Wednesday, April 12, 2017

दुर्ग भ्रमंती - पराक्रमी प्रतापगड

         
टेहळणी बुरुज 
  पराक्रमी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाच्या यशोगाथा आपण इतिहासात वाचत असतो. इतिहासकारांकडून ऐकत असतो. शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमावर आधारलेली गीते, भारुडे अगदी अंगावर शहारा येईपर्यंत ध्यानमग्न होऊन आपण ऐकत असतो. परंतु या पराक्रमी प्रतापगडावर आजच्या घडीला केवळ पर्यटनासाठी जाणारे लोक, गडाचे पावित्र्य जपत नाहीत. गडावर वाढत्या पर्यटनामुळे कचरा वाढत आहे. गडावर वास्तू कमी आणि हॉटेल्स, खानावळी जास्त आहेत. त्यामुळे गडावरील वास्तुंचे पावित्र्य आणि इतिहासाची आठवण नाहीशी होत असून एक दुर्गप्रेमी म्हणून याबद्दल काळजी वाटणे सहाजिक आहे. आपण सर्वांनी पुढाकार घेवून पराक्रमी प्रतापगडाचे पावित्र्य जपण्यासाठी गडास भेट देवून तेथे घडलेला इतिहास जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
             सह्याद्रीच्या पर्वत रांगेत जावळीच्या खोऱ्यात दाट जंगलामध्ये प्रतापगड किल्ला बांधलेला आहे. प्रतापगडाच्या पूर्वेस महाबळेश्वर पठार आणि घनदाट जंगल आहे. पश्चिमेकडे पार घाट आणि कोकण परिसर आहे. प्रतापगड सातारा जिल्यातील गिरीदुर्ग आहे. वाई परिसरातील जावळीच्या खोऱ्यात असलेला प्रतापगड महाबळेश्वर- पोलादपूर रस्त्यावर महाबळेश्वर पासून जवळच २१ कि. मी. अंतरावर आहे. राज्य महामार्ग ७२ ने प्रतापगडावर पोचता येते. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधील टेंभावर हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. किल्ल्याची चढाई जास्त अवघड नसून, पायथ्यापर्यंत आपण वाहन घेऊन जावू शकतो. महाबळेश्वरहून पोलादपूरला जाणारी एस.टी. (बस) कुमरोशी गावाजवळ आपल्याला सोडते. तेथून प्रतापगडला जाता येते. आपले स्वतःचे वाहन घेवून गेल्यानंतर आपण गडाच्या पायथ्यापर्यंत जावू शकतो. गडाच्या पायथ्याजवळ पार्किंगची आणि इतर सर्व व्यवस्था आहे. गडावर पायी जायचे असल्यास पार किंवा कुंभरोशी गावातून वर जाण्यासाठी वाट आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत पोचण्याच्या वाटे व्यतिरिक्त गडावर जाण्यासाठी पाच चोर वाटाही आहेत. त्यातील काही वाट आज वापरात आहेत.

प्रतापगडाचा इतिहास : 
          प्रतापगडाच्या डोंगराला पूर्वी भोरप्याचा डोंगर असे म्हणत असत. इ. स. १६५७-५८ मध्ये चंद्रराव मोरे यांच्याकडील जावळी परिसर जिंकून घेतल्यानंतर परिसरातील काही किल्लेही शिवाजी महाराजांनी जिंकले होते. त्यानंतर महाराजांनी प्रतापगडाची उभारणी केली. इ. स. १६५७ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगड उभारणीचे काम सुरु झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाच्या उभारणीमध्ये विशेष लक्ष दिले होते. नीरा आणि कोयना नदीच्या परिसरातील प्रदेशाचे संरक्षण करता यावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून गडाची उभारणी करण्यात आली होती. इ. स. १६५६-५७ मध्ये प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची ऐतिहासिक भेट होऊन त्यात महाराजांनी अफजलखानाचा वध केला. अफझल खानाच्या वधाने शिवाजी महाराजांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानभर झाले होते. अफजलखान वधाचा सर्व लेखाजोखा आपण अनेक पुस्तकातून वाचत असतो. तसेच इतिहासकारांकडून ऐकत असतो. महाराजांच्या शौर्य गाथेची साक्ष असणारा प्रतापगड आणि त्याच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर म्हणजे आजच्या स्वराज्याची एक प्रकारे पायाभरणी आहे.
          जावळीच्या प्रांतात गेल्यानंतर पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. गडाकडे जात असताना राज्य महामार्ग ७२ सोडून थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूस एक पायवाट दिसते. तेथे रस्त्याच्या कडेला दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ येथे अफजलखानाची कबर आहे. अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला. त्यावेळी संभाजी कावजी यांनी अफजल खानाचे शिर (मुंडके) गडावरील बुरुजात पुरले, अशी इतिहासात नोंद आहे. प्रतापगडावरील मुख्य टेहळणी बुरुज आणि त्यावर फडकत असलेला स्वराज्याचा ‘भगवा ध्वज’ शिवप्रेमी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते.


गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
महादरवाजा :
गडाच्या पायथ्याजवळ गेल्यानंतर वाहनतळावरून गडाच्या दक्षिण दिशेस असलेल्या टेहळणी बुरुजाजवळून पुढे जाणाऱ्या पायवाटेने आपण महादरवाज्यात येऊन पोहोचतो. गडावरील या महादरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो. तसेच सुर्योदयावेळी उघडला जातो. महादरवाज्यातून गडाकडे आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूस चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. 

भवानी देवीचे मंदीर :
गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे गडाच्या मध्यावर भवानी मातेचे दगडी बांधकामातील मंदीर आहे. या मंदीरात देवीची काळया पाषाणाची मुर्ती आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधून शाळिग्राम शिळा (दगड) आणून त्यामधून घडवलेली आहे. मंदिरामध्ये या मूर्ती शेजारीच शिवाजी महाराजांच्या दररोजच्या पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. भवानी देवीच्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या बाजूस समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आहे. त्यापुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर मंदिराजवळ येऊन पोहोचतो.

केदारेश्वर मंदीर आणि बालेकिल्ला :
बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यानंतर समोरच केदारेश्वराचे मंदीर आहे. बालेकिल्ला परिसरात केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईंच्या वाड्याचे अवशेष आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची राज सदर आहे. याच ठिकाणी असलेल्या बागेच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. हा पुतळा गडावरील आकर्षक ठिकाण आहे. या पुतळ्याच्या जागेवर पूर्वी शिवाजी महाराजांचा राहता वाडा होता. प्रतापगडावरील या पुतळ्याचे लोकार्पण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते. महाराजांच्या या पुतळ्याशेजारी शासकीय विश्रामधाम आहे. बालेकिल्ल्याच्या ईशान्य दिशेस दोन तळी आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर दऱ्या खोऱ्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले कोयना नदीचे खोरे दिसते. प्रतापगडाचे शेवटचे टोक याठिकाणी आहे.

