Friday, November 2, 2018

देव देतो, पण कर्म नेते ...

काही जणांच्या बाबतीत 'देव देतो, पण कर्म नेते'. परंतु येथे कर्मानेचं कमावलेले कर्मानेच गमावले आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी आलेल्या छगन भुजबळांना प्रसार माध्यमांमधून पाहिलं आणि हा विचार मनात आला. एकेकाळी महाराष्ट्र राज्याचा उप मुख्यमंत्री राहिलेला हा व्यक्ती असेल, असे त्यांच्याकडे पाहून वाटत देखील नव्हते.

वाढलेली पांढरी शुभ्र दाढी, थकलेला चेहरा, एकेक पावूल सांभाळून टाकणारे, बोलताना धाप लागणारे, कोणी विचारलं की कसे आहात?, तर केवळ स्मित हास्य करून, ठीक! असं म्हणणारे, इतरांचा आधार घेवून चालणारे हे कोण गृहस्थ आहेत? असा प्रश्न पडावा, अशी अवस्था भुजबळांची झाली होती. भुजबळांकडे खरोखर पहावत नव्हते. त्यांचा तो पूर्वीचा रुबाब, भाषणाला उभं असताना बोलण्याची पद्धत, ऐटबाज राहणीमान आठवले आणि त्यांची आजची स्थिती आठवली की, एवढेच म्हणावेसे वाटते की, 'देव देतो, पण कर्म नेते', ही म्हण यांना सार्थ ठरते.

छगन भुजबळांच्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात झाली, ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात. शिवसेनेच्या स्थापनेनंतर मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या बरोबरीने निष्ठेने काम करणारे भुजबळ अल्प काळात प्रसिद्ध झाले होते. शिवसेना पद्धतीने कोणाला ही नडण्याची त्यांची पद्धत, भाषणाची भाषाशैली, करारीपणा यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे मन जिंकले होते. त्याचीच फलश्रुती म्हणून मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक, महापौर आणि विरोधी पक्ष नेता ही महत्वाची पदे त्यांनी अल्प काळात भूषवली होती. भुजबळांच्या रूपाने मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला प्रथमच महापौर पद मिळाले होते. शिवसेना प्रमुखांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून पुढे भुजबळांची राजकीय कारकीर्द आणखी बहरत गेली, आमदार झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. परंतु सत्तेचा काटेरी मुकुट प्रत्येक राजकीय नेत्यास सतत खुणावत असतो. म्हणूनच की काय,  त्याच दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भुजबळ यांच्या मध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले. त्यामुळे भुजबळांनी आपल्यातील शिवसैनिक जिवंत ठेवत, शिवसेनेशी फारकत घेतली. त्यावेळी म्हणजेच १९९१ साली महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ सुरु होती. छगन भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार यांच्यासमवेत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या भुजबळांना शरद पवारांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पद मिळाले.

परंतु १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांनी भुजबळांचा पराभव केला. सत्ता संघर्ष आणि सत्तेचा काटेरी मुकुट निष्ठा, नितीमुल्ये आणि प्रतिष्ठा कशी वेशीला टांगतो, याचे हे उदाहरण होते. १९९५ साली महाराष्ट्रामध्ये शिवसेना – भाजपचे सरकार आले. आणि याच वेळी भुजबळ विधानसभेवर देखील निवडून येवू शकले नाहीत. कॉंग्रेसने त्यांना विधान परिषदेवर निवडून आणले, आणि विरोधी पक्षनेते पदी त्यांची वर्णी लावली. विरोधी पक्ष नेता म्हणून देखील भुजबळांनी कारकीर्द गाजवली. 

पुढे १९९९ साली शरद पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडले, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्याच वेळी छगन भुजबळ देखील काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या छगन भुजबळांचे स्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आजही भक्कम आहे. दरम्यान स्वतःचे राजकीय कौशल्य वापरून मुत्सद्दी राजकारण करणाऱ्या भुजबळांनी समता परिषदेची स्थापना केली. समता परिषदेच्या माध्यमातून ओ. बी. सी. समाजातून नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फळ म्हणून सत्तेचा काटेरी मुकुट परत एकदा भुजबळांच्या सभोवती फिरू लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, गृह मंत्री, पर्यटन मंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशी महत्वाची पदे भुजबळांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये भूषवली. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एक निष्ठ राहात, त्यांनी पक्ष देखील वाढवला. परंतु यालाच म्हणतात, “ देव देतो, पण कर्म नेते”. एवढा मोठा राजकीय अनुभव पाठीशी असताना, छगन भुजबळ यांना नंतरच्या काळामध्ये म्हणजेच २००८ सालानंतर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षांतर्गत आणि बाहेर देखील धडपड करावी लागली.

सत्तेचा काटेरी मुकुट स्वस्थ बसू देत नाही, असे म्हटले जाते. २००८ सालानंतर महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम मंत्रालय भुजबळांकडे आले, आणि परतीचा फेरा सुरु झाला. याच कालावधीत भुजबळांनी कोट्यावधींची माया जमवली, असे म्हणतात. मुलगा आणि पुतण्या यांना देखील राजकारणात आणले. आजच्या दिवशी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीमध्ये शिक्षण संस्था, कॉलेज, कोट्यावधींचे बंगले, जमीन आणि बरच काही आहे, असं म्हटल जातं. त्यामुळेच भुजबळांच्या संपत्तीवर ई. डी. ची जप्ती आली, आणि भुजबळांना अटक झाली. आज इतकी वर्षे करारी बाण्याने राजकीय आयुष्य जगलेला हा व्यक्ती एका कैद्याचे आयुष्य जगतो आहे. तुरुंगातून बाहेर निघण्यासाठी केविलवाणी धडपड करतो आहे. का? कशासाठी? कशामुळे? असे अनेक प्रश्न विचारले जातात. मग उत्तरादाखल भुजबळ समर्थक असे म्हणतात की, भाजपने सूड बुद्धीचे राजकारण करून छगन भुजबळांना अडकवले आहे. तर विरोधक म्हणतात की, केलेल्या घोटाळ्यांचे हे फळ आहे. तर काहींना असे वाटते की, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तह झालेला असून, भुजबळांचा राष्ट्रवादीने बळी दिला आहे. आणि आपल्या इतर नेत्यांना वाचवले आहे. ते काहीही असो, भुजबळांवरचे आरोप अजून सिद्ध व्ह्यायचे आहेत. परंतु त्यांनी जमवलेली संपत्ती आणि त्यांचा एकूणच आर्थिक डोलारा पाहता, ते या प्रकरणातून सुटतील असे वाटत नाही. हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच की, एखादा व्यक्ती व्यक्तिगत कितीही हुशार असला, अथवा मोठा असला तरी त्याच्या कर्मानुसार त्याला फळ मिळत असते.

(हा लेख २०१७ सालच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी लिहिलेला आहे.)

- नागेश कुलकर्णी 

No comments:

Post a Comment