Friday, November 2, 2018

कच्चा लिंबू आणि लैंगिक शिक्षणाची गरज


चित्रपट हा समाज मनाचा आरसा असतो आणि दिग्दर्शक, लेखक समाजामध्ये जे घडत आहे, त्यास चित्रपटामधून रितसर मांडण्याचा प्रयत्न करत  असतात. कच्चा लिंबू  हा एक वेगळ्याच धाटणीतील चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय आज चर्चेत आला आहे. आपल्या समाजामध्ये ज्या विषयावर मोकळेपणाने कधी बोललेही जात नाही. तो विषय घेवून हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. एखाद्या विशेष बालक (स्पेशल चाईल्ड) असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील हा विषय तेवढाच महत्वाचा आहे, जेवढा एखाद्या सामान्य व्यक्तीच्या जीवनात आहे, हे या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. 

भारतामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत जास्त काही बोलले जात नाही. कधीच नाही. या विषयावर कधी ही पालक आणि पाल्य यांच्यामध्ये संभाषण होत नाही. पौगंडावस्थेतील मुला -मुलींना या विषयाची योग्य वयात आणि योग्य वेळी माहिती दिली जात नाही. काही वेळा तर कुटुंबासमवेत टी. व्ही. पहात असताना, टी. व्ही. वर एखाद वेगळ दृश्य दिसू लागलं, तर आपण चॅनल बदलतो. परिणामत: आजच्या दिवशी कमी वयातच शहाणी होत चाललेली नवी पिढी आणि पाल्यांना वेळ देवू शकत नसलेले पालक यांच्यामधील दरी वाढत चाललेली आहे. पालक आणि पाल्य यांच्यामधील संवाद हरवत चाललेला आहे. 

सेक्स हा निसर्ग नियमावलीतील विषय आहे. आपल्या समाजातील गरीब, मध्यम वर्गीय अथवा श्रीमंत कुटुंब, कोणीही असो, प्रत्येकाची सुखाची व्याख्या काय आहे? लग्न –संभोग –प्रजनन? या पलीकडे सुख आहे की नाही ? जर ते असेल, तर ते आपण आपल्या भावी पिढ्यांना वारसारूपाने देत असतो. परंतु हे सुख भावी पिढ्यांना देत असताना, आपण त्यांच्याशी संवाद साधणे महत्वाचे आहे. वाढत्या वयातील मुला मुलींना लैंगिक शिक्षणाबाबत अवगत करणे, हे पालकांचे कर्तव्य आहे. परंतु आपला समाज या विषयापासून दूर पळताना दिसून येतो. सेक्स, हस्तमैथुन किंवा तत्सम शब्द आणि विषय कुटुंबासमवेत आपण कधीच बोलत नाही. असे का ? असा प्रश्न अनेक वेळा आपल्या पाल्यांना पडत असतो. कधी कधी त्यांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे ते स्वतः च शोधण्याचा प्रयत्न करतात. मग त्यात गुंतत जातात! गुरफटतात!! आणि कधी कधी तर विषय समजावून घेण्याच्या प्रयत्नात, या विषयाच्या आहारी देखील जातात. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. 


योग्य वयात आणि वेळीच हा विषय आपल्या पाल्यांना जर समजला, तर त्याचे वाईट परिणाम होणार नाहीत. आजच्या दिवशी वाढत्या लोकसंख्येमध्ये व्यभिचारी आणि बलात्कारी वृत्ती वाढत चालली आहे. पौगंडावस्थेतील पाल्य या विषयावर स्वत: च्या प्रश्नाची उत्तरे शोधत असताना पॉर्न पहाणे, त्या सारखं वागण्याचा प्रयत्न करणे, या अशा पाश्चात्य संस्कृतीकडे ओढली जात आहेत. यामध्ये चूक कोणाची आहे? पालकांची का पाल्यांची? तर नक्कीच पाल्य चुकीचा वागतोय यामध्ये पालकांची चूक आहे. आपण एखादा विषय जेवढा झाकून ठेवतो, तेवढा तो वाकून पाहण्याची मनस्थिती बाल्य अवस्थेत असते. त्यामुळे पाल्यांच्या आधी पालकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. तसेच आपल्या पाल्यांच्या प्रश्नांची उत्तरे वेळीच देणे आवश्यक आहे.

या पूर्वी देखील वाढत्या वयातील/ पौगंडावस्थेतील मुलांच्या मनस्थितीवर भाष्य करणारे काही चित्रपट येवून गेले आहेत. बालक पालक हा त्यापैकीच एक असलेला चित्रपट आहे. बालक पालक या चित्रपटातील बाल कलाकारांचे विषयाबाबतचे कुतूहल आणि त्यांचे प्रश्न हे केवळ चित्रपटापुरते मर्यादित नाहीत. वाढत्या वयातील आपल्या सभोवती असलेल्या सर्व मुला –मुलींना पडणारे हे प्रश्न आहेत. त्यांचे पालक म्हणून किंवा मित्र म्हणून आपण त्यांना समजावणे आवश्यक आहे. 

'कच्चा लिंबू' हा चित्रपट जयवंत दळवी यांच्या 'ऋणानुबंध' या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटामधून दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी ऐंशीच्या दशकातील एक कुटुंब दाखवलेलं आहे. ज्यांच्या घरामध्ये एक विशेष बालक (स्पेशल चाईल्ड) आहे. मतीमंद असलेल्या या मुलाच्या वाढत्या वयातील वाढत्या लैंगिक गरजांवर भाष्य करणारा हा एक उत्तम चित्रपट आहे. या विषयास आजवर कोणी हात घातला नव्हता. हा चित्रपट करून, अशा संवेदनशील विषयावर लोकांना बोलत केल्याबद्दल दिग्दर्शक प्रसाद ओक आणि सर्व कलाकारांचे आभार मानावे लागतील. चित्रपटामध्ये रवि जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय हृदयाला स्पर्श करून जातो. विशेष बालकास (स्पेशल चाईल्ड) हस्तमैथुन करवून देणारा बाप आणि “तु बाळ आहेस माझं आणि मी आई आहे तुझी, आई आहे ना मी तुझी, हे कधीच विसरायचं नाही हं बच्चू” असं समजावून सांगणारी आई. आणि मागील १५ वर्षांपासून स्वतः साठी सुख शोधणारी एक विवाहित स्त्री पाहिली, की या विषयाची गंभीरता आणि महत्व लक्षात येते.

ऐंशीच्या दशकात पौगंडावस्थेतील एका मतिमंद बालकाच्या वाढत्या लैंगिक गरजा पूर्ण करताना आई बापाची भूमिका काय होती, हे या चित्रपटामधून दाखवण्यात आले आहे. मग आजच्या दिवशी एकविसाव्या शतकात, आपल्यासारख्या सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना लैंगिक शिक्षण का देवू नये? हा बोध या चित्रपटामधून आपण घ्यायला हवा. कारण आपल्या नात्यांचे बंध टिकवायचे असतील, तर हा विषय पालकांनी आपल्या पाल्यांना समजावून सांगणे ही बदलत्या काळाची गरज आहे.

(हा लेख कच्चा लिंबू चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी, मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे.)

- नागेश कुलकर्णी

No comments:

Post a Comment