टेहळणी बुरुज :
गडाच्या पायथ्याकडून महादरवाजाकडे जात असताना एक वाट टेहळणी बुरुजाकडे जाते. टेहळणी बुरुजावरून जावळीच्या खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य पाहता येते. याठिकाणी असलेला ‘भगवा ध्वज’ परिसरात दुरूनच दिसतो.
         विमानातून अथवा हेलिकॉप्टरमधून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. महाराष्ट्रातील इतर गडांपेक्षा प्रतापगडास भक्कम आणि आज ही चांगल्या अवस्थेत असलेली तटबंदी आहे. तसेच प्रतापगडाला महादरवाज्याशिवाय घोरपडीचे चित्र असणारा दिंडी दरवाजा देखील आहे. या दरवाज्यास राज पहाऱ्याचा दरवाजा असे ही म्हणतात. दिंडी दरवाज्याच्या शेजारी जवळच रेडका बुरूज, त्यापुढे यशवंत बुरूज आणि सूर्य बुरूज आहेत. प्रतापगडावर कडेलोट करण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी दोषी आरोपींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येत असे. प्रतापगडावरुन पश्चिम दिशेस असलेला रायगड आणि दक्षिण दिशेस असलेला मकरंदगड उन्हाळ्यामध्ये दिसतो. परंतु हिवाळ्यामध्ये याठिकाणी भरपूर थंडी आणि धुके असते. त्यामुळे परिसरातील प्रदेश दिसत नाही. प्रतापगडावर दुर्ग प्रेमींनी हिवाळ्यामध्ये जाणे आणि गडाचा परिसर पाहणे योग्य आहे. प्रतापगडावर गेलेल्या दुर्ग प्रेमींना येथे खवय्येगिरीची मेजवानी देखील मिळते. गडावरील हॉटेल्समध्ये झुणका भाकरीसह खेडेगावातील सर्व खाद्य पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध आहेत.
      पराक्रमी प्रतापगडाचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानासोबत झालेल्या लढाईमध्ये खानाचा वध केला नसता तर इतिहासामध्ये अफजल खान वधानंतर घडलेल्या इतिहासाची वेगळी नोंद असली असती. त्यामुळे या इतिहासाची जाणीव ठेवून पराक्रमी प्रतापगडास भेट देवून आपण छत्रपतींच्या पराक्रमास त्रिवार मुजरा करणे आवश्यक आहे.


हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे. 

Monday, April 10, 2017

दुर्ग भ्रमंती - स्वराज्याचे तोरण ‘तोरणा’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक प्रमुख शिलेदार म्हणून तोरणा (प्रचंडगड) किल्ल्याची इतिहासात नोंद आहे. महाराष्ट्रातील सर्व गडांचा स्वतःचा असा विशिष्ठ इतिहास आहे. त्याचप्रमाणे तोरणा किल्ल्यावर देखील इतिहास घडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, त्यावेळी सर्वप्रथम तोरणा किल्ला सर केला असे इतिहास सांगतो. विजापूरच्या अदिलशहाच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळे या किल्ल्यास ‘तोरणा’ असे नाव दिले गेले, असे काही इतिहासकार सांगतात. तर काही इतिहासकारांच्या मते गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव ‘तोरणा’ असे ठेवण्यात आले होते. गड काबीज केल्यानंतर शिवाजी महाराजांनी गडाची पहाणी करत असताना गडाचा प्रचंड विस्तार पाहून, गडाचे नाव 'प्रचंडगड' असे ठेवले होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला तोरणा किल्ला अगदी गरुडाच्या घरट्यासारखा दिसतो. त्यामुळे त्यास ‘गरुडाचे घरटे’ असे देखील म्हणतात.
           पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बंगलोरकडे जात असताना नसरापूरहून वेल्हे या गावी पोहचता येते. वेल्हे हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेटहून वेल्हय़ाला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा आहे. तसेच पुण्याहून खडकवासला धरणापासून पुढे खानापूर गावाकडे जात असताना एक वाट पाबे घाटमार्गे वेल्हय़ाकडे जाते. या वाटेने देखील वेल्ह्यास पोहचता येते. स्वतःचे वाहन असेल तर या मार्गे जात असताना सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत वेल्ह्याकडे जाता येते.
           इतिहासामध्ये तोरणा किल्ला कोणी आणि इ. स. च्या कोणत्या षतकात बांधला याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु गडावर असलेल्या मंदिरांच्या जीर्ण अवशेषांवरून किल्ल्याच्या इतिहासाबाबत काही गोष्टी सांगण्यात येतात. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर कालांतराने हा किल्ला निजामशाही आणि आदिलशाहीच्या अखत्यारीत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी काही निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले. त्यावेळी तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना कोठी दरवाज्याजवळ सापडलेल्या धनाचा वापर करून मुरुंबदेवाच्या डोंगरावर असलेल्या राजगडाची उभारणी करण्यात आली होती. हाच राजगड पुढे अनेक वर्ष शिवाजी राजांच्या स्वराज्याची राजधानी होता. तसेच कोठी दरवाज्याजवळ सापडलेल्या धनाचा वापर तोरणा (प्रचंडगड) किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी देखील करण्यात आला होता.
         राजगडाला पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या तीन माच्या आहेत, त्याप्रमाणे तोरण्याला देखील झुंजार आणि बुधला या दोन माच्या आहेत. यातील झुंजार माची विस्ताराने छोटी असली तरी चढण्यास खुप अवघड आहे. राजगड आणि तोरण्याच्यामध्ये बुधला माची विस्तारलेली आहे. पावसाळ्यामध्ये बुधला माचीवर खुप मोठ्या प्रमाणात छोटे लाल रंगाच खेकडे आणि माकडे असतात.
            तोरणा (प्रचंडगड) हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर आहे. गडाची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत आहेत. तोरणा किल्ल्याच्या उत्तरेला कानद नदी आणि दक्षिणेला वेळवंडी नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. तोरणा किल्ला दगडी कातळामध्ये उभा आहे. गडावर जात असताना तोरण्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागतो. दगडी कातळात असलेल्या या दरवाजाला बिनीचा दरवाजा म्हणतात. बिनीच्या दरवाजातून पुढे गेल्यानंतर कोठीचा दरवाजा लागतो.

तोरजाई देवी मंदीर (कोठी दरवाजा) आणि मेंगाई देवी मंदीर : 
              कोठी दरवाज्यासमोरच्या दगडी चिरेबंदी तटामध्ये एक छोटे मंदीर आहे. त्यामध्ये तोरणजाई देवीची मूर्ती आहे. याच ठिकाणी खोदाई करत असताना, मावळ्यांना मोहरांचे हंडे सापडल्याची इतिहासात नोंद आहे. गडाकडे पुढे जात असताना वाटेवर तोरणा टाके आणि खोकड टाके आहेत. या टाक्यापासून थोडे पुढे चालत गेल्यानंतर समोर बालेकिल्ल्याचे अवशेष आहेत. त्यापुढे जवळच मेंगाई देवीचे मंदीर आहे. रात्री मुक्कामी येणारे दुर्गप्रेमी या ठिकाणी राहतात. तसेच नवरात्र उत्सव काळात, वेल्हे गावातील लोक गडावरती देवीचा नवरात्र उत्सव साजरा करतात. मेंगाई देवी मंदिरापासून झुंजार माचीकडे जात असताना हनुमान बुरुज, भेळ बुरुज, सफेली बुरुज माळेचा बुरुज, फुटका बुरुज आणि लक्कडखाना आहे.

झुंजार माची : 
          मेंगाई देवीच्या मंदिराकडून हनुमान बुरुजाकडे आल्यानंतर, बुरुजाच्या तटावरुन खाली उतरुन दिंडीच्या दाराने झुंजार माचीकडे जाता येते. झुंजार माचीकडे जाणारी वाट सोपी नाही. तसेच पावसाळ्यात झुंजार माचीकडे जाणे धोकादायक देखील ठरू शकते. त्यामुळे पर्यटकांनी सतर्क राहून झुंजार माचीकडे जाणे गरजेचे आहे. झुंजार माचीवर पावसाळ्यात खुप मोठ्या प्रमाणात धुके असते. तसेच उन्हाळ्यात माचीवरून दूरवरचा प्रदेश नजरेत येतो.

तोरणेश्वर महादेवाचे मंदिर :
          मेंगाई देवी मंदीर परिसरामध्ये भग्न वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. याच ठिकाणी बुधला माचीकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर तोरणेश्वर महादेवाचे मंदीर आहे. या परिसरात देखील पावसाळ्यात खुप मोठ्या प्रमाणात धुके असते. समोरचा माणूस देखील दिसू शकत नाही. तर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी गेल्यानंतर तोरणा (प्रचंडगड) परिसरातील राजगड, रोहीडा, रायरेश्वर, केंजळगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, महाबळेश्वर, प्रतापगड पर्यंतचा परिसर दिसतो.

