Friday, November 2, 2018

... आणि ‘प्रणव’ काळ

आज २५ जुलै रोजी प्रणव दा देशाच्या सर्वोच्च नागरी पदावरून सन्मानाने निवृत्त होत आहेत. येथे योगायोग असा आहे की, यु. पी. ए. सरकारच्या काळात राष्ट्रपती पदावर विराजमान झालेले प्रणव मुखर्जी आज एन. डी. ए. सरकारच्या काळात सन्मानपूर्वक, महामहिम राष्ट्रपती म्हणून निवृत्त होत आहेत. परंतु प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय कारकीर्दीचा एकूणच आढावा घेतला, तर देशाच्या राजकारणात गेली पाच दशके, राजकारणाचा गाढा ओढण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रणव दा निवृत्त झाले, तरी त्यांचा मार्गदर्शनपर राजकीय अनुभव देशासाठी महत्वाचा ठरणार आहे.
देशाचे मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निरोप देण्यासाठी संसदेच्या सेन्ट्रल हॉलमध्ये निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निरोप समारंभास सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. राष्ट्रपती पद हे देशाचे असते, त्यामुळे येथे पक्ष भेद बाजूला ठेवत, सवर्पक्षीय खासदार प्रणव मुखर्जी यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे निरोपाच्या भाषणावेळी प्रणव मुखर्जी यांना देखील गहिवरून आले.

मागील पाच दशकांपासून प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रीय आहेत. कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या मुखर्जी सरांनी काही काळ पत्रकार म्हणून देखील काम केलेले आहे. राजकारणात आल्यानंतर देशाच्या अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, रक्षामंत्री, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पदाचा कारभार पाहणाऱ्या प्रणव मुखर्जींना संसदीय कामकाजाचा भरपूर अनुभव आहे. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष ते लोकसभेतील सभागृह नेते, तसेच देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी सर्वोत्तम होती. त्यामुळेच २००८ साली भारत सरकारने देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म विभूषण’ देवून त्यांचा सन्मान केलेला आहे.

देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान पदाने मात्र हुलकावणी दिलेली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव तसेच मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. १९९१ साली भारतावर मोठे आर्थिक संकट आले होते, भारताने खासगिकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण आमलात आणले. त्यावेळी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रणव मुखर्जी होते, तर रिजर्व बँकेचे गव्हर्नर मनमोहन सिंग होते.

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतलेल्या मुखार्जीना इंदिराजी आदरणीय आहेत. त्यामुळेच इंदिराजीनंतर पक्षांतर्गत आणि बाहेरही सर्व राजकीय नेत्यांसमवेत मुखर्जी यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर, इंदिरा गांधी यांच्या राजकीय वाटचालीचा अनुभव असलेल्या प्रणव मुखर्जी यांनीच सोनिया गांधी यांना वेळोवेळी दिशा दाखवलेली आहे. आणि यामुळेच मुखर्जी यांची कारकीर्द बहरत गेली. याचाच प्रत्यय म्हणून वैश्विक स्तरावर भारताच्या “लूक इस्ट आणि अॅकट वेस्ट” धोरणाचा अवलंब करत प्रणवदांनी अनेक देशांशी भारताचे संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. प्रणव मुखर्जी परराष्ट्रमंत्री असताना अमेरिकेशी झालेला अणू करार आणि राष्ट्रपती झाल्यानंतर व्हिएतनामशी भारताचे वाढलेले संबंध हे त्याचेच उदाहरण आहे. आसियान, ब्रिक्स आणि सार्क संघटनांमधील देशांच्या नेत्यांच्या वयक्तिक ओळखी आणि राजकीय अनुभव यांचा समन्वय साधत प्रणव मुखर्जी यांनी काम केलेले आहे.

देशाचे रक्षामंत्री आणि अर्थमंत्री म्हणून प्रणव मुखर्जी यांनी केलेली कामगिरी देखील उल्लेखनीय आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक मंदीचे सावट असताना देशाच्या अर्थ मंत्रालयाचा कारभार काही काळ प्रणव मुखर्जी यांनी अगदी योग्यरित्या पाहिलेला आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या उभारणीसाठी तसेच इतरही महत्वाच्या योजना आमलात आणण्यासाठी मुखर्जी यांनी प्रयत्न केलेले आहेत.

महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

१९६९ पासून देशाच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या प्रणव मुखर्जी यांना, त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पंतप्रधान पदाने जरी हुलकावणी दिलेली असली, तरी देशाच्या सर्व्वोच्च नागरी पदावर विराजमान होण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. २५ जुलै २०१२ रोजी प्रणव मुखर्जी देशाचे १३ वे राष्ट्रपती झाले. प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये काही संवैधानिक बदल आणि भारतीय न्याय व्यवस्थेविषयीचे बदल आहेत. तसेच अजमल कसाब, अफजल गुरु आणि याकुब मेनन यांचा दयेचा अर्ज फेटाळून भारत सरकार दहशदवादाविरुद्ध किती कठोर भूमिकेत आहे, हे प्रणव मुखर्जी यांनी दाखवून दिले आहे. भारताचे राष्ट्रपती पद हे रबरी शिक्क्यासारखे आहे, असे म्हणतात, याला अपवाद म्हणाल तर, श्री. राजेंद्र प्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच सर्वांचे लाडके राष्ट्रपती राहिलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची नावे घ्यावी लागतील. परंतु राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या या सर्वांचा काळ वेगळा होता. आणि प्रणव मुखर्जी यांचा काळ वेगळा आहे. प्रणव मुखर्जी यांची राजकारणाची हयात ज्या पक्षात गेली, त्याच पक्षाचे सरकार सत्तेत नसताना त्यांना तब्बल तीन वर्षे राष्ट्रपती म्हणून काम करावे लागले. तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची असंवैधानिक घटना घडू न देता, आणि राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेस जपत, प्रणव मुखर्जी यांनी काम केले आहे. त्यामुळे संविधानास सर्वोच्च स्थान देत, पक्ष, संघटना आणि विचारसरणी या पलीकडे जावून राष्ट्रपती पदाचा मान राखणाऱ्या प्रणव मुखर्जी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय अनुभवाचा वेळोवेळी लाभ झाल्याचे सांगत असतात.

आज प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपलेला आहे. परंतु त्यांचा आजवरचा दांडगा राजकीय आणि संसदीय अनुभव पाहता ‘प्रणव काळ’ अजुनही संपलेला नाही. त्यामुळे भविष्यातही प्रणव मुखर्जी देशाचे माजी राष्ट्रपती म्हणून सरकारला नक्कीच मार्गदर्शन करत राहतील.

(माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर लिहिलेला लेख )

- नागेश कुलकर्णी 

No comments:

Post a Comment