Friday, March 29, 2019

अशी बेताल वक्तव्ये कोण थांबवणार?

सोशल मीडियावर स्वतःच्या नावापुढे चौकीदार लावून मिरवणारे भाजप प्रवक्ते अवधूत वाघ हे बेताल वक्तव्ये करण्यामध्ये पहिल्यापासून अग्रेसर आहेत. त्यांनी यापूर्वी देखील अशी काही वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांनी यावेळी केलेले वक्तव्य दुसऱ्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया जरी असले, तरी ते भाजपच्या संस्कृतीस शोभेल असे वक्तव्य नव्हते. त्यामुळे पक्ष्याच्या प्रवक्त्यांनीच केलेली अशी वक्तव्ये, एक दिवस पक्षाच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाहीत. 

मराठा क्रांती वॉरीयर या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेल्या ट्विटला उत्तर म्हणून, भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी विचित्र तर्क जोडत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबाबत वादग्रस्त ट्विट केले. तसेच एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. या ट्विटमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा अवधूत वाघ यांनी लावारिस असा उल्लेख केला आहे. “आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात” असे अवधूत वाघ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षाने त्यांचे हे वयक्तिक मत असल्याचे सांगून, स्वतःचे हात झटकले आहेत. 

मराठा क्रांती वॉरीयर या ट्विटर हॅण्डलवरून, ‘लावारिस असा उल्लेख भाजपच्या लोकांना का झोंबतो’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. सोशल मीडियावर अशाप्रकारे रोज अगणित प्रश्न विचारले जातात. बड्या नेते मंडळींना ट्रोल केले जाते. परंतु त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्याने एवढ्या खालच्या पातळीवर उतरून अशा प्रकारची उत्तरे देऊन वादाला तोंड फोडणे योग्य नाही. कारण मीडियामध्ये अशी वक्तव्ये ब्रेकिंग न्यूज बनण्यास जास्त वेळ लागत नाही. त्यात मीडियाकडून अशी वाचाळ वक्तव्ये ही त्या प्रवक्त्याच्या माध्यमातून, त्या पक्षाचीच भूमिका असल्यासारखे चित्र रंगवले जाते. त्यामुळे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्यांना न शोभणारी भाषा बोलून अवधूत वाघ यांनी पक्षाला अडचणीत आणले आहे. 

वाघ यांची बेताल वक्तव्ये करण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते, तसेच पंतप्रधान मोदींना विष्णूचा अवतार असे सांगून, प्रसारमाध्यमांना एकप्रकारे नवीन खाद्य पुरवले होते. त्यामुळे अशी भोवणारी वक्तव्ये करणाऱ्या प्रवक्त्यांबद्दल प्रत्येक पक्षाने वेळीच निर्णय घेणे आवश्यक आहे. खरे तर भाजपने अशी चीड आणणारी आणि अपमानजनक वक्तव्ये करणाऱ्या प्रवक्त्याला जाब विचारून, पदावरून दूर करणे अपेक्षित आहे. परंतु भाजपने असे न केल्यास, प्रवक्त्याच्या या वक्तव्याशी पक्ष सहमत आहे, असा संदेश जनतेमध्ये जाणार आहे. वाघ यांना यापूर्वी देखील त्यांच्या बेताल वक्तव्याची किंमत मोजावी लागली होती, त्यावेळी पक्षाने त्यांना काही काळासाठी प्रवक्ते पदावरून दूर केले होते. परंतु असे असताना देखील शहाणे न झालेल्या वाघ यांनी यावेळी परत स्वतःच्या बेताल बडबडीने पक्षाला अडचणीत आणलेले आहे. 

अशी बेताल वक्तव्ये करणारे वाचाळ वीर फक्त भाजपमध्येच आहेत असे नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेसह मनसेमध्ये देखील असे वाचाळ वीर आहेत. ज्यांनी त्यांच्या पक्षाला वेळोवेळी अडचणीत आणलेले आहे. यापूर्वी भाजपचे सहयोगी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैन्यातील जवानांच्या पत्नींबद्दल वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. दुसरीकडे वाचाळ आणि बेताल वक्तव्ये करण्यामध्ये पदवी घेतल्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड बडबडत असतात. अशा प्रवक्त्यांना वेळीच आवर घालणे हे प्रत्येक पक्षाला जमले पाहिजे.

खरे तर समाज माध्यमात वावरत असताना आपण काय बोलतो?, काय लिहितो? याबाबत प्रत्येकाला भान असणे गरजेचे असते. त्यात राजकारणात तुम्ही एखाद्या पक्षाची भूमिका मांडत असाल तर तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. कसला ही तोल ढळू न देता, एक सोजवळ आणि तेवढीच स्वतःच्या पक्षाची बाजू मजबूतपणे मांडणारी भाषा बोलणे हे प्रवक्त्याने काम असते. परंतु आजच्या या सोशल मीडियाच्या जीवनात सर्व पक्षांचे कार्यकर्ते स्वतः पक्ष प्रवक्ते असल्यासारखे स्वतःच्या पक्षाची बाजू मांडताना दुसऱ्यांवर अगदी खालच्या थराला जाऊन अपशब्द वापरत आहेत. हे कुठे तरी थांबायला हवे.

No comments:

Post a Comment