बुधला माची :
      गडाच्या पश्चिमेला बुधलामाची आहे. बुधला माचीच्या टोकाला चित्ता दरवाजा आहे. बुधला माचीकडून गडाकडे येत असताना कोकण दरवाजा, टकमक बुरुज, शिवगंगा, पाताळगंगा टाके दिसते. बुधला माचीवरून एक वाट भगत दरवाज्याकडे, तर दुसरी वाट घोडजित टोकाकडे जाते. भगत दरवाजाच्या वाटेने राजगडाकडे जाता येते. पावसाळ्यात या वाटेने जाणे धोक्याचे ठरू शकते, या ठिकाणी अतिशय कठीण वाट आहे. आणि एकदम उभा कातळ कडा आहे.

बालेकिल्ला :
     बालेकिल्ला ही तोरणा (प्रचंडगड) गडावरील सर्वात उंचावरची जागा आहे. बुधला माची परिसरातील सह्याद्रीचे सौंदर्य पाहून पुन्हा परतीच्या वाटेने मेंगाई देवीच्या मंदिराकडे आल्यानंतर बालेकिल्ल्याचे अवशेष दिसतात. बालेकिल्ल्यापासून गडाचा भलामोठा विस्तारही नजरेस पडतो. खरेतर त्याच्या या विस्तारावरूनच शिवाजी महाराजांनी तोरण्याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले होते.

      तोरणा किल्ल्यावर पुणे आणि परिसरातील पर्यटक सुट्ट्यांमध्ये येत असतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या या गरुडाच्या घरट्यावर येणाऱ्या पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा देखावा नजरेत साठवताना, स्वतःची सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून, जास्त उत्साही न होता, गड पाहणे गरजेचे आहे. कारण तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत चढाईस अवघड आहे.


हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे .

Thursday, April 6, 2017

दुर्ग भ्रमंती - राजराजेश्वर राजगड

पाली दरवाजा 
राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी. पुणे जिल्ह्यातील भोर–वेल्हे तालुक्याच्या सीमाभागात असणारा राजगड म्हणजे दुर्गप्रेमी पर्यटकांसाठी मध्यवर्ती किल्ला आहे. तीन दिशांना पसरत गेलेल्या तीन माच्या आणि मधोमध बालेकिल्ल्याची सोंगटी अशी या किल्ल्याची रचना आहे. राजगड किल्ल्यावरून परिसरातील तोरणा, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रायगड, लिगांणा, रोहीडा, रायरेश्वर, लोहगड आणि विसापूर हे किल्ले दिसतात.

नीरा-वेळवंडी नद्यांच्या खोऱ्यात मुरुंबदेवाचा डोंगर आहे. या डोंगरावरचा किल्ला म्हणून बहामनी राजवटीत राजगडास पूर्वी मुरुंबदेव असे नाव होते. मुरुंबदेव किल्ला काही दिवस निजामशाही तर काही दिवस आदिलशाहीच्या आधिपत्याखाली होता. इ.स. १६३० च्या सुमारास शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला, दरम्यान हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या शिवाजी राजांनी मुरुंबदेव किल्ला केंव्हा जिंकून घेतला याची इतिहासात नोंद नाही. परंतु रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर तोरणा किल्ला शिवाजी राजांनी काबीज केला. त्यानंतर मुरुंबदेव काबीज करून त्यावर बांधकाम आणि किल्ल्याची डागडुजी सुरु केल्याचा अंदाज इतिहासावरून लावता येवू शकतो.  मावळ प्रांतात  राज्यविस्तार करण्यासाठी तोरणा आणि मुरुंबदेव हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. इ.स. १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. स्वराज्याची २६ वर्षे राजधानी या व्यतिरिक्त राजगडावर राजारामांचा जन्म आणि महाराणी सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे छत्रपती  शिवाजी  महाराजांचे पहिले राजकीय केंद्र होते. परंतु राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी रायगडावर नेली.

पुणे बसस्थानकाहून महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या बसने किंवा खाजगी वाहनाने गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पुणे-राजगड या बसने वाजेघर या गावी उतरून गुप्त दरवाज्याने राजगडावर जाता येते. पुणे-वेल्हे बसने वेल्हेमार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करून पाली दरवाज्याने राजगडावर जाता येते. हा रस्ता पायऱ्यांचा असून सर्वात सोपा आहे. पुणे-वेल्हे मार्गासनी गावातून साखरगावमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. तेथून गुंजवणे दरवाज्याने राजगडावर जाण्यास थोडासा अवघड रस्ता आहे. तसेच गुंजवणे गावातून एक रस्ता जंगलातून सुवेळा माचीवर येतो.

राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. ४ फेब्रुवारी १७०३ रोजी औरंगजेबाने राजगडावर आक्रमण केले होते. गड जिंकल्यानंतर इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड’ असे ठेवले होते. शत्रूला जिंकण्यास अतिशय कठीण असा "राजराजेश्वर राजगड" त्याच्या वैभवासाठी आणि बालेकिल्ल्याच्या सुरक्षित ठिकाणासाठी स्वतःची इतिहासात वेगळी ओळख दर्शवतो. तर किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी राजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दर्शवतो.

पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग खुप प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या आहेत. पाली दरवाजाचे प्रवेशद्वार उंच आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून पुढे आल्यानंतर एक प्रवेशद्वार आहे. या दुसऱ्या प्रवेशद्वारावर अभेद्य आणि बुलंद बुरुज आहेत. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके आहेत. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत आल्यानंतर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

पद्मावती माची :
राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. या पैंकी सर्वात प्रशस्त आणि विस्तीर्ण माची म्हणजे पद्मावती माची. पूर्वी पद्मावती माचीवर लष्करी केंद्र आणि निवासाचे ठिकाण होते. पद्मावती देवीचे मंदिर, महाराणी सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे, रत्नशाला आणि  सदर या वास्तू आजही येथे आहेत. राजगडावर पद्मावती मंदिरामध्ये रात्रीच्यावेळी पर्यटक राहू शकतील अशी व्यवस्था आहे.
शिवाजी महाराजांनी  किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यानंतर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधल्याची इतिहासात नोंद आहे. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे. मंदीर परिसरातील वास्तुंचे अवशेष आजही छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष म्हणून उभे आहेत.

सुवेळा माची :
सुवेळा माची गडाच्या पूर्वेस आहे. सुर्योदयास सुवेळा माचीवरून सुर्योदय पाहण्यासाठी पर्यटक येत 
असतात. पद्मावती माचीकडून बालेकिल्ल्याकडे जाताना  सुवेळा माची आणि संजीवनी माचीकडे जाण्यासाठी पायवाट आहे. सुवेळा माचीकडे जात असताना वाट निमुळती होत जाते. गडावर  चिलखती बुरूज आणि  चिलखती तटबंदी हे या दोन्ही माच्यांचे वैशिष्ट्य आहे.
शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेतल्यानंतर किल्ल्याच्या पूर्व आणि पश्चिमेकडील डोंगररांगेलवर भक्कम तटबंदी बांधली. गडाच्या पुर्व दिशेस असल्यामुळे या माचीस सुवेळा माची असे नाव म्हणतात. सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे. तसेच रामेश्र्वर मंदिर आणि काळेश्र्वरी बुरुज आहे.

संजीवनी माची :
संजीवनी माची ही गडाच्या पश्चिम दिशेस आहे. पाली दरवाज्याने गडावर गेल्यास संजीवनी माचीकडे जाणारी निमुळती वाट दिसून येते. सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. संजीवनी माचीवर घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीवर विस्तीर्ण पाण्याची टाकी, विशिष्ठ अंतरावर बुरूज तसेच भुयारी मार्ग आहेत. भुयारी मार्गांनी संजीवनी माचीच्या बाहेरील तटबंदीकडे जाता येते.तोरण्यावरून राजगडावर येण्यासाठी संजीवनी माचीवर आळू दरवाजा हा एकमेव मार्ग आहे. आळू दरवाजा सद्य स्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात तसेच पाण्याची टाके देखील आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.

