Friday, November 2, 2018

देशाच्या राजकीय पटलावर

देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जी काही राजकीय उलथापालथ सुरू आहे, ती पाहता आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न पाहता, देशामध्ये एकहाती सत्ता केंद्र येवू पाहात आहे. सध्या कोण कोणासोबत आणि कोण कोणाविरुद्ध राजकारण करतेय याचा थांगपत्ता लागणे कठीण झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीस अजून २ वर्षे अवकाश आहे. तरीदेखील सत्तेसाठी एन.डी.ए. मध्ये येणाऱ्या सहयोगी पक्षांची संख्या वाढत आहे. हे आपल्याला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी दिसून आले. 

महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांना गोंजारत युतीची मित्र पक्षांसहित सत्ता स्थापन झाली. परंतु हा सेना भाजपचा संसार सुरळित सुरू आहे, असे अजिबात वाटत नाही. तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये पी.डी.पी. भाजप युती म्हणजे विळा आणि भोपळ्याची पडलेली गाठ. आजच्या एन.डी.ए.मध्ये सहयोगी मित्रपक्षांपेक्षा भाजपचे वजन जास्त आहे. आणि कालपरत्वे ते वाढतच आहे. त्यामुळे सहाजिकच सत्ताकेंद्राच्या दिशेने येणाऱ्या राजकीय पक्षांची संख्या वाढत आहे. परंतु यावेळी शिवसेना आणि पी.डी.पी. सारख्या प्रादेशिक राजकीय पक्षांची अवस्था मात्र सांगता ही येईना आणि दाखवता ही येईना, अशी झाली आहे. 

बिहारच्या मुख्यमंत्रिपदी महागठ्बंधनचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेल्या नितीश कुमार यांनी काँग्रेस आणि राजदला सोडचिठ्ठी देत अचानक भाजपशी घरोबा केला. तामिळनाडूमध्ये ए.आय.डी.एम.के.चे दोन्ही गट एकत्रित आले, अन ते आता एन.डी.ए.मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. तेलंगणामध्ये देखील मुख्यमंत्री राव यांची एन.डी.ए.शी जवळीक वाढतेय. पूर्वोत्तर राज्यातील काही स्थानिक प्रादेशिक पक्ष एन.डी.ए. किंवा भाजपशी जवळीक साधून आहेत. हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आणि त्यासाठी एन.डी.ए.ने रणशिंग फुंकलेले आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सेना आणि भाजपा यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.  

सेना- भाजप राजकीय सत्ता संघर्ष :
शिवसेना आणि भाजप हे समविचारी राजकीय पक्ष आहेत, असे म्हणतात. या विचारांच्या आधारावरच यांची २५ वर्षे युती होती. परंतु विचारांना आणि तत्वांना मुठमाती देत, यांचा हा सत्ता संघर्ष सुरु झाला आहे. शिवसेना - भाजपमधील अंतर्गत कलह आणि एकमेकांविरोधात वरचढ होण्याची भूमिका याचा खरा राजकीय फायदा विरोधकांना होवू शकतो. परंतु राजकीय इच्छा शक्ती संपलेल्या, मरगळ आलेल्या विरोधकांना याचा फायदा घेता येत नाहीये. 

एक प्रकारे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देवून, भाजपने सेनेवर वचक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नितीशकुमार यांना परत एन.डी.ए.मध्ये घेणे हा शिवसेनेसाठी एक प्रकारचा सुचक इशाराच आहे. परंतु सेना ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांची सेना स्टाईल बडबड सुरूच असते. 

‘रा’ राजकारणाचा आणि राष्ट्रवादीचाही...:
महाराष्ट्रातील राजकारण म्हटले की शरद पवार साहेब हे नाव आधी डोळ्यासमोर येते. पवार साहेबांशिवाय महाराष्ट्रातील राजकारणाचे पानही हलत नाही असे म्हणतात. २०१४ साली विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका असो वा काँग्रेसपासून फारकत घेण्याची भूमिका असो. प्रत्येक बाबतीत राजकारण आणि राष्ट्रवादी हे सूत्र खरेच वाखाणण्याजोगे होते. सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेस पाठिंबा असो अथवा बारामतीतील पवार मोदींचा व्हॅलेंटाईन डे असो. पवार साहेबांच्या राजकीय खेळीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम दिसून येतो. यामुळे शिवसेनेला खेळवत ठेवणे आणि त्याचबरोबर युती सरकारच्या सत्तेवर टांगती तलवार असल्याचे चित्र निर्माण करणे यामध्ये राष्ट्रवादी अग्रेसर असते. महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रणी स्थान असलेल्या पवार साहेबांकडून सध्या सत्तेत असलेले सेना- भाजपसह मित्र पक्षांचे युती सरकार, किती दिवस सत्तेत राहू शकते, याबाबत वेळोवेळी केवळ भाष्य केले जाते. विषय चर्चिला जातो. त्यामुळे काँग्रेसपेक्षा सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात जास्त चर्चिला जातो. 

मरगळलेली काँग्रेस :
महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेल्या अशोक चव्हाणांना बरीच आव्हाने पेलावी लागत आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसची सद्य स्थिती पाहता राज्य पातळीवरील आणि देश पातळीवरील काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. शेवटी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पक्षावर आत्मपरीक्षणाची वेळ येते म्हणजे विचार व्हायलाच हवा. पक्षांतर्गत बंडाळी, नारायण राणेंच्या हालचाली आणि केंद्रीय नेतृत्व पाहता जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर काँग्रेस कितपत पाण्यात आहे हे पाहणे आवश्यक आहे. बुडत असलेल्या जाहजातील उंदरे देखील पटापटा बाहेर उद्या मारत असतात. मरगळलेल्या काँग्रेस पुढे हे सर्वात मोठे आव्हान आहे की, त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बांधून ठेवणे. इतर राजकीय पक्षांमध्ये जावू ण देणे. परंतु काँग्रेस या पातळीवर देखील सध्या तरी हरलेली दिसतेय.

भारतीय राजकारणाचा नवा चाणक्य : 
भाजपसह मित्र पक्षांची देशातील १९ राज्यांमध्ये सत्ता आहे. भाजपचे १३ मुख्यमंत्री आहेत. आजच्या दिवशी गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान ते एखाद्या गावातील सरपंच या पदांवर भाजपची सत्ता आहे. याचे श्रेय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना द्यावे लागेल. 

गोवा, मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करणे, बिहारमधील सत्तांतर, अरूणाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधील सत्ता बदल आणि अहमद पटेल यांच्या राज्यसभेच्या एका जागेसाठीचे राजकारण या सर्व राजकीय खेळींचा चाणक्य म्हणून अमित शहा यांच्याकडे पहिले जाते. आजच्या दिवशी काँग्रेस मुक्त भारताच्या दिशेने जाणारे राजकारण आणि विरोधकांमध्ये वाढत चाललेली फुट यामागे अमित शहा आहे. भाजपला एक हाती सत्ता मिळवून देण्याच्या प्रयत्नात बरीच राजकीय उलथा पालथ होताना दिसून येत आहे.

देशाच्या राजकीय पटलावर तत्व आणि विचारसरणी यांना वेशीवर टांगत, अगदीच वेगळ्या पद्धतीचे राजकारण सुरु आहे. राजकारणाची दिशा बदलते आहे. विरोधकांच्या मते, एकहाती सत्ता केंद्र सत्तेत येवू पहात आहे, जे की लोकशाहीस घातक आहे. 

(हा लेख २०१७ सालातील राजकीय घडामोडीवर लिहिलेला आहे.)

- नागेश कुलकर्णी 

No comments:

Post a Comment