा उमेदवारीसाठी अजित पवार  आग्रही होते. त्यामुळे हा सत्ता संघर्ष उदयास आला, यामध्ये पवार साहेबांना एकाच कुटुंबातील ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नको, असे म्हणून माढा मतदारसंघातून माघार घ्यावी लागली.

आजवर पवार साहेबांचे राजकारण सहजरित्या कोणालाच समजू शकलेले नाही. ते अजित पवारांना कितपत समजले आहे अथवा अजित पवारांनी पवार साहेबांकडून कोणत्या प्रकारचे धडे घेतले आहेत, हे त्यांच्या पार्थ पवार यांच्या उमेदवारी हट्टावरूनच दिसून येते. कारण मावळमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पवार साहेबांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले होते. त्यावेळी पवार साहेब अगदी सहजपणे म्हणाले की, “ठेच लागल्याशिवाय माणसाला राजकारण कळत नाही.” त्यामुळे पवार साहेबांच्या उत्तरार्धात त्यांच्या कुटुंबात सुरु झालेला हा गृहकलह त्यांना व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणत्या दिशेने घेऊन जातो, हे येणारा काळच ठरवणार आहे.

No comments:

Post a Comment