बालेकिल्ला :
राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला.बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. बालेकिल्ल्याकडे जाणारे बिकट चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा महादरवाजा आहे. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननी मंदिर आणि चंद्रतळे आहे. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि संजीवनी माचीचा परिसर दिसतो. उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, राजवाड्यांचे अवशेष आढळतात.

राजगडावरील अभेद्य तीन दिशांच्या तीन माच्या, गडाच्या मध्यावर असलेला बालेकिल्ला, ३ प्रमुख दरवाजे, गडावरील अभेद्य तटरक्षक दुहेरी चिलखती तटबंदी, दुहेरी-तिहेरी बांधणीचे बुरुज हे गडबांधणीतील अभिनव प्रयोग आहेत. शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणीत एका शास्त्राचा वापर करून नवनिर्माणाची उभी केलेली नांदी म्हणजे राजगड असे म्हणता येईल. गडाचे सौंदर्य आणि इतिहास पाहता, गड खरच राजराजेश्वर दुर्गराज शोभतो. राजगड हा दुर्ग वास्तुशास्त्राचा सर्वोत्तम नमुना आहे. बुलंद आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
राजगडचे हे वास्तुवैभव पाहून फक्त मला एवढेच आठवते (साभार संग्रह),

"हे शिवसुंदर मंदिर बघता। क्षणभर थांबे रवी मावळता
दिग्गज आणति अभिषेकाला स्वर गंगेचे घडे ॥
उभे हे राजगडाचे कडे, उभे हे राजगडाचे कडे..."





- नागेश कुलकर्णी 
हा लेख  मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे . 

Monday, April 3, 2017

एम.पी.एस.सी म्हणजे सेवा करण्याची संधी

१० वीची परीक्षा दिल्यानंतर, परीक्षा झाल्याच्या आनंदात काही विद्यार्थी असतात तर काही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना भविष्यात काय करू, कुठे जावू याची चिंता लागलेली असते. त्यावेळी नातेवाईक, मित्र परिवार यांच्याकडून विविध सल्ले दिले जातात. कोणी म्हणत ११ वी १२ वी साठी सायन्स घे आणि पुढे मेडिकल इंजिनियरिंग कर खुप स्कोप आहे. तर कोणी म्हणत आर्ट्स नको घेऊ कॉमर्स घे तिकडे स्कोप आहे. कोणी म्हणत पुढे वकिली कर, वगैरे वगैर सर्व हितचिंतक नवनवीन पर्याय सुचवत असतात. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देवून एम.पी.एस.सी परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या सेवेत प्रशासकीय अधिकारी हो असा हि सल्ला काही जण देतात.
आपण जर स्पर्धा परीक्षा देऊन एम.पी.एस.सी परीक्षेची तयारी करून महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत जावू इच्छित असाल तर एक लक्षात घ्यायला हवे, की मुळात एम.पी.एस.सी आणि यु.पी.एस.सी या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या आहेत. एम.पी.एस.सी ची परीक्षा दिल्यानंतर केवळ महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून निवड होऊ शकते, तर यु.पी.एस.सी.ची परीक्षा दिल्यानंतर देशाच्या प्रशासकीय सेवेत निवड होऊ शकते. त्यामुळे एम.पी.एस.सीची परीक्षा द्यायची आहे असं ठरवल्यानंतर आपण मग ११ वी १२ वी करत असताना सायन्स घेवू अथवा आर्टस् घेवू अथवा कॉमर्स घेवू याचा विचार करू लागतो. अशावेळी खरंतर आर्ट्स घेवून १२ वीची परीक्षा दिल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी बी.ए.ला ऍडमिशन घेऊन अभ्यास सुरू करणे आवश्यक असते. आता बी.ए.च का कराव? हा प्रश्न पडू शकतो, परंतु यामागे देखील कारण आहे, बी.ए. करत असताना अभ्यासक्रमात जे विषय आहेत, तेच विषय पुढे एम.पी.एस.सी च्या अभ्यासक्रमात आहेत.
एम.पी.एस.सी चा अभ्यास करत असताना केवळ पुस्तकी अभ्यास करून थांबता येणार नाही. यासाठी अभ्यासक्रमातील पुस्तकी वाचनासोबतच इतर माहितीपर पुस्तकांच्या वाचनाची देखील आवड असणे आवश्यक आहे. एम.पी.एस.सी चा अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून तो आपल्यामधील सर्वांगीण गुणांचा विकास असतो. त्यामुळे आपण केवळ परीक्षार्थी म्हणून अभ्यास न करता विद्यार्थी म्हणून अभ्यास करणे आवश्यक असते. असे म्हणतात की, एम.पी.एस.सी. च्या परीक्षेत ‘Any Thing Under the Sun’ काहीही विचारू शकतात. त्यामुळे एका विशिष्ठ साच्यातील अभ्यास या परीक्षेसाठी व्यर्थ आहे. एम.पी.एस.सी. चा अभ्यास करत असताना आपण केवळ परीक्षाभिमुख दृष्टीकोन डोळ्यासमोर न ठेवता, समजून उमजून अभ्यास करणे आवश्यक असते. अभ्यास करताना आपणास काय अभ्यास करायचा आहे, यापेक्षा काय नाही करायचं याबबत लक्षात यायला हव.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एम.पी.एस.सी. परीक्षेच्या माध्यमातून राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट (अ) परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट (ब) परीक्षा, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा, सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी-२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट (ब), पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, कर सहायक गट (क) परीक्षा, सहायक परीक्षा आणि लिपिक-टंकलेखक परीक्षा या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षामधून निवड झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या अधिकारातील विविध पदांवरती नियुक्ती केली जाते. उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, डी.वाय.एस.पी., सी.ओ., पी.एस.आय. अशा विविध पदांवर उमेदवार नियुक्त केले जातात. त्यांना नियुक्तीपूर्वी पुण्यातील यशदा या संस्थेमध्ये प्रशिक्षण देखील दिले जाते.

उमेदवारांची पात्रता :
डिसेंबर २०१६ मध्ये एम.पी.एस.सी.ने प्रकाशित केलेल्या जाहिरातीतील सूचना पत्रकानुसार उमेदवाराचे वय एम.पी.एस.सी. राज्यसेवा, मुख्य परीक्षेच्या वेळी १९ वर्षांपेक्षा कमी नसावे अथवा ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. मागासवर्गीय गटातील आणि अनुसूचित जाती- जमातींमधील उमेदवारास वयाच्या ४३ व्या वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. अंध, कर्णबधिर अथवा अस्थीव्यंग्य असणाऱ्या उमेदवारांना ही परीक्षा देण्यासाठी खुल्या गटापेक्षा १० वर्षे अधिक शिथिलता असते.
वयाची १९ वर्ष पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देवू शकतो. तसेच यु.पी.एस.सी. परीक्षेप्रमाणे एम.पी.एस.सी. परीक्षा उमेदवारांनी किती वेळा द्यावी यावर आयोगाकडून कोणतेही बंधन नाही. आपण वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देवू शकतो. परंतु परीक्षा देण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) असणे आवश्यक आहे. ‘राज्य सेवा मुख्य परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं.

एम.पी.एस.सी. परीक्षेचे स्वरूप :
मुख्यत्वे ही परीक्षा- पूर्व परीक्षा (प्रिलिम्स), मुख्य परीक्षा (मेन्स) आणि मुलाखत (इंटरव्यू) अशा तीन स्तरांवर घेतली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या क आणि ड वर्गाच्या परीक्षांसाठी मुलाखत घेतली जात नाही. तसेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी देखील घेतली जाते. ही परीक्षा सापशिडीप्रमाणे असते तुम्ही या तीन टप्प्यातील एका परीक्षेतून बाद झालात तर तुम्हाला परत पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते.
पूर्व परीक्षा: राज्यसेवा पूर्व परीक्षा ही वैकल्पिक (मल्टिपल चॉईस) प्रकारची असून त्यात सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) आणि बुद्धिमत्ता चाचणी (CSAT) या प्रत्येकी २०० गुणांच्या दोन पेपर्सचा समावेश असतो.
पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन या विषयाचा अभासक्रम विचाराल तर त्यामध्ये भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह), भारताचा भूगोल (महाराष्टाच्या संदर्भासह), पर्यावरण, अर्थकारण, महाराष्ट्रातील समाजसेवक, राज्यघटना आणि शासन व्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान,  गणिती क्षमता, चालू महाराष्ट्र संबंधी घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी हे विषय असतात. यामध्ये महाराष्ट्रासंबंधी घटनांवर आधारित विषयांवर अधिक प्रश्न असतात.

मुख्य परीक्षा: मुख्य परीक्षा ही देखील पूर्व परीक्षेप्रमाणे वैकल्पिक प्रकारची असून यु.पी.एस.सी. प्रमाणे लेखी अर्थात लघु किंव दीर्घ उत्तर स्वरूपाची नसते. आयोगाने ठरवल्याप्रमाणे मुख्य परीक्षा ही ८०० गुणांची असून त्यात ६ पेपर असतात. यापैकी सामान्य अध्ययनासाठी एकूण ६०० गुण (सामान्य अध्ययन पेपर १, २, ३, ४ - प्रत्येकी १५० गुण) तर मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी प्रत्येकी १०० गुण असतात. यासाठी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेत स्थळाला भेट देवून अधिक माहिती मिळवू शकतो.
मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपरमध्ये पहिला पेपर इतिहास-भूगोलचा, दुसरा भारतीय राज्यघटना आणि प्रशासन (महाराष्ट्राच्या संदर्भासह), तिसरा मानव संसाधन विकास आणि अधिकार तसेच चौथा पेपर अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवर आधारित असतो.

मुलाखत: मुलाखतीचा टप्पा या परीक्षेतील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. एम.पी.एस.सी.कडून सर्व गटातील परीक्षेसाठी वेगवेगळ्या स्तरांवर मुलाखत घेतली जाते. राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची मुलाखत घेतली जाते. तज्ञ व्यक्तींचे सुमारे पाच सदस्यीय पॅनल एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेते. यामध्ये उमेदवारांच्या नेतृत्वगुणांचा, संभाषण कौशल्याचा आणि विचारशक्तीचा विशेष विचार केला जातो. मुलाखतीच्या या प्रक्रीयेतुन उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्रातील विविध प्रशासकीय पदांवर नियुक्ती केली जाते. यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून किती उमेदवारांची मागणी आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पदांसाठी जाहिरात काढत असते.

एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होवून महाराष्ट्र राज्याच्या सेवेत प्रशासकीय अधिकारी होवू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना शेवटी एवढच सांगावस वाटत की, आपण केवळ शासकीय नोकरीत जाण्याच्या उद्दिष्टाने या परीक्षेची तयारी करणे अपेक्षित नाही. तर देश सेवा करण्याची संधी उपलब्ध होत आहे, सामाजिक क्षेत्रात आपल्या कल्पनेतून काही कल्पक गोष्टी राबवून आपण लोकांसाठी काही तरी करू शकतो. या भावनेने आपण जर या परीक्षेस सामोरे गेलात तर यश नक्की मिळेल. बाकी अभ्यास करणे, यश मिळणे न मिळणे हा प्रक्रियेचा भाग आहे. या क्षेत्रात येवून स्पर्धा परीक्षांची तयारी करणार असाल तर. सर्वकाळ सर्व शुभेच्छा !

Wednesday, March 29, 2017

दुर्ग भ्रमंती - शिवालय शिवनेरी

शिवनेरी गडावर इतिहास जन्माला आला !  त्यामुळे या गडास “शिवालय शिवनेरी” असे म्हणता येईल. शिवकालीन सर्व किल्ल्यांचा स्वतःचा असा विशिष्ठ इतिहास आहे. शिवरायांच्या जन्माच्या पूर्वीपासून नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर असलेला किल्ला शकांच्या राजधानीचे ठिकाण म्हणून ओळखला जात असे. त्यावेळी नाणेघाटमार्गे खुप मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता दुर्गांची निर्मिती करण्यात आली. त्यात शिवनेरी देखील निर्माण करण्यात आला. शकांनंतर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट या राजवटींच्या अधिपथ्याखाली हा किल्ला राहिलेला आहे. जुन्नर गावामध्ये असल्यामुळे आणि जुन्नर ही नाणेघाट मार्गावरील मोठी बाजारपेठ असल्यामुळे या किल्ल्यास विशेष महत्व होते. परंतु खरेतर यादवांच्या कालखंडात शिवनेरीस भव्य गडाचे स्वरूप प्राप्त झाले. पुढे बहमनी राजवटीने गडाची डागडुजी करून गडावर वास्तव्य वाढवले. इ.स.१४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. आणि गड निजामशाहीच्या देखरेखीखाली आला.
गडावर शिवाई देवीचे मंदीर आहे. इ.स. १५९५ मध्ये जुन्नर प्रांत आणि शिवनेरी किल्ला मालोजीराजे भोसले यांना निजामशाहीकडून देण्यात आला. पुढे शहाजीराजे भोसले निजामशाहीत असताना शिवनेरी किल्ला शहाजी राज्यांच्या अधिकार क्षेत्रात आला. शहाजी राजांच्या पत्नी राणीसाहेब जिजामाता गरोदर असताना, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शिवनेरी गडावर पाठवण्यात आले होते. त्यावेळी राणीसाहेब जिजाऊनी गडावरील भवानी शिवाई देवीस नवस केला होता. पुत्ररत्न प्राप्त झाले तर त्यास तुझे नाव ठेवीन.

शिवनेरी गडावर “भवानी सिवाई” देवीचे मंदीर आहे, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन.

जिजाबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानुसार बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. हे बाळ  शिवाजी पुढे स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजीराजे या नावे आज ही महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत आहेत. शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. त्यामुळे शिवनेरी गडावर महाराष्ट्र शासनाकडून शिवजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पुण्याहून शिवाजीनगर बस स्थानकातून जुन्नरला जाण्यासाठी बस आहेत. पुणे-नाशिक मार्गावर नारायणगावमार्गे जुन्नरला शिवनेरी गडाच्या पायथ्यापर्यंत पोचता येते. मुंबईहून माळशेजघाटमार्गे जुन्नरला येण्यास मार्ग आहे. जुन्नर गावातून शिवनेरी गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

सात दरवाज्यांची वाट : जुन्नर गावामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूस असलेल्या मार्गाने चालत गेल्यास गडाच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते. या मार्गाने गडाच्या पायथ्यापर्यंत वाहन घेऊन जाता येत. पुढे गडावर जाताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच आपण जसे जसे पुढे गडावर चालत जावू तसे आपणास जुन्नर परिसरातील असलेल्या लेण्याद्रीच्या लेण्या गडाच्या उत्तर बाजूस दिसू लागतात. अष्ट विनायकांपैकी एक असलेला लेण्याद्री जुन्नरपासून खुप जवळ आहे. येथे गणेश लेणी आहेत. अष्ट विनायक यात्रा करणारे पर्यटक आणि भाविक यानिमित्ताने या परिसरात येत असतात.

साखळीची वाट : जुन्नर गावातून गडाकडे जात असताना एक पायवाट आपल्याला सात दरवाज्यांच्या वाटेकडे जाताना दिसते. त्या वाटेने शिवनेरी गडावर सात दरवाज्यांच्या वाटेपेक्षा लवकर पोचता येते.
पायवाटेने चालत गेल्यास गडाच्या पायथ्याच्या कातळ भिंतीपर्यंत जाता येते. या कातळ भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने गडावर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड आहे. परंतु या मार्गाने गडावर पोचल्यास शिवजन्म स्थळाच्या ठिकाणाकडे लवकर  पोहचता येते.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : गडावर आलेले पर्यटक वन विभागाकडून राखली जाणारी परिसरातील स्वच्छता आणि वनराई पाहून आनंदित होतात. खास करून गडावर असलेला बगीचा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतो. गडावर लाईट आणि पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शिवाई देवीचे मंदिर : सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर जाताना शिपाई दरवाज्यातून पुढे गेल्यानंतर गडाकडे जाणारी मुख्य वाट सोडून उजव्या बाजूस समोर ‘शिवाई देवीचे’ मंदिर दिसते. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. मंदिर परिसरात मागील बाजूस असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. गडाच्या कातळात उभे असलेल्या देवीच्या मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात आलेला असून, मंदिर परिसर सुशोभित करण्यात आलेले आहे.

अंबरखाना : शेवटच्या कुलाबकर दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. गडावरती ज्यावेळी वस्ती होती त्यावेळी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. आजच्या परिस्थितीत अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. अंबरखान्याचे भग्न अवशेष आजही शिवकालीन मावळ्यांच्या सामर्थ्याची आठवण करून देतात.

कोळी चौथरा : अंबरखान्यापासून पुढे गडाकडे जात असताना दोन मार्ग दिसतात. त्यातील एक मार्ग समोर दिसणाऱ्या टेकाडाकडे जातो. या टेकाडावर एक चौथरा आहे. निजामशाहीच्या पाडावानंतर आदिलशाहीचे आणि मोगलांचे त्यांच्या सीमावर्ती भागाकडे थोडेसे दुर्लक्ष होत होते. याचा फायदा घेऊन महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी  मोगलांनी महादेव कोळ्यांवर आक्रमण करून, शिवनेरीला वेढा दिला. त्यामुळे महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे शरणागती पत्करली. मुघल सैन्याकडून महादेव कोळी सैन्याचे अतोनात हाल करण्यात आले. गडाच्या माथ्यावरील चौथऱ्यावर महादेव कोळी सैन्याचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्यास कोळी चौथरा म्हणतात. कालांतराने त्या चौथऱ्यावर एक घुमट बांधून त्यावर फारसी भाषेमध्ये लिहिलेले दोन शिलालेख लावलेले आहेत.

शिवकुंज : अंबरखान्यापासून गडाकडे जाणारा दुसरा मार्ग शिवकुंजाकडे घेवून जातो. या मार्गाने जात असताना वाटेत पाण्याची अनेक टाकी लागतात. त्यात गंगा जमुना टाके देखील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या शिवकुंजात जिजाउंच्या पुढे उभे असलेल्या  बाल शिवाजीची पंचधातूची मुर्ती आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे. त्यासमोरच खाली पाण्याचे टाके आहे. कमानी मशिदी जवळून पुढे चालत गेल्यास हमामखाना आहे. तेथून पुढे उत्तरेकडे चालत गेल्यानंतर शिवजन्म स्थानाची इमारत आहे.

शिवजन्म स्थळ 
शिवजन्मस्थळ : शिवजन्म स्थानाची दगडी इमारत दुमजली असून, इमारतीच्या खालच्या खोलीमध्ये शिवरायांचे जन्मस्थळ आहे. तेथे शिवरायांचा अर्धाकृती पुतळा आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर देखील भव्य कोरीव काम केलेल्या दगडी भिंती आहेत. येथून जुन्नर गाव आणि परिसर दिसतो. तसेच गडावरून नाणेघाट आणि जीवधन परिसर दिसतो. गडाच्या उत्तरेस समोर दिसणारा वडूज धरणाचा जलाशय पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. परिसरात किल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष आहेत.

बदामी टाके : शिवजन्म स्थळाकडून कडेलोट टोकाकडे जाताना बदामाच्या आकाराचे पाण्याचे ‘बदामी टाके’ आहे. बदामी टाक्याचा संपूर्ण घेर दगडी बांधकामाचा असून, तळास देखील दगड आहे. बदामी टाक्यापासून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकाकडे जातो.

कडेलोट टोक : शिवनेरी किल्ल्याच्या उत्तरेस कडेलोट टोक आहे. अपराध्यांना शिक्षा देण्याकरिता  कडेलोट टोकावरून त्याचा कडेलोट केला जात असे. कडेलोट टोकावरून लेण्याद्री परिसर अगदी जवळ असल्यासारखा दिसतो.
स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास महाराष्ट्राच्या दर्‍या-खोर्‍यांशी, डोंगरकडांशी जोडलेला आहे. या डोंगररांगांमधील घडलेल्या इतिहासाची साक्ष देणारे गडकोट किल्ले, आजही आपणासमोर साक्षीदार म्हणून उभे आहेत. या किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि या किल्ल्यानीच स्वराज्य स्थापन केले. थोडक्यात स्वराज्याच्या उभारणीत इतर किल्ल्यांप्रमाणे शिवनेरीचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी शिवालय शिवनेरीस भेट देऊन, गडावरील पवित्र वस्तूच्या सानिध्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे.

हा लेख मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला आहे.

Thursday, March 16, 2017

प्रश्नार्थक ‘उत्तर’ प्रदेश

देशातील सर्वात मोठे राज्य असून देखील उत्तरप्रदेशचे अनेक प्रश्न आहेत. परंतु तेथील स्थानिक जनतेला त्याची उत्तरे मात्र मिळत नाहीत. केंद्रीय राजकारणात असे म्हणतात कीदेशाच्या पंतप्रधान पदाचा मार्ग उत्तरप्रदेश मार्गे जातो. देशाला पंडित नेहरूंपासून ते अटल बिहारी वाजपेयीजी पर्यंतची राजकीय उंची असणारे पंतप्रधान देणारे उत्तर प्रदेश राज्य आजही जाती व्यवस्थागरिबी आणि बेरोजगारी या समस्यांचा सामना करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली तरी तेथील अनेक स्थानिक समस्या जैसे थे आहेत. उत्तर प्रदेशच्या जनतेने आजवर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना राज्यात आलटून पालटून सत्ता देतानाअनेक वेळा स्पष्ट बहुमतातील सरकारं दिली आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील इतर छोट्या राज्यांमध्ये त्रिशंकू सरकार सत्तेत येत असतानाविधानसभेत ४०३ जागा असणाऱ्या उत्तरप्रदेशच्या जनतेने कॉंग्रेससमाजवादी पार्टीसह भाजपला देखील आजवर अनेक वेळा स्पष्ट बहुमत दिलेले आहे. परंतु उत्तर प्रदेशमधील जनतेला याचा आजवर किती फायदा झाला अथवा याचे फलित काय हे पाहणे आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्रीमंत्री म्हणून काम केलेल्या राजकीय नेत्यांचे केंद्रीय मंत्री मंडळात वजन वाढते. हे आजवरचा इतिहास सांगतो. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भुषवणारे चरणसिंग आणि व्ही. पी. सिंग हे तर देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते. ‘गरिबी हटाव’ची घोषणा देणाऱ्या इंदिरा गांधी यांचा लोकसभा मतदार संघ उत्तर प्रदेशमधील आहे. गांधी -नेहरू कुटुंबाची राजकीय वाटचाल उत्तर प्रदेशातून सुरु होते. तरी देखील कॉंग्रेस पक्ष आजही उत्तर प्रदेशमध्ये गरिबीबेरोजगारीशेतीच्या समस्याअन्न सुरक्षा योजनामनरेगा या मुद्द्यांवरच निवडणुका लढत आहे. तर दुसरीकडे स्वतःला गरीब आणि दलितांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या सुश्री मायावती आजही जातीय समीकरणे जुळवत निवडणुका लढवत आहेत. या स्पर्धेत मागे नसलेल्या समाजवादी पक्षाच्या अंतर्गत यादवीतून सावरतविकास करू म्हणणाऱ्या अखिलेश यादव यांनी देखील सत्तेत असून देखील काही ठराविक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली. परंतु भाजपने स्थानिक मुद्दे आणि केंद्रातील भाजपचा विकासाचा अजेंडा या मुद्द्यावर निवडणूक लढवतबहुमताने सत्ता स्थापन केली. या निवडणूक निकालावरून लक्षात येते कीउत्तर प्रदेशच्या स्थानिक जनतेला नेमक काय हवं आहे.

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. त्या प्रमाणात येथे गरिबीबेरोजगारीदुष्काळ या समस्या इतर राज्यांपेक्षा अधिक आहेत. याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेश मधून इतर राज्यांमध्ये कामानिमित्त विस्थापित होणाऱ्यांची समस्या देखील अधिक आहे. देशातील दिल्लीमुंबई आणि कलकत्ता यासारखी महानगरे या समस्येचा आजही सामना करत आहेत. तर मुंबई सारख्या महानगरात प्रादेशिक विरुद्ध बाहेरचे (उत्तर प्रदेशचे) हा वाद देखील आपणास दिसून येतो. उत्तर प्रदेशमध्ये शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठी दरी दिसून येते. एका बाजूस उत्तर प्रदेशबिहारमधून देशाच्या प्रशासकीय सेवेत दाखल होणाऱ्या युवकांची संख्या इतर राज्यांच्या प्रमाणात खुप जास्त आढळते. तर दुसरीकडे देशाच्या अनेक भागात पाणीपुरी विकणारेकामगार म्हणून काम करणारे भैय्या लोक देखील उत्तर प्रदेशचेच असल्याचे दिसून येते. ही एवढी प्रचंड सामाजिकआर्थिक दरी का निर्माण होते ? यास उत्तर प्रदेशातील स्थानिक लोक कारणीभूत आहेत ? की सत्तेवर असणारे राजकीय पुढारी कारणीभूत आहेत ? याचे उत्तर मात्र आजही अस्पष्टच आहे.

     देशातील गरीबीवर विश्लेषण करताना रंगराजन समितीच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशमधील ३९.८ % जनता दारिद्रय रेषेच्या खाली आहे. तर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात उत्तर प्रदेशचा वाटा महाराष्ट्राच्या तुलनेत कमीच राहिलेला आहे. देशात जीडीपीच्या बाबतीत उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. आजही उत्तर प्रदेशातील मध्यम वर्गीय शेतकरी दुष्काळशेतकरी आत्महत्यारासायनिक खतांची समस्याकृषी मालाला हमी भाव या मुद्द्यांवर तोडगा निघावा याकरिता आशावादी आहेत. केंद्रातील भाजप सरकारने युरियाचे निम कोटिंग करणेउत्तर प्रदेशातील अनेक छोट्या गावांमध्ये आज ही वीज नव्हती. त्या ठिकाणी वीज पोहचवणेअशी काही कामे केली आहेत. यामुळेच २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने मतांचा कौल दिला आहे. या पुढे देखील भाजपने मुख्य स्थानिक प्रश्नांना हात घालतउत्तर प्रदेशसाठी पुढील काळात काम करत राहणे आवश्यक आहे.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश हे गंगेच्या सुपीक मैदानी प्रदेशातील एक मोठे राज्य आहे. देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात उत्तर प्रदेश अग्रेसर असते. तरी देखील आज ही येथील स्थानिक समस्या पाहताअसे दिसते कीआजवर उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर आलेल्या सरकारांनी मूळ समस्यांवर तोडगा न काढताकेवळ त्या समस्यांचा राजकीय लाभ घेण्याकरिता उपयोग करून घेतलेला आहे. उत्तर प्रदेशातील वाढत्या गुंडाराजवर कोणताही राजकीय पक्ष काहीही बोलण्यास तयार नसतो. केवळ निवडणुकींच्या तोंडावर गुंडाराज ही समस्या असल्याचे राजकीय पक्षांकडून दाखवले जाते. निवडणुकीनंतर मात्र यावर कोणीही भाष्य करत नाही. येथील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्यातील सत्ताधाऱ्यांनी यावर योग्य उपाय शोधणे आवश्यक आहे. कारण २०११ च्या देशातील गुन्हेगारी अहवालानुसार उत्तर प्रदेशात गुन्हेगारीचे प्रमाण इतर राज्यांच्या प्रमाणात अधिक आहे. देशातील एकूण पोलीस संख्येपैकी ९.५० % पोलीस एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. तरी देखील येथे गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे.        

उत्तर प्रदेश राज्यामध्ये भविष्यात सत्तेत येणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा जोपासताना तेथील स्थानिक प्रश्नांना हात घालतविकास करणे आवश्यक आहे. कारण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आज ही उत्तर प्रदेशला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेच्या प्रश्नांवर उत्तरे शोधायची असतील तर यापुढे भाजपची जबाबदारी वाढली आहे. भाजपचे केंद्रातील सरकार जो विकासाचा अजेंडा देशभर राबवत आहे. तोच अजेंडा उत्तर प्रदेशमध्ये देखील राबवला जाणे अपेक्षित आहे. तरच प्रश्नार्थक उत्तर प्रदेशप्रश्नार्थक न राहता स्वतःची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल.

हा लेख मी दैनिक मुंबई तरुण भारत (Web Edition) साठी लिहिलेला आहे.

Tuesday, March 14, 2017

दुर्ग भ्रमंती - दुर्गराज रायगड

गड कसा पहावा याच देखील एक तंत्र असत, प्रत्येकाने गडाची वाट चालत असताना हे तंत्र पाळत आणि गडाचे सौंदर्य अनुभवत दुर्ग भ्रमंती करायला हवी. दुर्ग भ्रमंती करत असताना ज्या व्यक्तीचे वाचन आहे, तो व्यक्ती कल्पनाशक्तीच्या आधारे गडांचे सौंदर्य आणि इतिहास अनुभवू शकतो. मात्र त्यासाठी दुर्ग भ्रमंती आवश्यक आहे.

रायगड(पाचाड). जि.रायगड. महाराष्ट्र. स्वराज्याच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या दुर्गराज रायगडास इतिहासात आजवर विविध नावांनीसंबोधिले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जम्बूद्वीप, राजगिरी, भिवगड या नावांनी इतिहासत रायगडास ओळखले जात असे.
मुंबईहून रायगडला जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून महाडपर्यंत येऊन पुढे पाचाड (रायगड पायथा) पर्यंत जाता येते. पुण्याहूनभोरमार्गे वरंधा घाटातून महाडला परिवहन महामंडळाच्या बसेस असतात. पुढे पाचाड गावापर्यंत महाडहून बस तसेच टमटम, गडाच्या पायथ्यापर्यंत जातात. पुढे गडावर जाण्यासाठी रोप वे ची देखील सुविधा आहे. तसेच गडावर पायऱ्या चढून देखील जाता येते. परंतु गडाच्या पायऱ्या चढून जाण्यात जी मजा आहे ती रोप वे ने जाण्यात नाही. शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर येत असतात. तसेच अनेक शिवप्रेमी गडावर नियमितपणे येत असतात. मुख्यत्वे पावसाळ्यामध्ये रायगडावर अधिक पर्यटक असतात.
रायगडावर केवळ पर्यटक म्हणून जायचे असेल तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा अप्रतिम गड पाहण्यासाठी नक्की जा. स्वराज्याच्या राजधानीस भेट देण्यासाठी रायगड वारी करायची असेल तर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर जात असताना तिथे आपल्याकडून काही वेगळी हरकत होणार नाही याची नक्की काळजी घ्या. गडाचे पावित्र्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी गडावर स्वच्छता राखण्याचे काम आपणच करणे गरजेचे आहे.
रायगडावर इतिहासाची आठवण करून देणाऱ्या आणि स्वतःचे पावित्र्य टिकवून असलेल्या ठिकाणी फिरत असताना जो अनुभव येतो, तो अद्भुत आहे. त्याबाबत माहिती...

पाचाडचा आईसाहेब जिजाबाईंचा वाडा आणि समाधी :
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंची समाधी आहे. तसेच उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा सहन होत नसे, त्यामुळे महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळ एक वाडा बांधून दिला होता. पाचाड गावात या वाड्याचे अवशेष सुस्थितीत आहे. येथे असलेली तक्क्याची विहीर तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासाठी पर्यटक विशेष गर्दी करतात. वाड्याच्या परिसरात फिरत असताना जिजाऊ मासाहेब आणि त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांच्या सर्व कल्पनांचा येथे भास होतो. तुम्ही जर रायगडावर मुक्कामी जाणार असाल तर याठिकाणी संध्याकाळी नक्की भेट द्या.
महादरवाजा:
दुर्गराज रायगड चढत असताना सुरुवातीस वाटेवर असणाऱ्या महादरवाज्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. तसेच महादरवाज्याच्या दोन्ही बाजूस भव्य बुरूज आहेत. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांसाठी आणि संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत आणि डावीकडे हिरकणी बुरूजापर्यंत भक्कम तटबंदी बांधलेली आहे.

हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव:
महादरवाज्यातून थोडे पुढे गडाकडे जात असताना हत्ती तलाव समोरच दिसतो. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता हा तलाव बांधण्यात आलेला होता. हत्तीतलावापासून जवळच गंगासागर तलाव आहे. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि नद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकलेली होती. त्यामुळेच या तलावाचे गंगासागर असे नाव अस्तित्वात आले आहे. गडावर आजही या पाण्याचा उपयोग केला जातो.
सायंकाळी या परिसरात पक्षांचा मधुर आवाज ऐकायला येतो, येथे जवळच निवासाची सुविधा असल्यामुळे तलावातील पाणी आणि गडाचे सौंदर्य जवळून पाहता येते.

हिरकणी टोक (हिरकणी बुरुज) :
गंगासागराच्या पश्चिमेस चिंचोळी वाट हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी गवळणीची एक कथा हिरकणी टोकाशी संबंधित असल्यामुळे या बुरुजास हिरकणी बुरुज असेही म्हणतात. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावरून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे स्पष्टपणे दिसतात.

पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजा:
मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. तर पालखी दरवाज्याने प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो.त्याच्या जवळच राण्यांचे महाल दिसून येतात. सारे अवशेष रूप आज याठिकाणी अस्तित्वात आहे.

राजसभा आणि राजभवन:
महाराजांचा राज्याभिषेक राजसभा येथे झाला होता. येथे पूर्वेकडे तोंड करून असलेल महाराजांचे सिंहासन आहे. येथून मागील बाजूने बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की एक राजभवनमध्ये प्रवेश करता येतो. जवळच खलबतखाना देखील आहे.
राजसभा परिसरात गेल्यानंतर समोरच आसनस्थ छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती दिसून येते. येथे आजही सभा भरत असावी असा भास होतो. महाराजांची नेत्र दिपक मुर्ती सर्वांचे मन मोहून घेते.

बाजारपेठ:
राजभवनाकडून महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात असताना समोर होळीचा मळा लागतो. तेथे छत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुढे जात असताना पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात,तेथे पूर्वी बाजारपेठ होती. भव्य बाजारपेठेचे अवशेष आजही पर्यटकांना आकर्षित करतात.
बाजारपेठेतून जात असताना इतिहासात तेथील वैभव काय असेल याची जाणीव होते. अगदी याची देही याची डोळा प्रसंग समोर उभा राहावा, अशा ठिकाणी मोकळ्या जागेत बाजारपेठ वसलेली आहे.

टकमक टोक:
बाजारपेठेच्या समोरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. टकमक टोकाचा इतिहासात आहे. टकमक टोक हे गडावरील सर्वात उंच ठिकाण असून, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट केला जात असे.
टकमक टोक म्हणजे, गडावरील सर्वात उंच ठिकाण. टकमक टोकाकडे जात असताना जागा निमुळती होत जाते, अन आपल्या ह्रदयाचा ठोका वाढत जातो. इतिहासात या ठिकाणी कित्येक जणांचा कडेलोट झाला असावा आणि त्यांचे पुढे काय झाले असावे. याचा विचार आपण टोकाच्या शेवटी जावून नक्की करायला लागतो.

शिरकाई देवी मंदिर आणि जगदीश्वर मंदिर:
शिरकाईदेवी ही गडावरील मुख्य देवता आहे. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे.
महाराजांच्या समाधी स्थळाकडे पुढे जात असताना समोर दिसणारे भव्य मंदिर जगदीश्वराचे आहे. जगदीश्वराच्या मंदिरासमोर नंदीची मोठी भग्रावस्थेतील मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यास समोर हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात असताना, पायऱ्यांच्या खाली एक शिलालेख दिसतो. ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर’. रायगडाची बांधणी करत असताना हिरोजी इंदुलकर यांनी हा शिलालेख येथे लावलेला आहे.

महाराजांची समाधी:
जगदीश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजापासून बाहेर पडताच समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसते. महाराजांच्या समाधी स्थळावर महाराजांची महती सांगणारी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. या परिसरातील शांतता आणि स्वच्छता पाहता पर्यटक आणि शिवप्रेमी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी सतत गर्दी करत असतात.
महाराजांच्या ध्यानस्थ समाधी स्थळाजवळ जायची योग्य वेळ म्हणजे, सुर्योदय. सकाळी सकाळी महाराजांच्या समाधीवर पडणारी सोनेरी सुर्यकिरणे महाराजांसमोर नतमस्तक होण्यास आतुर असतात असा भास या ठिकाणी होतो.

वाघ्या कुत्र्याची समाधी :
महाराजांवर अंत्यसंस्कार सुरु असताना त्यांच्या चीतेमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी घेतली होती, असे इतिहासात म्हटले जाते, या वाघ्या कुत्र्याची समाधी महाराजांच्यासमाधीच्या परिसरातच आहे.

भवानी टोक :
महाराजांच्या समाधी स्थळाकडून पूर्वेकडे चालत गेल्यास शेवटी भवानी टोक अशी पाटी लावलेली दिसते. तुळजापूरच्या दिशेने असलेले भवानी टोक हे गडाच्या पुर्व दिशेचे शेवटचे टोक आहे. येथे भवानी देवीचे एक मंदिर आहे. समोर सह्याद्री पर्वत रांगेतील सौंदर्याने नटलेला परिसर पाहण्यासाठी पर्यटक येथे खास करून पावसाळ्यामध्ये येत असतात. भवानी टोकाकडून महाराजांच्या समाधी स्थळाकडे येत असताना महाराजांचे समाधी स्थळ आकर्षक आणि महादेवाच्या पिंडीप्रमाणे स्थिर आणि चीरशांत, ध्यानमग्न असल्यासारखे दिसते. सह्याद्रीच्या रक्षणार्थ कटीबद्ध असलेला हा दुर्ग इतिहासाची साक्ष आहे.
आपल्या पुर्वजांनी आपल्यासाठी इतिहासाची साक्ष म्हणून जोपासलेला सांस्कृतिक वारसा दुर्गराज रायगड टिकवून आहे. रायगडाने अनेक आक्रमणे पाहिली आहेत. अनेक लढाया लढल्या आहेत. परंतु तो अजून ही उभा आहे. स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या या दुर्गराजास आपण वेळ काढून नक्की भेट दयायला हवी. आणि हा वारसा पुढील पिढ्यांसाठी अभिमानास्पद ठरावा याकरिता आपण प्रयत्न करायला हवेत.
                  
मुंबई तरुण भारतसाठी दुर्ग भ्रमंती ही लेख माला सुरु केली आहे. त्या लेख मालेतील हा पहिला लेख.
                                                     नागेश कुलकर्णी.